“बसणे” अर्थात दारूकाम

“बसणे” या शब्दाचे तसे वैकल्पिक आणि व्यावहारिक अभिप्रेत अर्थ बरेच आहेत. जसे “गाडीवर बसणे”, “खुर्चीवर बसणे”, “सकाळी सकाळी १५ मिनिटे एकांतवासात बसणे” इत्यादी इत्यादी. या सर्व प्रचलित अर्थांबरोबरच “बसणे” या शब्दाला एक स्पेशल अर्थ आहे. या “बसण्यात” सगळंच येतं, मराठी व्याकरणातील नाम, सर्वनाम, कर्ता, कर्म, क्रियापद या सगळ्यांच्या व्याख्या या शब्दाला तंतोतंत लागू होतात. अगदी “उभयान्वयी” अव्ययाला “आडवे” करण्याची ताकद आहे या “बसण्या” मध्ये. असा हा “बसणे” शब्द विश्वव्यापक आहे. खरं तर ही एक साधना आहे, पण त्या साठी तुम्ही साधक असण्याची अट अजिबात नाही. एकदा का बसण्यातून आनंद मिळायला लागला की आपोआपच तुम्ही साधक होता. ;). सूचक अर्थाने उच्चारलेला हा शब्दसुद्धा अंगात एक नवं-चैतन्य निर्माण करतो. कधी कधी तर १०० हत्तींचे बळ येतं असं पण वाचण्यात आलंय. पण हे अनुमान नोंदवताना सदर व्यक्ती साधनामग्न अर्थात “बसलेली” असावी असे माझे ठाम मत आहे.

बसणे या क्रिये मध्ये स्थळाला जसे महत्व आहे तसेच काळाला देखील आहे. सूर्यास्त ते सूर्योदयाचा काल हा या साधनेस सर्वोत्तम मानला जातो. तसेच स्थळाविषयी देखील काही नियम नाहीत. अर्थात “पोचलेल्या” साधकांसाठी स्थळ-काळाची कुठललीही बंधने नसतात हे आवर्जून नमूद करावे लागेल. देवकृपेने आपणांस चौका चौकात सेवाकेंद्र, स्वेच्छागृह सापडतील जिथे आपण एकटेच किंवा सह-साधकांच्या साथीने साधने साठी बसू शकता. आणि त्यांची नावे देखील एकदम स्पेशल ….. आध्यात्मिक, हिंदू संस्कृतीशी जवळीक साधणारी. साईपूजा, साई प्यालेस, साई दरबार …. वा वा वा … कसं एकदम मस्त वाटतं. साईबाबांच्या नावे असलेली सेवाकेंद्रे सर्वात अग्रणी. तसं बाकी मीरा, माधव, मल्हार, शंकर यांची नावे पण झळकतात पण त्या मनाने कमीच. संध्याकाळी ७ नंतर सेवेकरी आणि साधक यांचा जंगी “बार” उडतो. बहुतांशी सेवेकरी हे पुरुष असतात पण ललनांची संख्या पण काही कमी नाही. काही वर्षांपूर्वी तर अश्या ठिकाणी साधनेला सांस्कृतिक आणि मनोरंजनात्मक कार्यक्रमांची जोड होती. साधने बरोबरच विरंगुळा आणि श्रमपरिहार व्हावा हाच उदात्त हेतू होता. पण या ठिकाणी मूळ अभिप्रेत साधने ऐवजी भलतीच साधना जोर धरू लागल्याची ओरड कट्टर “बसेकरींनी” केल्या मुळे हा प्रकल्प जवळ जवळ बंद पडल्यात जमा आहे. त्यामुळे अभिजात कलावंतीणीचे अतोनात नुकसान झाले असल्याचे प्रकल्प समर्थक म्हणतात.

सेवाकेंद्रामध्ये तुमची बैठक रंगण्यासाठी टेबल, खुर्ची सकट सगळी बडदास्त ठेवली जाते. तुमची साधना योग्यरीतीने बिनबोभाट पार पडण्यासाठी एक – दोन सेवेकरी देखील दिले जातात. ते सेवेकरी तुम्हाला अपेक्षित असलेली साधन सामुग्री आणून देतात. तुम्ही घेतलेल्या सामुग्रीचा रीतसर हिशेब ठेवतात. आणि नंतर … म्हणजे तुमची साधना पूर्ण झाल्यावर घरी जाण्याच्या आधी या सर्व सेवेसाठी तुम्हाला “कर” भरावा लागतो. येथे “कर” दाखवून किंवा जुळवून काही फायदा होत नाही हे कितीही “साधनामस्त” असले तरी लक्षात ठेवावे. या ठिकाणी वेळेचे बंधन देखील असते. आजूबाजूला असलेले इतर साधक आपल्या साधनेत व्यत्यय आणू शकतात. म्हणावी तशी शांतता लाभत नाही. उगाच अती झालं तर साधकांच्या गटांमध्ये सुसंवाद, वार्तालाप होण्याची शक्यता असते. “बसण्याच्या” विरोधात असलेले काही समाजकंटक कधी पण छापा मारून उगाच गुणी साधकांना पण त्रास देतात. त्यामुळे तसं बघायला गेलं तर सेवाकेंद्र हा मामला जरा खर्चीक आणि त्रासदायक आहे. तेथे मिळणाऱ्या सुविधांप्रमाणे “सेवाकर” आकाराला जातो. या सगळ्याची तयारी असेल तरच तेथील पायरी चढावी. अन्यथा तेथील सेवेकरी तुम्हाला सालंकृत “अनुग्रह” द्यायला नेहेमीच तयार असतात. ;). साधनेसाठी दुसरा कुठलाही पर्याय नसेल तर हाच सुलभ, सोपा आणि सहज उपलब्ध असलेला “बस”मार्ग आहे.

दुसरा आणि उत्तम पर्याय म्हणजे “साधना करी … घरच्या घरी”. पण या साठी सगळी धावपळ करावी लागते. बरोबर अजून काही साधक असतील तर ठीक आहे, म्हणजे निदान कामाचे वाटप तरी करता येते. मोजकीच साधन सामुग्री उपलब्ध असते त्यामुळे कुठलीही गोष्ट आणायची राहून जाऊ नये म्हणून सरळ यादी बनवून घ्यावी लागते. कारण मध्येच काही लागले तर साधना सोडून जाणे तसे कष्टप्रद आहे. आणि एकदा का सगळा मामला जमला की या साधने सारखी मजा नाही. संपूर्ण रूम प्रसन्न वाटायला लागते. वेळेचे बंधन नाही की दुसऱ्या कुणी साधकांचा त्रास नाही. तन आणि मन आसमंतात हलकं होवून भिरभिरत असतं. सगळे साधक झुलत असतात. नयनरम्य वातावरणाने रूम भारलेली असते. हे सगळं एकदम माफक खर्चात शक्य होतं. लेकिन इसमें भी थोडा प्रॉब्लेम है. सर्वात वैताग म्हणजे नंतर करावयाची आवराआवरी. मस्त साधना झालेली असते आणि सगळी आवराआवरी करावी लागते. त्या वर कडी म्हणजे एखाद्या साधकाला जर अती साधने मुळे त्रास झाला तर मग बघायलाच नको. केलेले सगळे कष्ट वाया. त्यामुळे साधनेच्या वेळी सगळ्यांकडे वक्र डोळ्यांनी कटाक्ष ठेवायला लागतो. पण सगळाच मामला जर “लिमिटेड” स्वरुपात ठेवला तर या सारखा आनंद आणि अनुभूती या भूतलावर कुठेही मिळणे शक्य नाही. त्यामुळे शांत “बसा” … निवांत “बसा” … साधना करा … साधक व्हा पण बाधक होवू नका.

4 thoughts on ““बसणे” अर्थात दारूकाम

  1. “बसण्याचा” एवढा व्यापक अर्थ कोणत्याही साधकाला जमला नसता..”बसण्याच्या” एकूण व्यवस्थेची छान शब्दात मांडणी केलीय. छमछमचा आवाज न करताही अनेक सेवाकेंद्रं आणि तिथलं वर्णन सुरेख केलय…छान अशी भट्टी “बसल्यावरच” जमते छान…तुमच्या पुढच्या साधनेला शुभेच्छा..

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s