अनोखे रक्षाबंधन

image

दर महिन्याच्या पहिल्या शनिवारी माझ्या मुलीच्या विद्यानिकेतन शाळेत पालक सभेच्या निमिताने जाण्याचा योग येतो. एका चांगल्या आणि नावाजलेल्या शाळेत माझ्या मुलीला प्रवेश मिळाला आणि तिची शैक्षणिक प्रगती सुरु झाली. या शाळेच्या प्रवेश प्रक्रियेचे सगळे सोपस्कार पूर्ण करून ज्यांना प्रवेश मिळतो त्यांचे पालक कृतकृत्य होतात आणि ज्यांना मिळत नाही ते नेहेमी प्रमाणे त्यांच्या कार्यप्रणालीला नावे ठेवतात. विद्यानिकेतन शाळा तशी डोंबिवलीच्या गजबजाटापासून लांबच. येण्या जाण्यासाठी शाळेची व्यवस्था आहे पण ती केवळ विद्यार्थ्यांसाठी. बाकी पालकांना आपल्या येण्याची सोय स्वतःच करून घ्यावी लागते, स्वतःचे वाहन असेल तर उत्तम. शाळेचे आवार देखील सुंदर आणि निसर्गदत्त आहे. शाळेचे सर्वेसर्वा श्री. पंडित यांनी मोठ्या आत्मीयतेने आणि स्वकष्टाने हा परिसर समृद्ध केला आहे. वेगवेगळया रंगांची, प्रकारांची शोभिवंत झाडे परिसराचे सौंदर्य वाढवतात. आकाशाला स्पर्श करू पाहणाऱ्या उंच उंच वृक्षवल्लींन मधून झुलणारी एक वार्याची झुळूक देखील मनाला तजेला देते. प्रत्येक वर्गात पारंपारिक पद्धती बरोबरच संगणकाच्या माध्यमातून शिकवायची सोय असल्यामुळे आधुनिकते बाबत देखील ही शाळा मागे नसल्याचा प्रत्यय येतो. पालक सभेच्या निमित्ताने माझ्या  बालपणीच्या आठवणी ताज्या होतात आणि या धकाधकीच्या जीवनात काही क्षण विरंगुळ्याचे मिळतात. आणि एक जबाबदार वडील असल्याचे दर्शवल्यामुळे बायको पण खुश हा बोनस. 😉

सकाळी ८:३० वाजता आम्ही उभयता आमची दुचाकी घेउन शाळेत पोचलो. गेट वरच्या कर्मचाऱ्याने गाडी कुठे लावायची ते सांगितले. सगळा कडक शिस्तीचा मामला असल्याने गाडी त्याने सांगितली तशीच लावली आणि लगबगीने निघून गेलो. पालक सभा संपली आणि परत आम्ही आमचा मोर्चा दुचाकीच्या दिशेने वळवला. गादी काढणार तितक्यात समोरच्या झाडाकडे लक्ष गेलं. त्या झाडाच्या बुंध्याला असंख्य राख्या बांधल्या होत्या. रक्षाबंधनाला सुट्टी न देता हा सण अश्या वेगळ्या पद्धतीने आणि कल्पकतेने साजरा केला गेला याचं आश्चर्य पण वाटलं आणि आनंद पण वाटला. विद्यार्थ्यांमध्ये निसर्गा बद्दलची आस्था जागृत करणे, निसर्ग संवर्धनाची आवड निर्माण करणे, या साठी आपल्या संस्कृतीचा असा सुयोग्य उपयोग अभावानेच आढळतो. रक्षाबंधन आम्ही खूप वेगळ्या रीतीने साजरे केले हे मुलीचे वाक्य आठवले पण अश्या व्यापक दृष्टीकोन नसल्याने तो वेगळेपणा म्हणजे कदाचित मुला मुलींनी एकमेकांना राखी बांधणे (स्त्री – पुरुष समानतेची नांदी) इथ पासून ते फार फार शाळेच्या बस चालकांच्या किंवा शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना राखी बांधणे इथ पर्यंतच सिमित होता. रक्षाबंधनाच्या दिवशी मुंबईच्या लोकल ट्रेनच्या चालकांना बऱ्याच स्त्रियांनी राख्या बांधल्या ही बातमी ताजी होती म्हणून असेल कदाचित. नजरेत जी जी झाडे दिसतील त्या सगळ्या झाडांना बांधलेल्या राख्या बघून माझे विचार किती त्रोटक आणि खुजे आहेत याची जाणीव झाली. वृक्ष संवर्धनाचे नुसते पुस्तकी ज्ञान न देता ते प्रत्यक्षात कृतीत आणण्यासाठी या पेक्षा अधिक चांगली संधी आणि चांगला उपक्रम दुसरा कुठला असू शकेल?

खरं तर मला ही नाविन्यपूर्ण कल्पना थोडी विसंगत देखील वाटली. आज जर झाडांमध्ये चर स्वभाव असता तर त्यांनी दिसेल त्या मानवाला पकडून पाने, फुले, वेलींनी बनवलेली “इकोफ्रेंडली” राखी बांधली असती आणि रक्षण करण्यासाठी विनंती केली असती. पण मूलतः झाडांपासून आपणांस प्राणवायू मिळतो. अन्न वस्त्र निवारा या मुलभूत गरजा भागवण्यासाठी देखील मानवाला विविध रूपांमध्ये झाडांची गरज आहेच ना. पण असे उपक्रम नव्या पिढीला निसर्गाच्या सांनिध्यात न्यायला आणि त्यांना निसर्गाची गोडी लावण्यासाठी खूप उपयोगी पडतील.

झाडे लावा …झाडे जगवा.

7 thoughts on “अनोखे रक्षाबंधन

  1. वाह ! तुमची मुलगी खरोखर नशिबवान आहे. अतिशय वेगळा आणि अनुकरणीय असा उपक्रम आहे हा. आपल्या परवानगीशिवाय मी माझ्या फ़ेबु वॊलवर शेअर करतोय. क्षमस्व ! 🙂

  2. धन्यवाद कुलकर्णी साहेब,
    असे काही उपक्रम खरंच अनुकरणीय आहेत. घाई घाई मध्ये लिहिताना लेख थोडा त्रोटक झाला. जे चांगलं वाटलं ते दुसऱ्यांना देण्यात … शेअर करण्यात काहीच हरकत नाही …क्षमस्व वगैरे शब्द वापरून उगाच अवघडून टाकू नका.

  3. शेवटी संस्कृती म्हणजे बाजरीची भाकरी… वांग्याचे भरीत.. गणपतीबाप्पा मोरया ची मुक्त आरोळी. केळीच्या पानातली भाताची मूद आणी त्यावारचे वरण. उघड्या पायांनी तुडवलेला पंचगंगेचा काठ… मारूतीच्या देवळात एका दमात फोडलेल्या नारळातली उडालेले पाणी…दुस-याचा पाय चूकुन लागल्यावर देखील आपण प्रथम केलेला नमस्कार.. दिव्या दिव्यादिपत्कार… आजीने सांगितलेल्या भुतांच्या गोष्टी… मारुतीची न जळणारी आणि वाटेल तेव्हा लहानमोठी होणारी शेपटी… दस-याला वाटायची आपट्याची पाने… पंढरपुरचे धुळ आणि अबिर यांच्या समप्रमाणात मिसळून खाल्लेले डाळे आणि साखरफुटाणे… सिंहगडावर भरुन आलेली छाती आणी दिवंगत आप्त्यांच्या मुठभर अस्थींचा गंगार्पणाच्या वेळी झालेला स्पर्श…कुंभाराच्या चाकावर फिरणा-या गोळ्याला त्याचे पाण्याने भिजलेले नाजुक हात लागून घाटादार मडके घडावे तसा ह्या अद्र्श्य पण भावनेने भिजलेल्या हांतानी हा पिंड घडत असतो.कुणाला देशी मडक्याचा आकार येतो. कुणाला विदेशी कपबशीचा….{पु.ल. देशपांडे}पुण्य जयांच्या उजवाडाने फुलले अन परिमळले होजीवन त्यांना कळले हो…मी पण ज्यांचे पक्व फळापरी सहजपणे गळले होजीवन त्यांना कळले हो….

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s