नेमेची येतो मग पावसाळा …

येरे येरे पावसा ते मडके गेले वाहून या ओळी अगदी सगळ्यांच्या मुखातून गेली कित्येक वर्षे गळत आहेत. तसं मुंबईच्या वाटेला सर आली धावून, मडके गेले वाहून अशी परिस्थिती फारच कमी वेळा आली. नेहेमी मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात या वर्षी भारताच्या सीमेवर जरा जास्तच रेंगाळला. आता जूनच्या पहिल्याच आठवड्यात महाराष्ट्राचे सीमोल्लंघन केले असले तरी मुंबई भिजवायला अजून २-३ दिवस तरी आहेत. अर्थात तशी वातावरण निर्मिती, आगमनाची तयारी सुरु झाल्याची वर्दी दाटलेल्या काळ्या ढगांनी दिली आहेच. मुंबईच्या “अनिश्चितता” या गुणधर्माचा आदर हा वरून राजा देखील राखतो म्हणे. अर्थात उशिरा धावणाऱ्या लोकलची सवय असलेला मुंबईकर पावसाने केलेला “लेट” विशेष मनावर घेत नाही. उन्हाच्या काहिली पासून थोडा आराम या व्यतिरिक्त सरासरी पेक्षा जास्त पाऊस झाला तर मुंबईकरांसाठी जलप्रलय असतो.  पावसाच्या पाण्याला नाचायला आणि साचायला  दर वर्षी नवीन नवीन सखल प्रदेश तयार होतात आणि रस्त्यावर खड्ड्यांची नक्षी तयार होते. असा हा नाठाळ पाऊस उगीच बृहन्मुंबईच्या म्युनिसिपाल्टी, नगरसेवक आणि नागरिक यांच्यात वाद निर्माण करतो.

नियमित पावसामुळे मुंबईकरांसाठी होणारे बदल म्हणजे पाणी साचणे (नळाला पाणी नाही पण मिलन सब वे तुंबलेला ;)), गाड्या बंद होणे आणि रुमालाने घाम पुसण्याची सरासरी कमी होणे. सामान्य मुंबईकरासाठी मुंबईत पाऊस कमी पडला तरी चालेल पण तानसा, वैतरणा हे तलाव दुथडी भरून वाहिले पाहिजेत म्हणजे वर्षभरासाठी पाण्याची सोय झाली. या व्यतिरिक्त मुंबईकर पावसाबद्दल जरा अल्पसंतुष्टच आहे. चार पाच ठिकाणी पाणी भरले, १-२ वेळा लोकल बंद झाल्या, रस्त्याला पावलागणिक एक खड्डा पडला, सगळे तलाव भरले की मुंबईकरांचा पावसाळा सुफल संपूर्ण होतो.

“यंदा पावसाला जरा उशीरच झाला. नाय काय?” टकलावरचा घाम पुसत ऑफिसमधला देशपांडे म्हणाला “या वर्षी केरळ मध्ये जरा जास्तच रेंगाळला. नाय काय? नाही तर येतो एव्हाना मुंबईत.” साहेबांची सेक्रेटरी सिंडी त्याला दुजोरा देत म्हणाली “येस येस डेशपांडे. इट्स टू हॉट. व्हेअर इज रेनी सिझन?” ही बया त्या देशपांडेला डेशपांडे का म्हणते ते तीच जाणो. हीच सिंडी तिने घातलेल्या कमी कपड्याचे समर्थन “उन्हाळ्यात उकडतं म्हणून” आणि “पावसाळ्यात भिजतात म्हणून” असं करते. आणि तिला बघून या देशपांड्याला अजूनच घाम फुटतो. आता मुंबईत पडणारा पाऊस आणि त्याला झालेला उशीर या वर ही दोघं मस्त टाईमपास करणार हे माहित होतं. मी म्हटलं “अरे तो पाऊस हिंदी महासागरातील जलपरी बघण्यात थोडा रेंगाळला असेल….. देशपांड्या तू नाही का ट्रेन मधल्या व्हिडीओ कोच जवळ रेंगाळतोस. आणि ही बया त्या जॉनच्या पोस्टर समोर. आणि देशपांड्या तू रोज रात्री ती मल्लू गाणी बघत असतोस डोळे फुटेस्तोवर मग जर वाटेत पावसाला खुद्द केरळ बघायची इच्छा झाली तर बिघडले कुठे?” देशपांडेने लगेच विषय बदलला. “छत्री घ्यायला हवी. जुन्या छत्रीच्या ताड्या तुटल्या आहेत” तितक्यात सिंडी म्हणाली “डेशपांडे, व्हाय डोंट यु बाय रेनकोट?” मी म्हटलं “नको, अच्युत पालवांच्या छत्री रंगवणे कार्यशाळेत जा. छत्री फुकट मिळेल … तीही रंगवून.” आता असे हे पावसावरील टाईमपास पुढील दोन तीन महिने सगळ्याच ऑफिस मध्ये चालतील.

तर हे असे संवाद घड्याळाच्या काट्यावर चालणाऱ्या मुंबई मध्ये नाक्या नाक्या वर रंगतील, सोबतीला वाफाळणारा चहा किंवा गरमागरम कांदाभजी असेल तर बात काही और आहे. एक दिवसाच्या किंवा शनिवार रविवारच्या पावसाळी सहलीना जोर येईल. नवीन कुठे स्पॉट मिळालाय का? कोण कोण जायचं? काय काय धम्माल करायची याचं पूर्ण प्लानिंग होईल. पर्यटन व्यवसायातील मंडळी देखील कुणा तरी सेलिब्रिटींचे लेबल लावून अश्या सहलींचे आयोजन करतील आणि पडणाऱ्या पाऊस धारांमध्ये हात धुवून घेतील. पहिल्या पावसाची वाट पाहात असलेला मुंबईकर पावसाचे थेंब अंगावर पडू लागले की चप्पल, छात्री, रेनकोट आणि इतर पावसाळी “सामानाची” जमवा जमव करतील.

असा हा पाउस काही दिवसात मुंबईत हजर होईल. हा लेख वाचे पर्यंत बाहेर शिडकावा पण चालू झाला असेल कदाचित. मुंबईत उन्हाळा तर १२ महिने असतो, निदान दोन महिने तरी नैसर्गिक शॉवरचा आनंद घेऊ. कुणी बरोबर भिजायला नसेल तर एकटेच भिजा. चहा कांदाभाजीचा आस्वाद घ्या. नुसतं शरीराने भिजण्यात मज्जा नाही तर मनापासून “चिंब” व्हा.

4 thoughts on “नेमेची येतो मग पावसाळा …

 1. तुमच्या लेखातून गारवा जाणवला.
  आणि पावसाची ओढ सुद्धा
  अवांतर
  नशीब मल्लिका आणि सनी सारख्या सेलिब्रेटी घेऊन कोणी पावसाळी सहल आयोजित करत नाहीत.

  • धन्यवाद निनाद. सगळेच ऋतू आवडतात. कारण प्रत्येकाचं महत्व आहे आणि नैसर्गिक कार्यकाल आहे.
   या बायांना घेऊन कुणी अश्या सहली आयोजित करत पण असतील पण मग त्या सहली राहणार नाहीत “monsoon rave parties” होतील. 😉

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s