देवराई

(नुकत्याच झालेल्या वसुंधरा दिनाचे प्रयोजन साधून भूतकाळात निसर्ग सानिध्यात घालवलेले काही हिरवेगार क्षण आठवले … ते आपणांपुढे मांडत आहे.)

१९९८ साली B.N.H.S. डॉ. संजय देशमुख यांच्या मार्गदर्शनानुसार “देवराई संवर्धन” या विषयावर काम करण्याचा योग आला. मी, डॉ. उमेश मुंडले आणि डॉ. अजित अणेराव असे तिघे जण या प्रोजेक्ट वर काम करत होतो. तसा “देवराई” हा विषय आमच्या साठी नवीनच होता. काम चालू करण्या आधी पूर्वी या विषयावर कुणी कुणी संशोधन केले होते त्याचे संदर्भ गोळा केले. प्रा. माधव गाडगीळ आणि डॉ. वर्तक हे या विषयातील संशोधनाचे प्रवर्तक मानले जातात. १९७० च्या सुमारास त्यांनी महाराष्ट्रातील जवळ जवळ २५० देवरायांची नोंद केली होती. यातील बहुतांश देवराया या पश्चिम घाट, कोंकण या भागात होत्या. तशी देवराई ही संकल्पना पूर्ण भारतात तसेच जगाच्या काही भागात जिथे जुनी संस्कृती टिकून आहे अश्या भागात आढळते. या व्यतिरिक्त “देवराई” वर विशेष संशोधन झाले नसल्यामुळे किंवा जी माहिती उपलब्ध होती ती कालबाह्यते मुळे परत नव्याने नोंदी करायचे ठरले आणि आम्ही खऱ्या अर्थाने कामाला लागलो.

देवराई हा विषय थोडा वेगळा, जुन्या समजुती, जंगलातील देवता, देव देवस्की अशा अनेक समजुतींमुळे कुतूहल जागृत करणारा. अशातच अवघ्या महाराष्ट्रातील देवरायांची नोंद करण्याचे आणि त्यातील काही प्रातिनिधिक देवरायांचा अभ्यास करण्याचे काम आम्हां सगळ्यांसाठी thrilling होते. जुन्या नोंदी आणि सरकारी कागदपत्रे यांची मदत घेउन २ गुंठे पेक्षा जास्त क्षेत्रफळ असलेल्या देवरायांची सूची बनवली आणि त्याचे पडताळणी करण्याचे काम चालू केले. देवराई मधील देवता, त्यांच्या बद्दल असलेल्या रुढी, परंपरा, त्याच्याशी निगडीत असलेल्या श्रद्धा/अंधश्रद्धा खरंच थक्क करणाऱ्या आहेत. अगदी ढोबळ भाषेत सांगायचे झाले तर देवराई म्हणजे देवाची राई, अर्थात देवासाठी राखलेली जमीन, त्या जमिनी वरील झाडे, दगड माती … अगदी कण अन् कण देवाचा, देवाच्या मालकीचा. काही ठिकाणी देवराईला देवबन, देवरहाटी असे देखील म्हणतात. देवराईच्या रुढी, परंपरा अजूनही पिढी दर पिढी जपलेल्या आहेत. या संकल्पनेचे मूळ हे वेदिक संस्कृती पासून असावे असे जाणकारांचे मत आहे. तसं बघायला गेलं तर प्रत्येक गावात, खेड्यात देवस्थानाची, विशेषतः ग्रामदेवतेची लहान मोठी जमीन असते. पण म्हणून या सगळ्याच जमिनींना देवराई म्हणता येणार नाही. एखाद्या जमिनीवर देऊळ बांधून आजूबाजूला १०-१२ झाडे लावली की त्याला देवराई म्हणणे हास्यास्पद ठरेल. देवराईच्या अस्तित्वाला, संवर्धनाला आणि ऱ्हासाला देखील कित्येक पिढ्या साक्षी आहेत.

देवरायांचा अभ्यास करता करता एक गोष्ट मात्र प्रकर्षाने जाणवली ती म्हणजे एखाद्या परिपूर्ण अश्या परीसंस्थेतील(ecosystem) जैवविविधता(biodiversity). इथे आढळणारे प्रत्येक वनस्पती अस्सल भारतीय, इथल्याच मातीत उगम असलेली. निबिड घनदाट अश्या वृक्षराजींनी नटलेली एखादी देवराई पहिली की पुराणातील गोष्टींमधील अरण्य कसे असू शकेल याची कल्पना येते. देवराईतील देवळापर्यंत जाणारी एखादी पायवाट सोडली तर इतरत्र सगळी कडे माजलेली अजस्त्र झाडे आणि मस्तवाल वेली दिसून येतात. अंबा, फणस, जांभूळ, ऐन, साग, किंजळ यांचा आकार बघितला तर विश्वास बसत नाही. वड, पिंपळ आपल्या पारंब्यानी अख्खी राई कवेत घेण्याचा प्रयत्न करत असतात. त्यांच्या पारंब्यांच्या विस्तारामुळे कधी कधी नैसर्गिक मांडव तयार झालेला असतो.एखादे माडाचे झाड सूर्यप्रकाशाच्या ओढीने सरळ वाढण्याचा बाणा सोडून नागमोडी वळणे घेत वाट काढत असतं. Gnetum, Entada सारख्या अजस्त्र वेलींचे झुले झालेले असतात. अश्या धष्टपुष्ट झाडांवर बांडगुळे, ऑर्किड्स दिमाखात वसाहत करून रहात असतात. झाडांच्या खोडांना चिकटलेली दगडफुले तेथे असलेल्या १००% शुद्ध वातावरणाची ग्वाही देतात.

या सगळ्यांमधून कानाला गोड वाटणारे पक्षांचे गुंजारव चालू असते.मधूनच कुठे तरी रातकिड्यांचा कर्कश्य आवाज काळजाचा थरकाप उडवून जातो. विविध आकाराचे कीटक टणाटण उड्या मारत असतात. नाना रंगांची फुलपाखरे फुलांचे माधुर्य चाखण्यात मग्न असतात. कुठेतरी झाडांच्या जाळीमधून राजनर्तकाची जोडी आपले नृत्य कौशल्य दाखवून जाते. एखादा पिंगळा झाडाच्या फांदीवर बसून धीरगंभीर नजरेने बघत असतो. सुतार पक्ष्याची चोच झाडाच्या खोडावर टक टक आवाज करत असते. कुठेतरी एखादी सुगरण आपलं अपूर्ण राहिलेलं घरटं पूर्ण करण्यात मग्न असते. जवळपास जर पाणवठा असेल तर मासेमारी करून दमलेला खंड्या क्षणभर विश्रांतीसाठी येतो.असे एक ना अनेक जीव या परीसंस्थेचा उपभोग घेत असतात. हे सगळं बघताना तेथील समृद्धीचा आणि संपन्नतेचा हेवा वाटल्याशिवाय रहात नाही. सूर्य माथ्यावर आला तरी त्याचा प्रकाश जमिनीपर्यंत पोहोचू शकत नाही. अश्या ठिकाणी किती वनसंपदा असू शकते याचा अंदाज येतो. वर्षानुवर्षे राखलेल्या या देवराया म्हणजे नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या अनेक प्रजातींची निसर्गदत्त स्थाने आहेत.

देवराई: संकल्पना
देवराईचे मूळ वैदिक संस्कृती पासून असल्याचे जाणवते. पुराणकाळापासून असलेले मानव आणि निसर्गाचे नातेसंबंध इथे प्रकर्षाने जाणवतात. देवराई या संकल्पनेचा उगम कसा आणि केंव्हा झाला या बद्दल अनेक मतप्रवाह आहेत. या संकल्पनेचा मूळ गाभाच हा श्रद्धा या नाजूक विषयावर बेतला असल्याने तोच मूळ उद्देश असावा असे अनेक जाणकार मानतात. अश्मयुगीन माणसाला जेंव्हा शेतीचे महत्व कळू लागले तेंव्हा लागवडी योग्य शेतजमीन निर्माण करण्यासाठी प्रचंड प्रमाणात जंगल तोड झाली असावी. त्यावेळी सुद्धा तत्कालीन मानव बहुतांशी जंगलावर निर्भर होता. शेती मध्ये कितीही उत्क्रांती झालेली असली तरी लाकूडफाटा, खाद्य, वनस्पतीजन्य ओषधे अश्या अनेक गोष्टींसाठी त्याला जंगलावरच अवलंबून राहणे भाग होते. तसेच मोकळ्या मैदानापेक्षा वास्तव्यासाठी  जंगल जास्त सुरक्षित असावे. आत्ता जसे भूखंड माफिया, बिल्डर नावाची मानवाची वेगळीच प्रजाती निर्माण झाली आहे तसेच त्या काळी “शेती माफिया” असावेत ज्यांनी शेतीसाठी वनसंहाराला हातभार लावला. अश्याच वेळी जंगलाचे महत्व जाणणारे देखील होते याची खात्री या देवरायांच्या अस्तित्वावरून जाणवते. मानवाच्या देवावरील श्रद्धायुक्त भीतीचा योग्य वापर जंगलांच्या रक्षणासाठी आणि संवर्धनासाठी केला गेला. त्यासाठी गणपती, श्रीराम, कृष्ण यांच्या सारख्या सौम्य देवतांचा वापर न करता देवी किंवा शंकर यांचे कडक आणि जहाल रूप दिले. या देवरायांतील देवतांची नावे पण विचित्र, झोलाई, कालकाई, वाघजाई, सोमजाई, वेतोबा, डुंगोबा, बापदेव, म्हसोबा अशी कधी न ऐकलेली. देवराईतील कुठल्याही साधन संपत्तीचा ह्रास झाला तर त्या देवतेचा कोप होतो. इतकंच काय पण बऱ्याच देवरायांमध्ये प्रवेश देखील निषिद्ध आहे. अश्या अनेक भ्रामक कल्पनांमुळे देवराया आपले अस्तित्व टिकवून आहेत. अंधश्रद्धेचा इतका उत्तम आणि वैधानिक उपयोग आजपर्यंत कुठेही बघितला नाही.

अश्या देवरायांवर कित्येक श्रद्धा/अंधश्रद्धा, त्यातून निर्माण होणाऱ्या दंतकथा यांचा पगडा असल्याने आजही हे हिरवे तारकापुंज शाबूत आहेत. खरा प्रश्न हा आहे की अजून किती दिवस शाबूत राहतील? सध्याच्या आधुनिक विचारसरणी पुढे या पिढीजात रुढींचा टिकाव लागणे जरा कठीणच आहे. या आधुनिकीकरणाचे पडसाद हळू हळू दिसू लागले आहेत … देवरायांचे क्षेत्र, विस्तार कमी होताना दिसत आहे. त्यामुळे तिथे आढळणाऱ्या अनेक प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. अशी जंगले एका दिवसात किंवा एका वर्षात उभी राहू शकत नाहीत तर ती एक मुक्त प्रक्रिया आहे वर्षानुवर्षे चालणारी. सामाजिक वनीकरण हा एक उपाय असला तरी तो जबरदस्तीने लादलेला आहे त्याला नैसर्गिक संवर्धनाची सर नाही. जैवविविधतेने समृद्ध अश्या देवरायांचे संरक्षण आणि संवर्धन होणे गरजेचे आहे. त्यासाठी गरज आहे ती सामाजिक पातळीवर प्रयत्न करण्याची, देवराया आणि आपली वनसंपदा वाचवण्याची.

(वरील लेख कुठलीही शास्त्रीय माहिती देत नाही याची वाचकांनी नोंद घावी. कुणी जाणकाराने काही मार्गदर्शन केले तर हा लेख अजून चांगला आणि शास्त्रशुद्ध बनवता येईल. या लेखातील माहिती बद्दल कुणास काही आक्षेप असल्यास कृपया coolgrahica at-the-rate gmail dot com वर कळवावे.)

16 thoughts on “देवराई

 1. आनंद,

  देवराई बद्दल इतकी चांगली आणि अभ्यासपूर्ण माहिती दिल्याबद्दल धन्यवाद.

  ह्या नावाचा एक मराठी चित्रपट आहे आणि त्यात अतुल कुलकर्णीने भूमिका केली आहे ह्याच्या पलीकडे ह्या विषयी मला काहीच माहिती नव्हते!!

  विषयातील विविधतेमुळे तुझा ब्लॉग खूप वाचनीय होतोय. अशीच नवीन नवीन माहिती देत रहा.

  एक सूचना – तुझ्या भटकंतीत तू बरीच चांगली नेचर फोटोग्राफी केली आहेस. तुझ्या ब्लॉगमध्ये एका नवीन विभागाद्वारे तेही वाचकांसमोर ठेवावेस!

  – प्रशांत नाफडे

  • धन्यवाद प्रशांत,
   अशीच भेट देत रहा. फोटोग्राफीची काही पोस्ट टाकायची आहेत पण त्या बरोबर असलेले संदर्भ जमवायला जरा वेळ लागेल. बघू कसं जमतंय ते.
   – आनंद.

 2. पिंगबॅक शुक् शुक् – भाग ०१/०२ « अनुविना

 3. माझा व माझ्या आईचा जन्म व बालपण डोंबिवलीत गेल्याने अजूनही सुट्टीत डोम मध्ये येणे होते.
  येथे डोंबिवलीचा उल्लेख वाचून जीव सुखावला.
  लेख चांगला झाला आहे.
  देवराई बद्दलची संकल्पना मस्त समजून सांगितली आहे.

 4. namaskaar.. mi dombivalitach rahato.. mihi botanycha vidhyaarthee.. Dr sanjay deshmukh, aani umesh doghannahi changala olakhato..

  lekh chaan zalay.. devraya haa kharokharach ek adbhut prakar aahe..

  dombivalitach rahata kaa? bhetuch kadhitari..

 5. अत्यंत सुंदर लिखाण माझ्या अकोले तालुक्यातील फोपसंडी गावात आजही पाच देवराई शाबूत आहेत. निश्चितच अभ्यास व्हावा –प्रा मच्छिंद्र देशमुख

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s