वेळ कसा घालवावा?

“वेळ कसा घालवावा?” हा एक गहन प्रश्न बऱ्याच जणांना पडलेला असतो. आणि ते त्यांच्या “पडलेल्या” चेहेर्यावर हमखास दिसून येतं. नेहेमीची कटकट असते, “शी, वेळ जाता जात नाहीये. काल संध्याकाळी ७ कसें वाजले तेच कळलं नाही. (हे आपलं उगीचच …. निरर्थक वाक्य असतं.) खरं तर काल पण हेच रडगाणे आळवून झालेले असते. वेळ जात नाहीये असं म्हणणारे हे रडगाणे वेगवेगळया वयात, वेगवेगळ्या परिस्थिती मध्ये उगीच “वेळ जाण्यासाठी” वापरतात असं माझं स्पष्ट मत आहे. मग ते अगदी शिशु वर्गातील बालका पासून ते वयस्कर माणसांपर्यंत वेळेला आपल्या सवडीप्रमाणे ढकलत ढकलत शेवटी त्याचा कडेलोट करतात.

काहींना काम नसेल तर वेळ जात नाही. आता वेळ न जाण्याचं हे काय कारण झालं? काम नाही मग एन्जॉय करा, टाईम पास करा. ऑफिस मध्ये असाल तर gossip सारखा दुसरा टाईमपास नाही. कुणाचं कुणा बरोबर जुळलंय, कुणाची कशी जिरवली, कुठल्या मिटींग मध्ये साहेबाचं हसं झालं ई. ई. गॉसिप मध्ये रुची नसेल तर ऑफिस मध्ये चक्कर मारा. बरेच दिवस ज्याच्याशी कामाव्यतिरिक्त बोलला नसाल त्याच्या बरोबर गप्पा मारा. शनिवार/रविवारच्या ओल्या सुक्या पार्टीचे आयोजन करा. घरी असलात तर तर बरेच ऑप्शन आहेत. साफसफाई करा, धान्य निवडा, मुबलक पाणीपुरवठा असेल तर अंघोळ करा (एकदा केली असेल तरी परत परत करा) चक्कर मारून या, ग्यालरीत उभे राहून येतां जाता कुणालाही जोरात “काका” “अहो जोशी” “ए पाटील” म्हणून हाका मारा आणि लपून जा किंवा इकडे तिकडे बघा (पण हा पर्याय सारखा अमलात आणू नये … नाहीतर तुमच्या मनावर परिणाम झाला असून तुम्हाला मानसोपचाराची गरज असल्याचे शेजारपाजारच्या लोकांना वाटेल). अगदीच काही नसेल तर गरमा गरम चहा/कॉफीचा आस्वाद घेत एखादे आवडते पुस्तक वाचत लोळत पडा. अश्या एक ना अनेक गोष्टी वेळ घालवण्यासाठी करणं सहज शक्य आहे. इतकं सगळं असताना उगाच “वेळ जात नाहीये” असं रडत बसण्यात काय अर्थ आहे.

काहींना दुसर्याची वाट बघत असताना वेळ जात नाही. हा त्रागा बरेच वेळा तारुण्यात पदार्पण केलेले तो किंवा ती करतात. वाट बघणारा जर “तो” असेल तर काही विशेष फरक पडत नाही. अश्या वेळी तो मिळालेल्या संधीचा फायदा घेऊन सभोवतालच सगळं सृष्टी सौंदर्य डोळ्यात सामावून घेण्याचा प्रयत्न करत असतो. कारण ती आल्यावर सक्तीने तिच्याकडेच बघण्याची शिक्षा होणार आहे हे त्याला माहित असते. आता जर वाट बघणारी “ती” असेल तर काही खरं नाही. कितीही थंडावा असला तरी रुमाला ने वारा घेण्याचं कसब करत त्रासिक मुद्रेने, कपाळावर दक्षिणोत्तर आठ्या घेउन ती त्याची वाट बघत असते. तिला काहीही सुचत नसतं. तो आला की त्याला फैलावर कसं घ्यायचं याच्या विचाराने जीव कासावीस होत असतो. वाट बघताना सरणारा प्रत्येक क्षण युगा युगा सारखा भासत असतो तिला. आता हे वेळेचं विचित्र गणित मला कधी कळलंच नाही. आणि अश्या कालचक्रात तुडुंब बुडालेल्या तिला मी काय सुचवणार?? फक्त इतकंच म्हणू शकतो “देवा वाचव त्याला”.

खरी कसोटी असते ती वयोवृद्ध तसेच नोकरीतून निवृत्त झालेल्यांची. ३०-४० वर्षे नोकरी करून झाल्यावर जेंव्हा एखादा माणूस निवृत्त होतो तेंव्हा त्याची दिनचार्याच बदलून जाते. मग अश्या वेळी हे लोकं आपले अपूर्ण राहिलेले छंद, इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात. एखादे सत्तरीचे आजोबा जेंव्हा मला सांगतात की मला वेळच मिळत नाही, हे ऐकून त्यांचा हेवा करावासा वाटतो. आणि मग त्यांची दिनचर्या ऐकताना वेळ कसा निघून जातो तेच कळत नाही. अश्या लोकांकडून शिकण्यासारखे बरंच काही असतं. त्याना पाहिजे असतो एखादा श्रोता आणि आपल्या कडे लागतो “वेळ”. अश्या वयोवृद्ध व्यक्तींच्या साथीला कुणी असेल तर ठीक अन्यथा त्यांच आयुष्य एखाद्या रिकाम्या अत्तराच्या कुपीप्रमाणे असतं, अत्तर सगळं उडून गेलंय पण कुपीला अजून तो जुना सुगंध जाणवतोय म्हणून जवळ बाळगून ठेवायची झालं.

आजकाल तर लहान मुलं देखील म्हणतात “आई कंटाळा आला. आता काय करू??” बरोबर आहे त्यांचं घरात खेळायला कुणी नाही आणि घराभोवती अंगण नाही. मग अशी मुलं टेलिव्हीजनशी किंवा कॉम्पुटरशी सलगी करतात. मॉल संस्कृती तर फोफावतच आहे. सुट्टी लागली की प्रशिक्षण शिबिरात त्यांना ढकललं की आई बाप मोकळे. त्याचा त्या मुलाच्या व्यक्तीमत्वावर किती परिणाम होतोय हे बघायला वेळ आहे कुठे?

मला खरंच “वेळ कसा घालवावा?” असे अगाध प्रश्न नाही पडत. (तसं मला माझे महाविद्यालयीन शिक्षण झाल्यावर कुठलेच प्रश्न पडले नाहीत 😉 ) वेळ हा घरात येणाऱ्या नावडत्या पाहुण्याला कसं घालवतात तसा घालवावा लागत नाही. तो तर बिचारा पावलांचा आवाजही न करता येतो आणि निमुटपणे निघून जातो. आपल्याकडे उणीव आहे ती त्याची पावले जाणून घेण्याची, आणि त्याच्या पाउलखुणा जपण्याची. हे ज्याला जमेल त्याला कधीच हा प्रश्न पडणार नाही. आता “मी वेळ घालवण्यासाठी काय करतो??” याचं उत्तर अगदी सोप्पं आहे ….. काहीही करतो किंवा काहीच करत नाही. 😉 पोटापाण्याची सोय झाली की उरलेला वेळ ही डोळे आणि मेंदूची कवाडे उघडी ठेवून सभोवतालचे निरीक्षण करण्यात जातो. त्यातूनच कधी कधी नवकल्पना सुचतात ज्या मला वेळ घालवण्यास मदत करतात. झाडं, पाने फुले यात मी विशेष रमतो. घरची साफसफाई करण्याचा मूड झालाच तर जमलेली कोळीष्टके काढायला जाम मजा येते. कोळीष्टके काढताना कोळ्याला “पळता जाळे थोडे” करून सोडण्यात आसुरी आनंद मिळतो. लहानपणी तर दोन डोंगळे घेऊन त्यांची मारामारी लावणे, चतुर पकडणे असे निरर्थक (विध्वंसक) उद्योग बरेच केलेत. घराबाहेर पडलो की लोकांच्या लकबींचे निरीक्षण करणे तर सगळ्यात आवडता छंद. निव्वळ वेळ जात नाही म्हणून टेलीव्हिजन अजिबात बघत नाही. त्यातल्या त्या डेली सोप मालिका तर एकदम बकवास. कुठला सोप कधी संपला आणि दुसरा केंव्हा चालू झाला तेच कळत नाही. फक्त रंग वेगवेगळे पण त्यांना येणारा “दर्प” एकच “एकमेकांचे पाय खेचणे”. एक वेळ साउथ चे भाषांतरित चित्रपट बघीन, मिथुनचे पण चित्रपट बघीन. हो, तेवढी कणखर मनोवृत्ती आहे आपली. रामसे बंधूंचे चित्रपट बघण्याची पण तयारी आहे, तरी इतकी बिकट वेळ काही माझ्यावर आलेली नाही. टेलीव्हिजन वरील काहीही चालेल पण ते सोप आणि सत्संग सोडून. इथे संग करायला वेळ नाही सत्संग कुठून करणार? 😉

सध्या वेळ घालवण्याचे छान साधन मिळालंय, लिखाण करायचं. जे मनात असतील ते विषय मांडायचे. काही विषय विनोदी, काही गहिरे, काही प्रेमाचे तर काही असेच अघळपघळ. शब्दांना अर्थ आला की कसं मस्त वाटतं. शब्दांना पकडून जुळवत बसायचं व्यसनच जडलाय म्हणाना. आणि हे व्यसन ज्याला लागतं त्याला वेळ कसा घालवावा याची तमा बाळगायचे कारण नाही. वेळ असाच निघून जातो ओघवत्या शब्दांसारखा, प्रत्येक क्षण अर्थपूर्ण करत …..

5 thoughts on “वेळ कसा घालवावा?

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s