कृत्य कुणाचे, “खाप”र कुणावर?

भारताच्या सारख्या प्रजासत्ताक राष्ट्रात अजूनही बऱ्याच राज्यांमध्ये विशेषतः ग्रामीण भागात स्त्रीला अतिशय हीन दर्जाची वागणूक मिळते हे खरंच दुर्दैव म्हणावे लागेल. एकीकडे दुर्गा, कालीमाता, लक्ष्मी इ. देवी रूपांची पूजा करायची आणि दुसरी कडे स्त्रियांची विटंबना … हे कुठल्या शास्त्रात बसतं? नातेसंबंधांमध्ये ज्या प्रमाणे एखाद्या पुरुषाची रूपे आहेत तितकेच किंबहुना भावनिक दृष्ट्या जास्त महत्वाचे पैलू स्त्री रुपाला आहेत. अगदी कुठल्याही पुरुषासाठी जन्म देण्यापासून ते शय्यासोबत करायला देखील स्त्रीच असते. ज्या स्त्रीला हिंदू संस्कृतीने देवता रूप दिलं तिच्यावर आज अनन्वित अत्याचार होतात. नामशेष होणाऱ्या प्रजातीला वाचवण्या साठी ज्या प्रमाणे आवाहन केलं जातं त्याच सुरात “मुलगी वाचवा” असे ओरडून सांगावे लागते? जनावराचा “माणूस” व्हायला खूप काळ जावा लागला पण सद्य परिस्थिती वरून असे वाटते की उलटी गणती चालू झाली असावी …. त्यामुळे माणसांमध्ये “जनावरे” वाढायला लागली आहेत.

हरियाणा (नावात “हरी” …बाकी सगळं शिव शिव) या सार्वभौम भारताच्या एका राज्यात गेल्या एका महिन्यात १५ बलात्काराच्या घटना घडल्या. त्यात बहुतांश घटना या सामुहिक बलात्काराच्या होत्या. ज्या प्रमाणे ४-५ जनावरे श्वापादावर तुटून पडतात त्या प्रमाणे पिडीत स्त्रियांच्या मनाचे आणि शरीराचे लचके तोडले गेले. पोलिसांनी तक्रार नोंदवून घेण्यात पण कुचराई केली. शेवटी प्रसार माध्यमांचा वाढत्या दबावापुढे प्रशासनाला झुकावे लागले आणि चौकशीचे आदेश दिले गेले. अर्थात किती जण पकडले जातील आणि किती जणांना शिक्षा होईल ते हरीच जाणो.

या सगळ्या प्रकारावर कडी केली ते खाप पंचायत आणि माजी मुख्यमंत्री चौटाला यांनी. यांनी उधळलेल्या मुक्ताफळांमुळे सद्सद्विवेकबुद्धी जागृत असणारी समस्त मानव जाती यांच्यावर हसत असेल. खाप पंचायत म्हणते बलात्काराचे प्रमाण कमी करायचे असेल तर मुलींच्या लग्नाची वयोमर्यादा कमी करायला हवी. म्हणजे त्या भरकटणार नाहीत? कसला सॉलिड जावई शोध आहे या पंचायतीचा. १६व्या वर्षी मुलीचे लग्न केल्यावर बलात्कार कमी होतील?? आणि या निर्णयाला चौटाला यांनी चक्क पाठिंबा दिला. नुसताच पाठींबा देऊन ते शांत नाही बसले, त्यांनी बलात्कारांच्या घटनांच्या निषेधार्थ राज्यपालांना आवेदन पत्र पण दिले. ज्या दिवशी सोनिया गांधी हरियाणातील पिडीत मुलीला भेटण्यासाठी गेल्या होत्या त्याच दिवशी बलात्काराच्या ४ घटना घडल्या.

खाप पंचायतीच्या सुचने कडे बघितल्यास खरंच हसावं का रडावं तेच कळत नाही. बलात्काराची व्याख्या यांना सांगायची वेळ आली आहे. बलात्कार कोण करतं? यात सध्यातरी मक्तेदारी पुरुषांकडे आहे. अजून तरी ऐकिवात नाही की एका स्त्रीने पुरुषावर बलात्कार केला. कुठलीही स्त्री स्वतः हून म्हणेल का … ये रे पुरुषा माझ्यावर बलात्कार कर. आणि तिची संमती असेल तर तो बलात्कार होईलच कुठे? असो तर पुरुष जर हे घृणास्पद कृत्य करत असेल तर १६व्या वर्षी लग्न करण्याचे जाच स्त्री करता का? लग्न झालेल्या स्त्रीवर बलात्कार होत नाहीत असं म्हणायचय का खाप ला? उलट कधी कधी खुद्द नवरा नामक नराकडून देखील जबरदस्ती होते आणि ती मुकाट्याने सहन करावी लागते. अशी सूचना हेच करू शकतात. बघा ना. गावातली मुलगी १६ ची झाली रे झाली की तिचं लग्न लावून दिलं. अश्या सगळ्या मुलींचे लग्न जर १६ व्यात झालं की त्या नराधमांना मुलीच मिळणार नाहीत बलात्कारासाठी. आहे की नी गंमत. खाप वाले म्हणतील कसं फसवलं त्या पुरुषांना … आता बसतील हलवत …. काय मुर्खपणा आहे हा. जो अत्याचार करतो तो मुक्त फिरत राहणार आणि जिच्यावर अत्याचार होतो तिचे वैयक्तिक सगळे हक्क डावलून त्या कोवळ्या जीवाला संसाराच्या जोखडाला रेटायच? हे म्हणजे चोर सोडून संन्याश्याला फाशी दिल्यासारखे आहे.

हरियाणात अश्याच काही कन्व्हर्ट झालेल्या जनावरांनी कायद्याला फाट्यावर मारलय आणि अश्या आजूबाजूच्या व्यवस्थेमुळे त्यांच्या अतिरेकाला खतपाणीच मिळत आहे. खरे तर अश्या जनावरांना वेळीच वेसण घातली पाहिजे आणि अश्या प्रवृत्तींना वाचक दिला पाहिजे. नाहीतर उद्या सामान्य माणूस हेच म्हणेल एकीकडे मुलगी जगवा असे आवाहन करायचे आणि दुसरी कडे तिच्याच अब्रुचे धिंडवडे काढायला ही जनावरे टपलेली आहेतच. तिची अवहेलना होण्यासाठी तिला जन्म द्यायचा का असा विचार माझ्यातला “बाप” कायम करत राहील. हरियाणाला लागलेली ही नराधमांची कीड इतरत्र पसरू नये हीच इच्छा.

11 thoughts on “कृत्य कुणाचे, “खाप”र कुणावर?

 1. चौताला सारख्यांची तर एवढ्या संवेदनशील विषयावर एक वाक्य बोलण्याचीही लायकी नाहीये !! त्यालाच आत टाकला पाहिजे बलात्काराला पाठींबा देण्याचा आरोप ठेवून !!

 2. मध्यंतरी ’सत्यमेव जयते’ मधे या आशयाचा एक भाग होता…. त्यात या ’खाप ’ पंचायतीचे मतं ऐकले होते… कहर मुर्खपणा चाललाय आपल्या देशात !!
  हा विषय घेऊन लिहीण्याबद्दल तुमचे मात्र कौतूक….

  >>तिची अवहेलना होण्यासाठी तिला जन्म द्यायचा का असा विचार माझ्यातला “बाप” कायम करत राहील. ….
  मुलगी जन्माला घालणं सोप्प नसतं हे वाक्य मी हल्ली अनेकदा उच्चारते !! … परीसारख्या बाहूल्या जपायच्या वाढवायच्या आणि असंवेदनशीलतेच्या गर्तेत ढकलायच्या 😦

  • बरेच दिवस हा मुद्दा घेऊन लिहायचे मनात होते. कितीही लिहिले तरी लेख आणि विचार अपूर्णच राहतात. तसच या लेखाबद्दल पण झालंय. खाप आणि चौटाला हे निमित्त झालं. पण खरं चित्र तर या पेक्षा विदारक आणि भयावह आहे. सरकारचे दुटप्पी धोरण …. मुलगी वाचवा म्हणायचे आणि मुलींना योग्य सन्मान द्यायचा नाही. समाज जागृती करायची नाही. रोजच्या पेपरात येणाऱ्या अत्याचाराच्या बातम्या वाचल्या की पेटून उठायला होतं. पण काहीच करू शकत नाही. अगदी २-३ वर्षाच्या कोवळ्या मुली देखील सुटल्या नाहीत यांच्या वासनेतून. हे सगळं वाचलं की आपण माणूस आहोत का पशु तेच कळत नाही. खरं तर पशूंमध्ये देखील मादीच्या मर्जीविना नर काही करू शकत नाही, मग ही लागण मनुष्य नावाच्या पशुत कुठून आली?
   परीसारख्या बाहुल्यांना जपण्यासाठी डोळ्यात तेल घालून जागरूक राहावं लागतं. पण हे करताना “असं का?” हा प्रश्न निरुत्तारीतच राहतो.

 3. खरंतर आता कठोर कारवाई करायला पाहिजे या नरपशुंवर. कायद्यानुसार ह्या प्रकरणातील दोषी लोकांना फार सामान्य शिक्षा दिल्या जातात. बलात्कार करणारा पुरुष परत समाजात मानाने हिंडतो. त्याचे लग्न होते. आणि जिच्यावर अन्याय झालाय ती स्त्री मात्र.. काय करावं? कसं समजवावे समाजाला. कठोर शासन एव्हडेच एक करता येईल. बलात्कार करणाऱ्या पुरुषाला खरंतर बैलांना जसे ‘बडील’ करतात त्या पद्धत्तीने नपुंसक बनविणे हा खरोखर चांगला पर्याय आहे. पण आपल्या कडे कायदे करणारेच जर बलात्कार करणारे असतील तर दाद मागायची कुणाकडे. हि शिक्षा भयानक वाटतेय पण मुलीच्या आयुष्यात बलात्कारामुळे जी भयाणता येते त्या पुढे हि शिक्षा काहीच नाहीये. विकृत समाज झाला आहे आपला.
  (बडील करणे म्हणजे अंडाशय ठेचून काढणे.)

  • समाजाची अशी अनेक रूपे आहेत. भावनेच्या भरात कुठलीही पावले उचलणे हे विघातक होऊ शकते. समाजोन्नती साठी (सु)शिक्षणाशिवाय पर्याय नाही. महिलांसाठी केलेले काही कायदे किती आतातायीपणाने केलेले आहेत याची उदाहरणे हल्ली वाढत आहेत. आणि ती शिक्षित/उच्चभ्रू कुटुंबात जास्त प्रमाणात आहेत. तुम्ही म्हणताय तसा कायदा आणला तर सरसकटपणे बरेच पुरुष “बडील” होऊ शकतात.

 4. छान पोस्ट आहे असं म्हणावं का? कि भयानक पोस्ट आहे असं म्हणू?!
  यातल्या एकेका प्रकरणाला तडीस न्यायला एकेकजण जरी पुढे आला तरी खूप फरक पाडू शकतो आपण….
  चांगल्या माणसांनी अधिक कृतिशील अन कठोर भूमिका घेण्याची वेळ आली आहे….अन्यथा वाईट लोकांची अरेरावी चालावी यात नवल काय?!

  species: woman
  Status: Near extinction
  Cause: reverse evolution of man into beast….

  हे बदलू शकतं!

  • अनुताई तुम्ही लाईक केलंय त्यामुळे पोस्ट छान म्हणता येईल पण विषय मात्र भयानक आहे. सध्यातरी आपल्या कडील परिस्थिती म्हणजे ज्यावर अन्याय होतो त्यालाच आधी आरोपी ठरवले जाते.
   येथे वाचा एका स्त्री राजकारणीची मुक्ताफळे : http://in.news.yahoo.com/rapes-happen-because-men-and-women-interact-freely–mamata.html
   हे असंच जर चालू राहिलं तर समतोल बिघडायला वेळ लागणार नाही.

    • भयंकर/भयानक तर चित्रपट पण असतात. हे त्याही पुढंच आहे. खरतर या प्रवृत्तीला भयंकर भयानक असे हलके शब्द लागूच होत नाहीत. निदान मानवाच्या शब्दकोषात तरी अश्या हीन कृत्यासाठी शब्द नाही. कदाचित पशूंमध्ये पण नसावा. कारण त्यांच्यामध्ये मादीवर असे अन्याय होत नाहीत. अश्या नराधमांचे बीजच वेगळे.

 5. मराठी ब्लोगर्स साठी सुवर्ण संधी..
  आपला मराठी ब्लॉग … http://www.marathiblogs.in/ वर जोडा
  आणि 4 जीबी चा पेनड्राइव जिंकण्याची संधी मिळवा.
  जगातील सर्वात मोठ्या मराठी ब्लॉग्स च्या नेटवर्क मध्ये सहभागी व्हा..

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s