मोऱ्या बापट (भाग ३)

दुसऱ्या दिवशी सुट्टी असल्याने रात्रीच्या प्रवचनाचा झोपेवर विशेष परिणाम झाला नाही. भल्या सकाळी ९ वाजता जाग आली तीच मुळी बायकोने तारस्वरात सुरु केलेल्या मंजुळ भूपाळीने. “कुठे रात्री अपरात्री भटकत असतोस देव जाणे. कधी कधी मला वाटतं की तुला कुणीतरी झपाटलंय. कारण आज काल तु झोपेत पण बडबडायला लागला आहेस. आज सकाळी पण काही तरी मोऱ्या, लेकुरवाळी, धोंड का खोंड असं काही तरी असंबद्ध बडबडत होतास.” माझ्या चेहेऱ्यावरील अविश्वासाचे भाव बघून “हो किनई गं माऊ?? बाबा सकाळी झोपेत बडबडत होता ना??” असं म्हणत बायकोने तिच्या बाजूने एक साक्षीदार उभा केला. “मम्मा म्हणाली ते खरंच आहे बाबा …. तु झोपेत सकाळी काहीतरी बडबडत होतास …. मी पण ऐकलंय ….” आता माझ्या मुलीने पण शपथेवर सांगितलं माझं धाबे दणाणले. मी झोपेत बडबडतो याचा साक्षात्कार मला नुकताच झाला होता.

शक्यतो मी बाहेरील मित्रांच्या, नाक्यावरच्या खबरी घरी सांगत नाही पण माझ्या या बडबडी मुळे मोऱ्या प्रकरण बायकोला सांगणं क्रमप्राप्त होतं. एकंदरीत मोऱ्या तिला “gossip” चा विषय वाटला. चहा पिता पिता तिने नेहेमीप्रमाणे मोऱ्यावर जास्त विश्वास न ठेवण्याचा सल्ला दिला. तसेच त्याच्या साठी बायको शोधण्याच्या नसत्या भानगडीत पडू नये असे फर्मान सोडले … त्या साठी त्याचे नातेवाईक आहेत असेही ठासून सांगायला विसरली नाही. “४-५ महिन्या पूर्वी झालेल्या माणसावर किती विश्वास टाकायचा? काय माहित त्यानेच बायकोचा छळ केला असेल तर? या अश्या नवऱ्यांचा काय नेम?” आणि हे ती तिच्या नवऱ्याला सांगत होती. तिच्या मेंदूत मध्यमवर्गीय बायकी विचारांचा किडा रेंगाळत होता. अश्या सल्ल्यांच्या नादी लागू नये ही अनुभवाची शिधोरी गाठीशी असल्याने हिच्या बोलण्याकडे सोयीस्कर रित्या दुर्लक्ष केलं. माझे सगळे मित्र हिला लुच्चे, लफंगे आणि बेभरवशी का वाटतात या विचारात इतका गुंग झालो होतो की एक दोन वेळा चहाचा घोट घेण्यासाठी ओठांना लावलेल्या कपात चहाच शिल्लक नाही हे लक्षात देखील आले नाही. माझा हा वेंधळेपणा बघून माझी बायको इतकी गोड हसली की तिचे हास्य मोऱ्याचे विचार डोक्यातून काढून टाकण्यास पुरेसे होते.

पुढे २-३ दिवस मोऱ्या मला भेटला नाही. आणि नंतर जेंव्हा जेंव्हा भेटायचा तेंव्हा एकच वाक्य असायचं …”आपल्या कामाकडे लक्ष ठेवा साहेब…. जरा बघ कुठे काहीतरी सापडलं तर.” सापडलं तर??? “अरे मोऱ्या …. तुझ्या साठी बायको शोधायची म्हणजे बाजारात एखादी वस्तू शोधण्या सारखं आहे का?” असं मी म्हणालो की लगेच तो म्हणायचा …”इथे नाक्यावर उगीच वाच्यता नको. निदान या वर्षी तरी घरी दिवाळीत कंदील लागून दे रे”. कधी कधी त्याची कीव यायची आणि कधी कधी वाटायचं हा मला काय विवाह मंडळ चालवणारा समजतो की काय? मोऱ्याचं असं माझ्या मागे हात धुवून लागणं मला बेचैन करायचं. मोऱ्याचं वय आणि आर्थिक परिस्थिती हे सर्वात मोठी अडचण होती. माझ्या माहिती मध्ये मोरेश्वर बापट यांच्या स्थळाविषयी सांगून ठेवले होते पण म्हणावे तसे यश मिळत नव्हते. मध्ये एक दोन इच्छुक विधवांची स्थळे आली होती असं मोऱ्या म्हणाला. पण केवळ फोटो बघूनच मोऱ्याने नकार घंटा वाजवली होती. त्यामुळे सध्या तरी मोऱ्याच्या एकटेपणावर आणि मटर पनीर वर मार्ग मिळाला नव्हता. मोऱ्याचे दोनाचे चार होण्यासाठी मी काही विशेष प्रयत्न करत नव्हतो. अर्थात तसे प्रयत्न न करण्यामागे काही खास कारण देखील नव्हते. मोऱ्याला बायको मिळण्याचे सोयरसुतक नव्हते पण मोऱ्या सोकावत होता. रोज रात्री तो जे माझ्या मेंदूचे चाटून पुसून चावे घ्यायचा ते आता झेपण्या पलीकडे गेले होते. याची परिणीती एकच होणार होती …. हळू हळू मी मोऱ्याला टाळणार होतो. ;)

ऑफिस मध्ये माझा एक सहकामगार होता …. उदय सुर्वे. त्याचे “कांदेपोहे” कार्यक्रम चालू होते. एके दिवशी त्याला विवाह मेलनाच्या (matrimony) संकेतस्थळांवर रेंगाळताना बघितलं. फावल्यावेळात त्याची टर उडवत असताना लग्नाचा विषय निघाला आणि या अश्या वेबसाईटच्या मदतीने त्याचे लग्न जवळ जवळ “फिक्स” झाल्याचे कळले. मी जोरात (मनातल्या मनात) ओरडलो …. “युरेका”. माझी सौभाग्यवती लग्नाच्या ५ वर्षे आगोदरच “फिक्स” झालेली होती त्यामुळे मला असल्या उठाठेवी कधीच कराव्या लागल्या नाहीत. उदय कडून या अश्या संकेतस्थळांची संपूर्ण माहिती घेतली आणि हे पिल्लू मोऱ्यावर सोडायचे ठरवले. अर्थात या अश्या साईटवर माझा अजिबात विश्वास नव्हता पण उदयचे उदाहरण ताजे होते. तसं सध्या फेसबुक मार्फत पण लग्न ठरतात असं ऐकून होतो पण ते मोऱ्या साठी अती झालं असतं. त्याच रात्री मोऱ्याला भेटून त्याला या ऑनलाईन विवाह मेलनाविषयी माहिती दिली की माझा व्याप कमी होणार होता.

ऑनलाईन विवाह मेलनासाठी लागणाऱ्या बऱ्याच गोष्टी मोऱ्याकडे अस्तित्वातच नव्हत्या. या युगात ज्या मानवाला संगणक म्हणजे दूरचित्रवाणी संचाप्रमाणेच असलेला एक तापदायक खोका असे वाटते त्याच्या कडे ईमेल आयडी काय असणार … घंटा?? “हा सगळा प्रकार तुला अजिबात जमणार नाही” असे मोऱ्याला परोपरीने समजावले. पण मोऱ्या भलताच हुशार … त्याने माझाच मोरू केला. “अरे तु तर २४ तास त्या कॉम्पुटरवरच असतोस ना …. आणि तुझा तो आयडी का काय ते आहेच….. मग तुझाच आयडी टाक ना. आणि काही मेल आलाच तर तु चेक करशीलच ना. तसा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहेच.” मनातून त्याला एक कचकावून शिवी घातली आणि विचार केला साल्या म्हणे तसा विश्वास आहे काय?? जणू काही कुणी बाई या मोऱ्यावर भाळली आणि ती लट्टू असल्याचा मेल मला आला तर या मोऱ्याच्या ताकास तूर न लागू देता मीच त्या उतावळी बरोबर चतुर्भुज होणार आहे…. मोऱ्याला काकापुता करून बरेच समजावण्याचा निरर्थक प्रयत्न करून देखील मोऱ्याने आपला कोकणी चिवटपणा सोडला नाही. आता मोऱ्याचं हे पण लचांड माझ्याच गळ्यात पडणार होतं. मग आलीया भोगासी असं म्हणत २-४ विवाहमेलन संकेतस्थळांवर मोरेश्वर बापटाला विवाहेच्छू उमेदवार म्हणून उभा केला. मोठ्या हौशीने मोऱ्याने वेगवेगळया पोझ मधले आपले फोटो टाकले आणि सगळी माहिती भरली. अपेक्षित वधू बद्दलच्या अपेक्षा माफकच होत्या ….

त्या विवाहमेलनाच्या संकेतस्थळांवर मोऱ्या चांगलाच रुळला होता हे त्याच्या प्रफुल्लित चेहेऱ्या वरून कळतच होतं. सगळ्या फोटोंचे निरीक्षण, गणन आणि अनुमान यांचे मनातल्या मनात विश्लेषण चालले असावे. कारण ज्या फोटोवर तो जास्त वेळ घुटमळत होता त्या स्थळाबद्दल “ही कशी वाटते?” असा टिपिकल प्रश्न विचारताना मोऱ्या आपल्या भुवया पण उडवायचा. मि काय असेल ते माझे परखड मत द्यायचो. इतक्या सगळ्या विविध रंगाच्या, विविध ढंगाच्या आणि विविध अंगाच्या होतकरू बायकांना बघून मोऱ्या पार गोंधळून गेला होता. आता निश्चित कुणासाठी हात पुढे करावा हेच सुचत नसल्याने माझ्याकडे बघून मोरेश्वरपंतांच्या भुवया सारख्या उडत होत्या. शेवटी वैतागून त्याला म्हणालो “चायला बायको तुला करायची आहे. मग तु बघ तुला कुठली उचलता येईल ती…. म्हणजे तुला झेपेल अशी…. त्यात मि काय कप्पाळ सांगणार?” मग हो ना करता करता मोऱ्याने १५ – २० जणींना ऑनलाईन मागणी घातली. सगळं झाल्यावर मोऱ्या मला नाक्यावर घेउन गेला. आता आपलं लग्न झाल्यात जमा असल्याच्या अविर्भावात मोऱ्याचं धुम्रपान चालू होतं. अर्थात त्या पैकी एकाही बाईचं उत्तर आले नाही तो भाग वेगळा. आता मोऱ्या मला दुहेरी पिडणार होता आणि माझी परिस्थिती “गाढव अंगावर घेतलंय ना …. मग त्याचा सोस पूर्ण होई पर्यंत उतरवता येणार नाही” अशी झाली होती.

(क्रमश:)

मोऱ्या बापट (भाग २)

वय अंदाजे ४५ च्या आसपास. साधारण उंच आणि बऱ्या प्रमाणात रुंद. वयोमानापरत्वे विरळ झालेले केस. कानातच्या पाळीत घुसवलेला हीना अत्तराचा फाया. बोलता बोलता मधेच तर्जनीने तो बोळा घुसळून वास घ्यायची वेगळीच लकब. शर्टाचा खिसा कागदाच्या असंख्य चीठोर्यानी ओथंबलेला. पोटाचा घेर विशेष नसला तरी त्याचा ताण शर्टाच्या काही बटणांना निश्चित जाणवत होता. बापट या आडनावाला शोभेल असा गौर वर्ण आणि चित्पावनी वाणीला अस्सल राजापुरी वळण. संगीत आणि पानाशिवाय दुसरे कुठलाही शौक नसलेला शौकीन माणूस. दिसायला … वागायला तसा अजागळच. फटकळ नव्हता पण त्याच्या स्पष्टवक्तेपणा ठासून भरलेला.

आता मोऱ्या मला रोज रात्री न चुकता भेटायचा. त्याच्या बरोबर गप्पा मारण्यासाठी कधी विषय शोधावे लागले नाही. जुन्या आठवणी, कोकण आणि संगीत हे त्याचे विशेष जिव्हाळ्याचे विषय. यात कधी आमच्या एकमेकांच्या व्यक्तिगत आयुष्यावर कधीच बोलणं झालं नाही. जीवनाच्या रंगमंचावरील व्यावहारिक नात्यातील मोऱ्या आणि व्यक्तिगत जीवनातील मोरेश्वर … या दोन भुमिकांमध्ये कमालीची तफावत होती. वरून अलबेल दिसत असलं तरी आत कुठली तरी नाजूक जखम मोऱ्याला सलत होती. हळू हळू त्याच्या जीवनातले विविध पैलू उलगडत गेले आणि माझ्या मनात असलेला मोऱ्याचा गुंता सुटत होता. नाक्यावर अघळपघळ असणारा मोऱ्या खासगी मध्ये तितकाच विचारी, बुद्धिवादी होता. कधी कधी वाटायचं …. आज मी ज्याचाशी बोलतोय तो मोऱ्या नसून त्याच्या शरीरात घुसलेला भलताच कुणी तरी आहे. तासंतास एखाद्या गंभीर विषयावर चर्चा करतानाच मध्येच कधीतरी असंबद्ध आणि बाळबोध विचार मांडायचा. एखादा अट्टल बेवडा पण झुलणार नाही इतकी त्याची वैचारिक पातळी झुलायची. जितका तो विक्षिप्त होता तितकाच तो भावूक आणि हळवा देखील होता.

एकदा का मोरेश्वरपंतांची स्वारी गायब झाली की ८ – ८ दिवस दर्शन दुर्लभ असायचे. सडाफटिंगच तो …. कुणालाही न सांगता गायब व्हायचा. आणि जेंव्हा तो परत यायचा तेंव्हा नाक्यावरील गुज्जू कंपूचा टार्गेट असायचा. कुणीतरी खिजावायचं “काय मोरू शेठ …. कुणीकडे गेलं होता? कुणी भेटली का?? कुठे घेऊन गेला होता?” नाक्यावरच्या टवाळ संस्कृतीला साजेसेच हीन दर्जाचे आपुलकीचे आणि जिव्हाळ्याचे प्रश्न. मोऱ्या पण अस्सल राजापुरी मिश्कील उत्तरं देऊन त्यांची तोंड बंद करायचा. मी एक दोन वेळा मोऱ्याला या सगळ्या प्रकार बाबत हटकलं तर तो म्हणायचा …. “जाऊंदे रे …त्यांची थोडी करमणूक होते ना. आणि माझा पण टाईमपास. अश्या वांझोट्या गोष्टींना फाजील महत्व देऊ नये” मी काही बोलणार इतक्यात तो विषय तरी बदलायचा किंवा एखादे छानसे गाणे तरी म्हणायचा. सुरांच्या नावाखाली बोंबच होती तो भाग अलाहिदा. आताशा मोऱ्याची खूप सवय झाली होती. कधीतरी शाम्यापण हजेरी लावायचा. नाक्यावरच्या गप्पा अगदीच रंगल्या तर त्यांचा समारोप रेल्वे स्टेशन वरील चहा वाल्याच्या टपरीवर व्हायचा. मोऱ्याचं गायब होणं … अचानक प्रगट होणं चालूच होतं. फरक इतकाच होता की आता मला त्याचा ठावठिकाणा माहित असायचा. मोऱ्या एक उत्तम इलेक्ट्रिशियन होता आणि व्यवसायानिमित्त तो भ्रमंतीवर असे.

असेच एकदा एक आठवड्याच्या अज्ञातवासानंतर मोरेश्वरपंत नाक्यावर अवतीर्ण झाले. मोऱ्याच्या एकंदरीत हालचाली वरून काहीतरी बिनसले आहे हे माझ्या ध्यानात आले. त्या गुज्जू टोळक्याने परत टवाळकी चालू केली तसा कधी नव्हे तो मोऱ्या भडकला …. “भडव्यानो …. तुमच्या xxxxx बरोबर होतो इतके दिवस.” प्रसंग बाका होता …. टोळक्याला पण त्याची जाणीव झाली. मी मोऱ्याला लांब घेऊन गेलो. मोऱ्या दुकानाच्या कट्ट्यावर बसला…. कपाळावर हात …. नजर मेलेली. घाई घाई ने त्याने मोबाईल काढला …. इअरफोनची बोंड कानात घुसवली आणि गाणी ऐकू लागला. १० – १५ मिनिटांनी शांत झाला. पण चेहेऱ्यावरची आग थंड झाली नव्हती. मोऱ्या सॉलिड पेटला होता. त्याला इतकं पोटतिडकीने बोलताना पहिल्यांदाच बघितलं. “अरे या फोकलीच्याना काय जातंय चिडवायला? यांना काय माहित माझ्या आयुष्याचं काय मातेरं झालंय ते? दर वेळेला यांचं आपलं एकच …. बाई आणि बाटली. स्वतः मात्र बारा गावाचं पाणी प्यायलेत.”

एकंदरीत परिस्थिती हाता बाहेर जाण्याआधी मी मोऱ्याला तिथून खेचतच बाजूला नेला. “चल चहा मारुया” असं म्हटल्यावर एक चकार शब्द न काढता मोऱ्या बाईक वर टांग टाकून बसला. अश्या परिस्थितीवर एकच उतारा …. मस्त कडक वाफाळलेला चहा. मोऱ्याने सिगारेट शिलगवली. तर्जनी आणि मध्यमेच्या बेचकीत सिगारेट घट्ट धरून हाताची मुष्टी मुद्रा करून जोरदार कश मारला. सिगारेटच्या धुरासोबत वाफाळलेल्या चहाचे एक दोन घोट मोऱ्याच्या नाभी पर्यंत पोहोचल्यावर मोऱ्याची कुंडलिनी जागृत झाली. मोऱ्याने त्याच्या आयुष्याच्या इतिवृतांताचे कथन चालू केले. माहीत नसलेल्या बऱ्याच गोष्टी त्या रात्री उमगल्या त्या वरून मोऱ्याचे विक्षिप्त वागण्याचे संदर्भ जोडत होतो. कोकणातील जागेच्या भानगडी, चुलात्यांचे त्रास, सलग ३ वर्षात घरातील अगदी जवळच्या माणसांची आजारपणे आणि त्या आजारपणात त्यांचे झालेले मृत्यू, बिघडलेली आर्थिक परिस्थिती …. आणि इतकं सगळं होऊन सुद्धा सगळ्या कडू आठवणी मनात दाबून ठेवून चेहेऱ्यावर त्याचा लवलेशही न दाखवण्याचा मानसिक कणखरपणा बाणावलेला मोऱ्या आपल्या अंतरंगाच्या विस्कटलेल्या रांगोळीचे रंग सारखे करण्याचा प्रयत्न करत होता. तो नुसता बोलत होता आणि मी ऐकत होतो. हो, नाही, बरं … ठीक आहे या व्यतिरिक्त मी तरी काय प्रतिक्रिया देणार. “नंदू …. कुठे हरवलास?” या वाक्याने मी भानावर आलो. ज्यांना ज्यांना मी माझे दुःख सांगतो त्यांचे असेच होते …. म्हणून तर मी माझे रडगाणे कुणालाही सांगत नाही. माझ्या हे रडगाणे ऐकण्या पेक्षा बाबूजींचे भावगीत उत्तम … “मग आज मला सांगण्याची उपरती का झाली??” मी जरा खोचकपणे विचारलं. “तु जवळचा वाटलास … अगदी लहान भावासारखा … इतके दिवस मनाचा कोंडमारा झाला होता. केंव्हापासून तुला या सगळ्या गोष्टी सांगणारच होतो. पण कधी योग आला नाही. आज तुझ्याजवळ जरा मन हलकं झालं.” मध्ये एक आवंढा गिळून मोऱ्या गप्प झाला.

बराच वेळ घेतलेल्या शाब्दिक विश्रामानंतर मोरेश्वर पंतांनी काहीतरी बोलण्यासाठी परत तोंड उघडले. “अरे गेली ८ वर्षे भोगतोय मी हे सगळं दुष्टचक्र. मनावर झालेले जे काही घाव सोसले आहेत ते तुझ्याच काय इतर कुणाच्याही वाट्यास येऊ नयेत” “माझ्या? … साल्या मोऱ्या … चहा पण चढायला लागला की काय?? …. तुला शत्रूला असे म्हणायचे आहे का?” मी जवळ जवळ ओरडलोच. मोऱ्या शरमला….. उगाच वजनदार साहित्यिक वाक्य टाकण्याच्या नादात भलतच काही तरी बडबडलो हे त्याला उमगल्याने त्याने लगेच सारवासारव केली …”तेच ते रे …. आनंदा…. तु भावना समजून घे रे” …. मी मनोमन कपाळावर हात मारून घेतला. “वर्षभर पलंगावर खितपत पडलेल्या आईने अखेरचा श्वास घेतला आणि तिच्या नंतर लगेच सासुबाईना देवाज्ञा झाली. आता मी त्यांच्या एकुलत्या एक कन्येचा एकुलता एक जामात असल्याने त्यांची सगळी नैतिक जबाबदारी माझ्यावरच नाही का??” मी मान डोलावून “हो हो ” म्हटलं. मोऱ्या नुसता कादंबरी छाप वाक्ये बोलत होता. आणि त्या गंभीर प्रसंगात देखील मला हसू येत होतं (मनातल्या मनात). “या दोन माउलींची आजारपण बायकोने तिच्या व्याधी कडे दुर्लक्ष केले. आणि ते दुर्लक्ष तिच्या जीवावर बेतले. माझा सुखी संसार उध्वस्त झाला. नशीब एखादे मुलबाळ सोडून नाही गेली नाहीतर आज आईविना त्या पोराची काय अवस्था झाली असती? त्याला कसं संभाळले असते ते परमेश्वरच जाणे. भरलेलं घर, त्या सोबतच्या असलेल्या सगळ्या गोड आठवणी घेउन गेली ती. ३ – ३ जणींचा आजारपणाचा खर्च पेलला नाही … मग स्वतःचे मालकीचे घर सोडून भाड्याच्या घरात राहायला आलो. पण तिच्या सोबत घालवलेल्या सोनेरी क्षणाच्या आठवणी अश्या सहजा सहजी थोडीच पुसल्या जाणार? कापड कितीही उसवलं तरी काही धाग्यांची वीण सुटता सुटत नाही” मोऱ्या एखादी कादंबरी उघडून त्याच्यातील छापील शब्द बोलत होता असे हळू हळू मला वाटायला लागले. “बरेच दा एकट्याला घर खायला उठतं. भिंती अंगावर धावून येतात असे वाटते. कुठेही कामानिमित्त बाहेर गेलो तरी माझ्या वाटेवर डोळे लावून बसणारं कुणी नाही. चार शब्द म्हणून कुणाशी बोलायचे असे वाटले तर घरात सगळंच निर्जीव …. आताशा सकाळी उठल्यावर चादरीला पडणाऱ्या चुण्या पण रुसून निघून गेलेल्या. थकलोय रे आता या एकटेपणाला.रोजचं बाहेर खाणे जमत नाही …. शेवटी घरच्या साध्या पण प्रेमाने भारलेल्या वरण भाताची गोडी बाहेरच्या पनीर मटरला नाही रे.” हे सांगता सांगता मोऱ्याचे डोळे पाणावले.  मोऱ्या एकदम काकुळतीला येवून बोलत होता आणि त्याची धग हळू हळू मला लागतं होती. “सध्या मराठी साहित्य जास्तच वाचतोस का?” असा खोडसाळ प्रश्न मी ओठांवरच रोखून धरला.

माझ्या इतक्या रात्री जागृत असलेल्या सद्सद्विवेक बुद्धीला अनुसरून मी बाळबोध प्रश्न विचारला “मग पुनर्विवाह का नाही केलास?” (मला ‘परत लग्न का नाही केलंस’ असं विचारायचं होतं बहुधा …. पण पुनर्विवाह हा शब्द म्हणजे मोऱ्याच्या बोलण्याचा इफेक्ट असावा) मी हा प्रश्न विचारणार हे माहित असल्यागत मोऱ्याची एका शब्दात उत्तरला “माझं अर्धवट वय आणि माझी आर्थिक परिस्थिती”. मोऱ्या गप्प झाला …. एखाद्या दिर्घविरामा सारखा. पण त्याच्या डोक्यात काहीतरी विचार चक्र चालू होती. अजून एक सिगारेट शिलगवत मोऱ्याने २-३ जोरकस कश मारले. अचानक मला विचारलं “बायको बघशील माझ्यासाठी?” मी पार उडालोच. मी आणि मोऱ्या साठी बायको शोधणार???? मैत्रीखातर केलेली मोऱ्याची ही विनवणी अजब होती. महिन्यातून एक दोन वेळा घरच्या जेवनाची सोय करू शकलो असतो फार फार तर … पण इथे तर डायरेक्ट बायको. आज काल सोन्याचे अंडे मिळू शकते पण इथे तर मोऱ्याने डायरेक्ट कोंबडीच मागितली. माझ्या चेहेऱ्यावरचे अगम्य भाव बघून मोऱ्या म्हणाला “तुला संकोच वाटत असेल तर राहून दे. पण कुठे असं स्थळ असेल तर लक्षात ठेव. अगदी कुणी पण चालेल … विधवा, घटस्फोटिता, परित्यक्ता … नाकी डोळी कशीही असली तरी चालेल पण हाती पायी धड असावी. लेकुरवाळी असेल तरी चालेल … मी जबाबदारी घ्यायला तयार आहे.” मोऱ्याच्या अपेक्षांचा नळ गळत होता. मी थोडं अवघडूनच म्हणालो “अरे कठीण नाही पण सोप्पं देखील नाहीये. तुझ्या अपेक्षा पूर्ण करणारी तुला हवी असलेली व्यक्ती आत्ता तरी माझ्या नजरे समोर नाही.” प्रसंग हलका करण्यासाठी मी त्याला म्हटले “स्त्री नाहीये पण एक पुरुष आहे …. चालणार असेल तर बघ. शब्द टाकतो तुझ्यासाठी. आजकाल अशी लग्न होतात … तु एक तडजोड म्हणून विचार कर. आणि पुढे मुलबाळ पण होणार नाही याची १००% खात्री.” माझा मिश्कील स्वभाव जाणून असल्याने मोऱ्या भडकला नाही. उलट थोडा लाजतच म्हणाला “कशाला थट्टा करताय गरीबाची. अरे, अडलेल्या गर्भार्शिनीला आणि उभ्या असलेल्या खोंडाला उगीच नाडू नये” मी मोऱ्याची उगीच खेचायची म्हणून म्हणालो “खोंड ??? कोण तु?? अंगावरच्या माशा हाकलायची गरज पडली तर शेपटी पण हलणार नाही तुझी. खोंड म्हणे खोंड … अरे धोंड आहेस तु धोंड.” हा संवाद इथेच संपला आणि मोऱ्याला त्याच्या घराखाली उतरवला. जाताना त्याच्या साठी सुशील, सद्वर्तनी सहचारिणी बघण्याचे आर्जव करायला विसरला नाही. आता जेंव्हा जेंव्हा मोऱ्या मला भेटणार होता तेंव्हा तेंव्हा “लग्न” या विषयावरून माझ्या मेंदूला “नग्न” करणार होता.

(क्रमशः)

मोऱ्या बापट (भाग १)

(मित्रांनो हे माझे पहिलेच दीर्घ स्वरूपातील व्यक्तिचित्र आहे. त्यामुळे अधे-मधे कुठे लिखाण भरकटल्या सारखे वाटल्यास जरूर कळवा.)

——————————————————————————————————————————

रोज रात्री जेवण झाल्यावर एक फेरफटका मारायची सवयच जडली होती. (घरच्यांच्या भाषेत रात्री उकिरडे फुंकायला बाहेर पडणे) कॉलेज मध्ये असताना जेंव्हा मित्र परिवार आणि इतर काही व्यासंग जोम धरू लागले तेंव्हा पासून जडलेला हा छंदच म्हणा हवं तर. लग्नाच्या बेड्या आणि बायकोच्या वेशात लाभलेला रिंगमास्टर देखील या नादापासून परावृत्त करू शकलेला नाही. “दिवसभर इतका उंडारत फिरतोस तरी रात्री अपरात्री बाहेर उकिरडे फुंकायला जायला हवंच कशाला मुळी” हे आईचे पालुपद पुढे माझ्या अर्ध्या अंगाने  एखाद्या घेतलेल्या वस्याप्रमाणे चालू ठेवले होते.  दिवसभर काम करून दमल्यावर जरा पाय मोकळे करायला जातो इतकंच. रात्री जेवण झाल्या झाल्या जे अजगरासारखे सुस्त होऊन लोळायला लागतात त्यांना ही ‘मोकळं’ होण्यातली मज्जा नाही कळणार. रात्री नाक्यावर जमून मित्रांमध्ये होणारी वैचारिक देवाणघेवाण या अश्या लोळकर मंडळीना नाही कळणार. राहण्याच्या २-४ जागा बदलल्या तरी रात्रीचा नाका आणि नाक्यावरचे मित्र काही सुटले नाहीत. जुने नाके लांब वाटू लागले की नवीन जवळच्या नाक्याशी सलगी करायची. तिथे येणाऱ्या माझ्या सारख्याच निशाचरांमधून कुणीतरी एखादा ‘समान शील व्यसनेषु’ असलेला सखा मिळतोच. नुकतंच घर बदललेलं होतं आणि जवळच एक नाका सापडला. मुख्य रस्त्यावर असल्याने त्या परिसरातील बरेच जण तिथे ‘पडीक’ होते. गुजराथी समाजाचे प्राबल्य असल्याने येणारे गांडाभाईच जास्त.  पण त्या घोळक्यात सुत जुळणारे कुणीच नव्हतं. तसे सगळे चांगले उच्चभ्रू होते … पण जेंव्हा तोंड उघडतील तेंव्हा सगळं मुसळ केरात. बरेचदा तर ते गप्पा मारत आहेत का भांडत आहेत तेच कळायचं नाही. त्यामुळे मी बरेच वेळा एकटाच असायचो आणि त्या पानवाल्या अण्णा कडून एरीयातील खबरी काढून घ्यायचो. तसं रोज नेमाने येणाऱ्या बऱ्याच जणांशी ओळखी झाल्या पण मैत्री अशी कुणाशी झाली नाही.

एके रात्री मी नुकताच जेवण संपवून नाक्यावर आलो होतो. बायको माहेरी गेली असल्याने घड्याळाच्या काट्यान्ची तमा बाळगायची तशी काही गरज नव्हती. पानवाल्या अण्णा बरोबर मस्त गप्पा रंगात आल्या होत्या. बाजूलाच गुज्जू टोळके होतेच. तितक्यात मोबाईल वर “लाजून हासणे अन् हसून ते पहाणे” हे गाणं जोरजोरात वाजवत कुणीतरी माझ्या बाजूला येऊन उभा राहिला. या अश्या वेळी हे गाणे, ते देखील मराठी मोबाईलच्या स्पीकर वर ऐकणारा हा रसिक माणूस कोण हे बघण्यासाठी त्याच्या कडे एक कटाक्ष टाकला. बरयाच यूपी बिहार मधील भैय्यांना त्यांची भोजपुरी गाणी मोठ्या मोठ्यानं वाजवत जाताना बघितलंय. पण त्यांचा हा शौक मराठी माणसाकडे पण आलाय हे बघून आश्चर्य वाटलं, त्याचं ते एकंदरीत ध्यान बघू हसूच आलं. कानात इयरफोनची बोंडे घुसवलेली असून सुद्धा हा माणूस स्पीकर वर गाणी का ऐकतोय हा मला पडलेला प्रश्न त्याने अचूक टिपला. हळूच हसत मला म्हणाला “इअरफोन ची वायर आत्ताच तुटली … म्हणून स्पीकर वर ऐकत होतो … आणि अण्णाच्या गडबडीत बोंड कानातून काढायची राहिली” मी पण फक्त हसलो.

तोंडात असलेल्या पानाची एक लाल भडक पिंक टाकून त्याने अण्णाला अजून एक पण बनवायची ऑर्डर दिली. एकी कडे अण्णाची खेचता खेचता मधूनच तो गुजराथी टोळक्याकडे बघून कुणाला तरी गांडाभाई म्हणाला तर कुणाची तरी केम छो म्हणून आदबीने चौकशी केली. त्या कळपातील त्याचे गुज्जू मित्र पण म्हणाले “काय रे भटा …. कुठे होता इतके दिस? कुठे झाऊन आला की काय?” अशी सगळी टवाळकी चालू होती. हा एकटा त्या सगळ्यांना आणि त्यांच्या आवाजाला पुरून उरत होता. हा मस्त अवलिया आसामी कोण, कुठला हे काहीच कळलं नाही पण बहुतेक या नाक्यावर मला मित्र मिळाला होता.

माझं येणं चालूच होतं पण नंतर हा इसम काही परत दिसला नाही. अण्णा कडे एक दोन वेळा सहजच चौकशी केली. अण्णा आपल्या टिपिकल मेंग्लोरीयन हेल काढून म्हणाला “वो? मोऱ्या? पता नई … अकेला है कहा जाता है बोलके नाही जाता. वैसे वो मोऱ्या एक नंबर का सटकेला है. घर में कोई नाही इसलिये भटकता रेहेता है. उसका कोई भरोसा नाही. कभीभी आता है और कभीभी जाता है. हमेशा बोलके जाता है लेकिन ये टाईम कुच बोला नई.” मी उगाच त्याला उकसवत होतो “क्या करता क्या है” “कुच नाही …. खुदाका बिजनेस है … मशीन और इलेक्ट्रिक का काम करता है. आदमी सिधा है तो अच्छा है. इन गुजराथी मारवाडी से तो सौ गुना अच्छा है. एक पैसे का उधारी नाही राखता है.” अण्णा पानाला चुना फासावा तशी माहिती पुरवत होता. इतक्यात दुसरं गिऱ्हाईक आलं आणि माझी सुटका झाली. थोडक्यात काय तर या ब्रह्मसमंधाचा पिंपळ फिक्स नसल्याने याचे बुड एकाच बुंध्यावर सापडणे कर्म कठीण. त्यामुळे पुढील भेटीसाठी वाट पहावी लागणार.

माझा रोजचा नेम तसाच अविरत चालू होता. पण ही वल्ली काही भेटत नव्हती. अण्णाला पण एक दोन वेळा विचारून बघितलं. अण्णा फणकारतच “नही” म्हणाला आणि तोंडातल्या तोंडात काहीतरी बडबडत होता. कदाचित कधीही उधारी न ठेवणाऱ्या मोऱ्या ने या वेळेस पैसे दिले नसावेत. इतक्यात समोरून ही स्वारी कुणाच्या तरी खांद्यावर हात टाकून डुलत डुलत येत होती. त्याच्या बरोबर असलेली व्यक्ती बहुतेक माझ्या ओळखीची होती. हो, शाम्याच तो, माझ्या असंख्य नाक्यांवरील असंख्य मित्रांपैकी एक. शाम्याला गाणी बजावण्याची भारी हौस …. बरीच वाद्ये पण वाजवता येत होती त्याला …. मोठा हरहुन्नरी कलाकार. मला तिथे बघून तो आश्चर्य चकितच झाला. मग इकडतिकडच्या गप्पा झाल्यावर शाम्या म्हणाला “थांब तुझी ओळख करून देतो … तुझ्या उपयोगाचा माणूस आहे …. सॉलिड कलेक्शन आहे याच्याकडे जुन्या गाण्यांचं.” असं म्हणून अण्णाला चिकटलेल्या मोऱ्याला शाम्याने हाक मारली. “थांब रे जरा … चायला या अण्णाला जरा बघतो … साला पहिल्यांदा १० रुपये द्यायचे राहून गेले तर गांडू जाम नाटकं करतोय” अण्णाशी मांडवली करून मोऱ्या आमच्या जवळ आला.

शाम्या: “हा माझा खास मित्र मोऱ्या …. मोऱ्या बापट. आपल्याला संगीताची आवड याच्यामुळेच लागली … अगदी लहानपणा पासूनची मैत्री. आणि मोऱ्या हा आनंद …. माझा नाक्यावरचा मित्र.”

एखाद्या आपल्यापेक्षा मोठ्या व्यक्तीला पहिल्यांदा भेटल्यावर निदान दोन्ही हात जोडून नमस्कार करण्याचे आपले जुने संस्कार आहेत. या जुन्या संस्कारांच्या झोळीतील काही संस्कार अजून तरी माझ्यात शिल्लक असल्याने मी रीतसर नमस्कार केला. ते बघून हस्तांदोलनासाठी पुढे केलेला हात तसाच मागे नेत मोऱ्याने पण नमस्कार केला. शाम्या कडे एक जळजळीत कटाक्ष टाकत म्हणाला “मी मोरेश्वर चिंतामणी बापट. वय वर्ष ४५, एकटाच असतो … बायको ४ वर्षांपूर्वी वारली …. धंद्यानिमित्त सगळी कडे फिरत असतो. डोंबिवलीत असलो तर रात्री ११ नंतर हमखास या नाक्यावर पडीक” खरं तर इतक्या विस्तृत ओळख परेडची अपेक्षा पण नव्हती. पण याच बाबतीत मोऱ्या कदाचित वेगळा वाटला…. पाण्याच्या झऱ्या सारखा ओघवता. आता मोऱ्या ची स्वारी शाम्याकडे वळली. “काय रे भि.चो. …. ओळख तरी निट करून दे. चायला मोऱ्या काय मोऱ्या. पहिल्यांदाच भेटतोय ना? समोरच्या अनोळखी माणसाला काय वाटेल?” शाम्या अजून चावायला लागला … “साल्या उद्या हा तुला मोऱ्याच म्हणणार ना? तुझा बाप पण तुला मोरेश्वर या नावाने ओळखत नसेल.” या वर मोऱ्याने त्याच्याकडे दुर्लक्ष करून मला म्हणाला “या शाम्या सारखे जवळचे आणि अडाणचोट मित्र मला मोऱ्या म्हणतात … काही जण मोची पण म्हणतात”. मी म्हटलं “मोची??” त्यावर मोऱ्या म्हणाला “अरे मी इतकी विस्तृत माहिती दिली तरी तुला कळलं नाही. मोची म्हणजे मोरेश्वर चा ‘मो’ आणि चिंतामणी चा ‘चि’ … म्हणून मोची”. असा खुलासा करून मोऱ्या पोट गदगदे पर्यंत हसला. शाम्यामुळे का होईना या मोऱ्याची आणि माझी तोंड ओळख झाली होती.

(क्रमशः)

Follow

Get every new post delivered to your Inbox.

Join 886 other followers