शेजारधर्म : चाळीचा गणेशोत्सव ०१

केसरभाई चाळीचा हा शेवटचा गणेशोत्सव. अहो शेवटचा म्हणजे चाळीचा शेवटचा कारण पुढचा गणपती केसर हाइट्सच्या अलिशान इमारतीमध्ये बसणार होता. त्यामुळे जरा जास्तच महत्व आणि उत्साह होता चाळकरींमध्ये. सगळे समरसून कामास लागले होते. हिशेबाची जबाबदारी नाना कुलकर्ण्याने उचलली. तर सगळा उत्सव बिनबोभाट होण्याचे काम बाळू महाजानाने आपल्या लष्करी अखत्यारीत घेतले. बंडू केळकरने आपल्या या कमाईच्या दिवसात वेळात वेळ काढून पूजा आणि दिवाबत्तीची व्यवस्था केली. अप्पा ऐनवेळेला दगा देऊन कोकणात पळणार हे माहित असल्याने त्याला मोकळाच ठेवला होता. चाळीतल्या पोराटोरांना घेऊन मधुकाका वर्गणी मागत हिंडत होते. प्रत्येक छापील पावतीच्या मागे दरवर्षी प्रमाणे गणेशोत्सवातील कार्यक्रमाच्या रूपरेषे बरोबरच  मधू पवारच्या “स्नेकबार” ची जाहिरात केली होती याची चर्चा चाळीत उठायला वेळ लागला नाही.

————————————————————————————————————————————————————

श्रींच्या आगमनाची पूर्व-तयारी

सगळे कार्यकर्ते चर्चा करण्यासाठी चाळीच्या मोकळ्या जागेत जमलेत. चाळीतले ‘पांडव’ तर सगळ्यात पुढे. सगळी तयारी जवळजवळ झाली आहे. अप्पा डाव्या हातात पंढरपुरी घेऊन उजव्या हाताच्या तर्जनीने मळती चालू आहे. “आप्प्या थोडा मला पण दे रे” असं म्हणत बंडू जवळजवळ सगळाच तंबाखू चिमटीत घेतो. अर्थात त्याकडे अप्पाचे लक्ष नसते. अप्पा हातात किती ऐवज उरला आहे हे न बघताच सगळी उरलेली पूड तोंडात टाकतो आणि कचकावून एक शिवी घालतो “फोकलीच्या थोडं म्हणताच सगळाच घेतलंनी”
वस्ताद बंड्या हे नेहेमीच करत असला तरी अप्पा कधीही जास्तीचा तंबाखू माळत नाही. त्या निमित्ताने बंड्याला शिवी घालण्याचा चान्स मिळतो. आणि त्यांची शाब्दिक जुंपते.
“अरे इतका कंजूष आहेस? अश्या हज्जार पुड्या देईन तुला त्या पंढर्पुरीच्या. आधीच कणभर मळतोस…मग देतोस कशाला?” बंड्या अजून पेटवतो.
“नुसतेच बोल तू हज्जार पुड्यांबद्दल. पक्का भटुरडा तू. कडसरी तून पावली जरी पडली तरी १०० रुपये हरवल्याचा आव आणतोस. उद्या पासून बघ. भांडे जरी पसरलेस तरी चिमूट पण देणार नाही” अप्पाच्या मेंदूत तंबाखूची पूड घुसलेली होती.
बंड्याने हळूच स्वतःकडची एक पुडी काढली आणि अप्पाच्या तळव्यावर आपटली. “ही घे. ९५० राहिल्यात. हिशेब आहे माझ्या कडे” असं बंड्या म्हणताच, अप्पा गगनभेदी हास्य करून म्हणतो “बाकी मळण्याचे सोड पण चुना मात्र छान लावतोस” हे दोघेही एकाच मळीचे (माळेचे) असल्याने उर्वरित ३ जण यांच्याकडे दुर्लक्ष करतात.

“मध्या चहा सांग रे मस्त” नाना फर्मान सोडतो. “बिल खिशातून देणार का गणपतीला चिकटवणार?” असा प्रश्न मधुने विचारताच नाना गप्प.
“अरे कसले फाटे फोडत बसला आहात. गणपती आला वेशीवर आणि अजून यांची वर्गणी किती जमली आहे याचा पत्ता नाही. त्या शिवाय कसं काय नियोजन करणार? मंडप, विजेची रोषणाई, पूजेचा खर्च सगळे नीट व्हायला हवे नाही का? गणपतीच्या मूर्तीचे काय? इको-फ्रेंडली वगैरे काही भानगड आहे क्का? केसरभाई आणि तो सरदेशमुख बिल्डर येणार होता त्याचे काय झाले? स्थापना कुठे करायची?” बाळू महाजन प्रश्नांच्या नुसत्या फैरी झाडत होता. “इतक्या गोष्टी करायच्या राहिल्यात आणि याना चहा, तंबाखू सुचतोय. यांना सीमेवर पाठवा … या पैकी काहीच मिळणार नाही तेंव्हा कळेल”

आता या पुढचे संभाषण लष्कराच्या तैनातीत जाणार हे सगळे जाणून होते म्हणून नान्या एका पोराला म्हणाला “जा रे ती भरलेली पावती पुस्तके घेऊन ये. यंदाचा गणपती झोकात बसेल इतकी माया तरी जमली आहे आपल्या कडे.” हातात एक रजिस्टर आणि पावती पुस्तकांचे बंडल बघून नाना म्हणाला “साधारण ७ हजार इतकी वर्गणी जमली आहे. आता केसरभाई आणि बिल्डर या गंगाजळीत काय ओततात ते बघू”

मध्याचा व्यापारी जागा झाला “अरे यात तर सगळा बाकीचा अवांतर खर्च निघून जाईल. पण बाप्पाची मूर्ती कशी बसवणार?”
“वेडा का खुळा तू मध्या? अरे कशी बसवणार काय? मंडपात …. स्टेज वर बसवू” अर्धवट ऐकून अप्पा म्हणाला.
मध्या वैतागला “अरे कशी बसवणार म्हणजे मूर्ती आणायलाच पैसा उरलेला नाही”
अप्पा हताश “अरे रामा. हे मोठंच त्रांगडं झालं की. आपण असं करू केसरभाईला आणि बिल्डलाच मूर्ती द्यायला सांगू. कशी वाटते आयडिया?” सगळ्यांनी माना डोलावल्या आणि त्यांना पटवायचे काम बंडू केळकर वर टाकले. आणि केसरभाईआणि बिल्डर येताच बंडू मागल्या पावलाने पळून जाऊ नये म्हणून बाळू महाजन त्याच्या मांडीला मांडी लावून बसला.
“मध्या, हे तू बरोबर नाही केलेंस. पावतीच्या मागे तुझी एकोळी जाहिरात कश्या पायी? उगीच गिचमिड करून टाकलीस” बाळू महाजन कडकडला.
“अरे थोडी जागा होती ….म्हटलं देऊ टाकून एक ओळ स्नेकबार बद्दल. आणि एवढ्या कशाला हव्यात मिर्च्या झोंबायला? एका वडापाव बरोबर दोन वडापावची लसून चटणी लाटतोस त्याचे काय?” मधू पवारचा हल्ला.
“अरे माझं म्हणणं इतकंच की जरा कार्यकारणी च्या कानावर तरी घालायचेस” बंड्याची शरणागती.
आयती संधी साधली नाही तर तो नाना कसला? “बरं चल मग आता निदान चहा तरी पाज” नान्याने आपला चहाचा धोशा चालू ठेवला.
“अरे सख्या १०-१२ चहा घेऊन ये रे. या नान्याचा घसा ओला झाल्याशिवाय चैन नाही पडणार” मधू ने चहा आणायला सांगितले.

चाळीच्या दरवाज्याशी गाडी येऊन थांबली. केसरभाई बिल्डरला घेऊन आले होते. चाळीच्या बोळातून दोघे पुढे येताच मंडळींमधली कुजबुज थांबली. “कसा काय चाललाय गणपतीच्या तयारी?” केसरभाई मोडक्यातोडक्या मराठीत बोलला. “चालू आहे हळू हळू” सगळे एकसुरात म्हणाले. “वर्गनी वगेरा शगळा जमला का नाय? नाना कुनी दिला नाय तर मला सांग. मी बघते तेच्या कडे” “सगळ्यांनी दिली वर्गणी पण तरी जरा प्रॉब्लेम आहे” खजिनदार नाना वदला.
“अरे नाना, कशाला घाबरते. हा बिल्डर हे ना ते देईल वरचा काय पायजेल ते” केसरभाईने बाण सोडला आणि बिल्डर भकास झाला.
“तरी एक ५-१० हजार लागतील अजून” नाना ने उगीच पुडी सोडली आणि बंडू चळवळ करू लागला. “अरे मी बोलणार आहे ना मग हा नान्या कशाला आपली अक्कल पाजळतोय?” असे हळूच बाळ्याला म्हणाला. बाळ्याने त्याचा हात दाबत थांबायला सांगितले.
“नाही हो इतकी वर्गणी नाही जमणार. बऱ्याच ठिकाणी वर्गणी द्यावी लागते. केसरशेठला माहित आहे आमचा किती पसारा आहे ते” सरदेशमुख शक्य तितके हताश भाव चेहेऱ्या वर आणून बोलला.
आता बंड्या सरसावला. “हे बघा सरदेशमुख साहेब. हा या चाळीचा शेवटचा गणपती. आणि यानंतर आपणच ताबा घेणार. आम्ही काय दरवर्षी येणार नाही आपल्या दारी. बरं तुम्ही एक करा रोख वर्गणी देऊ नका. तुमच्या नावे गणपतीची मूर्ती द्या. बाकीचे आम्ही सांभाळतो. असे मूर्तीचे दान तुम्हांला खूप बरकत देईल. आता काहीच दिवस राहिलेत तर उगाच चाळकरी नाराज नको व्हायला नाही का? काय हो पटतंय ना माझं म्हणणे?” सगळे एका सुरात “हो”.

बंडू केळकर गणपतीला लाभला आणि हो ना करता करता किंवा चाळकरी नाराज होऊ नये म्हणून सरदेशमुख गणपतीची मूर्ती द्यायला तयार झाला. तितक्यात सख्या चहा घेऊन आला आणि नाना परत एकदा टवटवीत झाला.

(क्रमशः)

2 thoughts on “शेजारधर्म : चाळीचा गणेशोत्सव ०१

    • कोंकणी माणूस आणि तंबाखू -बिडी नाही असं कसं शक्य आहे. खरं तर एक प्रकारची “साधना”च ती …. व्यसनी व्यसनी म्हणून ओरडणाऱ्याना त्याची लज्जत नाही कळणार. 😉

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s