देवराई

(नुकत्याच झालेल्या वसुंधरा दिनाचे प्रयोजन साधून भूतकाळात निसर्ग सानिध्यात घालवलेले काही हिरवेगार क्षण आठवले … ते आपणांपुढे मांडत आहे.)

१९९८ साली B.N.H.S. डॉ. संजय देशमुख यांच्या मार्गदर्शनानुसार “देवराई संवर्धन” या विषयावर काम करण्याचा योग आला. मी, डॉ. उमेश मुंडले आणि डॉ. अजित अणेराव असे तिघे जण या प्रोजेक्ट वर काम करत होतो. तसा “देवराई” हा विषय आमच्या साठी नवीनच होता. काम चालू करण्या आधी पूर्वी या विषयावर कुणी कुणी संशोधन केले होते त्याचे संदर्भ गोळा केले. प्रा. माधव गाडगीळ आणि डॉ. वर्तक हे या विषयातील संशोधनाचे प्रवर्तक मानले जातात. १९७० च्या सुमारास त्यांनी महाराष्ट्रातील जवळ जवळ २५० देवरायांची नोंद केली होती. यातील बहुतांश देवराया या पश्चिम घाट, कोंकण या भागात होत्या. तशी देवराई ही संकल्पना पूर्ण भारतात तसेच जगाच्या काही भागात जिथे जुनी संस्कृती टिकून आहे अश्या भागात आढळते. या व्यतिरिक्त “देवराई” वर विशेष संशोधन झाले नसल्यामुळे किंवा जी माहिती उपलब्ध होती ती कालबाह्यते मुळे परत नव्याने नोंदी करायचे ठरले आणि आम्ही खऱ्या अर्थाने कामाला लागलो.

देवराई हा विषय थोडा वेगळा, जुन्या समजुती, जंगलातील देवता, देव देवस्की अशा अनेक समजुतींमुळे कुतूहल जागृत करणारा. अशातच अवघ्या महाराष्ट्रातील देवरायांची नोंद करण्याचे आणि त्यातील काही प्रातिनिधिक देवरायांचा अभ्यास करण्याचे काम आम्हां सगळ्यांसाठी thrilling होते. जुन्या नोंदी आणि सरकारी कागदपत्रे यांची मदत घेउन २ गुंठे पेक्षा जास्त क्षेत्रफळ असलेल्या देवरायांची सूची बनवली आणि त्याचे पडताळणी करण्याचे काम चालू केले. देवराई मधील देवता, त्यांच्या बद्दल असलेल्या रुढी, परंपरा, त्याच्याशी निगडीत असलेल्या श्रद्धा/अंधश्रद्धा खरंच थक्क करणाऱ्या आहेत. अगदी ढोबळ भाषेत सांगायचे झाले तर देवराई म्हणजे देवाची राई, अर्थात देवासाठी राखलेली जमीन, त्या जमिनी वरील झाडे, दगड माती … अगदी कण अन् कण देवाचा, देवाच्या मालकीचा. काही ठिकाणी देवराईला देवबन, देवरहाटी असे देखील म्हणतात. देवराईच्या रुढी, परंपरा अजूनही पिढी दर पिढी जपलेल्या आहेत. या संकल्पनेचे मूळ हे वेदिक संस्कृती पासून असावे असे जाणकारांचे मत आहे. तसं बघायला गेलं तर प्रत्येक गावात, खेड्यात देवस्थानाची, विशेषतः ग्रामदेवतेची लहान मोठी जमीन असते. पण म्हणून या सगळ्याच जमिनींना देवराई म्हणता येणार नाही. एखाद्या जमिनीवर देऊळ बांधून आजूबाजूला १०-१२ झाडे लावली की त्याला देवराई म्हणणे हास्यास्पद ठरेल. देवराईच्या अस्तित्वाला, संवर्धनाला आणि ऱ्हासाला देखील कित्येक पिढ्या साक्षी आहेत.

देवरायांचा अभ्यास करता करता एक गोष्ट मात्र प्रकर्षाने जाणवली ती म्हणजे एखाद्या परिपूर्ण अश्या परीसंस्थेतील(ecosystem) जैवविविधता(biodiversity). इथे आढळणारे प्रत्येक वनस्पती अस्सल भारतीय, इथल्याच मातीत उगम असलेली. निबिड घनदाट अश्या वृक्षराजींनी नटलेली एखादी देवराई पहिली की पुराणातील गोष्टींमधील अरण्य कसे असू शकेल याची कल्पना येते. देवराईतील देवळापर्यंत जाणारी एखादी पायवाट सोडली तर इतरत्र सगळी कडे माजलेली अजस्त्र झाडे आणि मस्तवाल वेली दिसून येतात. अंबा, फणस, जांभूळ, ऐन, साग, किंजळ यांचा आकार बघितला तर विश्वास बसत नाही. वड, पिंपळ आपल्या पारंब्यानी अख्खी राई कवेत घेण्याचा प्रयत्न करत असतात. त्यांच्या पारंब्यांच्या विस्तारामुळे कधी कधी नैसर्गिक मांडव तयार झालेला असतो.एखादे माडाचे झाड सूर्यप्रकाशाच्या ओढीने सरळ वाढण्याचा बाणा सोडून नागमोडी वळणे घेत वाट काढत असतं. Gnetum, Entada सारख्या अजस्त्र वेलींचे झुले झालेले असतात. अश्या धष्टपुष्ट झाडांवर बांडगुळे, ऑर्किड्स दिमाखात वसाहत करून रहात असतात. झाडांच्या खोडांना चिकटलेली दगडफुले तेथे असलेल्या १००% शुद्ध वातावरणाची ग्वाही देतात.

या सगळ्यांमधून कानाला गोड वाटणारे पक्षांचे गुंजारव चालू असते.मधूनच कुठे तरी रातकिड्यांचा कर्कश्य आवाज काळजाचा थरकाप उडवून जातो. विविध आकाराचे कीटक टणाटण उड्या मारत असतात. नाना रंगांची फुलपाखरे फुलांचे माधुर्य चाखण्यात मग्न असतात. कुठेतरी झाडांच्या जाळीमधून राजनर्तकाची जोडी आपले नृत्य कौशल्य दाखवून जाते. एखादा पिंगळा झाडाच्या फांदीवर बसून धीरगंभीर नजरेने बघत असतो. सुतार पक्ष्याची चोच झाडाच्या खोडावर टक टक आवाज करत असते. कुठेतरी एखादी सुगरण आपलं अपूर्ण राहिलेलं घरटं पूर्ण करण्यात मग्न असते. जवळपास जर पाणवठा असेल तर मासेमारी करून दमलेला खंड्या क्षणभर विश्रांतीसाठी येतो.असे एक ना अनेक जीव या परीसंस्थेचा उपभोग घेत असतात. हे सगळं बघताना तेथील समृद्धीचा आणि संपन्नतेचा हेवा वाटल्याशिवाय रहात नाही. सूर्य माथ्यावर आला तरी त्याचा प्रकाश जमिनीपर्यंत पोहोचू शकत नाही. अश्या ठिकाणी किती वनसंपदा असू शकते याचा अंदाज येतो. वर्षानुवर्षे राखलेल्या या देवराया म्हणजे नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या अनेक प्रजातींची निसर्गदत्त स्थाने आहेत.

देवराई: संकल्पना
देवराईचे मूळ वैदिक संस्कृती पासून असल्याचे जाणवते. पुराणकाळापासून असलेले मानव आणि निसर्गाचे नातेसंबंध इथे प्रकर्षाने जाणवतात. देवराई या संकल्पनेचा उगम कसा आणि केंव्हा झाला या बद्दल अनेक मतप्रवाह आहेत. या संकल्पनेचा मूळ गाभाच हा श्रद्धा या नाजूक विषयावर बेतला असल्याने तोच मूळ उद्देश असावा असे अनेक जाणकार मानतात. अश्मयुगीन माणसाला जेंव्हा शेतीचे महत्व कळू लागले तेंव्हा लागवडी योग्य शेतजमीन निर्माण करण्यासाठी प्रचंड प्रमाणात जंगल तोड झाली असावी. त्यावेळी सुद्धा तत्कालीन मानव बहुतांशी जंगलावर निर्भर होता. शेती मध्ये कितीही उत्क्रांती झालेली असली तरी लाकूडफाटा, खाद्य, वनस्पतीजन्य ओषधे अश्या अनेक गोष्टींसाठी त्याला जंगलावरच अवलंबून राहणे भाग होते. तसेच मोकळ्या मैदानापेक्षा वास्तव्यासाठी  जंगल जास्त सुरक्षित असावे. आत्ता जसे भूखंड माफिया, बिल्डर नावाची मानवाची वेगळीच प्रजाती निर्माण झाली आहे तसेच त्या काळी “शेती माफिया” असावेत ज्यांनी शेतीसाठी वनसंहाराला हातभार लावला. अश्याच वेळी जंगलाचे महत्व जाणणारे देखील होते याची खात्री या देवरायांच्या अस्तित्वावरून जाणवते. मानवाच्या देवावरील श्रद्धायुक्त भीतीचा योग्य वापर जंगलांच्या रक्षणासाठी आणि संवर्धनासाठी केला गेला. त्यासाठी गणपती, श्रीराम, कृष्ण यांच्या सारख्या सौम्य देवतांचा वापर न करता देवी किंवा शंकर यांचे कडक आणि जहाल रूप दिले. या देवरायांतील देवतांची नावे पण विचित्र, झोलाई, कालकाई, वाघजाई, सोमजाई, वेतोबा, डुंगोबा, बापदेव, म्हसोबा अशी कधी न ऐकलेली. देवराईतील कुठल्याही साधन संपत्तीचा ह्रास झाला तर त्या देवतेचा कोप होतो. इतकंच काय पण बऱ्याच देवरायांमध्ये प्रवेश देखील निषिद्ध आहे. अश्या अनेक भ्रामक कल्पनांमुळे देवराया आपले अस्तित्व टिकवून आहेत. अंधश्रद्धेचा इतका उत्तम आणि वैधानिक उपयोग आजपर्यंत कुठेही बघितला नाही.

अश्या देवरायांवर कित्येक श्रद्धा/अंधश्रद्धा, त्यातून निर्माण होणाऱ्या दंतकथा यांचा पगडा असल्याने आजही हे हिरवे तारकापुंज शाबूत आहेत. खरा प्रश्न हा आहे की अजून किती दिवस शाबूत राहतील? सध्याच्या आधुनिक विचारसरणी पुढे या पिढीजात रुढींचा टिकाव लागणे जरा कठीणच आहे. या आधुनिकीकरणाचे पडसाद हळू हळू दिसू लागले आहेत … देवरायांचे क्षेत्र, विस्तार कमी होताना दिसत आहे. त्यामुळे तिथे आढळणाऱ्या अनेक प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. अशी जंगले एका दिवसात किंवा एका वर्षात उभी राहू शकत नाहीत तर ती एक मुक्त प्रक्रिया आहे वर्षानुवर्षे चालणारी. सामाजिक वनीकरण हा एक उपाय असला तरी तो जबरदस्तीने लादलेला आहे त्याला नैसर्गिक संवर्धनाची सर नाही. जैवविविधतेने समृद्ध अश्या देवरायांचे संरक्षण आणि संवर्धन होणे गरजेचे आहे. त्यासाठी गरज आहे ती सामाजिक पातळीवर प्रयत्न करण्याची, देवराया आणि आपली वनसंपदा वाचवण्याची.

(वरील लेख कुठलीही शास्त्रीय माहिती देत नाही याची वाचकांनी नोंद घावी. कुणी जाणकाराने काही मार्गदर्शन केले तर हा लेख अजून चांगला आणि शास्त्रशुद्ध बनवता येईल. या लेखातील माहिती बद्दल कुणास काही आक्षेप असल्यास कृपया coolgrahica at-the-rate gmail dot com वर कळवावे.)

मुंबईची लोकल आणि नव वर्षाचे सेलिब्रेशन

मुंबईतील लोकल ट्रेनशी लागेबांधे नसलेला सामान्य माणूस शोधून पण सापडणार नाही. नोकरी धंद्या निमित्त ट्रेन ने प्रवास करणारा चाकरमानी, ट्रेन मधील गर्दीला शिव्या घालत घालत त्या गर्दी मध्ये कधी मिसळून जातो ते त्यालाच कळत नाही. आणि एकदा का इच्छित ट्रेन मिळाली की चेहेऱ्यावर जे समाधान मिळते त्याची तुलना केवळ ……… कशाशीच होवू शकत नाही ;) . अव्याहत आणि अविरत धावत असणारी ही लोकल सगळ्या उपनगरांना या मायानगरीशी जोडणारी एक दैवी देणगी आहे. इथे खच्चून भरलेल्या लोकल ट्रेन मध्ये सामान्य मुंबईकर दिवसातील २-३ तास घालवतात. त्यामुळे लोकलचा डब्बा म्हणजे एक प्रती विश्वच आहे.

इथे काय नाही मिळत?? ….. फुकटच्या सल्ल्या पासून ते जीवाभावाच्या मैत्री पर्यंत …. सगळं मिळतं. जिथे पाय ठेवायला जागा नसते तिथे भजनी मंडळ, रमी क्लब, हौशी कलाकार गुण्यागोविंदाने नांदत असतात. हळदी कुंकू (अर्थात बायकांच्या डब्यात), सत्यनारायणाची पूजा, दिवाळी, होळी, गुढीपाडवा असे सगळे सण झाडून साजरे केले जातात. पण हे सगळं सहप्रवाश्यांच्या सोयी नुसार. सणाच्या दिवशी सुट्टी असल्याने बरेच सण आदल्या दिवशीच साजरे केले जातात. कारण रोज ट्रेन पकडायची कसरत सुट्टीच्या दिवशी कोण करत बसतंय.

भल्या पहाटे कधीतरी कर्जत वरून सुटणारी एक ट्रेन डोंबिवलीला सकाळी ८:०३ ला येते. म्हणजे ते तिचे वेळापत्रकातील टाईम असले तरी त्या टायमाला जर चुकून कधी तरी आली तर …. जाऊंदे उगाच कशाला स्वप्न बघा. अर्थात कर्जत वरून येत असल्यामुळे आणि अंबरनाथ बदलापूर येथे प्रचंड प्रमाणात लोकसंख्या वाढ झाली असल्याने या लोकलला दुथडी भरून गर्दी असते. त्यामुळे कधी त्या गाडीत चढायला मिळतं तर कधी खाली उभं राहूनच दुसऱ्या गाडीची वाट बघावी लागते. तर या गाडी मध्ये जिवाभावाचे काही मित्र मिळाले. नवीन वर्षाच्या निमित्ताने आमच्या ट्रेन मधील या “चुलबुल मित्र मंडळ” ने अमावास्येलाच म्हणजे २२ मार्चलाच पाडवा साजरा करायचे ठरवले. २१ ला गाडी पकडता न आल्यामुळे प्रशांत ने खिडकीतून ओरडूनच सांगितले “काहीही करून उद्या गाडीत ये …. पाडवा सेलिब्रेशन करायचंय”. आम्हाला गाडीत चढायला मिळेल याचीच शाश्वती नसते तर “काही आणू का?” हे विचारणं मूर्खपणाच ठरला असता.

आज सकाळी नेहेमीची कसरत करत कसाबसा ट्रेन मध्ये चढलो. याच ग्रुप मधला डोंबिवलीचा गौरव जावळेकर आधीच चढला …. मोठा इरसाल गडी. चपळाईने दोनचार डबे आधी उभारतो आणि चालत्या गाडीत चढतो. नितीन संत चा पत्ताच नव्हता. चढायला तर मिळालं …. आता घाई होती ग्रुप पर्यंत पोहोचण्याची. ठाण्याला आत जायचा योग आला …. नाहीतर डोंबिवली ते ठाणे दरवाज्यात लटकतच होतो. ठाणे स्टेशनला गाडी टेकली आणि मी आजूबाजूच्या चारचौघांना रेटा मारत ग्रुप पर्यंत पोहोचलो. आज झाडून सगळे आजी-माजी सभासद आले होते. बघितलं तर यांचे पेय-पान चालू होते. मनात विचार आला …. चायला याचं सगळं संपलं की काय? .. आणि काय आश्चर्य … नितीन संत ठाण्यात चढला. हे महाशय डोंबिवलीत चढता येणार नाही म्हणून आधीच्या गाडीने ठाण्याला आले आणि ठाण्याला आम्हाला सामील झाले. काय जबरदस्त इच्छाशक्ती आहे या माणसाची. जे नेहेमी ठाण्याला उतरतात आज ते पण दादर पर्यंत येणार होते. तर ठाण्याला आमचा ग्रुप पूर्ण झाला.  And the party begins.

आम्ही डोंबिवली नंतर चढलेल्या ३ जणांना आमच्या मित्रांनी लगेच बसायला जागा दिली. त्यांनी आणलेल्या पेपर डिश मध्ये इडली चटणी काढून दिली. कल्याणच्या अजय डोरले नी आणलेली इडली अप्रतिम होती. प्रशांत म्हणत होता …. “हे काहीच नाही अजून खायचंय” असं म्हणत त्याने मस्त जिलेबी दिली खायला. जलेबी संपली तर गुलाबजाम वाट बघताच होते. असा शाही फराळ झाल्यावर कोल्ड्रिंक प्यायलं. अधून मधून फोटो काढणे चालूच होते. इतक्या गर्दीत देखील सगळ्यांना सांभाळून … इतरांना त्रास न देता आमचं पाडवा सेलिब्रेशन चालू होतं. कचरा इतस्ततः न टाकता आणलेल्या पिशव्यांमध्ये नीट भरून ठेवला. सगळा हिशोब करून सगळ्यांकडून पैसे जमा केले गेले. हे सगळं करे पर्यंत दादर आलं. दादर स्टेशनच्या बाहेर अजून एक ग्रुप फोटोसेशन झालं. एकमेकांना पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा देऊन प्रत्येक जण आपापल्या कामाच्या ठिकाणी रवाना झाला.

उद्या कदाचित गाडीची वेळ बदलेल. नोकरीचे ठिकाण बदलेल. आत्ता जे होते ते उद्या काही कारणास्तव असतीलच हे सांगता येणार नाही. पण अवघ्या ४० रुपयांमध्ये साजरा केलेला चुलबुल ग्रुपचा पाडवा कायमच लक्षात राहील हे मात्र नक्की.

चुलबुल ग्रुपची मित्र मंडळी:

आनंद भातखंडे, प्रशांत इंगळे, सतीश सरोदे (चुलबुल पांडे), प्रसाद राजे, सतीश पुजारी, सुधीर पंडित, नीरज महेश्वरी, विजय जाधव, नितीन संत, गौरव जावळेकर, विवेक, अजित गुंजाळ, सचिन टिचकुले, हरेश तुपे (छोटा रिचार्ज), अजय डोरले, काका (वांगणी)

लोकल ट्रेन मधील बऱ्याच गमती जमाती लिहायच्या आहेत … पण ते परत कधी तरी.

नागांव …. माझं सर्वात आवडते ठिकाण

नागांव …. माझं सर्वात आवडते ठिकाण. मुंबई ला जवळ, शनिवार/रविवार प्रचंड गर्दी असलेला one day picnic spot. पण या कारणासाठी नागावची ओढ नाही. तर ओढ आहे ती या मातीची, निसर्गाची … तिथल्या सगळ्याचीच. नागांव चे वास्तव्य म्हणजे मला लागलेलं एक व्यसनच आहे म्हणा हवे तर. दोन महिने तिथे गेलो नाही तर जीव घुटमळत होता. शेवटी १३ जानेवारीच्या रात्री जायचा योग आला …. तसा तो ओढून ताणूनच आणला.
बऱ्याच कामांना टांग दिली आणि गाडी रेमटवत रात्री १२:३० ला बंगल्याच्या आवारात पोचलो. कर्नाळा परीसरापासूनच थंडीची जाणीव तीव्र झाली होती. त्यामुळे गाडीतील खिडक्यांच्या काचा बंद होत्या तरी आतमध्ये सगळे स्वेटर, शाल पांघरून बसले होते. नागावात घरी आल्यावर तर थंडी अधिकच जाणवत होती. कडाक्याची थंडी काय असते याचा अनुभव घेत होतो. गाडीतले समान घरात घेतले आणि सगळी दारे खिडक्या बंद करून निवांत झालो. रात्री १२:३० ला इतक्या थंडीत आणि अंधारात सुद्धा माझ्या बागेत फेरफटका मारायचा मोह मला टाळता आला नाही. कुणीच कंपनी द्यायला तयार नसल्याने शेवटी मीच पायात चपला घालून घरच्या बाहेर पडलो. मस्त थंडी अंगावर काटा आणत होती. दूर वरून येणारा समुद्राच्या लाटांचा लयबद्ध आवाज, पानांची होणारी नाजूक सळसळ रात्रीच्या प्रहरातील कुठल्याश्या रागाशी सांगड घालत सुरांचे आवर्तन पूर्ण करत होती. मस्त एक फेरफटका मारून ताजातवाना झालो. चार पाच जाडजूड पांघरूण घेउन छोटी आर्या आणि तिची आई तर कधीच स्वप्नांच्या दुनियेत रममाण झाली होती. मग मी पण शांतपणे झोपी गेलो.
शनिवारी सकाळी लवकरच म्हणजे ८ वाजता आपोआप जाग आली …. कुठलाही गजर न लावता. …. शनिवारी, म्हणजेच सुट्टीच्या दिवशी ८ वाजता जाग येणं कठीणच. डोंबिवलीत असतो तेंव्हा १० शिवाय उठत नाही आणि ते सुद्धा टाळ मृदुंगांच्या साथीने जेंव्हा बायको गजर करेल तेंव्हाच. पण नागाव मध्ये असताना असं होतं नाही …. निकोप प्रदूषण मुक्त हवेमुळे शरीरातील थकवा लवकर नाहीसा होतो. सकाळी परत बागेला फेरफटका मारणं हेच तेथील नित्यकर्म …… फिरता फिरता सकाळचा पहिल्या धारेचा ऑक्सिजन भरून घ्यायचा आणि मग दिनक्रमाला सुरुवात करायची हाच तेथील शिरस्ता. बागेत फिरायला निघालो आणि तितक्यात माझं पिल्लू पण माझ्या पाठून चपला घालून तयार. बागेचं निरीक्षण आणि आर्याच्या प्रश्नांना उत्तरं देता देता अर्धा पाऊण तास कसा निघून गेला तेच कळलं नाही. बरेचवेळा मला असं वाटत की झाडं माझ्याबरोबर गप्पा मारतात. गेट वरचा पळस म्हणत असेल “बरं झालं तू माझी नीट निगा राखलीस नाहीतर २ वर्षांपूर्वीच मी संपलो असतो”. केळी म्हणत असतील “काय रे शहाण्या एकटाच केळी खातोस म्हणून जाडजूड झाला आहेस … थोडी माझ्या नातीला पण देत जा”. नारळ म्हणत असतील “नंदू शेठ या वेळी शहाळी नाही मिळणार …. पाडेकरी मागल्याच आठवड्यात नारळ घेऊन गेला”. २ महिन्या पूर्वी नवीन लावलेल्या सुपाऱ्या म्हणता असतील “आत्ता वेळ झाला या टवाळ्याला …. दोन महिने साधी दखल पण नाही घेतली आमची …. आम्ही आहोत का मेलोत”. ५-६ वर्षे वयाच्या कलमी आंब्याचा डोळ्यात कारुण्य आणि अपराध्याची भावना होती …. “इतके वर्ष झाली तरी मी यांना साधा एक आंबा पण देऊ शकलो नाही …. या वर्षी पण मोहोर नाही” मी त्याच्या खोडावरून हात फिरवला आणि त्याच्या डोळ्यात समाधान बघितले. हा आमचा संवाद चालू असतानाच …..
कीर्तीने गरमागरम चहाची हाकाटी केली आणि मस्त अंगणात बसून चहाचा आस्वाद घेतला, बरोबर आणलेले चकणा आयटम खाल्ले. आणि मी, कीर्ती, अमित आणि तृप्ती असा गप्पांचा फड रंगात आला. परसातील फुले तोडून आणली …. अंघोळ करून पूजाअर्चा केली. आर्या बरोबर मस्ती आणि टिवल्याबावल्या करण्यात वेळ कसा निघून गेला ते कळलंच नाही.
संध्याकाळी समुद्रावर मस्त धम्माल केली. पाण्यात डुंबलो, वाळूत खेळलो. स्पीड बोटिंगचा थरार अनुभवला. थंडी परत पसरायला लागली आहे याची जाणीव आर्याच्या कडकड आवाज करणाऱ्या दातांनी करून दिली. घरी पोहोचे पर्यंत अंधार झाला होता. रात्रीच्या जेवणाची तजवीज मला आणि अमितला अलिबाग ला जाऊन करायची होती. मस्त पावभाजी घेऊन आलो. आधी विचार होता मस्त अंगणात जेवायला बसायचं पण पांघरूण घेऊन जेवता येत नसल्या मुळे घरातच जेवण उरकलं. शेकोटी करायची म्हणून काही लाकडे आधीच जमवून ठेवली होती …. पण तो बेत सुद्धा बारगळला. थंडी कुठल्या कुठे पळवून लावणारे औषध आणले होते पण त्याचाही काही विशेष फायदा झाला नाही. आणि उद्या परतीच्या प्रवासाला लागायचे त्यामुळे शक्य तितका त्रासिक चेहेरा करून परत पांघरुनांच्या दुलईत झोपी गेलो.
रविवारी सकाळी उठून परत नित्यकर्म चालू … पण आज त्यात कालचा जोश नव्हता. बागेतून फेरफटका मारला पण कुणीच बोलत नव्हतं …. जणू त्यांना माहित होतं की आज मी परत जाणार …. परत भेट केंव्हा ते माहीत नाही. एक म्हातारं नारळाचं झाड म्हणत होतं “तू येऊन गेलास की इथे कुणीच येत नाही …. कुणीतरी येऊन आम्हांला पाणी पाजून जातो इतकंच” मी काहीच बोललो नाही. तितक्यात एक अनाहूत वेल म्हणाली “कशाला जातोस परत ??? काय ठेवलंय त्या शहरात?? तू इथे ये आम्ही सगळं भरभरून तुला देऊ ….” पुढचे शब्द ऐकायला मी थांबू शकलो नाही. जड पावलानी घरात आलो …. कालची जी ENERGY होती ती कुठेच जाणवत नव्हती. शक्तिपात झाल्यासारखे वाटत होते. तीच पानांची सळसळ, तोच समुद्राचा आवाज आणि तेच पक्षांचे गुंजारव पण माझे कान बहिरे झाले होते. कीर्तीला म्हटलं मी समान गाडीत टाकतो तू घर बंद कर …. निघायला हवं नाहीतर “उशीर” होईल ….
“अनुविना”
दि. १६ जानेवारी २०१२

Follow

Get every new post delivered to your Inbox.

Join 886 other followers