शेजारधर्म : चाळीचा गणेशोत्सव ०२

बंडू केळकरची शिष्टाई फळाला आली आणि सरदेशमुख गणपतीची मूर्ती द्यायला तयार झाला. सगळा ताळेबंद कागदावर तरी ठीक वाटत होता. बरेच खर्च होते जे नानाला सांभाळायचे होते. त्या खर्चात महत्वाचा चहा, अप्पाचा तंबाखू आणि मधूची सिगारेट. लायटिंग, मंडपाचे अप्पा बघणार होता. पूजाअर्चा या साठी चाळीतले बंडू केळकर गुरुजी होतेच. आणि या सगळ्यांवर करडी नजर ठेवण्यासाठी कर्नल बाळू महाजन होते.

मागील भाग:
शेजारधर्म : चाळीचा गणेशोत्सव ०१

———————————————————————————————————————————————————–

मंडप बांधणी

“अरे हा बंड्या कुठे गेला? तरी सांगितलं होतं अप्पाचा मंडप वाला येणार आहे. तो कसा लावायचा आणि त्याची ती दिशेची भानगड त्यालाच ठावूक.” नाना चहाचा घुटका घेत मधूला विचारात होते.
“काय ब्वा … गेला असेल कुठे तरी आचमनं टाकायला शेंडी उडवत. त्यांका काय दक्षिणा मिळाली की चालला भट. हो तो असलाच पाहिजे नाहीतर मागल्या खेपेस सगळं स्टेजच चेंज करायला लावलानीत …म्हणे काय तर दक्षिणेकडे सोंड येईल.” एक दमदार झुरका घेत मधू वदला.
“तू पण चक्रमच …. सोंड नाही रे तोंड … गणपतीचे तोंड हे पूर्वेस पाहिजे असं त्याचा हट्ट होता. तरी बरे याचे दरवाजे दक्षिणेकडेच उघडतात.” इति बाळू महाजन.

अजून एक ५ मिनिटे वाट बघू आणि अप्पा आला की चालू करू अश्या युक्तिवादावर ते तिघे थांबले. तोंडाची टकळी थांबली तर तो मधू कसला. “५ दिवसच बसवायचा ना? का अजून कुणाच्या काही इच्छा, नवस वगैरे असतील तर आधीच सांगाया हवं?”
“अरे नवस वगैरे असायला हा काय लालबागचा राजा आहे? ५ दिवसच स्थापना करायची. अजून ५ हजार देतोस का? ७ दिवसाचा करू. आणि तुझा तेवढाच धंदा होईल. बायकोने व्यवसायात लक्ष घातले म्हणून इतका हुशार झालास. नाहीतर तुझा वड्यांचा हिशोब पावांना लागला नाही कधी. ते काही नाही गणपतीचे ५व्या दिवशी विसर्जन करायचे. आणि ते सुद्धा संध्याकाळी ८ च्या आत …पारंपारिक वाद्यांच्या गजरात. कुणी नाही मिळाले किंवा या नान्याने पैसे रिचवले तर नुसते टाळ कुटीत जाऊ.” बाळूने शिस्तीचा बडगा दाखवला.
“बाळ्या उगाच कायपण बरळू नको. मी काय राजकारणी नाही गणपती फंडाचे पैसे गिळायला. सगळा हिशेब क्लियर आहे. कायपन ऐकून नाही घेणार. नाहीतर आज पासून हे पण तूच सांभाळ.” नाना भडकला
“अरे मध्या, नानाच्या चहाचे किती झाले ते बघून सांग रे. हा हा हा … फुकटच्या गमज्या करतोय” बाळ्याने अजून ताणलं.
“यांच्या वडापाव, भाजी, नाश्ता, विडी काडी सगळ्याचेच सांग रे माध्या …. माझ्या एकट्यावरच कशापायी खापर फोडून घ्यायचे?” नानाने बाळ्याच्या आवाजावर आवाज चढवून विचारले.

अप्पा चार पाच गडी, मंडपाचे समान, लायटिंगचे समान घेऊन चाळीत हजर झाला. “काय रे चो***नो, गणपती आला वेशीवर आणि भांडताय कसले? तो बंड्या कुठे उलथलाय? ही माणसे जास्त वेळ थांबाची नाय. यांची लवकर मोकळीक करायला हवी. बरीच कामं आहेत त्यांका” अप्पा तंबाखू चोळत म्हणाला. “या बंड्याला पण ना वेळेचं बंधन नाय. पूजा सांगायला जातो आणि तिथेच रमतो.” असं बोलत त्याने मधूला पण हाकाटी केली.
“काय रे माझ्या बद्दल काय चुगल्या चालू होत्या? पूजा करायला जातो म्हणजे काय मजा मारायला नाही. अरे चार मंत्र म्हणून दाखवा नाही जिभेला गाठ पडली तर कळेल. साधे वक्रतुंड महाकाय नाही धड म्हणता येतंय. कसली बोंबाबोंब चालू होती?” अप्पा कडे तंबाखू मागत बंड्या म्हणाला.
अप्पाने तंबाखूची पुडी बंड्याच्या हातात टेकवत म्हणाला “अरे काही नाही रे. स्टेज लावायचं होतं .. कारागीर आले आहेत. त्यांना दुसरी कडे जायचंय. तू पटकन कुठे स्टेज लावायचं ते सांग. म्हणजे यांची तोंडे बंद होतील.”

बंडू चाळीतील मध्यवर्ती असलेल्या मोकळ्या जागेत फिरला आणि एका कोपऱ्याकडे बोट दाखवून म्हणाला “इथे घाला मांडव”.
“इथे????” नाना किंचाळलाच, “वा रे पंडित, अरे मागील खेपेस हा कोपरा दक्षिण येते म्हणून नाही म्हणालास. आणि या वर्षी इथे घालायला सांगतोस? दिशा फिरल्या की काय तुझ्या? दर वर्षी आळीपाळीने पूर्व बदलते की काय?” दिशेचा हा वाद दाहीदिशा उधळणार या अपेक्षेने समस्त चाळकरी आपापल्या वरांड्यात जमा झाले. काहीतरी गोंधळ झाल्याचे लक्षात येऊन बंडू म्हणाला “इतके वस्कायला काय झाले? थांब जरा होकायंत्र नव्हते ना जवळ. ते घेऊन येतो आणि मग सांगतो नाना तुला. थांबच तू”. बंड्या तरातरा वर निघून गेला. सगळ्यांच्या नजरा बंड्याकडे लागल्या असताना बाळू महाजन मात्र आकाशात बघून मनातल्या मनात काहीतरी आडाखे बांधत होता.

बंडूने डोळ्यासमोर होकायांत्राचा लोलक धरला. त्याचे होकायंत्र भलतीच दिशा दाखवत होते. अप्पा म्हणाला “मला वाटलेच तुझ्यासारखेच तुझे होकायंत्र पण कामाचे नाय.” एक हात डोक्यावर आणि एक हात कमरेवर ठेऊन बाळ्या अजूनही आकाशातच बघत होता. “आता याला काय झालें आकाशात बघायला? इतका तल्लीन होऊन बघतोय …रंभा नाच्त्येय की काय?” आधीच वैतागलेल्या अप्पाने परत तोंड चालवले. “तुम्ही सगळे उगाच त्या बंड्याच्या नादाला लागलात. ती बघा पश्चिम दिशा.” कलत्या सूर्याकडे बोट दाखवत बाळू म्हणाला. जमलेले समस्त चाळकरी अस्ताला जाणाऱ्या सुर्याला कधी बघितले नव्हते अश्या अविर्भावात बाळूच्या तर्जनी कडे बघत होते. “आता ही पश्चिम तर त्याच्या समोरची पूर्व. काय बरोब्बर की नाही बंडूभट्ट?” अश्यारीतीने बाल्याने दाखवलेल्या पश्चिमेकडे पाठ करून पूर्वाभिमुख मंडप उभा राहिला. लायटिंग चे काम पण झोकात केलं अप्पाने.

मंडप बांधणी आणि लायटिंग चे काम रात्री उशिरा पर्यंत चालू होते. ते बघून स्टेजवरच पत्त्यांचा डाव रंगला होता. दुसऱ्या दिवशी चाळीतल्या पोरांनी आणि बाळूने सजावटीचे काम हाती घेतले. बाळू ने आधीच निक्षून सांगितले होते की जास्त फापट पसारा करायचा नाही. थर्माकोल वापरायचा नाही, सगळे कसें इकोफ्रेंडली झाले पाहिजे. “इकोफ्रेंडली म्हणजे काय काका?” छोट्या सचिन ने आपले कुतूहल मोकळे केले. आणि आता हा कर्नल काय सांगणार याच्या कडे सगळ्यांचे कान लागले. “अरे इकोफ्रेंडली म्हणजे अश्या वस्तू की ज्यांच्या वापराने या निसर्गाची हानी होत नाही. पीओपी, थर्माकोल ई. गोष्टींनी पर्यावरणाची हानी होते. पीओपीच्या ऐवजी शाडूच्या मातीची मूर्ती वापरावी जी पाण्यात विरघळते. सजावटी साठी फुले वापरावी. गुलाल वगैरे रंग टाळावेत. इतकेच काय मोठमोठ्यांनी वाजणारे ढोल ताशे पण वापरू नये त्यांनी ध्वनिप्रदूषण होते. देवाची, सणाची, उत्सवाची विटंबना होऊ नये असे सात्विक वर्तन असावे.” बाळू तल्लीन होऊन प्रवचन करत होता. तितक्यात सचिनने दणका दिला “मग काका ते रात्री सगळे पैसे लावून पत्ते खेळतात ते जागरण सात्विक असतं का?” बाळू जरा चरकला पण अश्या कोड्यातल्या प्रश्नाची लष्करी सवय असल्यामुळे या प्रश्नाला यशस्वी पणे बगल दिली. सचिनच्या कुल्यावर चापटी मारत म्हणाला “पोरांनो पळा. ज्यांच्या ज्यांच्या घरी शोभेच्या झाडांच्या कुंड्या असतील त्या घेऊन या …. आणि हो झाडांसकट घेऊन या नाहीतर झाडे टाकाल उपटून आणि नुसत्या कुंड्या घेऊन याल.” झालं एका आज्ञेसरशी सगळी वानरसेना पळाली आणि दिसेल तिथून शोभेची झाडं घेऊन आली. काहींनी हसत खेळत दिली तर काहींनी “उत्सव संपला की परत आणून द्या” अशी तंबी देऊन दिली. बघता बघता ३०-३५ कुंड्या जमा झाल्या.

बाळ्याने मधोमध टेबल लावले. स्टेजला आतून एक मोठं देखावा असलेलं कापड लावलं. आणि टेबलाभोवती छान कुंड्या रचल्या आणि कुंड्यांच्या भोवताली कापड लावून त्या दिसणार नाहीत याची तजवीज केली. एकदम मस्त असा जंगलाचा फील आला होता. अजून गणपती बसवायला २ दिवस असल्याने झाडांना पाणी घालायची जबाबदारी पोरांवर टाकली. ही सगळी सजावट मंडळी खाली उतरली आणि मंडपाचे अवलोकन करत असतानाच पाठी मागून टाळ्यांचा आवाज आला. सजावट उत्तम झाल्याची जणू पावतीच मिळाली. नाना, अप्पा, मधू, बंड्या यांच्या सोबत अजून दोन चार चाळकरी या सगळ्यांनी डेकोरेशन मस्त झालय असं सांगितल्याने सगळ्या वानरसेनेने एकच गलका केला.

“बाळ्या हे बरे झाले तू सजावट केलीस ते. मागच्या वर्षी मधुने सजावट केली होती त्यावेळी गणपती समोर फक्त एका माणसालाच उभे राहता यायचे. त्यामुळे पूजा करायला नाना स्टेजवर आणि त्याची बायको खाली. आणि मी पण खालूनच बोंबलून पूजा सांगितली. पुजेला बायको बसली की ती अर्धे पुण्य मिळवण्यासाठी नवऱ्याच्या हाताला हात लावते पण मग मी तिला स्टेजलाच हात लावायला सांगितला.” बंड्या ने खडा टाकला. “या वर्षी केली ना सोय सगळ्यांनी खांद्याला खांदे लावून उभे राहायची. झाले तर मग. उगाच खाजवून खरुज काढू नकोस बंड्या. पूजा नीट कर म्हणजे झाले. म्हणे मागच्या वर्षी पत्री तशीच होती टोपलीत ५ दिवस” मधू असले चान्स सोडत नाही.. “ती काय पत्री असते??? नुसतं गवत, पालापाचोळा आणता विकत आणि वाहता पत्री म्हणून गणपतीला”   आता यांची जुंपणार हे कॉर्नरच्या इस्त्रीवाल्या भैय्याने पण सांगितले असते. त्यांचा वाद-भेद करत बाळ्या म्हणाला “या वर्षी मधू पूजा करणार आहे ना? मग मध्या काय बिड्या फुकायच्या आहेत त्या आधीच फुकून घे. पूजा चालू असताना कुठे पळता येणार नाही. मूर्ती ३ फुटी तरी आहे आणि शाडूची आहे. मध्याला काही पेलवणार नाही. हातगाडी बघावी लागेल”. “हातगाडी वगैरे काय पण नको मी सगळी प्रोविजन केलेली आहे. अरे तो सुशील आहे ना त्याने मागच्या महिन्यातच नवा ३ चाकी टेम्पो घेतलाय तो येणार आहे आपल्या बरोबर गणपती आणायला आणि विसर्जनाला पण. आपल्या हिशोबात पण बसतंय. उद्या संध्याकाळी ७ ची वेळ सांगितली आहे. तो आला की निघू गणपती आणायला. पोरांनो झांजा, लेझीम तयार ठेवा. अंतर जास्त नसले तरी वाजत गाजत आणला पाहिजे बाप्पाला.” नानाने खुलासा केला. आणि सगळे घरी जायला निघणार तितक्यात चाळीच्या गेटातून केसरभाई वजन सांभाळत आत आला. “अरे वा एकदम चांगला झाला आहे डेकोरेसन. कुनी केला?” असं विचारताच सगळ्या बच्चे कंपनीने परत गलका केला. “अरे बालाभाई तुम्ही जो गणपतीच्या मूर्ती सिलेक्ट केला होता त्याचा पैसा बिल्डरनी दिला हाय. गणपती आणायच्या वेळी सांगा मी पण येते तुमच्या संगती. या वर्षी चाळीचा शेवटचा उत्सव. काय रोकडा कमी पडला तरी पण बोल.” शेटजी नेहेमीप्रमाणे आश्वासन देऊन निघून गेला. “आता बोलायला काय? रोकडा पाहिजे तर बोल म्हणतोय. मागच्या वर्षी सुद्धा असंच येऊन गेला आणि म्हणाला गणपती आणायला मी पण येते तुमच्या संगती पण हा पठ्ठा गायब. दर्शनाला पण ५व्या शेवटच्या दिवशी उभ्या उभ्या येऊन गेला. गेली कित्येक वर्षे अशीच पणे पुसतोय तो आपल्याला. असो. तर उद्या सगळ्यांनी संध्याकाळी ७ वाजता श्रींच्या आगमनासाठी इथे जमायचे आहे” बाळ्याने दवंडी पिटली. सगळे जण पांगले आणि उरले ते फक्त ५ जण, चाळीचे आधारस्तंभ. आता यांच्या गप्पा जुन्या आठवणींमध्ये रमणार आणि इथेच मध्यरात्र होणार हे निश्चित.

(क्रमशः)

8 thoughts on “शेजारधर्म : चाळीचा गणेशोत्सव ०२

Leave a reply to nitin sant उत्तर रद्द करा.