डॉक्टर डॉक्टर

नेहेमी प्रमाणे ऑफिस मधून उशिरा न येता वेळेवरच आलो …. जरा चेंज म्हणून बरं असतं कधी कधी. थोडा घसा पण दुखत होता. तरल पदार्थाव्यतिरिक्त कुठलीही इतर खाद्य वस्तू घश्याखाली उतरताना आतून चिमटे काढत जात आहे असे वाटत होते. कदाचित आत्ताच गावी जाऊन आल्यामुळे तेथील पाण्याचा त्रास झाला असावा. तेथील पाण्या मध्ये घालून काही द्रव पदार्थ घेतला असल्याचे शल्य घशात डसत असेल असा मौलिक निष्कर्ष माझ्या बायकोने काढला होता. बऱ्याच बाबतीत आमचे जसे एकमत होत नाही ते या बाबतीत देखील झाले नाही हे उघड झाले. माझ्या असंख्य मित्रांच्या मते ‘मि बऱ्याच गावचे पाणी प्यायले असल्या कारणाने मला कुठल्याही पाण्याचा त्रास होणे निव्वळ अशक्य आहे’. असो …. या मत मतांतरात न शिरता सद्य परिस्थिती म्हणजे माझा दुखरा घसा आणि त्यामुळे कुठल्याही पट्टीत न बसणारा खर्जातला आवाज.

बायको स्वयंपाक घरातील भांड्यांची अवराआवर (आदळआपट) करता करता तार सप्तकात ओरडली “ती नवीन डॉक्टरीण आलीये ना तिला फोन करा आणि घसा तपासून या”. बायकोची आज्ञा शिरसावंद्य मानून त्या नवीन डॉक्टरीणबाईला फोन लावला. या नवीन डॉक्टरीणबाईचा जास्त भर डिस्पेन्सरी मध्ये रांगेत बसलेल्या पेशंटना तपासण्या पेक्षा ”होम विझिट’ वरच जास्त …. फी जास्त मिळते ना, म्हणून असेल कदाचित. चांगला चार पाच वेळा एंगेज लागल्यावर एकदाचा फोन लागला. पलीकडून “हलो, कोण बोलतंय” इतका गोड आवाज ऐकून मि जरा ‘हललोच’ …. मि आपलं माझं नाव गाव सगळं थोडक्यात सांगितलं. “ओह म्हणजे त्या भातखंडे काकुंचे मिस्टर का? काय होतंय??? थ्रोटचा त्रास होतोय का काका तुम्हाला?” हे बहुदा माझ्या खरखरीत आवाजावरून केलेलं निदान असावं. मि म्हटलं “हो, कालपासून जरा घसा दुखतोय आणि गिळताना त्रास होतोय. केंव्हा येऊ तपा….” माझे पुढील वाक्य अर्धवट ठेवत डॉक्टरीणबाई मंजुळ आवाजात म्हणाल्या “नको नको … तुम्ही कशाला त्रास घेताय मीच येते तिथे.” “अहो. माझा घसा दुखतोय. पाय शाबूत आहेत अजून” मि नाराजीनेच म्हणालो. कारण केवळ घसा तपासण्यासाठी या बयेला जास्त फी देण्याची माझी इच्छा नव्हती. डॉक्टरीणबाई कृतज्ञता पूर्वक म्हणाल्या “काका, मि शेजारच्याच बिल्डिंग मध्ये शरद कुलकर्णी कडे आलेली आहे. जाता जाता तुमच्याकडे येते” चायला …. तो कुलकर्ण्या माझ्याच वयाचा आणि मि “काका”. असो, मि या म्हटलं आणि फोन बंद केला. आत मधून बायको त्या डॉक्टरीणबाईची तारीफ करत होती …. गुणाची आहे, घरी येउन तपासून गेली तरी तितकेच पैसे घेते … वगैरे वगैरे. तितकेच पैसे घेते हे वाक्य माझ्यादृष्टीने महत्वाचे.

दहा मिनिटात डॉक्टरीणबाई बाई दारात हजर. आल्या आल्या मला बेड वर झोपण्याची आज्ञा केली. आपल्या ब्यागेतून स्टेथोस्कोप काढून कानाला लावला आणि त्याची ती ठोके ऐकायची चकती छाती वर ठेवली. मग तीच चकती न उचलता सरकवत सरकवत पोटावर ठेवली. पोटावरून सरकवत सरकवत थेट घश्यावर दोन्ही बाजूला लावली. चकतीच्या प्रत्येक हालचाली वर मि चकित होत होतो. आज पर्यंत कुठल्याही डॉक्टरने ती चकती माझ्या हृदयाव्यातिरिक्त कुठल्याही अंगाला टेकवली नव्हती. मि माझ्या कापऱ्या आवाजात म्हटलं “डॉक्टर …. तिथे ती चकती लावून काय कप्पाळ कळणारे …. त्याने हृदयाचे ठोके तपासतात” तसं ती गोड आवाजात म्हणाली “तुम्ही शांत राहा. मि डॉक्टर आहे मला माहित आहे कुठे चेक करायचं ते. आणि हा स्पेशल स्टेथेस्कोप आहे. यातून सगळं कळत” माझी बायको ती डॉक्टर मला कशी तपासत आहे हे बघून बाजूलाच हसत उभी होती. त्यामुळे पाहिजे तिथे ती चकती फिरवून झाली आणि तिने माझे ब्लडप्रेशर चेक करण्या करता वेगळंच काहीतरी उपकरण बाहेर काढले. माझ्या मनगटावर ते ठेवून एका हाताने माझी नाडी हातात धरली. आता या बाईला माझी नाडी तळहातावर कुठे सापडली ते तो धन्वंतरीच जाणे.

कुठलीशी छोटी बाटली बाहेर काढून त्यातले दोन थेंब माझ्या घशात टाकले आणि विचारलं “आता कसं वाटतंय?” परिस्थितीत काहीही फरक पडला नसला तरी “जरा बरं वाटतंय” असं म्हणावं लागतं कधी कधी. परत एकदा तो स्टेथोस्कोप माझ्या घश्यावरून फिरला. स्टेथेस्कोप बाजूला काढून ठेवून ती बया म्हणाली “घसा कापावा लागेल” मि त्या आवाजात देखील किंचाळलो “घसा कापावा लागेल?? अहो काही तरीच काय डॉक्टर??” बायको बाजूला उभी राहून हसतच होती. डॉक्टरीणबाईने हातात एक छोटी कात्री घेतली आणि मला दाखवत म्हणाली “काळजी करू नका. अजिबात दुखणार नाही, रक्त पण येणार नाही” मि म्हटलं “निदान अनेस्थेशिया तरी द्या”. “ते काय असतं?” डॉक्टरच्या या प्रश्नाने मला भूल द्यायची अजिबात गरज पडली नाही. डॉक्टरीणबाईनी घश्याला कात्री लावली. खरंच दुखलं नाही …. “मि म्हणालो रक्त येतंय का बघा जरा” तर त्या बयेने कापसाच्या ऐवजी माझाच कळकट रुमाल जिथे कात्री लावली होती तिथे ठेवला आणि मला म्हणाली “५ मिनिटे धरून ठेवा …. सोडू नका अजिबात … आता झालं … मि जाते” मि म्हटलं “अहो जे कापलं आहे ते निदान शिवा तरी”. डॉक्टर माझ्या पत्नी कडे बघून म्हणाल्या …”तुम्ही मशीन वर शिवता ना? मग यांचा घसा तुम्हीच शिवून टाका. आता माझी फी द्या … १५० रुपीज.”

तिच्या हातावर ते पैसे ठेवले आणि तिला तशीच उचलून मांडीवर घेतलं … बायको बाजूला उभी राहून हसतच बघत होती. मि तिचे दोन चार मस्त पापा घेतले तशी ती माझ्यावर ओरडली “सोड मला…. मम्मा सांग ना बाबाला …. आत्ताच मि त्याला तपासलं आणि त्याच्या घशाचे ऑपरेशन केलं … मग ठरल्या प्रमाणे त्याने मि जाई पर्यंत झोपून राहायला हवं ना? …. याला ‘डॉक्टर डॉक्टर’ खेळताच येत नाही.” असं म्हणून मि आणि माझी बायको, आम्ही दोघे आमच्या अवघ्या ६ वर्षाच्या डॉक्टर लेकीवर प्रचंड हसलो. बायको म्हणाली “चला आता नेहेमी प्रमाणे तुमची मस्ती झाली असेल तर जेवायला बसूया. तिला काय …. तिची सुट्टी चालू झाली आहे तुला ऑफिसला जायचंय उद्या.”

मित्रांनो, अश्या असंख्य गमती जमती या लहान मुलांबरोबर होत असतात. ऑफिस मधून दमून भागून आल्यावर अशी द्वाड मुलगी असेल तर शीण कुठल्या कुठे निघून जातो. जसा आमरस कितीही गोड असला तरी चवीपुरता मिठाचा दाणा लागतोच तसंच या गमती जमाती मध्ये देखील चवीपुरते काही काल्पनिक संदर्भ जोडले आहेत ते चाणाक्ष वाचकांच्या नजरेत आलेलेच असतील.

24 thoughts on “डॉक्टर डॉक्टर

 1. तिच्या हातावर ते पैसे ठेवले आणि तिला तशीच उचलून मांडीवर घेतलं…..
  ह्या वाक्यातील ट्विस्टमुळे मी ज्या खुएचीत रेलून बसलो होतो तो अचानक उठून सरळ बसलो……..वाचयला मजा आली. एवढ्या सहज प्रसंगाचं लेखात केलेलं रुपांतर अप्रतिम!

  • अरे वा …. साक्षात “काय वाटेल ते” प्रतिक्रिया….. एका शब्दाची असली तरी अमुल्य …. आमच्या सारख्या नुकतेच बाळसे धरलेल्या ब्लॉगर्स साठी. …. 🙂

   • अरे काय हे.. बहूतेक सगळेच ब्ॉग मी वाचत असतो, फक्त प्रत्येक वेळेस प्रतिक्रिया देणे होत नाही. लिहिलं एकदम मस्त आहे. रहावलं नाही प्रतिक्रियादिल्याशिवाय.. 🙂

    • “रहावलं नाही प्रतिक्रियादिल्याशिवाय..” …. यातंच सगळं आलं साहेब. ई-साहित्य वर आपले पुस्तक बघितले “वाटा आणि वळणे” वाचले. हार्दिक अभिनंदन.

 2. सुंदर..अनपेक्षित वळण दिले शेवटी.
  लहान मुलांबरोबर खेळण्यात एक मजाच असते. माझे पण बाळ फक्त ५ महिन्याचे आहे. पण ऑफिस मधून कधी येतो आणि त्याला घेतो असे होऊन जाते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s