शुक् शुक् – भाग ०२/०२

image

पूर्वार्ध:
सदुभाऊ, गावचा वैदू, धोंडीबाच्या आग्रहा खातर त्याच्या घरी म्हशीला औषधोपचार करण्या साठी जातो. अंधार आणि भूतांची प्रचंड भीती असलेला सदू दिवे लागणीच्या वेळी घरी जायला निघतो …..

गावचे दिवे दूर दूर जाऊ लागले आणि अंधार अधिक गडद झाला. कंदील, हातातली काठी सरसावली, झोळी काखेत घट्ट मारली आणि सदूभाऊ त्या अंधारात शिरला. अमावस्या असल्याने सगळी कडे मिट्ट काळोख आणि सदूच्या कंदिलाचा जेमतेम २-३ फुटावर पडेल इतका प्रकाश. मगाशी येताना वाटलेली राईतील परिस्थिती अजूनच भयाण वाटत होती. जमिनीवरचा पालापाचोळा तुडवताना होणाऱ्या त्याच्या वाहाणेच्या आवाजाबरोबरच अजून एक वेगळा आवाज आला म्हणून त्याने नीट बघितलं तर एक जनावर त्याच्या काठी जवळून सळसळत गेलं. सदूची मोहाची मारलेली सगळी एका हिसक्यात उतरली. “आताशा कुठे आत शिरलो तर जनावर आडवं गेलं, आजून अर्धी वाट पण न्हायी झाली. आज काय धड्या गांडीनं घरी पोचत नाय.” पुढची १५ – २० पाऊले तसं काहीच विशेष घडलं नाही त्यामुळे सदुभाऊला जरा हायसं वाटलं. सदुभाऊच्या पायाखालची वाट असली तरी रात्रीच्या अंधारात आणि वाटत असलेल्या भीती पोटी तो बरेच वेळा अडखळत होता. कंदिलाच्या मिणमिणत्या प्रकाशात सदू राईतल्या दाट जंगलातील पायवाट तुडवतचालला होता तितक्यात पाठीमागून आवाज आला “शुक् शुक्” आणि पाठीवरची झोळी हलली, थरथरली. सदुभाऊ थांबला आणि मागे न पाहताच ओरडला “कोन हाये?” पण काहीच उत्तर नाही. कुणीच काही बोललं नाही. सदू परत चालू लागला आणि ५-६ पावलांनंतर परत एकदा तोच आवाज “शुक् शुक्” आणि तीच थर थर. आता मात्र सदूची बोबडीच वळली. दरदरून घाम फुटला. “गावची लोकं बोलत्यात त्ये काय खोटं न्हाय … बापदेवाची राई झपाटलेली हाय. कुठली अवदसा सुचली म्हनून या वाटनं आलो”

सदुभाऊ बापदेवाच्या देवळी पाशी आला. आत्ता पर्यंत मागे वळून बघायची एकदाही हिम्मत त्याला झाली नव्हती. दमलेला सदू देवळीच्या कट्ट्यावर बसला आणि घाबरत घाबरत आलेल्या वाटे कडे बघितलं तर तिथे साधी पानांची पण हालचाल नव्हती. २ मिनिटं स्थिरावून बापदेवाला नमस्कार करायला वळला. दिवा लावलेला, उदबत्तीचा वास येत असलेला बघून सदू चाट पडला “कुनी साधी सकाळची दिवाबत्ती करत न्हाई मग आत्ता हिथं दिवा कुनी लावला असल? …. आरं द्येवा या रानात खरंच भूत हाय” सदुभाऊ उठून चालायला लागताच परत एकदा “शुक् शुक्” ….. सदू सगळा ऐवज घेऊन कंदिलाच्या प्रकाशात पाळायला लागला. रानाची वाट काही संपत नव्हती क्षणभर सदूला वाटले चकवा लागला की काय? पण लगेच दूर वर त्याला त्याच्या घरच्या पडवीचा दिवा दिसू लागला. आता घर नजरेच्या टप्प्यात आल्याने सदूला थोडं हायसं वाटत होतं. पण तितक्यात पाठीमागे कुणीतरी त्याची झोळी पकडली. सदुभाऊ थबकला, पाठीमागे वळून बघायची पण भीती वाटत होती. आणि आता तर मागून वेगळाच आवाज येत होता “अरे! उचल मला उचल …… अरे! उचल मला उचल.” सदू जवळ जवळ किंचाळलाच “मी नाही … मी नाही …. सोड मला कोन तु …. म्या काय केलया तुझं” सदुभाऊ गयावया करत होता तर पाठीमागून काहीच आवाज नाही पण ज्या कुणी पाठीमागून पकडून ठेवलं होतं तो काही सोडत नव्हता. एक दोन वेळा झोळीला हिसडा देऊन सुद्धा काही उपयोग झाला नव्हता. रामाचं नाव घेत सदू तसाच उभा राहिला. पण आजूबाजूला काहीच हालचाल झाली नाही. शेवटी सगळा धीर एकवटून हातातली काठी त्याने मागे नं बघताच फिरवली. तशी ती काठी झाडांच्या पानांना घासून गेली. खांद्यावरच्या पंच्याने टकलावर निथळणारा घाम पुसला आणि सदुभाऊ ने हळू हळू मान वळवायला सुरुवात केली. कुणीच दिसलं नाही म्हणून कंदील वर केला आली लक्षात आलं झोळी कुणीही पकडलेली नसून घरी पोचण्याच्या धावपळीत हेलकावणारी झोळी बोरीच्या काट्यात फसली होती. सदूने झोळी सोडवून निघाला आणि राई च्या बाहेर असलेल्या धोंडीवर बसला. १५-२० मिनिटांची पायवाट पण पुरती दमछाक झाली होती. त्याला वाटलं आता राईच्या बाहेर पडलो म्हणजे सुटलो कुणी पकडणारा नाही की बोलावणारा नाही. खवीस मेला … त्याची हद्द राई पर्यंतच. तितक्यात परत तोच आवाज अंधार चिरत आला “शुक् शुक्” आणि त्याची झोळी थरथरली. “अरे द्येवा ह्यो खवीस राईच्या भायेर बी हाये?” असं म्हणत सदूने जिवाच्या आकांताने धूम ठोकली आणि तडक त्याच्या घरच्या पडवी पर्यंत आला आणि तिथेच कोसळला.

सदूला पडलेला बघताच त्याची बायको पळत बाहेर आली. “यशोदे लोटाभर पानी हान, तुज्या सासर्यास्नी फेफरं आलाया”. सूनबाईने पाण्याचा लोटाच उपडा केला आणि काहीही फरक पडत नाही हे बघून परत लोट्यात पानी घेऊन आली. तो ती ओतणार तितक्यात तिची सासू गरजली “हान इकडं त्यो लोटा. किती पानी घालशील? आन्घुल न्हाई घालायचीया सासऱ्यासनी”. १० – १५ मिनिटांनी डोळे उघडे करून बघतो तर आजू बाजूला त्याचा मुलगा, सून आणि ७ वर्षाच्या नातू त्याच्या भोवती कोंडाळ करून उभे होते. त्याचं डोकं कारभारणीच्या मांडीवर होतं आणि ती ओंजळीने त्याच्या चेहेऱ्यावर पाण्याचा शिडकावा करत होती. सदुभाऊ ला हुशारी आली आणि तो उठून सरकत सरकत भिंतीला टेकून बसला. हाता पायात जणू त्राणच नव्हता. नातवाने प्यायला पाणी दिलं, सुनबाई पदरानं वारा घालत होती आणि बायको जवळच्या पंच्याने अंग पुसत होती. आणि पुसता पुसता धुसफुस चालूच होती “इतकं का पानी वोतायचं? चार थेम शिपड म्हणले तर आखा लोटाच उलटा केला …. काय म्हनावं याला? आनी आमचं धनी … त्या धोंडीबा कड गेलं म्हंजी दारू ढोसली असल … येता येता तरास झाला असल … का उगी न्हाई झेपत तर पियाची म्हन्ते मी … उगा जीवाला घोर” तिची बडबड ऐकून मुलगा म्हणाला “आये गप् की जरा. भाऊ काय झालं इतकं आडवं पडाया”. सदुभाऊ अडखळत बोलू लागला “आता आयुष्यात कधीच रात्री त्या राईत जाणार न्हाई. राई मंदी भूतं हायेत. राईत शिरल्या पासून मागे लागली होती, सारखी हाकाटी करत होती. शुक् शुक् आवाज यायचा, झोळी थरथराची. लहानपणा पासून बापाने सांगून ठीवले होतं की रानावनातून जाताना मागून हाकाटी आली की लक्ष द्यायचं न्हाई म्हणून आज जीता राहिलो … न्हाईतर माजं बी भूत झालं असतंया”

सदुभाऊचा मुलगा हलकेच हसला….आणि त्याच्या मुलाला म्हणाला “किसन आता खर खर सांग माजा शेल्फोन कुट ठेवला हाये?” किसन ने सदुभाऊच्या झोळीत लपवलेला मोबाईल काढून सखाराम कडे दिला. “आता येण्याच्या काही दिवस आदुगर हा शेल्फोन घेतला. शिरप्यानं त्यात रिंगटोन का काय ते भरलं आणि म्हनला शुक् शुक् आवाज आलं की फोन आला समज.”असं सखाराम ने सांगताच सदू सकट सगळे खुदु खुदु हसायला लागले आणि सदूची बायको म्हणायला लागली “काय पण भित्रटपणा म्हनायचा. सादा शेल्फोन वाजलेला कळत न्हाई व्हय?” इतक्यात परत एकदा “शुक् शुक्” आवाज आला. सखारामने फोन घेतला “हा बोल रं शिरप्या” असं म्हणत घरात निघून गेला. सदूभाऊ ला चैन पडत नव्हती तो कसल्या तरी विचारात होता आणि अचानक “अरे द्येवा” म्हणत कपाळाला हात मारून खाली बसला “ह्यो शुक् शुक् आवाज या शेल्फोनचा….. मग ती दुसरी हाकाटी कुणाची हुती???”

12 thoughts on “शुक् शुक् – भाग ०२/०२

    • हा हा हा …… मागे एक सातारी मराठी बोली भाषे वर एक मेल आला होता तिथे हा “शेल्फोन” सापडला. ते पण एक मस्त आर्टीकल आहे … सवडीने टाकीन.

    • नमस्कार नेहा,
      अनुविना वर स्वागत. याच्या पुढे देखील अजून भाग असेल अशी आपली आकांक्षा बघून बरं वाटलं. ही कथा दोन भागांचीच आहे.
      धन्यवाद. अशीच भेट देत रहा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s