मोरू आणि बाप

दैनिक लोकसत्ता (बुधवार, २४ ऑक्टोबर २०१२) मधील अग्रलेख मोरू आणि बाप एकदम झक्कास वाटला म्हणून इथे सर्वांसाठी देत आहे.

————————————————————————————————————————————————————– 

अष्टमी गेली, नवमी गेली आणि विजयादशमीचा सण उजाडला. परंपरेप्रमाणे मोरूचा बाप मोरूस म्हणाला, मोरू ऊठ. आज विजयादशमी. आजच्या दिवशी तरी किमान सूर्योदय पाहावा, असे शास्त्र सांगते. मोरूचा बाप लहान होता, तेव्हा त्यास वडील असेच उठवायचे. परंतु त्या वेळी गोष्ट वेगळी होती. आवाजाचे प्रदूषण अशी काही भानगड नसल्याने रात्री उशिरापर्यंत टिपऱ्या खेळता यायच्या.

त्यामुळे जागरण व्हायचे. परंतु आताची पिढी कमनशिबी. ध्वनिप्रदूषणाचे कारण पुढे करीत त्यांना दहा वाजताच टिपऱ्यांचा आवाज बंद करावा लागतो. त्यामुळे सगळ्याच मोरूंची गोची होते. अर्थात ध्वनिप्रदूषणाचे कारण काढले तरी नव्या मोरूंना गरबा खेळण्याची तशी संधी कमीच. गेल्याच वर्षी अनेक मोरूंच्या आसपासच्या इमारतींच्या मध्ये झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पाच्या इमारती उभ्या राहिल्या होत्या. त्यामुळे जे काही लंगोटी मैदान होते, ते अधिकच आकसून गेले. तेव्हा तशीही मोरूंना खेळण्यासाठी जागा नव्हतीच. त्यामुळे नव्या पिढीचे मोरू संगणकावर ऑनलाइन गरबा खेळीत. हा नवाच प्रकार गेल्या काही वर्षांत उदयास आला होता. ऑनलाइनच असल्याने त्यास भूगोलाच्या सीमा नव्हत्या. त्यामुळे महाराष्ट्रातल्या मोरूने एक टिपरी फिरवली की ती समेवर मॅनहटनमधल्याच्या टिपरीवर आपटायची. तेव्हा असा ऑनलाइन गरबा खेळून दमलेल्या मोरूने डोळे किलकिले केले. टीव्हीवर क्रिकेटचा सामना पाहत असताना मध्ये आलेल्या जाहिरातीच्या व्यत्ययाकडे पाहावे, तसे त्याने वडिलांकडे पाहिले. कूस बदलली आणि पुन्हा पहिल्यापासून तो झोपी गेला. मोरूची माता आतून म्हणाली, दमला असेल.. झोपू द्या थोडा वेळ. ते ऐकून मोरूच्या बापाने मोठा श्वास सोडला. म्हणाला, आमच्या लहानपणी दमण्यासाठी काहीना काही करावे लागायचे. काहीही उद्योग न करता दमणे हा अजबच प्रकार म्हणायचा. त्यावर मोरूची माता विचारती झाली- असे कसे म्हणता आपण? संगणकावर खेळ खेळणे म्हणजे काहीच कसे नाही. कसला वेगात खेळतो तो गरबा संगणकावर.
साक्षात जन्मदात्रीच चिरंजीवाची कड घेत आहे, हे पाहून मोरूच्या बापास परिस्थितीचा अंदाज आला. त्याने माघार घेणेच पसंत केले. परंतु थोडा वेळ गेल्यावर त्यास राहवले नाही. त्याने पुन्हा हाके मारले. मोरू ऊठ.. आज विजयादशमी.. चांगल्या कामाची सुरुवात करावी.. सीमोल्लंघन करावे. मोरूस ऑनलाइन गरबा खेळून आलेला शिणवटा एव्हाना गेला होता. तेव्हा वडिलांकडे त्याने शक्य होईल तितक्या स्नेही नजरेने पाहिले. तो पुसता झाला- वडील, मी लवकर उठून काय करावे असे आपले म्हणणे आहे?
अशा वेळी नक्की काय काय सांगावे हे वडिलांस सुचेना. समोर नुकतेच आलेले वर्तमानपत्र पडले होते. ते त्यांनी घेतले. आपल्या चिरंजीवासमोर धरले. म्हणाले- हे वाचावे. ज्ञानात भर पडते. मोरूने वाचण्यास सुरुवात केली. ‘चि. सौ. कां. करीना वेड्स चि. सैफ अली खान .. उभयतांना विश करण्यासाठी समस्त पेज थ्री’, ‘२०३२ सालच्या वल्र्ड कपनंतर आपण निवृत्तीचा विचार करायचा की नाही, त्याचा विचार करू- सचिन तेंडुलकर’, ‘विजय मल्या यांच्या कंपनीतील किंग जाऊन नुसतेच फिशर राहिल्याने कर्मचाऱ्यांना टेंशन’, ‘युवासेना २०१८ च्या विधानसभा निवडणुका शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या लीडरशिपखाली लढणार, आदित्य ठाकरे यांचा निर्धार’ (सोबत पडसे होऊ नये म्हणून घालतात ती कानटोपी घातलेले उद्धव ठाकरे यांचे छायाचित्र), ‘मामा आणि आपल्यांत कोणतेही मतभेद नाहीत असा चि. सुळे यांचा दावा’, ‘अर्थव्यवस्था सुधारल्याने मनमोहन सिंग यांनी स्माइल केले हे सहन न होऊन काँग्रेस कार्यकर्त्यांस हार्ट अटॅक’. असे वाचन करून मोरूने अकरा रुपयांत वर्षभर मिळणारे वर्तमानपत्र वाचून संपवले. सव्वा दोन मिनिटांच्या या ज्ञानसाधनेने आपल्या चिरंजीवांच्या मस्तकाभोवती तेजोवलय निर्माण झाल्याचा भास मोरूपित्यांस होऊन त्यांचा आनंद अडीच खण खोलीच्या गगनात मावेना. किती बदल झाला आहे, आजच्या पिढीत, या विचाराने ते हरखून गेले. आपल्या लहानपणी वर्तमानपत्र वाचन हा किती कष्टप्रद अनुभव होता आणि तो घेत असताना आपल्या तीर्थरूपांचा उजवा हात आणि आपला डावा कान यांच्यात किती कर्णमधुर संबंध होते ते आठवून मोरूच्या बापास गहिवरून आले. खेरीज डोक्यात काही प्रकाश न पाडणाऱ्या मजकुराच्या जोडीला हातास शाई लागू देणारी तेव्हाची वर्तमानपत्रे. त्या मानाने आताची भाषा किती सोपी. करीना वेड्स सैफ. किती सोपे आणि सहज मराठी. सैफ याच्या विवाहांसारखेच. शिवाय जोडीला मुळातच लाल असलेली आणि अखेर लग्न करावे लागले यामुळे लाजलाजून लाललाल झालेल्या करीनाचे छायाचित्र. असे आपल्याही लहानपणी असते तर आपणही वर्तमानपत्र असेच आनंदाने बराच काळ पाहिले असते आणि दोन मिनिटे वाचले असते, असा विचार मोरूपित्याच्या मनात दाटून आला. परंतु तो त्यांनी झटकला. त्यातील फोलपणा त्यांना लगेचच लक्षात आला. असे असते तर.. वगैरे म्हणण्यात काय हशील. आत्याबाईला मिशा असत्या तर या चालीवर त्यांच्या मनात सुषमाबाईंना दाढी असती तर त्यांना मोदीच नसते का म्हणता आले, असा विचार येऊन गेला. तोही त्यांनी झटकला.
आपल्या दोन मिनिटांच्या वर्तमानपत्र वाचनाने ज्ञानसंपन्न झालेल्या मोरूकडे पाहत ते म्हणाले, मोरू, आजच्या शुभदिनी सरस्वतीपूजन करावयाचे असते. त्यामुळे तू ज्ञानी होण्यास मदत होईल. मोरूने पुसले- त्यामुळे काय होईल. मोरूचा बाप म्हणाला- अरे, असे काय विचारतोस.. तू ज्ञानी झालास तर तुझी कारकीर्द चांगली होईल, तुजला चांगली नोकरी मिळेल. उत्तम पगार मिळेल. तसे झाल्यास तू अधिक मोठे घर घेऊ शकशील. तुझा संसार सुखाचा होईल. मोरूने सर्व ऐकून घेतले आणि आपल्या तीर्थरूपांस म्हणाला- इतकेच हवे असेल तर हे इतके सारे करीत श्रमण्याची काहीच आवश्यकता नाही. मी हे सर्व अभ्यासात वेळ वाया न दवडताही मिळवू शकतो.
आपल्या चिरंजीवाच्या या आत्मविश्वासपूर्ण उद्गारांनी मोरूपित्यास आपल्या श्रमाचे सार्थक झाले अशी भावना दाटून आली, सद्गदित आवाजात ते मोरूस विचारते झाले- ते कसे? मोरू म्हणाला, तीर्थरूप हे फारच सोपे आहे. हे सर्व मिळवण्यासाठी मी एकच करेन. मी बिल्डर होईन.
मोरूच्या बापाचा आनंद आता त्यांच्या दीडफुटी देहात मावेना. काय ती भविष्यवेधी नजर, असे त्यांना मोरूचे ऐकून झाले. आपल्या पोटीही इतका कर्तबगार पुत्र निपजू शकतो तर या विचाराने तर ते धन्य धन्यच झाले. आजचा बिल्डर हा उद्याचा नगरसेवक, परवाचा आमदार आणि तेरवाचा खासदार किंवा मंत्री असतो असे त्यांनी वाचले होतेच. त्यामुळे आपल्या मोरूचेही असे होऊ शकते या विचाराने मोरूपित्यास काय करू आणि काय नाही.. असे होऊन गेले. आपला मोऱ्या प्राध्यापक, अभियंता, डॉक्टर नाही, पण मंत्री होऊ शकतो या कल्पनेचीदेखील नशा त्यांना पुढच्या आयुष्यात पुरणार होती. यापेक्षा सीमोल्लंघन वेगळे का असते..
इतक्या मोठय़ा सीमोल्लंघनाच्या विचारानेच मोरूपित्यास ग्लानी आली. त्यांचा डोळा लागला. आपल्याला जागे करणारे वडील आता स्वत: मात्र झोपी गेलेत हे पाहून मोरू आपल्या बापास म्हणाला.. अहो बाप, उठा.. आज विजयादशमी..

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s