कुतूहल

माणसाच्या एखादी गोष्ट जाणून घेण्याच्या इच्छाशक्तीला “कुतूहल” म्हणता येईल. या स्वभाव गुणधर्माला काही शहाणी माणसं “चिकित्सक” म्हणून उगीच हिणवतात. कुतूहल हे प्रत्येक अज्ञात गोष्टीबद्दल असणे हा माणसाचा स्थायी स्वभाव आहे. कुतूहल संपले की त्यातील नाविन्य संपते. ज्याला नवीन गोष्टींबद्दल कुतूहल नसते असा माणूस विरळाच.आणि असा कुणी सापडला तर तो किंवा ती मनुष्य योनीत नाहीत असे समजण्यास हरकत नाही.

अगदी तान्ह्या बाळाच्या डोळ्यात सुद्धा कुतूहलपूर्ण भाव असतात.नवीन माणसे, रंग, आकार, स्पर्श या सगळ्यांविषयी त्यांचे डोळे अतिशय बोलके असतात. खेळण्यांमधील कुतूहल संपलं की त्यांच्या बरोबरचा खेळ पण संपतो. आणि जेंव्हा वाचा फुटते तेंव्हा तर त्यांच्या प्रश्नांना उत्तरे देताना नाकी नऊ येतं. काही भयंकर प्रश्नांना उत्तरं देताना एखाद्या कसलेल्या राजकारणी प्रमाणे उडवून लावण्याचे कसब आत्मसात करावे लागते. शाळेत गेल्यावर औत्सुक्य निर्माण करणारे विषय अजून वेगळे. कायम मोठ्यांच्या बोलण्याकडे तक लावून लक्ष देणारे आणि मग आई वडिलांची तोंडी परीक्षा घेणारे बालक पुढे जाऊन चिकित्सक, आगाऊ, अतिशहाणा अशी बिरुदावली मिरवणार याची खात्री बाळगावी. “आई बाबांचे लग्न झाले तेंव्हा मी कुठे होतो?” हा तर सर्वात common प्रश्न. आणि याच्यावर जर तुम्ही तुमच्या बायकोचे डोहाळे जेवणाचे फोटो दाखवायला गेलात तर तुम्ही तुमच्या पायावर धोंडा मारून घेतलाच समजा. “आईचे पोट इतके का फुगले आहे?” “मी त्या पोटात कसा गेलो?” “तिथे काय करत होतो?” “पोटातून बाहेर कसा काय आलो?” अश्या अनेक प्रश्नांना तोंड द्यायची तयारी ठेवा आणि मगच फोटो दाखवा. पोटातून बाहेर कसा काय आलो याचे उत्तर जर “डॉक्टरनी ऑपरेशन (पोट फाडून) करून तुला बाहेर काढले” असे दिलेत आणि त्यावर तुमच्या गोंडस मुलाने तुमच्या अर्धांगीनीची आणि त्या डॉक्टरची तुलना नरसिंह-हिरण्यकश्यपू बरोबर केली तर? (अर्थात आपल्या मुलाने इतक्या लहान वयात आपल्या जीवनातील हिरण्यकश्यपूला कसे बरोबर ओळखले याचा सात्विक आनंद चेहेर्यावर जास्त झळकू देऊ नका त्याने अनर्थ होवू शकतो … आयुष्यातील सगळे प्रश्न क्षणार्धात सुटतील.)

माझं प्रश्न विचारून केलेलं “कुतूहल शमन” हे बरेचवेळा आगाऊपणा कडे झुकतंय असं या शहाण्या माणसांना वाटेल कदाचित. आणि तुम्हाला सांगतो, वाटलं तर वाटून दे … (अति)शहाण्या माणसांची अशीच जिरवायची असते. मी तर असा कुणी शहाणा माणूस सापडला की त्याला प्रश्न विचारून भंडावून सोडतो. लहानपणी तर माझ्या वडिलांचे मित्र उपहासाने म्हणायचे “तुझं पोर शास्त्रज्ञ होणार”. शास्त्रज्ञ तर काही झालो नाही कारण प्रत्येक प्रश्नाचे उत्तर एकच “गप्प बस, मुर्खासारखे प्रश्न विचारू नकोस, अजून लहान आहेस तू”. अश्या अनेक कुतूहलांचा किडा या एकाच उत्तराच्या मदतीने त्याच क्षणी झुरळाला चिरडावे तसा चिरडला गेला. आधी कुतूहल चिरडले जायचे आणि विचारलेला प्रश्न जर फारच उच्च कुळातील असेल तर नंतर मी चिरडला जायचो. “नसते प्रश्न कुठून सुचतात या मेल्याला कळत नाही. अभ्यासाबद्दल नाही प्रश्न पडत” या वाक्याने सांगता व्हायची. मला पडणारे प्रश्न खरंच बाळबोध होते. पण बाकी स्थळ, काळ आणि ज्याला विचारायचं ती व्यक्ती नेहेमीच चुकलेलं. त्यामुळे प्रश्नाचे निरसन करण्या ऐवजी माझ्या कुतुहलाचेच निर्दालन केले जायचे. स्त्री-पुरुषातील बाह्य फरक, कावळा शिवणे, जन्म, मृत्यू, तिरडी, मराठमोळ्या शिव्यांचे अर्थ, गाढव आणि माझ्यात असलेले साधर्म्य, मी माणसात जमा नाही म्हणजे नक्की काय, कुत्र्यांचे रस्त्यावरचे चाळे (या गोष्टीला “मारामारी” म्हणून बरेच वेळा टोलवले जाते. पण अजून एक प्रश्न अनुत्तरीतच ….. मारामारी पण कुल्यांना कुले लावून?? …. या वर जबरदस्त मार खाल्ला आहे) अश्या अनेक कुतूहलांचा कारखाना असायचा माझ्या डोक्यात. त्यावेळच्या वयाच्या मनाने ते बाळबोधच होते पण तत्कालीन काळाप्रमाणे असे प्रश्न म्हणजे घरातील मोठ्यांसाठी करमणूक कमी पण चार हात चालवून दिवसभराचा शीण घालवण्यासाठी अत्यंत उपयुक्त असायचे.

वयात आल्यावर असणारी कुतूहल फार वेगळी. प्रेम, आकर्षण, तारुण्य यांच्याशी निगडीत. यातील बऱ्याच बाबी या एकदम “शिक्रेट” या सदरात मोडणाऱ्या. ऐकीव माहितीवरून ही कुतूहल संपत नाहीतच. सध्यातरी “गुगल” हाच एकमेव पर्याय आहे. पण तो किती खात्रीशीर आहे हे सांगणे कठीण आणि तितकेच जिकरीचे आहे. ;). कारण गुगल म्हणजे “असून अडचण आणि नसून खोळंबा” आणि जर त्याच्या वर विसंबलात तर आपला “ओळंबा” झालाच म्हणून समजा. माझ्या “वयात” येण्याच्यावेळी हे गुगल वगैरे काहीच नव्हतं. आपली ज्ञानेंद्रिये जागृत ठेवून मिळेल ते ज्ञान पदरी पाडून घ्यायचे आणि त्याचा आपल्या मनाप्रमाणे अर्थ लावायचा. मग आमचा भर उपलब्ध असलेल्या दृकश्राव्य (पण बरेच वेळा नुसताच “दृक”) माध्यमावर असायचा. पण त्याने कुतुहलाचे शमन न होता ते उगीच अजून चाळवले गेले. (मौलिक सल्ला असा … वरील पद्धत ही शास्त्रोक्त नसल्याने त्या बद्दल गैरसमज करून घेवू नये, जरी झाले तरी ते लवकरच दूर करण्याची सोय विधात्याने गृहस्थाश्रम या महान संस्थेमध्ये केलेली आहे हे ध्यानात ठेवावे.) पुढेमागे वयोमानापरत्वे बऱ्याच प्रश्नांचे निरसन झाले आणि काही काळाच्या ओघात विसरले गेले. मला आत्ता कधी कधी माझ्या बालपणीचे हे कुतुहलाचे किस्से आठवले की हसायला येतं…. आणि एकटाच हसत असतो.

One thought on “कुतूहल

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s