निवडणुकीचा थरार – भाग १

खरं तर या शीर्षकाला काहीच अर्थ नाही …. आपलं काही तरी मसालेदार शीर्षक द्यायचं म्हणून दिलं इतकच. पण कधी कधी मात्र एखाद्या इंग्रजी चित्रपटाला लाजवेल इतका थरार अनुभवायला मिळतो. याची सुरुवातच मुळी जेंव्हा निवडणुका जाहीर होतात तेंव्हा पासून होते आणि हा थरार सत्ता मिळवून एखादे पद पदरात पडे पर्यंत राहतो. ज्या प्रभागात किंवा मतदारसंघात निवडणूक होणार असते त्यात वेगळेच वातावरण निर्माण होते. मोर्चेबांधणी आणि चमचेगिरीला ऊत येतो. असेच काही काही निवडणुकीतील थरार या लेखात दिले आहेत. उगाच गांभीर्याने घेऊ नका ….. 😉

थरार निवडणुकी पूर्वीचा:
निवडणूक … मग ती कुठल्याही स्तरावरची असो, त्यात अनेक थरार, अनपेक्षित घडामोडी आणि कधी कधी करमणुकीचे किस्से पण होतात. अगदी मागच्या निवडणुकीत काय झाले, कोण किती आपटलं, कुणी कुणाला खाल्लं इथपासून ते कुणाची लायकी नसताना निवडून आलं …. वगैरे वगैरे. नाक्या नाक्या वर गप्पा रंगतात. कितीही काहीही झालं तरी या वेळी आमच्या पक्षाचाच नेता येणार असे छातीठोक पणे सांगत कार्यकर्त्यांची अस्मिता जगी होते. हा हा म्हणता निवडणुकीचा ज्वर का काय म्हणतात तो सगळी कडे पसरू लागतो. अर्थात याची बाधा निद्रिस्त, उदासीन सामान्य नागरिकांना होत नसल्याने त्यांनी चिंता करायची गरज नसावी. या निवडणुकीच्या ज्वरावर काहीही इलाज नाही. तो जसा चढतो तसाच आपोआप उतरतो किंवा उतरवला जातो. ;).

असे ज्वरबाधित इच्छुक उमेदवार आणि हौशी कार्यकर्ते यांच्या अपेक्षांच्या दोरीवर पक्षश्रेष्ठी डॉबार्याप्रमाणे कसरत करत असतात आणि त्यांचे चमचे खाली ढोल वाजवत असतात. चमचे ढोल वाजवून दमले किंवा “वरून आदेश” आला की ही पक्षश्रेष्ठी ही कसरत थांबवतात. या नंतर चालू होतो तो मुलाखती आणि भेटीगाठींचा खेळ. आणि आता तर एका पक्षाने तर नवीनच टूम काढली आहे …. लेखी परीक्षा घेण्याची. मग त्या साठी अभ्यास, कोचिंग वगैरे ओघाओघाने आलंच. कधी शाळा कॉलेज मध्ये अभ्यास केला नसेल अशी तयारी इच्छुक उमेदवारांनी केली होती म्हणे. त्यांची पेपर तपासणी कुणी केली? कोण कोण पास झालं? हे सगळं गुलदस्त्यातच. अर्थात हा त्या त्या पक्षाचा वैयक्तिक प्रश्न आहे. हे सगळं होत असतानाच “लोणी लावणे”, “अंडी कुरवाळणे” ई. वाक्प्रचारांचा अर्थ तंतोतंत कळतो. पक्षातील वजनदार मंडळी निवडणुकी साठी आपल्या कुणाकुणाची वर्णी लागावी म्हणून घाम गाळत असतात. स्पेशल न झिजणारे जोडे घालून खेटे मारत असतात. सर्वात धम्माल असते जेंव्हा एखादा प्रभाग किंवा मतदारसंघ “स्त्रियांसाठी आरक्षित” होतो तेंव्हा. मग हीच मंडळी “यंदा मला नाही तर निदान माझ्या बायकोला तरी उभी करा” अशी याचना करत असतात. अशी लाचार लोकं म्हणजे पांढऱ्या कपड्यातील भिकारीच. या सगळ्या दिव्यातून जो तरतो त्याच्या साठी “गगन ठेंगणे” भासू लागते. ही निवडणूक जिंकण्यासाठी मीच एक लायक आहे अश्या आविर्भावात तो फिरू लागतो. त्याच्या मागे त्याचे समर्थकतर “साहेब आपल्याशिवाय वाली नाही” असे म्हणून त्यालाच भावी विजेता ठरवू लागतात. तिकीट मिळाल्या नंतर त्याचे जवळ/लांबचे नातेवाईक फुकटचा भाव खातात ते वेगळंच. त्यांना निवडणूक जिंकल्यानंतर हार तुरे घेऊन निघणाऱ्या मिरवणुकीची स्वप्ने देखील पडतात असा आतल्या गोटातील रिपोर्ट मिडीयाने “स्टिंग ऑपरेशन” करून मिळवला आहे (अशी अफवा आहे).

पक्षातर्फे उमेदवारांची पहिली यादी फुटली की चालू होतो खरा थरार. याची सुरुवात पक्षातील असंतोष, दुफळ्या, हेवेदावे, पक्षपात इ. चव्हाट्यावर येऊन होते. ज्या इच्छुकांना उमेदवारी मिळते ते हार तुरे मिरवतात आणि ज्यांना नाही त्यांचा थयथयाट चालू होतो. एका नकाराने सगळं गणितच बदलून जातं. आणि आगीत तेल ओतायला त्यांच्या सहकाऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून बेंबीच्या देठापासून ओरडणारी मिडीया असतेच. आधी पसरायचं आणि मग सारवायचं याची सवय जडलेल्या पक्षाश्रेष्टीना मोठी जबाबदारी असते पक्षातील असंतोषाचा बिमोड करण्याची. चातुर्नितींचा वापर करून असंतुष्ट उमेदवाराची “समजूत” काढली जाते. ज्यांना पटते ते दुसऱ्याची झूल खांद्यावर घेऊन प्रचाराला लागतात. ज्यांची समजूत पटत नाही त्यांना बंडखोर नेता म्हणतात. मग असे वाटेला लावलेले उमेदवार “अपक्ष” म्हणून लढायला तयार होतात. तेही नाही जमलं तर एखाद्या बागेत फिरायला जावं तसं दुसऱ्या पक्षात जातात. तसंही सगळे पक्ष “नाना नानी पार्क”च आहेत …. आत्ता कुठे जरा हिरवळ यायला लागली आहे.

उमेदवार निश्चित झाला की मग त्याचे campaigning चालू होते. अमुक अमुक नेत्याने अमुक अमुक किती कामं केली हे बिंबवले जाते. विद्यमान नेत्याने काय काय दिवे लावले. समोरच्या पार्टीचा उमेदवार जर निवडून आला तर तो तुमचा कसा बट्याबोळ करू शकतो …. इ. इ. आरोप प्रत्यारोप यांचे एकच पिक आलेले असते. मला बरेचदा हे कळत नाही की हेच सत्य दोन निवडणुकांच्या मधल्या काळात का बाहेर येत नाही? का सगळा राग एकदम काढायचा म्हणून तुंबवून ठेवलेलं असतं? मग मोठे मोठे नेते छोट्या छोट्या नेत्यांच्या प्रचाराला येतात. यांच्या भाषणाने जरी काही उपयोग झाला नाही तरी करमणूक मात्र निश्चित होते. भले मोठे व्यासपीठ, त्यावर १०-१५ खुर्च्या आणि त्यावर बसलेली गुंड सदृश नेते. कुणी तरी एक नेता माईक वर बेंबीच्या देठापासून ओरडत असतो आणि समोर बसलेला समुदाय “आपण दाद दिली तर पैसे मिळतील” अश्या आविर्भावात टाळ्या वाजवत असतो. सभेला ५०० माणसे जरी जमली तरी उगीच प्रचंड जनसमुदाय, जनसागर अश्या उपाध्या द्यायच्या त्याला पण डेरिंग लागतं. इतकी मोठी लाईव्ह करमणूक कुठेच होणार नाही. घरातील समस्त माणसांनी फालतू सिरीयल बंद करून अश्या प्रचारसभेला उपस्थित रहावे असे माझे आवाहन आहे. ;). याच व्यासपीठाच्या जवळच कुठे तरी एक दोन जण संगणक घेऊन बसलेले असतात … कशा साठी देव जाणे? आजकालचा प्रचार हायटेक झालाय असं म्हणतात. कदाचित याच्यामुळेच असेल.

उमेदवार ऐनवेळी गायब होणे, फॉर्म भरायला उशीर होणे, फॉर्म गायब होणे किंवा करणे, फॉर्म चुकीचे भरणे (आपलं शिक्षण, वय, आपल्याला असलेल्या मुलांची संख्या, आपली जात, आपली स्थावर मालमत्ता हे हमखास चुकणारे मुद्दे) हे सगळे थरारकच नाही का? खरं तर ज्यांना साधा फॉर्म आणि आपली व्यक्तिगत माहिती व्यवस्थित भरता येत नसेल ते उमेदवारी साठी खरंच लायक आहेत का? सर्वसामान्य माणसाला पडणारा हा प्रश्न पक्षश्रेष्ठींना कसा पडत नाही कोण जाणे?

(क्रमशः)

(अजून काही थरार लिहायचे आहेत. पण तुम्हाला इतकं मोठं वाचताना एकदम अजीर्ण नको म्हणून टप्प्या टप्प्याने देत आहे.)

(निवडणुकीचा थरार – भाग २ इथे वाचा)
(निवडणुकीचा थरार – भाग ३ इथे वाचा)

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s