हायटेक चितळे बंधू

Chitale Bandhu Mithai

एका शनिवारी भाच्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सहकुटुंब पुण्याला जायचा योग आला. पुण्याला गेलं की येताना काय खाऊ आणायचा असा प्रश्नच पडत नाही. चितळ्यांची बाकरवडी तर ठरलेली.मस्त कप भर चहा बरोबर १०-१२ बाकरवड्या कधी फस्त होतात तेच कळत नाही. माझी बहिण कोथरूडच्या Happy Colony मध्ये राहते.तिच्या घराजवळच चितळे बंधूंची शाखा आहे. संध्याकाळी ५ वाजता वाढदिवसाची सगळी तयारी झाली होती आणि वाढदिवस साजरा करण्यासाठी ६:३० वाजायच्या सुमारास सगळ्या बालगोपाळ मित्र मंडळीना बोलावले होते. संध्याकाळी ५:३० वाजता चितळ्यांच्या दुकानात ताजी बाकरवडी येते अशी ताजी बातमी कानावर पडली आणि दुकाना पर्यंत जायला पाऊले चळवळ करू लागली. अवघ्या ५ मिनिटात मी सपत्नीक चितळे बंधूच्या कोथरूड शाखे समोर येऊन थडकलो. या आधी पण तिथे गेलेलो असल्याने दुकान परिचयाचं होतं. पण त्या दिवशी मात्र बराच फरक/बदल जाणवत होता.

दुकानात शिरण्यासाठी जो दरवाजा होता तिथे बरेच अडथळे ठेवलेले दिसले. किंबहुना फालतू, वेळकाढू किंवा उगीच “चवी पुरत्या” येणाऱ्या गिऱ्हाईकाला मज्जाव करण्यासाठी केलेली ही तरतूद असावी. ते अडथळे पार करून आत शिरणार तितक्यात दुकानाच्या बाजूला असलेल्या बोळकांडी वजा जागेतून आवाज आला ” अहो शुक् शुक्, इकडे या …प्रवेश इथून आहे”. त्यातच दुकानाच्या गल्ल्यावर बसलेल्या माणसाने आपली तर्जनी जमिनीला समांतर धरून वाटेकडे बोट दाखवले. मग लक्षात आलं पूर्वीचा मार्ग जो येण्या जाण्या साठी वापरला जायचा त्याचा आता एकदिशा मार्ग झाला होता. पुण्यातील शिस्तबद्ध वाहतुकीला अजून शिस्त लागावी म्हणून एखादा मार्ग अचानक पणे एकदिशा मार्ग घोषित करतात तेच सूत्र इथे पण लागू झालेले बघून मला जरा आश्चर्यच वाटले. कदाचित उगीच गिऱ्हाईकांची गर्दी वाढली असावी. मग परत त्या अडथळ्यातून बाहेर पडून त्या प्रवेश करण्याच्या जागे पर्यंत गेलो. “मग आधी नाही सांगता येत? जरा एक पाउल अजून पुढे पडले असते तर झालेला अपमान कुणी सहन केला असता? बाकरवडी विकत घ्यायला आलोय बाहेरून बरणीतले लाडू बघण्या साठी नाही” मी जरा तुसडेपणानेच विचारले. “इथे बरणीत लाडू ठेवत नाहीत. बरणीत सुकामेवा आहे” या त्याच्या थंड प्रतिक्रियेने मी सराईत पुणेकर आहे हे भासवण्याचा निरर्थक प्रयत्न फोल ठरला. आणि त्याच्या सकट सगळ्या दुकानाला कळले मी पुणेकर नसून ३/४ विजार घालून आलेला एक मुंबईकर आहे.

आम्ही त्या प्रवेश दरवाज्यातून आत शिरणार तितक्यात या शुक् शुक् गृहस्थांनी परत थांबवले. मला वाटले इथे येणाऱ्या जाणाऱ्या गिऱ्हाईकाची झडती घेत असावेत असं समजून मी त्याच्या जवळ गेलो आणि कवायतीत करतात त्या प्रमाणे खांद्याच्या सरळ रेषेत हात करून उभा राहिलो. ते गृहस्थ तितक्याच थंडपणे म्हणाले “याची काही गरज नाही आणि अजून ही सिस्टीम चालू झालेली नाही” आणि त्याने माझ्या हातात चक्क एक पोस्टकार्डा किंवा शुभेच्छापत्रा पेक्षा थोडं मोठं प्याड वजा आयताकृती प्लायवूडचे फळकुट दिले. त्या वर कसली तरी स्क्रीन होती. तो जेंव्हा हीच अगम्य वस्तू माझ्या पत्नीला द्यायला लागला तेंव्हा मी म्हणालो “एकच पुरे आम्ही एकत्रच आहोत” परत कुणीही प्रतिप्रश्न करायचे धाडस करू नये अश्या ठसक्यात तो गृहस्थ म्हणाला “जो कुणी इथून आत जाईल त्याने हे बरोबर घेऊन जायचे आहे. आणि जाताना काउंटर वर परत द्या. काहीही खरेदी करताना आणि झाल्यावर हे बरोबर लागेल. तुम्हांला काहीही करायचे नाही फक्त मागितल्यावर हे कार्ड द्या”. एका हातात ते फळकुट ज्याला हे कार्ड म्हणतात ते घेऊन आम्ही उभयतांनी चितळे बंधूंच्या दुकानात एकदाचा प्रवेश केला.

आमचा एक हात या फळकुटाने व्यापला होता त्यामुळे उरलेल्या एका हाताने जमेल इतकीच खरेदी करावी लागणार होती. गिऱ्हाईकांना कमीत कमी खरेदी करायला मिळावी, उगाच अनावश्यक वस्तू घेऊन पैश्याचा अपव्यय करू नये असा उदात्त हेतू केवळ पुण्यातच असू शकतो. दुकानात मस्त बाकरवडीचा घमघमाट सुटला होता. आत शिरल्या शिरल्या बाकरवडीच्या काउंटर जवळ गेलो. काउंटर वरचा माणूस एका मोठ्या क्रेट मधील बाकरवड्या पाव पाव किलो मोजून त्याचे हवाबंद पाकीट बनवत होता. मी पाव पाव किलोचे ४ पुडे बनवून देण्यास सांगितले आणि त्याने त्याचं तत्परतेने पुडे भरायला सुरुवात पण केली. मुंबईच्या सवयीने मी त्याला म्हणालो “आत्ता ५:३० ला जी ताजी येते तीच भर” हे वाक्य ऐकताच त्याने हातातले काम थांबवले आणि माझ्याकडे एकच पुणेरी कटाक्ष टाकला. मला वाटलं आता हा मला म्हणणार निघा …बाकरवड्या मिळणार नाहीत आणि वरून काहीतरी उपदेशाचे चार शब्द माझ्यावर फेकणार हे एखाद्या शेंबड्या पुणेकर पोराने देखील सांगितले असते.

सौजन्य सप्ताह चालू आहे, कधी नव्हे ते येणाऱ्या गिऱ्हाईकाचा सन्मान करून त्याला दुर्मुख करू नये असा चेहेऱ्यावर सोज्वळ भाव आणून तो काउंटरवरचा पुणेरी दुकानदार मझी मंजुळवाणीने कानउघाडणी करू लागला “सकाळी आलेली बाकरवडी संध्याकाळी विकत नाही ….कारण ती विकण्यासाठी उरतंच नाही. इथे रोज सकाळ संध्याकाळी ताजा माल येतो. देऊ का? खात्री नसेल तर उद्या संध्याकाळी ५:३० वाजता क्रेट मोजायला या” सकाळच्या का संपतात म्हणजे कमी बनवता की विकल्या जातात असा खोडसाळ प्रश्न विचारण्याचे मुद्दाम टाळले आणि त्याला चार पुडे बांधून देण्याची विनवणी वजा आर्जव केलं. पटापट त्याने ४ पुडे भरले आणि म्हणाला “कार्ड द्या”. प्रवेश करताना दिलेल्या मोठ्या आयताकृती फळकुटाला कार्ड म्हणणं जरा हास्यास्पदच होतं. कार्ड कसलं ते कार्ड बोर्ड होता तो … तुमच्या दरवाज्यावरची पाटी लिहिता येईल इतका मोठा. “तुमच्या हातात आहे तेच कार्ड द्या. त्याच्या वर तुम्ही घेतलेल्या वस्तूंची नोंद होईल आणि पुढे याच कार्डचा उपयोग तुम्ही काय काय वस्तू घेतल्यात त्या प्रमाणे बिल बनवले जाईल. बिला प्रमाणे पैसे द्यावे लागतील.” मी परत एकदा त्या फळकुटाकडे बघितलं आणि ते “कार्ड” त्याला देता देता म्हणालो “अरे वा … एकदम अत्याधुनिक प्रणाली आहे तुमच्या कडे” त्याला बहुदा माझा खोचकपणा देखील कळला नाही किंवा माझं “प्रणाली” वगैरे पण त्याच्या डोक्यावरून गेलं. त्या सद्गृहस्थाने ते कार्ड माझ्याकडून खेचून घेतले आणि त्याच्याकडील मोजणी यंत्रावर ठेवले. त्यावर असलेली काही बटणे दाबून ते कार्ड मला परत दिले.

मी त्या बाकरवडीच्या वासाने इतका अधीर झालो होतो की काउंटर सोडता सोडता मी बाकरवडीची एक पुडी फोडली. आणि त्यातली एक बाकरवडी उचलून तोंडात टाकणार इतक्यात बाकरवडी काउंटरवरचा इसम ओरडला “बिल बनवायच्या आगोदर इथे खाऊ नका.” आणि त्याच्या सुरात माझ्या बायकोने पण सूर मिसळला “तुला काही कळतं की नाही … लहान मुला सारखं इथेच काय पाकीट फोडून खायला सुरुवात केलीस?” दोन बोटांनी पकडलेली बाकरवडी तशीच पुडीत सोडून द्यावी लागली. पुढे लाडू, पेढे, बर्फी यांचा काउंटर होता. काय मस्त मस्त रंगांच्या बर्फ्या ठेवल्या होत्या … अगदी बघता क्षणी एक डिश भर घेऊन तिथेच फस्त कराव्याश्या वाटत होत्या. लाडूंची तर रेलचेल होती. मेथी लाडू, बुंदी लाडू, मोतीचूर लाडू, बेसन लाडू, रवा लाडू झालच तर डिंक लाडू … पण या सगळ्या लाडवांमधून “पौष्टिक” लाडूने माझे लक्ष वेधून घेतले. “हा पौष्टिक लाडू काय प्रकार आहे?” असे विचारताच त्या काउंटर वरील माणसाने पौष्टिक लाडू, त्याचे घटक, पौष्टीकतेचे परिमाण सविस्तर सांगितले. पाव किलो पौष्टीक लाडू घेतले आणि सराईतपणे कार्ड पुढे केले. परत ते कार्ड त्या मोजणी-नोंदणी यंत्रावर ठेवले गेले आणि त्या कार्डावर नोंद करून ते मला परत दिले. अजून बाकी काही चकणा आयटम नको ना असं विचारताच भर चितळ्यांच्या दुकानातच कुणाचाही मुलाहिजा नं ठेवता बायको म्हणाली “नको इथून नको. या पेक्षा चांगले आणि स्वस्त चकणे आपल्या डोंबिवलीला मिळतात तुझ्या त्या गुजराथ्याकडे मिळतात”. ती असं म्हणताच मी इकडे तिकडे बघायला लागलो आणि मेन काउंटर वरचा मालक माझ्या हावभावांकडे बघून मिश्किलपणे हसत होता. … अश्या काही प्रसंगावरून मला नेहेमी वाटतं की माझी बायको पूर्व जन्मीची पुणेकर असावी. 😉

एका हातात सामान आणि दुसऱ्या हातात माझे आणि माझ्या बायकोचे कार्ड घेऊन मी सामानाचे पैसे देण्यासाठी शेवटच्या काउंटरवर आलो. कुठल्याही काउंटर वर गेलं की कार्ड पुढे करायचं हे माहीत झाल्यामुळे मी माझ्या हातातील दोन्ही कार्ड त्याच्या समोर धरली. त्याने त्यातले एक फळकुट घेतले आणि त्याच्या कडील मोजणी यंत्रावर ठेवले. ते बहुतेक बायकोच्या हातातले असल्याने त्या कार्डावर कुठलीही नोंद आढळली नाही. आधी मला वाटले वा …काहीच नोंद नाही म्हणजे काही तरी गल्लत झाली असणार आणि आता हा माल चकटफू मिळणार. “दुसरे कार्ड द्या” या मालकाच्या वाक्याने मी वास्तवात आलो. दुसऱ्या कार्डात सगळ्या नोंदी सापडल्या मालकाच्या चेहेऱ्यावर प्रसन्न भाव बघितले. किती झाले हे विचारायच्या आताच मालकाने त्याची तर्जनी संगणकाच्या पटलावर जिथे मोठ्या अक्षरात किंमत दिसत होती तिथे ठेवली. आणि त्याचं तर्जनीने बिल छापण्यासाठी असलेले बटन दाबले. छापील बिलाप्रमाणे रक्कम दिल्यावर मालक आदबीने म्हणाला “डोंबिवली मधून आलात का? बघा अजून काही नकोय ना?” मी म्हटलं “हो, डोंबिवलीहून आलोय. नको अजून काही नको” (आणि जरी हवं असेल तरी हा माणूस मला परत प्रवेश द्वारावर जाऊन फळकुट घेऊन यायला सांगेल”) “इथे प्लास्टिकच्या पिशव्या मिळणार नाहीत” अशी हुकुमावरून स्वरातील पाटी ठळकपणे दिसत असताना सुद्धा पिशवी आहे का? असे विचारले असते तर कदाचित त्याने बाकरवड्या काढून घेतल्या असत्या आणि मला रिकाम्या हाताने पाठवले असते या भीतीने मी पिशवी बद्दल विचारले नाही. पण काय आश्चर्य मालकांनी माझ्या कडून समान घेतले ते प्लास्टिकच्या पिशवीत भरले आणि ती पिशवी चेहेऱ्यावर स्मितहास्य ठेवून मला परत केली. मी परत एकदा ‘पिशवीचे किती झाले?’ हे विचारण्याच्या भानगडीत पडलो नाही कारण एकच भीती ….ताज्या बाकरवड्या हातून निसटल्या तर???

37 thoughts on “हायटेक चितळे बंधू

 1. डेक्कनच्या चितळे बंधू शाखेत ही अत्याधुनिक कार्ड(बोर्ड) प्रणाली प्रथम पाहिली तेंव्हा मला वाटले होते की हे चॉपिंग बोर्ड का देत आहेत? पण तिथला तुसडेपणा माहीत असल्याने मी उगीच काही प्रश्न विचारले नाहीत.

  पोस्ट झकास झालीय. एकदम बाकरवडी प्रमाणेखुसखुशीत.

  • पुण्यात गेलो की नेहेमी काही ना काही गमतीदार प्रसंग घडत असतात त्यातील हा एक नमुना दाखल दिला. झक्कास धमाल आली. बाकी फळकुटा एवढे कार्ड देण्याची हिम्मत अस्सल पुणेकरच करू शकतो हे मात्र निश्चित.
   अभिप्रायाबद्दल धन्यवाद

 2. हाहाहा… मस्त पोस्ट झालीये… मी पहिल्यांदा डेक्कनच्या चितळे बंधूंत गेलेलो तेव्हा ते फ़ळकुटासारखे आरएफ़आईडी टॅग्स बघून जाम हसू आले होते. उग्गाच अपमान व्हायचा म्हणून हसू दाबून ठेवावे लागले. आणि मी ““एकच पुरे आम्ही एकत्रच आहोत” हाच प्रश्न विचारला होता, उत्तर तुम्हाला मिळालेलेच मिळाले अर्थात ! 😉

  • घरोघरी मातीच्या चुली याच उक्ती प्रमाणे स्वतः बद्दलचा सार्थ अभिमान असणारे पुणेकर दुकानदार एका दुकानात एक नियम आणि दुसऱ्यासाठी वेगळा असा दुजा भाव करत नाहीत. 😉
   अभिप्रायाबद्दल धन्यवाद.

   • अर्थातच गरज नसताना मध्ये डोकावतेय त्याबद्दल आधी क्षमस्व
    (पुणेकर असुनही मी नम्र आहे याची नोंद घ्यावी. तात्पर्य पुण्यात नम्र पुणेकरही असु शकतात 😉 )
    एकत्र असुनही प्रत्येकाकडे वेगळे कार्ड का याचं उत्तर देतेय
    (मी चितळे बंधुंची कोणीही लागत नाही याचीही नोंद घ्यावी 😉 )
    कस होतं कधी कधी बाबांना हवी असते चकली आणि आई घेत असते बेसनाचे लाडू. मग आईचं होईपर्यंत बाबांनी बिलींगसाठी वाट पाहत बसायची का? म्हणुन हा सगळा खटाटोप, आपल्याच सोयी साठी !(आणि समजा तेवढयात बाबांचा विचार बदलला तर? गेलं का एक गिर्‍हाईक हातातुन?( कोण म्हणतं मराठी माणसाला बिझनेस जमत नाही? 😉 ) )
    प्रत्येकाची वेगळी आवड आणि मान (लक्ष द्या हो इकडे 😉 ) जपण्याचा साधासा प्रयत्न केलाय चितळ्यांनी!
    पण पुणेकरांचं कस झालय ना ते म्हणतात ना एकदा कानफाट्या नाव पडलं की पडलंच! तस 🙂

    • प्रि.वि.उ.फ.,
     आपला नम्रपणा लक्षात आला …. तसे पुणेकर (पुण्याच्या बाहेर) भारीच नम्र बर का. ;). तुमचं दोन दोन कार्डाचे लॉजिक काही पटलं नाही बा. पुण्यात आई बाबा आपापलं बिल भरतात की काय?
     पण पुणेकरांचं कस झालय ना ते म्हणतात ना एकदा कानफाट्या नाव पडलं की पडलंच! तस 🙂
     हे बाकी खरं.

 3. Hi system tyanchaya kade barayach varsha pasun ahe…….apppreciate karaichya aivaji tyachi khilli udavtay……..evdhi atyadhunik system Mumbai chya 100 malls madhe pan nahiye…….karan ki tumhi punyala jaat nahi tya mule tumhala mahit nahiye……sarva punekar ya saglya system shi avagat ahet Bhatkhande……dombivalikar na bahutek mulatah…ashya sopya saral goshti samjayla khas training lagat asave…..ani samajle nahi ki udva khilli 🙂

  • आपल्या प्रतिक्रिये बद्दल धन्यवाद. चितळे बंधू मिठाईवाले यांच्या बद्दल प्रचंड प्रेम आणि अभिमान असलेल्या तुमच्या सारख्याच बऱ्याच जणांच्या काळजाला बहुतेक या लेखाने हात घातलेला आपल्या रागावरून दिसून येते. 🙂
   1. हा पूर्णपणे विनोदी लेख आहे …. खिल्ली लेख नाही.
   २. इथे त्यांच्या आधुनिकतेची खिल्ली उडवण्यात आलेली नाही.
   ३. कुठली सिस्टीम अत्याधुनिक आहे आणि किती अत्याधुनिक आहे या बद्दल मत प्रदर्शन करण्यास मी असमर्थ आहे कारण आजची technology उद्या असेलच असे नाही.
   ४. मी पुण्याला जात नाही हा तुमचा गैरसमज आहे आणि तो दूर करण्यासाठी मी बांधील नाही.
   ५. पुणेकरांना काय अवगत आहे किंवा काय नाही या बद्दल मत प्रदर्शन करण्यास मी असमर्थ आहे किंवा त्यांनी कश्याबद्दल आक्षेप घ्यावा किंवा घेऊ नये हा त्यांचा प्रश्न आहे. कुठलाही डोंबिवलीकर त्यात पडण्याचा वेडेपणा करणार नाही. 😉
   ६. दुकानात गेल्यावर हातात मोठ्ठ कार्ड घेऊन फिरण्या सारख्या सोप्प्या गोष्टी खरंच डोंबिवली मध्ये नाहीत. वेगळे ट्रेनिंग घ्यायची गरज नाही ….एकदा पुण्याला गेलं की ते आपोआप मिळतं ….डोंबिवलीकर तितके हुशार आहेत.
   ७. “या लेखात चितळ्यांची किंवा त्यांच्या प्रणालीची खिल्ली उडवलेली नाही. ज्यांना असे वाटत असेल त्यांनी या लेखा कडे दुर्लक्ष करावे. किंवा चितळ्यांच्या ठिकाणी दुसरे नाव वाचावे. हुकुमावरून” (पुणेरी पाटी)
   धन्यवाद. या पर प्रतिक्रिया नाही.

 4. me pan bakarwadi ghyayala gelo hoto…!

  Mala pan tyanni te card haatat dile … me vicharale yaa var naav marathit lihayache ki english madhe? ‘ekdum prashnarthak chehara karun me vicharale’

  “Theva fakt javal”… urmat pane uttar milale. aani mala khoop hasu aale

  • याच उर्मटपणामुळे ते आपले पुणेकर जपून आहेत आणि त्यात तर खरी गम्मत आहे. नाही तर चितळे बंधू आणि हल्दीराम मध्ये काय फरक तो राहिला. पण एक नमूद करावेसे वाटते की पदार्थांच्या दर्जामध्ये चितळ्यांचा क्रमांक फार वरचा आहे यात वादच नाही.
   अभिप्रायाबद्दल धन्यवाद.

  • धन्यवाद अनु,
   कुठलाही लेख म्हटला की त्यावर सहमती तसेच असहमतीच्या प्रतिक्रिया येणारच. पुणेकरांना त्यांच्या वरचे विनोद आवडले नसते तर आत्ता पर्यंत पुण्यातील एकही पाटी नावादाखल सुद्धा राहिली नसती. त्यांची विनोदबुद्धी जागृत होती म्हणूनच लाडके पुलं पुण्यात राहिले ना?

 5. chitale bhandu chya dukanala dupari dukan band zhalya nantar aag lagali, Fire Brigd vala ale ani thayani dukan ugadanas sangitale,chitalani saf nakar dila ani sangitale dukan 4 ugdale aag theva vizava. aha ahe assal punerai bana.

 6. आमच्या पुण्याला आणि पुण्याचा जाज्वल्य अभिमान असलेल्या चितळे बंधुंना नावं ठेवल्याबद्दल निशेध… 😀
  आता मी चितळे बंधुंना सांगणारेय नविन पाटी अ‍ॅडा.. आमची सिस्टिम कळत नसल्यास बाहेरुन माहिती काढुन या.. नंतर नावे ठेवलेली ऐकुन घेतली जाणार नाहीत.. 😀
  जोक्स अपार्ट! छान लिहिलय एकदम खुसखुशीत (आमच्या बाकरवडीसारखंच 😉 )
  ब्लॉग आवडला तुमचा!
  आवंतर : डोंबिवली म्हणे मुंबईत येत नाही ना? मग कसले तुम्ही मुंबईकर 😉

 7. प्रि.वि.उ.फ.,
  अहो … पुण्यातील भाषा शास्त्रज्ञांची मने दुखावालीत तुम्ही निशेध म्हणून आता तुम्हांला ते पोटफोड्या ‘ष’ लिहायला लावतील १०० वेळा. 😉
  नको अजून एक पाटी नको … त्या पेक्षा त्याच फळकुटावर मागल्या बाजूस काळ्या शाईने अगम्य अक्षरात सुवाच्य लिहायला सांगा. 😉
  आवंतर : डोंबिवली म्हणे मुंबईत येत नाही ना? मग कसले तुम्ही मुंबईकर 😉 (??#@&$*@$&@)
  भावांतर: आहो स्थळकाळावर जाऊ नका. मुंबई सारखेच पुणे पण इतके फोफावले आहे की सध्या लोणावळ्यात राहणारा देखील पुणेकर म्हणून मिरवतो. आणि तसंही पुलंच्या मते ज्यांच्यापुढे कर जोडावे असे तीनच मुंबईकर पुणेकर आणि नागपूरकर. डोंबिवलीचे सांगायचे झाले तर भाषा, वेश हे सगळे जरा मुंबईकरांच्या जवळचेच. आणि पुणेकर सुद्धा कर्जत गेल्यावर घाम पुसत मुंबई आले मुंबई आले करत असतो असे म्हणतात. 😉
  जोक्स अपार्ट पण आपली प्रतिक्रिया लई भारी …. अस्सल पुणेकरी 😉

  • 😀 😀
   lolzzz
   karjat baddal 100 patal baraka .. aaNi mala Priya mhanalat tari chalel
   ata pot phodya sh baddal bolaayach zaala tar seriously nishedh kelyasch mi to shabd barobar lihite 😉 karan nahi khar sangatey 😉
   punekar marathit chukat nahit shakyato ( typo na durlax karave 😉 )
   mazi pratikriya assal pune ha shabd aikun dhany zali baki 😀

   • प्रिया उर्फ प्रि.वि.उ.फ.,
    आपण निशेध हा शब्द निषेध असा न लिहिल्या मुळे बाराखडीतील पोटफोड्या ‘ष’ रुसला आहे आणि त्याने आपली मधली दांडी गुल केली आहे … त्यामुळे निषेध हा शब्द तुम्हाला निपेध असा दिसेल. 😉
    असं म्हणतात की पुणेकरांचा जाज्वल्य अभिमान टिकवून ठेवलात की पुणेकर तुमचा उत्तम पाहुणचार करतात नाहीतर दारावर पाटी “फडणीस” आणि सांगतात फडणीस इथे रहात नाहीत …दरवाजा बंद. 😉
    एकंदरीत तिथल्या मराठीसाठी तरी पुण्यनगरी मनाला कायम भावते.

  • नमस्कार,
   बरेच दिवस तिथे जातोय पण त्यांचे नाव माहित नव्हते. खरं तर त्यांची वर्तणूक मला कधीच पुण्यातील दुकानदारांच्या ऐकीव वर्तणुकी प्रमाणे वाटली नाही. “प्लास्टिक पिशवी मिळणार नाही” असे लिहिलेले असून सुद्धा हातात असलेले भरपूर समान बघून चेहेऱ्यावर एकही आठी न आणता स्वतःहून पिशवी देणारा विनायक यांच्या सारखा दुकानदार पुण्यात अपवादात्मक असावा. पौष्टीक लाडवाच्या गोडीच्या तोडीची मधुरवाणी आणि बाकरवडी सारखे खुसखुशीत हास्य या दुकानदाराच्या ठाई कायम असतं.

 8. लेख चांगला झाला आहे . चितळे यांच्याकडे एक काह्न्दानी उर्मटपणा आहे आणि तयची लागण निर्विकारपणे counter वर बसलेल्या मालकापासून ते दारातील रखवालदाराच्याही चेहेर्यावर दिसतो . आपण अक्धी चुकीचा प्रश्न विचारणार आणि आपण एक्से जास्तीजास्त छद्मी उत्तर देणार याची जणू ते वाट पाहत असतात .
  त्यांच्या कडचा एक किस्सा{Deccan Gymkhana branch } – माझे बिल झाले होते ५४३ रुपये पन्नास पैसे . ते आधुनिक कुप न रका यंत्रात घालून तेथील महिला कर्मचारी उद्गारली ५४४ रुपये मी म्हणतल का ग बाई तीम्हन्लाई आहो जवळच्या रुपयाची किंमत सांगितली मी म्हटलं ५४३ रुपये ही तेवढेच जवळ आहेत. तिने मुकाट्याने ५४३ रुपये घेतले ,पण सुटे पैसे नाहीत या नावाखाली हे लोक असे किती ५० पैसे ढापत असतील आपण म्हणतो ५० पैसे तर आहेत पण गर्दी बघता असे १०० , २०० रुपये सहज होत असतील माझा सल्ला- सम तारखा आणि विषम तारखा असे दोन भाग करून सम तारखेला ५० पैसे जास्त घ्यायचे विषम तारखेला कमी
  काय आवडली का idea ?

 9. Haldiram vs chitalenche bhandan amachyakade pan hote. Interestingly, Nagpurkaranna Haldiram kharach nagpuri vatato. Tyanna Sharma and Varma kinwa sarda and agrawal, hey nagpurat rahat aslyamule tyanchyabaddal tevadhich apulki aste jevadhi tithe rahanarya deshpande wankhede kimmatkar kinwa gadkarinn baddal vatavi. Jevadhe ascharya punyatlya lokanna nagpuri marathi aiklyavar vatatey, tevadhech ascharya nagpurkaranna punayatlya chali-riti baghoon hot astey.

 10. Tumhi Dombivalikar asunahi swatala ‘mumbaikar’ mhanavata tar chitaleni tya mothya phalkutala card mhatla tar kaay zala 😉
  Dombivali Mumbai cha bhaag nahiye- geographically pan nahi ani culturally pan nahi.

 11. आम्ही स्वतःला डोंबिवलीकरच समजतो बाबा …. मुंबई बाहेरचे लोक मुंबईच्या आसपास असलेल्या सगळ्या शहरांना मुंबई मध्ये कोंबतात…;) …..
  खरंय मुंबई डोंबिवलीचा भाग नाहीये ते 😉 … ओह …. डोंबिवली मुंबईचा भाग नाहीये … कश्याच्याच बाबतीत .. पण सध्या एम् एम् आर् डी ए ली मुंबईचा भाग मानतात म्हणे.
  बाकी अनुविना वर आपले स्वागत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s