मामलेदार मिसळ

जिन्नस

  • कांदे ४/५ + वरुन घालण्यासाठी २ ,बटाटे ४/५,लसुण १ मोठा गड्डा,
  • तेल १.५वाट्या,तिखट १वाटी,गरम मसाला ४ चमचे
  • १०० ग्राम पापडी,२५०ग्राम हिरवे वाटाणे,५००ग्राम फरसाण
  • चवीनुसार मीठ

मार्गदर्शन

हिरवे वाटाणे ५/६ तास भिजत घालावेत. नंतर कुकर मधुन ३/४ शिट्ट्या देऊन शिजवावे.बटाटे उकडून घ्यावे.४/५ कांद्यातील ३ कांदे वाटून घ्यावे. लसुण सोलून वाटून घ्यावा.उरलेले २ कांदे बारीक चिरुन घ्यावे.

पापडी कुटून घ्यावी,व पाण्यात भिजत घालावी.

एका जाड बुडाच्या पातेल्यात १ वाटी तेल तापत ठेवावे. चांगले तापले की त्यात वाटलेला कांदा घालुन परतावे,मग वाटलेला लसुण घालून परतावे. १ वाटी तिखटातील १/२ वाटी त्यात घालावे व भरपुर परतावे,गरम मसाला घालुन परतावे.इतके परतावे की तेल सुटले पाहिजे.मग त्यात उकडलेले वाटाणे घालावे,पाण्यात भिजवलेली पापडी घालावी,मीठ घालावे.उकळू द्यावे.

उरलेले १/२ वाटी तेल एका कढईत तापत ठेवावे.त्यात  बारिक चिरलेले २ कांदे

घालून  परतावे,उरलेले १/२ वाटी तिखट घालून परतावे,थोडे मीठ घालावे.व हा खाट वेगळा ठेवावा.

वरुन घालायसाठी कांदे बारिक चिरावे,उकडलेले बटाटे चिरावे.

खोलगट ताटलीत आधी फरसाण,त्यावर बटाटे ,त्यावर रस्सा,आणि त्यावर कांदा घालून द्यावा.

“जादा तिखा”- ३नं हवे असेल तर वेगळा खाट वरुन घ्यावा.

दोस्त-सुह्रदां मध्ये बसून पैज लावून खावा.

टीपा

१.ह्या मिसळी बरोबर पाव चांगला लागतो.पण दही ह्या मिसळी बरोबर खाऊन तिचा अपमान करू नये.

अतिशय महत्त्वाचे:

२.दुकानातून फरसाण घेताना त्यात गोडसर पदार्थ उदा.बेदाणे,मक्याचा चिवडा इ. न घालण्यास सांगावे.

(मूळ लेखक स्वाती दिनेश, मनोगत.कॉम)

पोपटी: एक गावरान पाककृती

जिन्नस

  • २ किलो. गोड्या वालाच्या शेंगा
  • १ मातीचा माठ
  • मीठ चवी प्रमाणे
  • बटाटे ३/४
  • कांदे ३/४
  • खरवडलेला नारळ (कांदे, बटाट्यांमध्ये सारण म्हणून)
  • मसाला (सारणासाठी)
  • भांबुर्डीची पाने
  • भरपुर पला-पाचोळा, सरपण

मार्गदर्शन

पोपटी ही एक गावरान पाककृती (?) आहे. शेणाने सारवलेल्या जमिनीवर बसुन गरमागरम खाण्यात जी मजा आहे ती शब्दात सांगणे खूप अवघड आहे.
अलिबाग ते रेवदंडा (जि. रायगड) या परिसरात जे वाल पिकतात त्यांना गोडेवाल म्हणतात. अशा वालच्या शेंगा घ्याव्या. ताज्या ताज्या शेतातून काढून आणल्या असतील त फ़ारच उत्तम. (या शेंगा दिसायला थोड्याफ़ार घेवड्याच्या शेंगेसारख्या दिसतात पण आकाराने लहान असतात) या शेंगा अवश्यकता वाटल्यास धुवून घ्याव्या.
बटाटे व कांदे धुवून घ्यावेत. कांदे सोलून घ्यावेत. भरली वांगी करतात त्याप्रमाणे कांदे व बटाटे कापून घ्यावे.
सारण तयार करण्यासाठी खरवडलेला ओला नारळ, मसाला, मीठ, थोडे तिखट चवी प्रमाणे एकत्र करावे. कापलेल्या कांदे व बटाट्यांमध्ये हे सारण भरावे. प्रत्येक कांदा / बटाटा छोट्या सुताने बांधून घ्यावा.
मातीचे मडके घेऊन त्याच्या तळाच्या पाव भागात सर्वात खाली भांबुर्डीचा पाला भरावा. मग त्यावर वालच्या शेंगा, बटाटे, कांदे आणि चवी प्रमाणे मीठ टाकावे. उरलेल्या जागेत भांबुर्डीचा पाला ठासुन भरावा.
सगळे सरपण एकत्र करावे. त्यामधे या माठाला ठेवावे (पाला ठासून भरलेला असल्यामुळे आतले जिन्नस बाहेर येत नाहीत) आणि बिनदिक्कत आग लावून द्यावी. जाळ करतान एक दक्षता घ्यावी, माठाच्या सर्व बाजूंनी सरपण असेल. ३० ते ४० मिनीटे असाच जाळ राहू द्यावा. आपण ठेवलेला माठ लालबुंद झालेला आपणांस आढळून येईल. आशा वेळी त्यावर जळत असलेले सरपण थोडे बाजुला करून माठावर ओंजळीतून पाणी शिंपडावे. पाण्याच फ़ेस झाला तर पोपटी झाली असे समजावे.
काठीने तो माठ बाहेर काढावा. काठीनेच वर भरलेला भांबुर्डीचा पाला काढावा. मग़ शेंगा, बटाटे, कांदे काढून घ्यावे. आणि गरम गरम शेंगा सोलून खाव्या. शेंगा खाल्यावर ३० मिनीटे पाणी पिण्याचे टाळावे.(सुज्ञास सांगणे न लागे)

टीपा

खरं म्हणजे हे सगळं करणं आपल्या शहरात शक्य नाही. तरी पण नुसतं वाचण्यात देखिल मजा आहे. या प्रांतातील प्रत्येक शेतकरी एकदा तरी पोपटी करतोच. विशेषतः होळी शिमगा यात पोपटीची धमाल असते. लोकांच्या शेतातील वालच्या शेंगा चोरून त्याची पोपटी लावली जाते.

Follow

Get every new post delivered to your Inbox.

Join 886 other followers