सहजच शिकली रं शिकली

(सदर लेख हा संपदा जोगळेकर-कुलकर्णी यांनी लिहिला आहे. त्यांना न विचारताच येथे आपणासाठी देत आहे. त्या बद्दल क्षमस्व)

ती जर स्वत: शिकलेली, पण घरच्यांच्या बंधनात अडकून घरातच राहणारी गृहिणी झाली असेल तर तिची कुतरओढ वेगळीच असेल. एवढं हौसेनं, जिद्दीनं माहेरच्यांनी शिकवलं, पण सासरी घरीच बसवलं. काय उपयोग मग माझ्या शिक्षणाचा?

मुलगी शिकली प्रगती झाली’ या वाक्याबद्दल तुम्हाला काय वाटतं, असा प्रश्‍न माझ्या कार्यक्रमात एका प्रौढ बाईनं मला विचारला. हा माझ्यासारख्या शिक्षित आणि प्रसिद्धीमाध्यमातल्या ‘मुलीला… माफ करा बाईला हा प्रश्‍न विचारला याची मला सुरुवातीला मजा वाटली. मनात आलं अहो मुलगी शिकली म्हणून तर ही संपदा नामक व्यक्ती फक सेलिब्रिटी म्हणून उभी आहे,’ पण क्षणातच हा प्रश्‍न इतका वरवरचा नाही हे लक्षात आलंच.

विचारणारी एखादी सासू असेल का असं मनात आलं. सासू असेल तर बिच्चारी वयानी निवृत्त होऊनही अजून घरच्या जबाबदार्‍यांमध्ये अडकली असणार. कारण सून आहे, मुलगा आहे; पण दोघेही 18 तास बाहेर. सुनेचा जरा उपयोग नाही. ‘मुलगी शिकली म्हणून हे सगळं सुरू झालं’ असा बहुधा राग असावा. विचारणारी जर संवेदनशील स्त्री असेल, समंजस असेल तरीही तिचं मत वेगळं असू शकतं. मुली शिकल्या खर्‍या, पण काय हे स्त्रीसारख्या नाजूक देहाला असं कित्येक तास घराबाहेर असुरक्षित, काच्या जगात राबावं लागतंय. कधी शारीरिक मेहनत तर कधी मेंदूचा शिणवटा. स्वास्थ्य म्हणून नाहीच. ती जर स्वत: शिकलेली, पण घरच्यांच्या बंधनात अडकून घरातच राहणारी गृहिणी झाली असेल तर तिची कुतरओढ वेगळीच असेल. एवढं हौसेनं, जिद्दीनं माहेरच्यांनी शिकवलं, पण सासरी घरीच बसवलं. काय उपयोग मग माझ्या शिक्षणाचा? उलट शिक्षणामुळे बाहेरचं जग कळलं आणि रीतिरिवाजांनी त्या जगाचे दरवाजे बंद केले. त्यामुळे घुसमट वाढली. ती जर वेगळी राहून सून-मुलांचा संसार बघत असेल तर कामवाल्यांचा खर्च, त्यांची घरात कुणी नसल्यामुळे चाललेली मजा, बाहेरचं आणून खाणं यामुळे घरातली एक हक्काची स्त्री हरवल्यामुळे (करीयर, शिक्षणामुळे) घराची वाताहत होते हे पाहत असेल. त्याचाही राग असेल.

परंतु मला भेडसावत होता एक वेगळाच प्रश्‍न. इंधनपुरवठा कमी आहे तो जपून वापरा म्हणतात तसंच काही क्षेत्रात शिक्षणाच्या संधी अगदी मोजक्याच आहेत. तिथे नंबर पटकवणार्‍या मुली ते शिक्षण घेऊन पुढे काहीच करीत नाही याचा राग येतो. डॉक्टर, इंजिनीअर पदवी घेऊन घरी किटी पार्टी, सास-बहूच्या मालिका बघणे. शिक्षणाच्या कुवतीप्रमाणे नवरा मिळतो तो अर्थात त्या पातळीवरचा शिक्षित, रूढीप्रमाणे तो मनमुराद त्यात करीयर करून बक्कळ पैसा मिळविणारा. त्यामुळे श्रीमंतीचा उपभोग घेत पुढचं आयुष्य काढायचं. अशावेळी चीड येते की घरीच बसायचं होतं तर का ती सीट अडवली? बरं एवढी शिकलेली बाई मुलांवर घरी राहून तसे उच्च संस्कार करते म्हणावं तर या सर्वांची मुलं 8-8 तास ट्यूशन्सना जातात. मग शाळेचे पाच तास, ट्यूशन चार-चार तास राहिले किती तास?

मुलीच सीट फुकट घालवतात का? असा विचाराला फाटा फोडू नये. मुलेही घालवतात, पण तुलनेनी एवढं शिक्षण घेतल्यावर कळतं की या शिक्षणावर आधारित करीयर खूपच काचं आहे, दमवणारं आहे, वेळखाऊ आहे की मग घरच्यांना त्रास होतो म्हणून तरी मुली (रूढीप्रमाणे मुलीच) घरी बसतात किंवा हे पाहून मुलींचं सोयीप्रमाणे रूढीला मधे आणून घरी थांबतात. (दोघांपैकी कुणी घरासाठी थांबायचं, हा प्रश्‍न येतो तेव्हा मुलीलाच थांबावं लागतं. हा आणखी वेगळा लेखाचा विषय आहे.) मुलगी शिकली, पण प्रगती झाली का? ती तेव्हाच होईल जेव्हा शिक्षणाबाबत डोळस राहून निवड केली तर.

मग सावित्रीबाई फुलेंनी मोठी चूक केली का? नाही. जन्माचं सार्थक, जगण्याचा अर्थ आणि मेंढरापेक्षा वेगळं माणूस म्हणून ओळख स्त्रीला व्हावी हे त्यांना अपेक्षित असावं.

(सदर लेख हा संपदा जोगळेकर-कुलकर्णी यांनी लिहिला आहे. त्यांना न विचारताच येथे आपणासाठी देत आहे. त्या बद्दल क्षमस्व)

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s