डोईजड झाले …. भार सोसवेना

नुकत्याच झालेल्या ऑस्ट्रेलिया मध्ये प्रचंड ताकदवान अशी भारताची क्रिकेट टीम प्रत्येक मैदानावर चारी मुंड्या चीत झाली. अगदीच अपवाद होता तो शेवटच्या श्रीलंकेविरुद्ध झालेल्या सामन्याचा. प्रतिस्पर्धी संघ धूळ चारण्याच्या कुवतीचा नसला तरी आपला संघ स्वतःहून पीच वर गुडघे टेकवतो आणि जिभेने धूळ चाटायला लागतो. अर्थात प्रत्येक संघावर वाईट दिवस येतात तसच भारतीय संघावर पण आले आहेत असे जरी गृहीत धरले तरी पचनी पडायला कठीण आहे नाही का? रथीमहारथी ठासून भरलेल्या या संघाची अशी पुरती विल्हेवाट लागणं म्हणजे “आम्ही आमच्या आधी केलेल्या चुकांपासून काहीच शिकू शकत नाही” हेच द्योतक आहे. गेल्या कित्येक सामन्यात आघाडीचे फलंदाज हजेरी लावून जातात. यात असे काही दिग्गज आहेत की ज्यांच्या नावावर असंख्य मानांकने आहेत. भारतातील नव्या पिढीतील युवा खेळाडू त्यांनाच आपला आदर्श (?) मानतात. आपले एक एक धीरोदात्त हजेरीपटू फलंदाज सचिन तेंडूलकर, वीरेंद्र सेहवाग, गौतम गंभीर (भारताची भावी भिंत म्हणून ज्याची काही महिन्यांपूर्वी गणना केली होती), सुरेश रैना, रोहित शर्मा, रविंद्र जडेजा …. चायला अर्धा संघ इथेच झाला. मग फलंदाजी कुणी करायची?? अश्विन, झहीर, पठाण नी?? माझी तर खात्री आहे … पहिली विकेट गेल्यागेल्या झहीर फलंदाजीसाठी तयार होत असेल ….. अगदी अधे मध्ये मुतायला जायची पण पंचाईत होत असेल त्या बिचाऱ्याची. चुकून घाईची लागली म्हणून गेला आणि लगेच रैना किंवा शर्मा सांगायला आला “जा रे बाबा … मला काही जमलं नाही … आता तुझी पाळी” …. तर उगीच कप्तानाचा रोष नको.

अजून किती वर्ष हे दिग्गज आपल्या पुर्वकर्मावर कागदोपत्री ठाण मांडून बसणार आहेत? सचिन अजून १००व्या शतकासाठी चाचपडतोय. वीरेंद्र सेहवाग नेहेमीच्या थाटात आत्मघातकी फटके खेळून बाद होतोय. अरे पण किती वर्ष हेच चालणार. अश्या अवसानघातकी फलंदाजा पेक्षा दुसरं कुणी नाही का? आणि त्यालाच तुम्ही धोनीच्या अनुपस्थितीत कप्तान करता?? कशाच्या निकषावर?? खेळपट्टीवर टिकलात तर धावा होतात हे साधं गणित इतका अनुभव गाठीशी असलेल्या फलंदाजाला कळू नये. तीच गत सध्या गंभीरची झाली आहे. ज्याचा द्रविड नंतरचा तंत्र शुद्ध फलंदाज म्हणून वर्णी लागली. त्याच्या चेंडू, फळी आणि पायात इतकं भगदाड झालंय की अख्खा गोलंदाज त्या मधून जाईल. रोहित शर्मा या मठ्ठ खेळाडूला संधी देण्या साठी अजून किती “rotation policy” राबवली जाणार? असेल तो चांगला खेळाडू (तो चांगला आहे म्हणून तर संघात आहे … नाहीतर मी नसतो का ??). पण इतके वेळा संधी देऊन सुद्धा याची गाडी २० ते ३० रन प्रती सामना या वर धावतच नाही. सुरेश रैना, जडेजा तर फिरायला नेलेले पाहुणे आहेत. स्वतः तर धावा करतच नाहीत आणि गोलंदाजी करताना प्रतिस्पर्ध्यांना विनासायास धावा मिळवून देतात. आता हेच सगळे खेळाडू …. IPL मध्ये कसा जीव लावून खेळतील आणि एक वेगळंच रूप बघायला मिळेल.

आता इतक्या वजनदार खेळाडूंना “व्यवस्थित जिंकण्यासाठी खेळा नाहीतर बाहेर बाकड्यावर बसा” असं कसं सांगणार? कारण बोर्डानेच त्यांना डोक्यावर चढवून ठेवले आहे. कालच्या सामन्यात कर्णधार असलेल्या रिकी पोंटिंगला ऑस्ट्रेलियन बोर्ड जर कायमचा बसवू शकते तर जगात सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड म्हणवून घेणाऱ्या भारतीय नियामक मंडळाला असे करणे शक्य नसावे का? सगळेच स्वयंभू आणि स्थितप्रज्ञ आहेत तर कोण काय करणार? म्हणूनच म्हणावसं वाटतं …
डोईजड झाले ….. भार सोसवेना |
कुणीतरी सांगा त्यांना …. घरी बसा ||

One thought on “डोईजड झाले …. भार सोसवेना

  1. असा जिवाचा त्रागा नको म्हणून मी क्रिकेट बघणे सोडून दिले आहे. 🙂
    मॅच जिंका किंवा हरा त्यांना ढीगाने पैसे मिळणारच, शिवाय परा बुकींकडून ‘खोके’ मिळणार, जाहिरातींतून पैशाचा पाऊस पडणार ते वेगळेच. त्यामुळे आपली भावनिक गुंतवणूक ह्या खेळात ह्यापुढे करणे नाही असे ठरवले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s