मोऱ्या बापट (भाग २)

वय अंदाजे ४५ च्या आसपास. साधारण उंच आणि बऱ्या प्रमाणात रुंद. वयोमानापरत्वे विरळ झालेले केस. कानातच्या पाळीत घुसवलेला हीना अत्तराचा फाया. बोलता बोलता मधेच तर्जनीने तो बोळा घुसळून वास घ्यायची वेगळीच लकब. शर्टाचा खिसा कागदाच्या असंख्य चीठोर्यानी ओथंबलेला. पोटाचा घेर विशेष नसला तरी त्याचा ताण शर्टाच्या काही बटणांना निश्चित जाणवत होता. बापट या आडनावाला शोभेल असा गौर वर्ण आणि चित्पावनी वाणीला अस्सल राजापुरी वळण. संगीत आणि पानाशिवाय दुसरे कुठलाही शौक नसलेला शौकीन माणूस. दिसायला … वागायला तसा अजागळच. फटकळ नव्हता पण त्याच्या स्पष्टवक्तेपणा ठासून भरलेला.

आता मोऱ्या मला रोज रात्री न चुकता भेटायचा. त्याच्या बरोबर गप्पा मारण्यासाठी कधी विषय शोधावे लागले नाही. जुन्या आठवणी, कोकण आणि संगीत हे त्याचे विशेष जिव्हाळ्याचे विषय. यात कधी आमच्या एकमेकांच्या व्यक्तिगत आयुष्यावर कधीच बोलणं झालं नाही. जीवनाच्या रंगमंचावरील व्यावहारिक नात्यातील मोऱ्या आणि व्यक्तिगत जीवनातील मोरेश्वर … या दोन भुमिकांमध्ये कमालीची तफावत होती. वरून अलबेल दिसत असलं तरी आत कुठली तरी नाजूक जखम मोऱ्याला सलत होती. हळू हळू त्याच्या जीवनातले विविध पैलू उलगडत गेले आणि माझ्या मनात असलेला मोऱ्याचा गुंता सुटत होता. नाक्यावर अघळपघळ असणारा मोऱ्या खासगी मध्ये तितकाच विचारी, बुद्धिवादी होता. कधी कधी वाटायचं …. आज मी ज्याचाशी बोलतोय तो मोऱ्या नसून त्याच्या शरीरात घुसलेला भलताच कुणी तरी आहे. तासंतास एखाद्या गंभीर विषयावर चर्चा करतानाच मध्येच कधीतरी असंबद्ध आणि बाळबोध विचार मांडायचा. एखादा अट्टल बेवडा पण झुलणार नाही इतकी त्याची वैचारिक पातळी झुलायची. जितका तो विक्षिप्त होता तितकाच तो भावूक आणि हळवा देखील होता.

एकदा का मोरेश्वरपंतांची स्वारी गायब झाली की ८ – ८ दिवस दर्शन दुर्लभ असायचे. सडाफटिंगच तो …. कुणालाही न सांगता गायब व्हायचा. आणि जेंव्हा तो परत यायचा तेंव्हा नाक्यावरील गुज्जू कंपूचा टार्गेट असायचा. कुणीतरी खिजावायचं “काय मोरू शेठ …. कुणीकडे गेलं होता? कुणी भेटली का?? कुठे घेऊन गेला होता?” नाक्यावरच्या टवाळ संस्कृतीला साजेसेच हीन दर्जाचे आपुलकीचे आणि जिव्हाळ्याचे प्रश्न. मोऱ्या पण अस्सल राजापुरी मिश्कील उत्तरं देऊन त्यांची तोंड बंद करायचा. मी एक दोन वेळा मोऱ्याला या सगळ्या प्रकार बाबत हटकलं तर तो म्हणायचा …. “जाऊंदे रे …त्यांची थोडी करमणूक होते ना. आणि माझा पण टाईमपास. अश्या वांझोट्या गोष्टींना फाजील महत्व देऊ नये” मी काही बोलणार इतक्यात तो विषय तरी बदलायचा किंवा एखादे छानसे गाणे तरी म्हणायचा. सुरांच्या नावाखाली बोंबच होती तो भाग अलाहिदा. आताशा मोऱ्याची खूप सवय झाली होती. कधीतरी शाम्यापण हजेरी लावायचा. नाक्यावरच्या गप्पा अगदीच रंगल्या तर त्यांचा समारोप रेल्वे स्टेशन वरील चहा वाल्याच्या टपरीवर व्हायचा. मोऱ्याचं गायब होणं … अचानक प्रगट होणं चालूच होतं. फरक इतकाच होता की आता मला त्याचा ठावठिकाणा माहित असायचा. मोऱ्या एक उत्तम इलेक्ट्रिशियन होता आणि व्यवसायानिमित्त तो भ्रमंतीवर असे.

असेच एकदा एक आठवड्याच्या अज्ञातवासानंतर मोरेश्वरपंत नाक्यावर अवतीर्ण झाले. मोऱ्याच्या एकंदरीत हालचाली वरून काहीतरी बिनसले आहे हे माझ्या ध्यानात आले. त्या गुज्जू टोळक्याने परत टवाळकी चालू केली तसा कधी नव्हे तो मोऱ्या भडकला …. “भडव्यानो …. तुमच्या xxxxx बरोबर होतो इतके दिवस.” प्रसंग बाका होता …. टोळक्याला पण त्याची जाणीव झाली. मी मोऱ्याला लांब घेऊन गेलो. मोऱ्या दुकानाच्या कट्ट्यावर बसला…. कपाळावर हात …. नजर मेलेली. घाई घाई ने त्याने मोबाईल काढला …. इअरफोनची बोंड कानात घुसवली आणि गाणी ऐकू लागला. १० – १५ मिनिटांनी शांत झाला. पण चेहेऱ्यावरची आग थंड झाली नव्हती. मोऱ्या सॉलिड पेटला होता. त्याला इतकं पोटतिडकीने बोलताना पहिल्यांदाच बघितलं. “अरे या फोकलीच्याना काय जातंय चिडवायला? यांना काय माहित माझ्या आयुष्याचं काय मातेरं झालंय ते? दर वेळेला यांचं आपलं एकच …. बाई आणि बाटली. स्वतः मात्र बारा गावाचं पाणी प्यायलेत.”

एकंदरीत परिस्थिती हाता बाहेर जाण्याआधी मी मोऱ्याला तिथून खेचतच बाजूला नेला. “चल चहा मारुया” असं म्हटल्यावर एक चकार शब्द न काढता मोऱ्या बाईक वर टांग टाकून बसला. अश्या परिस्थितीवर एकच उतारा …. मस्त कडक वाफाळलेला चहा. मोऱ्याने सिगारेट शिलगवली. तर्जनी आणि मध्यमेच्या बेचकीत सिगारेट घट्ट धरून हाताची मुष्टी मुद्रा करून जोरदार कश मारला. सिगारेटच्या धुरासोबत वाफाळलेल्या चहाचे एक दोन घोट मोऱ्याच्या नाभी पर्यंत पोहोचल्यावर मोऱ्याची कुंडलिनी जागृत झाली. मोऱ्याने त्याच्या आयुष्याच्या इतिवृतांताचे कथन चालू केले. माहीत नसलेल्या बऱ्याच गोष्टी त्या रात्री उमगल्या त्या वरून मोऱ्याचे विक्षिप्त वागण्याचे संदर्भ जोडत होतो. कोकणातील जागेच्या भानगडी, चुलात्यांचे त्रास, सलग ३ वर्षात घरातील अगदी जवळच्या माणसांची आजारपणे आणि त्या आजारपणात त्यांचे झालेले मृत्यू, बिघडलेली आर्थिक परिस्थिती …. आणि इतकं सगळं होऊन सुद्धा सगळ्या कडू आठवणी मनात दाबून ठेवून चेहेऱ्यावर त्याचा लवलेशही न दाखवण्याचा मानसिक कणखरपणा बाणावलेला मोऱ्या आपल्या अंतरंगाच्या विस्कटलेल्या रांगोळीचे रंग सारखे करण्याचा प्रयत्न करत होता. तो नुसता बोलत होता आणि मी ऐकत होतो. हो, नाही, बरं … ठीक आहे या व्यतिरिक्त मी तरी काय प्रतिक्रिया देणार. “नंदू …. कुठे हरवलास?” या वाक्याने मी भानावर आलो. ज्यांना ज्यांना मी माझे दुःख सांगतो त्यांचे असेच होते …. म्हणून तर मी माझे रडगाणे कुणालाही सांगत नाही. माझ्या हे रडगाणे ऐकण्या पेक्षा बाबूजींचे भावगीत उत्तम … “मग आज मला सांगण्याची उपरती का झाली??” मी जरा खोचकपणे विचारलं. “तु जवळचा वाटलास … अगदी लहान भावासारखा … इतके दिवस मनाचा कोंडमारा झाला होता. केंव्हापासून तुला या सगळ्या गोष्टी सांगणारच होतो. पण कधी योग आला नाही. आज तुझ्याजवळ जरा मन हलकं झालं.” मध्ये एक आवंढा गिळून मोऱ्या गप्प झाला.

बराच वेळ घेतलेल्या शाब्दिक विश्रामानंतर मोरेश्वर पंतांनी काहीतरी बोलण्यासाठी परत तोंड उघडले. “अरे गेली ८ वर्षे भोगतोय मी हे सगळं दुष्टचक्र. मनावर झालेले जे काही घाव सोसले आहेत ते तुझ्याच काय इतर कुणाच्याही वाट्यास येऊ नयेत” “माझ्या? … साल्या मोऱ्या … चहा पण चढायला लागला की काय?? …. तुला शत्रूला असे म्हणायचे आहे का?” मी जवळ जवळ ओरडलोच. मोऱ्या शरमला….. उगाच वजनदार साहित्यिक वाक्य टाकण्याच्या नादात भलतच काही तरी बडबडलो हे त्याला उमगल्याने त्याने लगेच सारवासारव केली …”तेच ते रे …. आनंदा…. तु भावना समजून घे रे” …. मी मनोमन कपाळावर हात मारून घेतला. “वर्षभर पलंगावर खितपत पडलेल्या आईने अखेरचा श्वास घेतला आणि तिच्या नंतर लगेच सासुबाईना देवाज्ञा झाली. आता मी त्यांच्या एकुलत्या एक कन्येचा एकुलता एक जामात असल्याने त्यांची सगळी नैतिक जबाबदारी माझ्यावरच नाही का??” मी मान डोलावून “हो हो ” म्हटलं. मोऱ्या नुसता कादंबरी छाप वाक्ये बोलत होता. आणि त्या गंभीर प्रसंगात देखील मला हसू येत होतं (मनातल्या मनात). “या दोन माउलींची आजारपण बायकोने तिच्या व्याधी कडे दुर्लक्ष केले. आणि ते दुर्लक्ष तिच्या जीवावर बेतले. माझा सुखी संसार उध्वस्त झाला. नशीब एखादे मुलबाळ सोडून नाही गेली नाहीतर आज आईविना त्या पोराची काय अवस्था झाली असती? त्याला कसं संभाळले असते ते परमेश्वरच जाणे. भरलेलं घर, त्या सोबतच्या असलेल्या सगळ्या गोड आठवणी घेउन गेली ती. ३ – ३ जणींचा आजारपणाचा खर्च पेलला नाही … मग स्वतःचे मालकीचे घर सोडून भाड्याच्या घरात राहायला आलो. पण तिच्या सोबत घालवलेल्या सोनेरी क्षणाच्या आठवणी अश्या सहजा सहजी थोडीच पुसल्या जाणार? कापड कितीही उसवलं तरी काही धाग्यांची वीण सुटता सुटत नाही” मोऱ्या एखादी कादंबरी उघडून त्याच्यातील छापील शब्द बोलत होता असे हळू हळू मला वाटायला लागले. “बरेच दा एकट्याला घर खायला उठतं. भिंती अंगावर धावून येतात असे वाटते. कुठेही कामानिमित्त बाहेर गेलो तरी माझ्या वाटेवर डोळे लावून बसणारं कुणी नाही. चार शब्द म्हणून कुणाशी बोलायचे असे वाटले तर घरात सगळंच निर्जीव …. आताशा सकाळी उठल्यावर चादरीला पडणाऱ्या चुण्या पण रुसून निघून गेलेल्या. थकलोय रे आता या एकटेपणाला.रोजचं बाहेर खाणे जमत नाही …. शेवटी घरच्या साध्या पण प्रेमाने भारलेल्या वरण भाताची गोडी बाहेरच्या पनीर मटरला नाही रे.” हे सांगता सांगता मोऱ्याचे डोळे पाणावले.  मोऱ्या एकदम काकुळतीला येवून बोलत होता आणि त्याची धग हळू हळू मला लागतं होती. “सध्या मराठी साहित्य जास्तच वाचतोस का?” असा खोडसाळ प्रश्न मी ओठांवरच रोखून धरला.

माझ्या इतक्या रात्री जागृत असलेल्या सद्सद्विवेक बुद्धीला अनुसरून मी बाळबोध प्रश्न विचारला “मग पुनर्विवाह का नाही केलास?” (मला ‘परत लग्न का नाही केलंस’ असं विचारायचं होतं बहुधा …. पण पुनर्विवाह हा शब्द म्हणजे मोऱ्याच्या बोलण्याचा इफेक्ट असावा) मी हा प्रश्न विचारणार हे माहित असल्यागत मोऱ्याची एका शब्दात उत्तरला “माझं अर्धवट वय आणि माझी आर्थिक परिस्थिती”. मोऱ्या गप्प झाला …. एखाद्या दिर्घविरामा सारखा. पण त्याच्या डोक्यात काहीतरी विचार चक्र चालू होती. अजून एक सिगारेट शिलगवत मोऱ्याने २-३ जोरकस कश मारले. अचानक मला विचारलं “बायको बघशील माझ्यासाठी?” मी पार उडालोच. मी आणि मोऱ्या साठी बायको शोधणार???? मैत्रीखातर केलेली मोऱ्याची ही विनवणी अजब होती. महिन्यातून एक दोन वेळा घरच्या जेवनाची सोय करू शकलो असतो फार फार तर … पण इथे तर डायरेक्ट बायको. आज काल सोन्याचे अंडे मिळू शकते पण इथे तर मोऱ्याने डायरेक्ट कोंबडीच मागितली. माझ्या चेहेऱ्यावरचे अगम्य भाव बघून मोऱ्या म्हणाला “तुला संकोच वाटत असेल तर राहून दे. पण कुठे असं स्थळ असेल तर लक्षात ठेव. अगदी कुणी पण चालेल … विधवा, घटस्फोटिता, परित्यक्ता … नाकी डोळी कशीही असली तरी चालेल पण हाती पायी धड असावी. लेकुरवाळी असेल तरी चालेल … मी जबाबदारी घ्यायला तयार आहे.” मोऱ्याच्या अपेक्षांचा नळ गळत होता. मी थोडं अवघडूनच म्हणालो “अरे कठीण नाही पण सोप्पं देखील नाहीये. तुझ्या अपेक्षा पूर्ण करणारी तुला हवी असलेली व्यक्ती आत्ता तरी माझ्या नजरे समोर नाही.” प्रसंग हलका करण्यासाठी मी त्याला म्हटले “स्त्री नाहीये पण एक पुरुष आहे …. चालणार असेल तर बघ. शब्द टाकतो तुझ्यासाठी. आजकाल अशी लग्न होतात … तु एक तडजोड म्हणून विचार कर. आणि पुढे मुलबाळ पण होणार नाही याची १००% खात्री.” माझा मिश्कील स्वभाव जाणून असल्याने मोऱ्या भडकला नाही. उलट थोडा लाजतच म्हणाला “कशाला थट्टा करताय गरीबाची. अरे, अडलेल्या गर्भार्शिनीला आणि उभ्या असलेल्या खोंडाला उगीच नाडू नये” मी मोऱ्याची उगीच खेचायची म्हणून म्हणालो “खोंड ??? कोण तु?? अंगावरच्या माशा हाकलायची गरज पडली तर शेपटी पण हलणार नाही तुझी. खोंड म्हणे खोंड … अरे धोंड आहेस तु धोंड.” हा संवाद इथेच संपला आणि मोऱ्याला त्याच्या घराखाली उतरवला. जाताना त्याच्या साठी सुशील, सद्वर्तनी सहचारिणी बघण्याचे आर्जव करायला विसरला नाही. आता जेंव्हा जेंव्हा मोऱ्या मला भेटणार होता तेंव्हा तेंव्हा “लग्न” या विषयावरून माझ्या मेंदूला “नग्न” करणार होता.

(क्रमशः)

4 thoughts on “मोऱ्या बापट (भाग २)

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s