ऑइकोस प्रोजेक्ट – डोंगरवाडी

डोंगरवाडी, खोडाळा टाके रोड पासून काही किलोमीटर आत वसलेला १०० उंबरठ्यांचा पाडा. या भागात असलेले पाण्याचे दुर्भिक्ष्य ओघओघाने या गावात देखील होतंच. गावातील घरापासून साधारण १ किमी वर असलेली सार्वजनिक विहीर गावाच्या पाण्याच्या गरजा पुरवायला मार्च – एप्रिल नंतर अपुरी पडायची. आणि मग पाऊस पडेपर्यंत गावातील बायकांची वणवण सुरू व्हायची. उन्हातान्हातून ५-५ हांडे कळश्या घेऊन बायकांचे पाण्यासाठी फिरणे बघितले की जीव कापरा होतो.
रोटरी क्लब, ठाणे पश्चिम आणि ब्लॉसम चॅरिटेबल ट्रस्टने जलसंधारण आणि जल स्त्रोतांचे सक्षमीकरण करण्याचे काम ऑइकोसचे डॉ. उमेश मुंडल्ये यांच्या अनुभवसिद्ध मदतीने ठरवले. गावाच्या एकंदरीत भूभागाचे परीक्षण केले असता विहिरीपासून काही अंतरावर भूमिगत बंधारा बांधण्याचे ठरले. त्याचा फायदा यावर्षी देखील विहिरीचे पाणी जास्त काळ उपलब्ध होऊ शकते या बद्दल आम्ही आशावादी आहोत. दि. २९ मार्च रोजी ब्लॉसम संस्थेच्या अश्विनी रणदिवे, शर्मिला गुप्ते ऑइकोस चे डॉ. उमेश मुंडल्ये, विवेक जोशी, आनंद भातखंडे आणि गावकरी यांनी भूमिपूजन करून कामाचा श्रीगणेशा केला. गावकऱ्यांमध्ये महिलांची उपस्थती देखील लक्षणीय होती. निव्वळ १२ महिने पाणी मिळणार या केवळ कल्पनेनेच सगळ्यांचे चेहेरे खुलले होते. कालच भूमिगत बंधाऱ्याचे भूमिपूजन झाले आणि आज जागेवर जेसीबी पोचला सुद्धा. येत्या काही दिवसात हे काम पूर्ण होईल आणि याचा १००% फायदा पुढील वर्षी निश्चित मिळेल.


स्थळानुरूप जलसंधारण करताना योग्य पद्धतीचा वापर करून जलसाठा वाढवून किमान १२ महिने पिण्यासाठी, गुरांसाठी आणि इतर वापरासाठी पाणी उपलब्ध करून देण्यावर ऑइकोस टीमचा भर असतो. डॉ. उमेश मुंडल्ये यांचे कौशल्य आणि पालघर जिल्ह्यातील कामाचा प्रदीर्घ अनुभवाचा फायदा अश्या कित्येक गावांना झाला आहे आणि भविष्यात देखील होत राहील. आत्तापर्यंत गेल्या ३ वर्षांमधे ब्लाॅसम संस्थेसाठी काम केलेल्या ५ गावांमधे आता टॅंकरची गरज नाही आणि वर्षभर पुरेसा पाणीसाठा असतो.
कुठल्याही गावात, शहरात (Rain water harvesting) जलसंधारणाचे काम करायचे असेल तर ऑइकोसशी जरूर संपर्क साधा.

ऑइकोस – +91 99670 54460 । rwh.oikos@gmail.com

जलसंधारण #watershedmanagement #water #waterconservation #oikos #blossomcharitabletrust

आबालाल अडकित्ते आणि मुमताज महल

व्यावसायिक रंगभूमीवर जमून गेलेले प्रायोगिक नाटक

abalal

(टिप: हे नाटकाचे परीक्षण नाही. कुठल्याही नाटकाचे मोज मापन करण्या एवढा माझा त्या विषयाचा अभ्यास नाही व्यासंगही नाही. या लेखाला फार तर नाट्यानुभव म्हणू शकतो.)

डोंबिवलीच्या सावित्रीबाई फुले नाट्यमंदिरा पासून हाकेच्या अंतरावर राहायला आलो तरी देखील नाटक बघण्याचा योग काही केल्या जुळून येत नव्हता. कधी नाटकाची वेळ  सोयीची नव्हती तर कधी आवर्जून एखादे नाटक बघायला जावे असे वाटले नाही.  दिनांक १५ एप्रिल २०१८ रोजी सकाळी नेहेमीप्रमाणे सकाळचे वृत्तपत्र चाळत असताना स्वयंपाक घरातून आज सावित्रीबाई फुले नाट्यगृहात कुठले नाटक आहे हे बघण्याची वर्दी आली.  शशांक केतकर आणि नेहा जोशी यांच्या “आबालाल अडकित्ते आणि मुमताज महल” या नाटकाचा प्रयोग होता. वेळ होती संध्याकाळी साडे चारची. नावाचा आणि नाटकाच्या पोस्टर मध्ये काहीही साधर्म्य नसले आणि काहीतरी वेगळेच नाव असले तरीहि कलाकार ओळखीचे असल्याने “बघायला हरकत नाही” असे म्हणून नाटकाला जायचे निश्चित झाले. आम्हां तिघांची तिकिटे आधीच काढून ठेवली असल्याने थेट आसनस्थ झालो.

तीन घंटानाद झाले आणि अजूनही नाट्यगृह अर्धे देखील भरले नाहीये हे बघून माझी चुळबुळ सुरु झाली. बरेच प्रेक्षक नियमित पास धारक असल्यासारखे वाटत होते. लेक पहिल्यांदाच नाटकाला आली होती त्यामुळे तिच्या साठी हा अनुभव नवीन आणि वेगळाच होता. त्यामुळे तिला माझ्या प्रश्नार्थक आणि चिंताजनक चेहेऱ्यावरून काहीही कळत नव्हते. डोंबिवली सारख्या शहरात एखाद्या नाटकाला इतका अल्प प्रतिसाद म्हणजे, झालं पैसे फुकट गेले. …. माझी अस्वस्थता कुटुंबाच्या लक्षात आल्यावर तिने माझ्यासाठीच्या खास ठेवणीतल्या नजरेने मला गप्प केले.

एवढी कमी गर्दी का याचा उलगडा नाटकाच्या शेवटी झाला. नाटक संपले … पडदा अर्धा बंद होऊन पुन्हा उघडला गेला. सगळे कलाकार रंगमंच्यावर आले. श्री. शशांक केतकर यांनी छोटेसे निवेदन केले तेंव्हा काही गोष्टी ठळकपणे समोर आल्या. लेखक आणि दिग्दर्शक श्री. गजेंद्र अहिरे यांच्या “आबालाल अडकित्ते आणि मुमताज महल” या नाटकाचा डोंबिवलीतील पहिलाच आणि महाराष्ट्रातील केवळ चौथा प्रयोग. १२ एप्रिल ला पहिला प्रयोग प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृह, बोरीवली येथे संपन्न झाला. साधारणपणे प्रायोगिक रंगभूमीला साजेशी संहिता असलेले, थोडे हटके असलेले नाटक व्यावसायिक रंगभूमीवर आणण्याचे शिवधनुष्य पूर्ण टिम ने लीलया पेलले. या संहितेला सजवण्याचे कार्य प्रदीप मुळ्ये (नेपथ्य-प्रकाश), शैलेंद्र बर्वे (संगीत), सोनल खराडे (वेशभूषा) प्रत्यक्षात आणले. शशांक केतकर, नेहा जोशी, नम्रता संभेराव, प्रणव जोशी, किरण राजपुत, आणि श्रद्धा मोहिते या कलाकारांनी तर प्रेक्षकांना दोन अडीच तास नाट्यमुग्ध केले.

राघव आणि सई, एका मनस्वी चित्रकाराची/कलाकाराची आणि त्याला पदोपदी साथ देणाऱ्या प्रेमळ मैत्रिणीची  कथा आहे आबालाल अडकित्ते आणि मुमताज महल. स्वतःच्या “मी” च्या शोधात असलेल्या, एका वेगळ्याच मानसिक आणि भावनिक गर्तेत अडकलेल्या राघवच्या मनोगताने कथेची सुरुवात होते. नायकाच्या संवादात आलेली मुंबईची सद्य परिस्थिती सांगणारी कविता तर फारच भन्नाट वाटली. नाटकातले संवाद, स्वगत सहज सोप्या शब्द प्रयोगांमुळे परिणामकारक वाटतात. राघवला जीवापाड जपणारी सई, आपली नोकरी सांभाळून त्याला निराशेच्या गर्तेतून बाहेर काढण्याचा, त्याला त्याच्या पायावर उभे करण्याचा कसोशीने प्रयत्न करत असते. एकामागे एक घटना उलगडत जातात आणि नाटकाची कथा प्रेक्षकांच्या भोवती रुंजी घालू लागते.

शमा नावाची एक अदृश्य व्यक्तिरेखा या नाटकात आहे. खरे तर या व्यक्तिरेखेचा प्रवेश खूप उशिराने होतो. तो जर का पहिल्या अर्ध्यातासात झाला असता तर राघवाच्या मानसिक अवस्थेच्या संकल्पनेला अजून पाठबळ मिळाले असते.  शमा, राघवची बालमैत्रीण, लहानपणी दोघे खेळत असताना तिचे अपहरण होते आणि परत ती त्याला कधीच भेटत नाही. या सगळ्या प्रकरणाचा राघवच्या बालमनावर मनावर परिणाम होतो.

चाळीतल्या काही वादामुळे राघव मुंबई सोडून निघून जातो. आणि त्याच्या मनातली घुसमट कमी होऊन त्याच्यातला खरा कलाकार त्याला सापडतो. “मी” ला शोधायला निघालेला राघव सईला पाठवलेल्या पत्रांच्या रूपाने आपल्याला भेटत राहतो. या सगळ्या प्रसंगाचा योग्य तो परिणाम साधण्यासाठी दिलेल्या पार्श्वसंगीताला श्रद्धा मोहिते यांनी गायलेल्या गझलची जोड तर निव्वळ अप्रतिमच.

राघव ज्या चाळीत राहत असतो त्या चाळीची मालकीण (नम्रता संभेराव), त्याच चाळीत नवऱ्याच्या कायम दडपणात राहणारी शेजारीण (किरण राजपुत), साधा मध्यमवर्गीय जुन्या रूढींना जपणारा पुरुषप्रधान संस्कृती मानणारा तिचा नवरा, श्री. वाघ (प्रणव जोशी) या सगळ्यांनी आपापल्या भूमिका सुंदर वठवल्या आहेत. कथानक जास्त उघड न करता इथेच थांबतो.

(नाटकाचे पोस्टर गुगल वरून साभार)

सुट्टी आणि मी : भाग ०२

मुलीचं उन्हाळी शिबीर यथासांग पार पडलं आणि आमची नागांवला जायची तयारी सुरु झाली. सामानसुमान जमवणे त्याची बांधाबांध सगळंच नोकरीच्या वेळा सांभाळून शिस्तीच्या बडग्याखाली आमलात आणलं जात होतं. नागांवचे घर इतर वेळी बंदच असल्याने लागणारे बरेच समान घेऊन जायची सवयच झाली होती आणि यावेळेची वस्ती तर चक्क ८ दिवसांची होती त्यामुळे जाताना सामानामुळे गाडीची डिक्की भारलेली असणार हे निश्चित. आमचे कपडे, विविध खायच्या वस्तू, चकणा आयटम्स, निरनिराळी पीठे, आम्ही नसताना घरात फुकट जातील म्हणून उरलेल्या भाज्या, कांदे बटाटे अश्या अनेक गोष्टीनी डिकी सजली होती. डीकीचा दरवाजा लावताना आत काहीतरी तुटल्याचा आवाज आला पण आतले रचून ठेवलेले समान पत्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळेल म्हणून उगीच रिस्क नाही घेतली. जाता जाता वाटेमध्येच उसनी आणलेली कर्नाळ्यातील कांदे भज्यांची भूक आणि पळीच्या सोड्याची तहान भागवली. डोंबिवली पासून नागाव मात्र १०० की.मी. असल्याने ३ तासातच इच्छित स्थळी पोचलो. हेमंतानेआधीच सगळी साफसफाई करून ठेवली असल्याने समान लगेच जागच्या जागी लावण्यासाठी शि.प्रि. नी कंबर कसली. दिवसभरात हळू हळू पाव्हणेरावणे जमू लागले. पुण्याहून माधुरी, अभिजीत आणि ओम आले. बोरिवली वरून ताई, मिलिंद आणि कलश आले आणि कोरम पूर्ण झाला. घर कसं फुलून गेलं आणि रात्री गप्पांना ऊत आला. सकाळी सकाळी माझ्या भाच्यांनी आणि मुलीने मला झोपेतून उठवण्याचा चंग बांधला होता. प्रत्येक जण आपापल्या परीने खोड्या काढत मला उठवत होता. आणि जसा मी उठलो तसा “आजचा मेनू” अश्या अविर्भावात येत्या ५ दिवसात काय काय धम्माल या बच्चे कंपनीला करायची होती त्याचा पाढाच वाचून दाखवला. अगदी आंबे चिंचा गोळा करणे, बर्फाचा गोळा खाणे, शहाळी पडणे, हौदात डुंबणे, समुद्रावर फिरायला जाणे इथ पासून ते बैलगाडीत बसणे इथपर्यंत. त्यात बर्फाचा गोळा, हौद आणि समुद्र एकदम “अती महत्वाचे आणि अत्यावश्यक” या सदरातील. हे सगळे आणि अजून काही सुचेल ते आपण या सुट्टीत करायचे असे म्हटल्यावर एकच गलका झाला. आता इथे मामाच “राजी” म्हटल्यावर घरातला कुठलाही “काजी” काय बोलणार? तसंही घरातील समस्त महिला वर्गाने ढील दिली असल्याने सगळ्या बालक वर्गाचे पतंग हवेत मस्त बदत होते … आणि मी बदवत होतो.

हौद आधीच साफ करून ठेवला होता आणि पंप लावून हौद भरून घेत होतो. तर ही वानरसेना बोलावण्या अगोदर तयार. माझी मुलगी तर चक्क बिकिनी घालून “मुलांनो मारा उड्या” या आज्ञेची वाट बघत होती. तिघांनी हौदात धुमाकूळ घालायला सुरुवात केली. १२ वर्षाचा कलश त्याच्या पेक्षा वयाने बऱ्याच लहान असलेल्या ७ वर्षाची आर्या आणि ४ वर्षाच्या ओम ची छान काळजी घेत होता. त्यांचा खोडकरपणा बाहेर उभं राहून बघणं जीवावर आलं होतं आणि त्यातच या तिघांनी मला पुरता भिजवला असल्याने मी पण हौदात उतरलो. सकाळी ९ वाजता चालू झालेले हे रासन्हाण १२ वाजता या सगळ्यांची आजी अर्थात माझ्या मातोश्री हातात शिपटी घेउन आली तेंव्हा संपलं. संध्याकाळी समुद्रावर जाऊन धमाल केली. शंख शिंपले जमवले. वाळूचा किल्ला केला, नक्षी काढली, समुद्राच्या लाटांमध्ये सैरावैरा धावलो. समुद्रावरचा गोळेवाला आमच्या गल्लीतूनच जात असल्याने दुसऱ्या दिवशी त्याला यायला सांगितले आणि बच्चे कंपनीने परत एकदा कल्ला केला “उद्या गोळा खायचा … उद्या गोळा खायचा”. समुद्रावरच इतकं खेळल्यावर अर्थात क्षुधाशमनार्थ भेळ आणि तृषाशमनार्थ थंडगार उसाचा रस ही मागणी देखील पूर्ण केली. दमून भागून माझी तिन्ही पाखरं गाढ झोपी गेली. सगळे इतके दामले असून देखील त्यांच्या चेहेऱ्यावर एक तजेला होता … स्थळ काळाचा परिणाम असेल कदाचित.

ठरल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी गोळेवाला घंटानाद करत दरवाज्यात हजर झाला तसा पोरांनी “गोळा गोळा” म्हणत एकच गजर केला. थोरा मोठ्यांनी बर्फ आणि त्यात मिसळलेला गोड रस चुपून चुपून गोळा खाल्ला … इतकंच नव्हे तर सगळ्यांनी वरून रस मागून घेतला. मुलांसाठी चवीपेक्षा रंगाचे आकर्षण अधिक. कुणाला हिरवा, कुणाला गुलाबी लाल, कुणाला कालाखट्टा तर कुणाला मिक्स – अशी रंग आणि चवीची रेलचेल होती. मुलांनी अर्धे खाल्ले आणि अर्धे सांडवले आणि अंगणात सप्तरंगी बर्फाचा सडा पडला. बालगोपाळांचीच काय तर मोठ्यांच्या देखील काही ना काही मागण्या रोज पूर्ण करत होतो…नेम धरून आंबे चिंचा पडणं, शहाळी पिणं, अगदी बैलगाडीची रपेट पण मारून झाली. क्रिकेट, पत्ते याच बरोबर लंगडी, आबादुबी पण खेळलो. डुक्करमुसुंडी, विषामृत, डब्बा ऐसपैस, खांब खांब खांबोळी असे जागे अभावी लोप पावत चाललेले खेळ देखील शिकवले. खेळता खेळता मुलं पडायची धडपडायची पण उठून परत खेळायला सुरुवात…तिथल्या मातीचाच गुणधर्म असावा कदाचित. एक दिवस आजूबाजूच्या प्रेक्षणीय स्थळांचे दर्शन घडवून आणले. नागावच्या आजूबाजूला बघण्या सारखी बरीच ठिकाणे असल्याने कुठे जायचे हा प्रश्नच नव्हता. सुंदर सुंदर देवालयं, नारळी पोफळीच्या बागा, अथांग समुद्राच्या वाळूला खेटून उभी असलेली सुरुची बनं, जगप्रसिद्ध शिल्पकार श्री. करमरकर याचं कलादालन, कोर्लईचा किल्ला आणि दीपस्तंभ, शितलादेवी,  नांदगावचा सिद्धिविनायक,  हे सगळं करता करता चौलचा दत्त, कनकेश्वर मंदिर, सिद्धेश्वर, सागरगड, वंदरलिंगी, रामधरणेश्वर अशी जरा उंचावर असलेली ठिकाणे मात्र राहून गेली. मला आश्चर्य याचं वाटत होतं की ही सगळी मुलं शहरात असताना पायात चप्पल नसेल तर घरच्या बाहेर पडणार नाहीत पण इथे माझ्या बरोबर रानावनात, शेतावर अनवाणी यायला देखील एका पायावर तयार होती. मला मिळालेल्या ४-५ दिवसांमध्ये मी त्यांच्यात गावातील राहणीमाना बद्दलची आस्था जागवत होतो आणि जगत होतो.

हळू हळू तिथले वास्तव्य संपत आले आणि एकमेकांचा निरोप घेण्याची वेळ आली. अजून काही दिवस राहिलो असतो तर अजून मज्जा आली असती असं प्रत्येकाला वाटत होतं. स्वतःच्या रक्ताच्या ३ पिढ्या जेंव्हा अश्या एकत्र येतात तेंव्हा नात्यांमधील रेशमी वीण अशीच घट्ट होत जाते आणि या आठवणी चिरकाल टिकतात. पुढल्या सुट्टीत इथेच येऊ, दिवाळी इथेच साजरी करू, भरपूर फटके वाजवू असे म्हणत आमची पुढची पिढी एकमेकांचा निरोप घेत होती. हे बघून आमच्या मागील पिढीचे डोळे पाणावले नाही तरच नवल. आजी आजोबांनी डोळ्यांच्या कडा पुसत तिन्ही नातवंडांना खाऊ साठी पैसे दिले. घर जसं भरलं तसचं हलक्या फुलक्या आठवणी ठेवत रितं झालं. दरवाज्याला कुलूप लावताना माझी कन्या मला म्हणाली “दिवाळीच्या सुट्टीत आपण इथेच येऊ. अजून बाकीच्यांना पण बोलवू. कुठेतरी फिरायला जाण्यापेक्षा इथेच जाम मज्जा येते”. मुलीला ऋणानुबंधाची गोडी लावण्याचा माझा उद्देश सफल झाला होता.

नागांवच्या गोड आठवणी मनात ठेवून एकदम ताजे तावाने होत आम्ही सगळे एकमेकांच्या घरी पोहोचलो आणि रोजच्या जगरहाटीला सुरुवात झाली. नोकरी, प्रदूषण, ट्रेनचा प्रवास असह्य असलं तरी करणं भाग होतं. पण मुलीला दिवाळीत काश्मीरला नेण्याचा बेत काही डोक्यातून जाईना. एक कल्पना सुचली आणि धडाधड फोन फिरवले. दिवाळीचा काश्मीरचा बेत निश्चित केला …. हो पण फक्त आम्ही तिघं नाही. माणसं सगळी तीच फक्त स्थळ वेगळं. सहकुटुंब सहपरिवार काश्मीर पण दिवाळीचे फटाके नागांवच्या अंगणात फोडून झाल्यावरच.