शेजारधर्म : चाळीचा गणेशोत्सव ०३

शेवटी मंडपाची जागा निश्चित झाली आणि मंडप उभा राहिला. अप्पाने लायटिंग पूर्ण केले तर बाळू आणि बच्चे कंपनीने मंडपाची उत्तम सजावट केली. गणपतीची पूजा कोणी करायची हे पण निश्चित झाले. केसरभाई हजेरी लावून गेला आणि गणपती आणायला तो पण येणार असे आश्वासन देऊन गेला.

मागील भाग:
शेजारधर्म : चाळीचा गणेशोत्सव ०१
शेजारधर्म : चाळीचा गणेशोत्सव ०२

—————————————————————————————————————————————————————-

श्रींचे आगमन

संध्याकाळचे ६:३० वाजले. बाळ्या स्टेज जवळ दाखल झाला आणि त्याच्या पाठोपाठ बच्चे कंपनी देखील हातातली कामे टाकून आली. नेहेमी बाळ्याला वचकून असणारी पोरं गणपतीचा मोहोल असल्याने जरा बिनधास्त होती. झाडांना पाणी घातले का रे? असं विचारताच सगळ्यांनी “हो” चा टाहो फोडला. पण स्टेज च्या खाली पाणी साचलेले बघून बाळ्याने सैनिकी खाक्या दाखवलाच आणि किती पाणी घालायचे हे पण दाखवून दिले. ६:४५ वाजले तरी कोणी खाली उतरत नाही हे बघून खालूनच तो हाका मारायला लागला. “नाना, बंड्या, मधू, अप्पा कुठे आहात सगळे?” बाळूने बिगुल वाजवताच एक एक करून हजर झाले. पंधरा झब्बा, लेंगा वर गांधी टोपी या अवतारात अप्पाला बघताच बंड्या म्हणाला “रस वाला शोभतोस.” मधू गल्ल्याची व्यवस्था लावून धावतच आला. पोरं झांजा लेझीम घेऊन सज्ज झाले. “काय रे नाना तुझा टेम्पोवाला म्हणे अजून भाडी मारतोय. वेळेत यायचे सोडून बसला असेल चकाट्या पीटत चौकात. त्याला आठवण केली आहेस ना? पैश्याचे बोलणे झाले आहे ना नाहीतर त्याला ‘चकटफू’ मामला वाटायचा खरे तर कोपऱ्या वरच जायचेय तो तिथेच असेल तर कळव त्याला तिथेच थांबायला.” अप्पाने गुलाल उधळला. नाना ने सुशीलला फोन लावला “बर बर … पोचतोच” असे म्हणत फोन बंद केला. “वाटलेच होते हा चक्रधारी उभा असेल तिथेच कारखान्याजवळ. पण आम्हांला सांगायला नको आम्ही आपली वाट बघतोय याच्या चार चाकांची. जाताना रिकामीच जाणार ना मग झाली असती सोय म्हाताऱ्यांची” अप्पा बाळू कडे बघत म्हणाला. बाळूने अप्पाकडे दुर्लक्ष केलं. “तो दुपार पासूनच तिथे आहे. आत्ता पर्यंत २ गणपती सोडून आलाय. त्याचा धंदाच आहे तो. आपल्यालाच तिकडे जायचे आहे. चला रे पोरांनो” नाना ने खुलासा केला.

चाळीतून बाहेर पडताच समोरून धपा टाकत केसरभाई येताना दिसला. जरा ओळखणे कठीणच होते कारण नेहेमी शर्ट विजारीत असणारा केसरशेठ आज चक्क टिपिकल गुजराथी धोती, कुडता आणि टोपीत आला होता. एकटाच नाही तर बरोबर बेंडबाजा, ढोल, ताशे आणि एक मस्त सजवलेला छोटा टेम्पो. आल्या आल्या सगळ्यांना गुलाल फसला आणि बाळ्याचा “इकोफ्रेंडली गणेशोत्सवाचा” बोऱ्या वाजला. पण मुलं खुश होती आता नाचायला मिळणार. केसरभाई ओरडला “वाजवा रे वाजवा” आणि पडत्या फळाची आज्ञा समजून वाजंत्री वाल्यांनी बडवायला सुरुवात केली. “बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे चरणी ठेवितो माथा”. बाळू नाराज आहे असे बघून केसरभाई त्याच्या जवळ गेला आणि त्याच्या खांद्यावर हात ठेऊन म्हणाला “बालूशेठ, मला माहिते तुमाला नाय आवडला हे सगळा. पण चाळीचा हा शेवटचा गणपती. करूनदे सगळ्यांना मजा. तुमीबि थोडा नाचून घे. काळजी करू नको ते वाजवणारे हायेत ना ते शीला, चमेली आणि तुमचा तो जवानी बिवानी वगेरा नाय वाजवनार. त्यांना गणपतीचा गानाच वाजवायला सांगितला आहे. एकदम स्ट्रीक वार्निंग”. बाळूपण दिलदार पणे म्हणाला “बरं ठीक आहे. या वर्षी तुम्ही म्हणाल तसं करू” बाळ्याच्या वागण्याचे बाकी कुणाला नाही पण नान्याला आश्चर्य वाटले ‘हा कर्नल इतका मवाळ आणि व्यवहारी कसा झाला?’

रिकामा टेम्पो, ढोल ताश्याच्या तालावर नाचणारी पोरं सगळ्यांच्या मधे केसरभाई, अप्पा आणि मधू चा नृत्याविष्कार रस्त्यावरील लोकांसाठी प्रेक्षणीय होता. बाळू सगळ्यांकडे लक्ष ठेऊन, नाचता नाचता रस्त्याच्या मधे येणाऱ्याला आत रेटण्याचे काम करत होता. बंडू आणि नाना टेम्पो बरोबर चालत होते तर इतर स्त्रिया त्यांच्या मागून. केसरभाई अफू लावून आला असल्याची शंका नानाने बोलून दाखवली आणि बंड्याने त्याला दुजोरा दिला. अशीही बिना गणपतीची मिरवणूक मजल दर मजल करत गणपतीच्या कलाकेंद्राजवळ जवळ जवळ ३० मिनिटांच्या रस्त्यातील सांस्कृतिक कार्यक्रमानंतर पोचली. सगळ्यांनी “गणपती बाप्पा मोरया” चा एकच जल्लोष केला. केसरभाई अप्पा आणि मधू गुलालमय झाले होते. कपाळावरचा घाम गुलबट झालेल्या टोपीने पुसत केसरभाई म्हणाला “लई मज्जा आली. आज बरेच दिवसांनी नाचला. तुमी दोगेबी भारी नाचते. आमच्या गरब्यात अशी मज्जा नाय. राउंड करा आणि त्याच्या मंदीच नाचा. हे मंजे एकदम मस्त … साला कसा पण नाचा ना कोण बगते.” बाळ्याने कपाळावर हात मारून घेतला. आपल्या चाळीचा हा सगळा लवाजमा बघून चक्रधारी सुशील उदास झाला. “एवढं असतं तर सांगायचं ना. मी अजून भाडी मारली असती.” त्याने आपली नाराजी उघड व्यक्त केली. नाना ने त्याला बाजूला घेतला आणि समजावलं “अरे आयत्यावेळी शेठनी घोटाळा केला. आम्हांला सांगितलंच नाही की ते टेम्पो आणणार आहेत. तुझे काय पैसे असतील ते देऊ”. “बस का नाना काका, मी काय चाळी कडून पैसे घेणार होतो. हा आपलाच गणपती.” असे म्हणत सुशील ने मोबाईल काढला आणि कुणालातरी त्याचे काम झाले आहे आणि तो येतोय असे सांगून भाडे ठरवले आणि नानांना हातानेच “मी कटतो” असे सांगितले आणि गर्दी मध्ये निघून गेला. नानाचं एक टेन्शन कमी झालं होतं आता दोन दोन टेम्पोचे पैसे द्यावे लागणार नव्हते.

“रिशीट?” टेबला पलीकडील कालाकेंद्राच्या माणसाने विचारले. नानाने पावती देताच त्याने एकदा पावती कडे बघितले आणि एकदा नाना कडे. “केसारचाल मित्र मंडल? ५ फुटी आहे ना? तिथून पलीकडून घ्या. इथे सगळे छोटे घरगुती गणपती मिळतात. गाडी आहे का हातगाडी? यांची झाली की तुमची लावा” असं म्हणून त्याने आत ओरडून सांगितले “केसरचे आलेत रे, गाडीत चढवून द्या” नाना पावती घेऊन बाजूला गेला. मोठे गणपती जिथे देतात तिथे गाडी उभी केली. तिथे परत पावती दाखवण्याचे सोपस्कार झाले “केसरभाई ला काढ रे. कार्यकर्ते जास्त दिसत नाहीत … आपल्यालाच चढवावा लागेल” कारखान्यातील ४-५ जणांनी मिळून गणपती टेम्पोवर चढवला. सगळ्यांनी एकदा बाप्पाचा घोष केला. केसरभाईने मदतनिसांच्या हातात १००-१०० च्या नोटा सारल्या. प्रत्येक नोटेसरशी नानाचे डोळे मोठे होत होते. हा सगळा खर्च केसरभाई ने मागितला तर ५ दिवसाच्या गणपतीचे दीड दिवसातच विसर्जन करावे लागेल अशी चिंता लागून राहिली होती.

गणपतीला घेऊन केसरभाई चाळ मित्र मंडळाच्या श्रींची मिरवणूक वाजत गाजत नाचत बागडत (केसरभाई ज्या पद्धतीने नाचत होता त्याला नाचणे या पेक्षा बागडणे म्हणणंच जास्त सयुक्तिक ठरेल) चाळीच्या दरवाज्यापाशी पोचली. आणि बघतो तर काय साक्षात मालकीण औक्षण करायला हजर होत्या. केसरभाईंचा परिवार देखील आला होता. पत्नी, २ मुलगे आणि एक मुलगी गणपतीच्या स्वागता साठी चाळीत जमले होते. सगळ्यांनी मिळून गणपतीला व्यवस्थित स्थानापन्न केले. परत एकदा बाप्पाचा जयजयकार झाला. सगळ्यांना फुटाणे खडीसाखर वाटण्यात आली. नानाने सगळ्यांसाठी चहा मागवला. केसरभाईना विचारले त्यांचे कुटुंब काय घेणार त्यावर केसरभाई म्हणाला “अरे जे तुमी घेनार तेच अमी. आता मी पण तुमच्या सारखाच. आता केसरभाई ओनर नाय ही चाळ जवा बिल्डरला विकला तेंव्हाच ओनरशिप संपली. आता पाच दिवस मी पण तुमच्या सारखाच इथे येऊन गणपतीची पूजा करणार. सत्यनारायण वगैर महापूजा ठेवली का नाय?” बंडू लगेच म्हणाला “हो हो आहे ना तिसऱ्या दिवशी आहे. शेठ तुम्ही आणि भाभींनी करा पूजा.” नानाच्या पोटात गोळा येत होता. हे सगळे खर्च कसें सांभाळायचे याची चिंता सतावत होती. “गणराया या विघ्नाचे हरण कर रे बाबा” चहाच्या घोटागणिक नानाची प्रार्थना चालू होती.

“भाद्रपद गणेशचतुर्थीला सकाळी ११ वाजता गणपतीची पूजा होईल. सगळ्यांनी सहकुटुंब सहपरिवार उपस्थित रहावे” अशी सूचना नानाने देताच सगळे जण निघून गेले. केसरभाई आपल्या कुटुंबकबिला घेऊन “उद्या सकाडी येते” असं म्हणत निघून गेला. मंडपात राहिले ते नेहेमीचे ५ जण. नानाने आपली खर्चाची बाब बोलून दाखवली. त्याकडे इतरांनी विशेष लक्ष दिले नाही “बघू काय होतंय ते” असं मोघम उत्तर दिले. सवयी प्रमाणे मधू ने बिडी शिलगवताच बाळूने कचकावून एक शिवी हाणली आणि सगळे मंडपातून बाहेर आले. केसरभाई आणि परिवार येणं हे जणू जगातलं आठवं आश्चर्य असल्याप्रमाणे त्यावर चर्चा रंगात आली.

(क्रमशः)

6 thoughts on “शेजारधर्म : चाळीचा गणेशोत्सव ०३

    • नमस्कार दत्ता जोशी साहेब,
      आपल्या सारख्या व्यासंगी व्यक्तीने दिलेला अभिप्राय म्हणजेच लेखन चांगले होत आहे याची पावती आहे. धन्यवाद. अशीच भेट देत रहा आणि वेळ प्रसंगी मार्गदर्शन पण करत रहा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s