RSS

निवडणुकीचा थरार – भाग १

खरं तर या शीर्षकाला काहीच अर्थ नाही …. आपलं काही तरी मसालेदार शीर्षक द्यायचं म्हणून दिलं इतकच. पण कधी कधी मात्र एखाद्या इंग्रजी चित्रपटाला लाजवेल इतका थरार अनुभवायला मिळतो. याची सुरुवातच मुळी जेंव्हा निवडणुका जाहीर होतात तेंव्हा पासून होते आणि हा थरार सत्ता मिळवून एखादे पद पदरात पडे पर्यंत राहतो. ज्या प्रभागात किंवा मतदारसंघात निवडणूक होणार असते त्यात वेगळेच वातावरण निर्माण होते. मोर्चेबांधणी आणि चमचेगिरीला ऊत येतो. असेच काही काही निवडणुकीतील थरार या लेखात दिले आहेत. उगाच गांभीर्याने घेऊ नका ….. ;)

थरार निवडणुकी पूर्वीचा:
निवडणूक … मग ती कुठल्याही स्तरावरची असो, त्यात अनेक थरार, अनपेक्षित घडामोडी आणि कधी कधी करमणुकीचे किस्से पण होतात. अगदी मागच्या निवडणुकीत काय झाले, कोण किती आपटलं, कुणी कुणाला खाल्लं इथपासून ते कुणाची लायकी नसताना निवडून आलं …. वगैरे वगैरे. नाक्या नाक्या वर गप्पा रंगतात. कितीही काहीही झालं तरी या वेळी आमच्या पक्षाचाच नेता येणार असे छातीठोक पणे सांगत कार्यकर्त्यांची अस्मिता जगी होते. हा हा म्हणता निवडणुकीचा ज्वर का काय म्हणतात तो सगळी कडे पसरू लागतो. अर्थात याची बाधा निद्रिस्त, उदासीन सामान्य नागरिकांना होत नसल्याने त्यांनी चिंता करायची गरज नसावी. या निवडणुकीच्या ज्वरावर काहीही इलाज नाही. तो जसा चढतो तसाच आपोआप उतरतो किंवा उतरवला जातो. ;) .

असे ज्वरबाधित इच्छुक उमेदवार आणि हौशी कार्यकर्ते यांच्या अपेक्षांच्या दोरीवर पक्षश्रेष्ठी डॉबार्याप्रमाणे कसरत करत असतात आणि त्यांचे चमचे खाली ढोल वाजवत असतात. चमचे ढोल वाजवून दमले किंवा “वरून आदेश” आला की ही पक्षश्रेष्ठी ही कसरत थांबवतात. या नंतर चालू होतो तो मुलाखती आणि भेटीगाठींचा खेळ. आणि आता तर एका पक्षाने तर नवीनच टूम काढली आहे …. लेखी परीक्षा घेण्याची. मग त्या साठी अभ्यास, कोचिंग वगैरे ओघाओघाने आलंच. कधी शाळा कॉलेज मध्ये अभ्यास केला नसेल अशी तयारी इच्छुक उमेदवारांनी केली होती म्हणे. त्यांची पेपर तपासणी कुणी केली? कोण कोण पास झालं? हे सगळं गुलदस्त्यातच. अर्थात हा त्या त्या पक्षाचा वैयक्तिक प्रश्न आहे. हे सगळं होत असतानाच “लोणी लावणे”, “अंडी कुरवाळणे” ई. वाक्प्रचारांचा अर्थ तंतोतंत कळतो. पक्षातील वजनदार मंडळी निवडणुकी साठी आपल्या कुणाकुणाची वर्णी लागावी म्हणून घाम गाळत असतात. स्पेशल न झिजणारे जोडे घालून खेटे मारत असतात. सर्वात धम्माल असते जेंव्हा एखादा प्रभाग किंवा मतदारसंघ “स्त्रियांसाठी आरक्षित” होतो तेंव्हा. मग हीच मंडळी “यंदा मला नाही तर निदान माझ्या बायकोला तरी उभी करा” अशी याचना करत असतात. अशी लाचार लोकं म्हणजे पांढऱ्या कपड्यातील भिकारीच. या सगळ्या दिव्यातून जो तरतो त्याच्या साठी “गगन ठेंगणे” भासू लागते. ही निवडणूक जिंकण्यासाठी मीच एक लायक आहे अश्या आविर्भावात तो फिरू लागतो. त्याच्या मागे त्याचे समर्थकतर “साहेब आपल्याशिवाय वाली नाही” असे म्हणून त्यालाच भावी विजेता ठरवू लागतात. तिकीट मिळाल्या नंतर त्याचे जवळ/लांबचे नातेवाईक फुकटचा भाव खातात ते वेगळंच. त्यांना निवडणूक जिंकल्यानंतर हार तुरे घेऊन निघणाऱ्या मिरवणुकीची स्वप्ने देखील पडतात असा आतल्या गोटातील रिपोर्ट मिडीयाने “स्टिंग ऑपरेशन” करून मिळवला आहे (अशी अफवा आहे).

पक्षातर्फे उमेदवारांची पहिली यादी फुटली की चालू होतो खरा थरार. याची सुरुवात पक्षातील असंतोष, दुफळ्या, हेवेदावे, पक्षपात इ. चव्हाट्यावर येऊन होते. ज्या इच्छुकांना उमेदवारी मिळते ते हार तुरे मिरवतात आणि ज्यांना नाही त्यांचा थयथयाट चालू होतो. एका नकाराने सगळं गणितच बदलून जातं. आणि आगीत तेल ओतायला त्यांच्या सहकाऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून बेंबीच्या देठापासून ओरडणारी मिडीया असतेच. आधी पसरायचं आणि मग सारवायचं याची सवय जडलेल्या पक्षाश्रेष्टीना मोठी जबाबदारी असते पक्षातील असंतोषाचा बिमोड करण्याची. चातुर्नितींचा वापर करून असंतुष्ट उमेदवाराची “समजूत” काढली जाते. ज्यांना पटते ते दुसऱ्याची झूल खांद्यावर घेऊन प्रचाराला लागतात. ज्यांची समजूत पटत नाही त्यांना बंडखोर नेता म्हणतात. मग असे वाटेला लावलेले उमेदवार “अपक्ष” म्हणून लढायला तयार होतात. तेही नाही जमलं तर एखाद्या बागेत फिरायला जावं तसं दुसऱ्या पक्षात जातात. तसंही सगळे पक्ष “नाना नानी पार्क”च आहेत …. आत्ता कुठे जरा हिरवळ यायला लागली आहे.

उमेदवार निश्चित झाला की मग त्याचे campaigning चालू होते. अमुक अमुक नेत्याने अमुक अमुक किती कामं केली हे बिंबवले जाते. विद्यमान नेत्याने काय काय दिवे लावले. समोरच्या पार्टीचा उमेदवार जर निवडून आला तर तो तुमचा कसा बट्याबोळ करू शकतो …. इ. इ. आरोप प्रत्यारोप यांचे एकच पिक आलेले असते. मला बरेचदा हे कळत नाही की हेच सत्य दोन निवडणुकांच्या मधल्या काळात का बाहेर येत नाही? का सगळा राग एकदम काढायचा म्हणून तुंबवून ठेवलेलं असतं? मग मोठे मोठे नेते छोट्या छोट्या नेत्यांच्या प्रचाराला येतात. यांच्या भाषणाने जरी काही उपयोग झाला नाही तरी करमणूक मात्र निश्चित होते. भले मोठे व्यासपीठ, त्यावर १०-१५ खुर्च्या आणि त्यावर बसलेली गुंड सदृश नेते. कुणी तरी एक नेता माईक वर बेंबीच्या देठापासून ओरडत असतो आणि समोर बसलेला समुदाय “आपण दाद दिली तर पैसे मिळतील” अश्या आविर्भावात टाळ्या वाजवत असतो. सभेला ५०० माणसे जरी जमली तरी उगीच प्रचंड जनसमुदाय, जनसागर अश्या उपाध्या द्यायच्या त्याला पण डेरिंग लागतं. इतकी मोठी लाईव्ह करमणूक कुठेच होणार नाही. घरातील समस्त माणसांनी फालतू सिरीयल बंद करून अश्या प्रचारसभेला उपस्थित रहावे असे माझे आवाहन आहे. ;) . याच व्यासपीठाच्या जवळच कुठे तरी एक दोन जण संगणक घेऊन बसलेले असतात … कशा साठी देव जाणे? आजकालचा प्रचार हायटेक झालाय असं म्हणतात. कदाचित याच्यामुळेच असेल.

उमेदवार ऐनवेळी गायब होणे, फॉर्म भरायला उशीर होणे, फॉर्म गायब होणे किंवा करणे, फॉर्म चुकीचे भरणे (आपलं शिक्षण, वय, आपल्याला असलेल्या मुलांची संख्या, आपली जात, आपली स्थावर मालमत्ता हे हमखास चुकणारे मुद्दे) हे सगळे थरारकच नाही का? खरं तर ज्यांना साधा फॉर्म आणि आपली व्यक्तिगत माहिती व्यवस्थित भरता येत नसेल ते उमेदवारी साठी खरंच लायक आहेत का? सर्वसामान्य माणसाला पडणारा हा प्रश्न पक्षश्रेष्ठींना कसा पडत नाही कोण जाणे?

(क्रमशः)

(अजून काही थरार लिहायचे आहेत. पण तुम्हाला इतकं मोठं वाचताना एकदम अजीर्ण नको म्हणून टप्प्या टप्प्याने देत आहे.)

 
Leave a comment

Posted by on फेब्रुवारी 22, 2012 in इथून - तिथून, हास्यमेळा

 

Tags: , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , ,

सहजच शिकली रं शिकली

(सदर लेख हा संपदा जोगळेकर-कुलकर्णी यांनी लिहिला आहे. त्यांना न विचारताच येथे आपणासाठी देत आहे. त्या बद्दल क्षमस्व)

ती जर स्वत: शिकलेली, पण घरच्यांच्या बंधनात अडकून घरातच राहणारी गृहिणी झाली असेल तर तिची कुतरओढ वेगळीच असेल. एवढं हौसेनं, जिद्दीनं माहेरच्यांनी शिकवलं, पण सासरी घरीच बसवलं. काय उपयोग मग माझ्या शिक्षणाचा?

मुलगी शिकली प्रगती झाली’ या वाक्याबद्दल तुम्हाला काय वाटतं, असा प्रश्‍न माझ्या कार्यक्रमात एका प्रौढ बाईनं मला विचारला. हा माझ्यासारख्या शिक्षित आणि प्रसिद्धीमाध्यमातल्या ‘मुलीला… माफ करा बाईला हा प्रश्‍न विचारला याची मला सुरुवातीला मजा वाटली. मनात आलं अहो मुलगी शिकली म्हणून तर ही संपदा नामक व्यक्ती फक सेलिब्रिटी म्हणून उभी आहे,’ पण क्षणातच हा प्रश्‍न इतका वरवरचा नाही हे लक्षात आलंच.

विचारणारी एखादी सासू असेल का असं मनात आलं. सासू असेल तर बिच्चारी वयानी निवृत्त होऊनही अजून घरच्या जबाबदार्‍यांमध्ये अडकली असणार. कारण सून आहे, मुलगा आहे; पण दोघेही 18 तास बाहेर. सुनेचा जरा उपयोग नाही. ‘मुलगी शिकली म्हणून हे सगळं सुरू झालं’ असा बहुधा राग असावा. विचारणारी जर संवेदनशील स्त्री असेल, समंजस असेल तरीही तिचं मत वेगळं असू शकतं. मुली शिकल्या खर्‍या, पण काय हे स्त्रीसारख्या नाजूक देहाला असं कित्येक तास घराबाहेर असुरक्षित, काच्या जगात राबावं लागतंय. कधी शारीरिक मेहनत तर कधी मेंदूचा शिणवटा. स्वास्थ्य म्हणून नाहीच. ती जर स्वत: शिकलेली, पण घरच्यांच्या बंधनात अडकून घरातच राहणारी गृहिणी झाली असेल तर तिची कुतरओढ वेगळीच असेल. एवढं हौसेनं, जिद्दीनं माहेरच्यांनी शिकवलं, पण सासरी घरीच बसवलं. काय उपयोग मग माझ्या शिक्षणाचा? उलट शिक्षणामुळे बाहेरचं जग कळलं आणि रीतिरिवाजांनी त्या जगाचे दरवाजे बंद केले. त्यामुळे घुसमट वाढली. ती जर वेगळी राहून सून-मुलांचा संसार बघत असेल तर कामवाल्यांचा खर्च, त्यांची घरात कुणी नसल्यामुळे चाललेली मजा, बाहेरचं आणून खाणं यामुळे घरातली एक हक्काची स्त्री हरवल्यामुळे (करीयर, शिक्षणामुळे) घराची वाताहत होते हे पाहत असेल. त्याचाही राग असेल.

परंतु मला भेडसावत होता एक वेगळाच प्रश्‍न. इंधनपुरवठा कमी आहे तो जपून वापरा म्हणतात तसंच काही क्षेत्रात शिक्षणाच्या संधी अगदी मोजक्याच आहेत. तिथे नंबर पटकवणार्‍या मुली ते शिक्षण घेऊन पुढे काहीच करीत नाही याचा राग येतो. डॉक्टर, इंजिनीअर पदवी घेऊन घरी किटी पार्टी, सास-बहूच्या मालिका बघणे. शिक्षणाच्या कुवतीप्रमाणे नवरा मिळतो तो अर्थात त्या पातळीवरचा शिक्षित, रूढीप्रमाणे तो मनमुराद त्यात करीयर करून बक्कळ पैसा मिळविणारा. त्यामुळे श्रीमंतीचा उपभोग घेत पुढचं आयुष्य काढायचं. अशावेळी चीड येते की घरीच बसायचं होतं तर का ती सीट अडवली? बरं एवढी शिकलेली बाई मुलांवर घरी राहून तसे उच्च संस्कार करते म्हणावं तर या सर्वांची मुलं 8-8 तास ट्यूशन्सना जातात. मग शाळेचे पाच तास, ट्यूशन चार-चार तास राहिले किती तास?

मुलीच सीट फुकट घालवतात का? असा विचाराला फाटा फोडू नये. मुलेही घालवतात, पण तुलनेनी एवढं शिक्षण घेतल्यावर कळतं की या शिक्षणावर आधारित करीयर खूपच काचं आहे, दमवणारं आहे, वेळखाऊ आहे की मग घरच्यांना त्रास होतो म्हणून तरी मुली (रूढीप्रमाणे मुलीच) घरी बसतात किंवा हे पाहून मुलींचं सोयीप्रमाणे रूढीला मधे आणून घरी थांबतात. (दोघांपैकी कुणी घरासाठी थांबायचं, हा प्रश्‍न येतो तेव्हा मुलीलाच थांबावं लागतं. हा आणखी वेगळा लेखाचा विषय आहे.) मुलगी शिकली, पण प्रगती झाली का? ती तेव्हाच होईल जेव्हा शिक्षणाबाबत डोळस राहून निवड केली तर.

मग सावित्रीबाई फुलेंनी मोठी चूक केली का? नाही. जन्माचं सार्थक, जगण्याचा अर्थ आणि मेंढरापेक्षा वेगळं माणूस म्हणून ओळख स्त्रीला व्हावी हे त्यांना अपेक्षित असावं.

(सदर लेख हा संपदा जोगळेकर-कुलकर्णी यांनी लिहिला आहे. त्यांना न विचारताच येथे आपणासाठी देत आहे. त्या बद्दल क्षमस्व)

 
Leave a comment

Posted by on फेब्रुवारी 21, 2012 in इथून - तिथून

 

Tags: , , , , , , , , , , ,

मतदाना नंतर… मुंबई

“नेमेची येतो मग पावसाळा” असा हा दर ५ वर्षांनी येणारा मतदानाचा पावसाळा मुंबईत हलक्या सारी पडून गेला. हलक्या म्हणण्याचे उद्दिष्ट असे की मुंबईत झालेले ४६% मतदान. (अधिक माहिती साठी वाचा ‘मुंबईत मतदानाचा बोजवारा’) आधी शिवसेनेने आपली सत्ता अबाधित राखली त्याबद्दल त्यांचे अभिनंदन. नुसत्या हिंदुहृदय सम्राट यांचा करिष्मा त्याना किती दिवस तारणार देव जाणे. “करून दाखवलं” या एका वाक्याने मुंबई जिंकली असं म्हणता येणार नाही तर आता हाती लागलेली ५ वर्षे “मुंबईकरांनी दिलेला बोनस” समजून “करून दाखवावे” लागणार आहे. नाहीतर शत्रू दारावर टपलेलेच आहेत. आज शिवसेनाभवनाच्या परीसारात मनसेला मिळालेलं यश सेनेसाठी डोके दुखी होणार आहे. आणि करून दाखवलं नाही तर पुढील ५ वर्षानंतर मुंबईतलं चित्र वेगळे असू शकते. त्यामुळे सेना नगरसेवकांनो सावधान. तुम्ही तुमच्या वॉर्डची काळजी नाही घेतलीत तर त्याचा फायदा मनसे घ्यायला तयार असेल. कारण राष्ट्रवादी आणि काँग्रसला स्वतःच्या भानगडीत जाणते साठी वेळ मिळणार नाही म्हणून त्यांचे नाव घेतले नाही.

या वेळी शिवसेना, भाजपा आणि रिपाई यांनी महायुती केली. रिपाई ला किती फायदा झाला हा प्रश्न त्यांनाच विचारलेला बरा. खरं तर त्यांनी त्याचे आत्मपरीक्षण करणं जरुरीचे आहे. दर वेळी दुसऱ्याच्या खांद्यावर हात ठेवून आपले नशीब बदलत नाही. आंबेडकरी जनतेची ससेहोलपट केंव्हा संपणार ते त्यांनाच ठावूक. मा. बाबासाहेबांनंतर एकाही सक्षम नेता मिळू नये हे त्यांचे दुर्दैव आणि डोळ्यावर पट्टी बांधून फिरणारे त्यांचे नशीब. युतीला देखील या महायुती वर किती भरवसा आहे ते थोड्या दिवसातच जाणते समोर येईल जेंव्हा आठवले त्यांच्या नेहेमीच्या अर्धवट मिटलेल्या डोळ्यांनी त्यांच्या मागण्या मांडतील. महायुती जरी सत्तेवर येणार असली तरी त्यांना सर्वात मोठा धक्का मनसे ने दिला आहे. अर्थात त्यामुळे सध्या तरी त्यांचे नुकसान काही झाले नसले तरी त्याची झळ दोन्ही कॉंग्रेसला बसली हे निश्चित. शिवसेनेला संपवण्याच्या वल्गना करणाऱ्या या दोन्ही कॉंग्रेसला काळतच नव्हतं की आपण एकत्र काम करायचंय की वेगवेगळं. त्यांच्यात नसलेल्या एकसूत्रीपणाचा पूर्ण उपयोग ठाकरे द्वयींनी करून घेतला. …. नाही नाही त्यांना तो आपोआप झाला.

शेवटी काही झालं तरी अत्ता काय आणि पुढे काय ठाकरे बंधू हेच मुंबईचे अनभिषिक्त सम्राट राहणार हे अजून एकदा सिद्ध झाले. आणि ते जनतेनेच दाखवून दिले. तीच गत ठाण्यात झाली. राष्ट्रवादी समजत होती ठाण्यात आनंद परांजपे सर्वेसर्वा आहेत. एकदा त्याला फिरवला की ठाण्यात सत्ता आपलीच …. पण तो ही त्यांचा भ्रमनिरास झाला. दोन्ही काँग्रेसना बाकी ठिकाणी बहुमत मिळाले असेलही पण शेवटी मुंबई ती मुंबईच आणि पिंपरी-चिंचवड ती पिंपरी-चिचवड. मुंबई जिंकण्याची शान कुठेही नाही.

तात्पर्य …
१. मिळालेल्या विजयाने शिवसेनेने हुरळून न जाता पुढील ५ वर्षे “जागते राहो” या अविर्भावात काम करणे गरजेचे आहे.
२. तुम्ही नाही केलंत तर मनसे टपलेलीच आहे.
३. टगेपणा आणि अंतर्गत हेवेदावे कमी करून दोन्ही कॉंग्रेसना पुढील ५ वर्षांसाठी अजेंडा तयार करावा लागेल.
४. रिपब्लिकन पार्टी तसेच समस्त आंबेडकरी जनतेला सक्षम नेतृत्व उभे करणे गरजेचे आहे. बाबासाहेबांच्या पुण्याईवर हे नेते जास्त काळ टिकू शकणार नाहीत.
५. मनसेला फुकटचा सल्ला “नाशिकच्या संधीचे सोने करा …. ५ वर्षांनी मुंबई फुकट मिळेल”
६. पुढील ५ वर्षात जनतेने आपली अनासक्ती सोडून मतदानाकडे गांभीर्याने बघावे नाहीतर बोंब पण मारता येणार नाही.

 
5 Comments

Posted by on फेब्रुवारी 19, 2012 in इथून - तिथून, काहीच्या काही

 

Tags: , , , , , , , , , , , , , , , , ,

 
Follow

Get every new post delivered to your Inbox.

Join 33 other followers