लीला सेल्फ हेल्प ग्रुप

कुठल्याही आईला नेहेमीच आपल्या मुलाबद्दल चिंता लागलेली असते. अगदी त्याच्या संगोपना पासून ते त्याच्या भविष्यापर्यंत. ही मातेची भूमिका गर्भधारणेपासूनच म्हणजे जेंव्हा स्वतःच्या मुलाला बघितले नसेल अगदी तेंव्हा पासून. पण काही मुले अशी असतात की त्यांच्या बाबतीत सगळ्या गोष्टी सुरळीत नसतात. गुणसूत्रांच्या २२ जोड्यांपैकी २१व्या जोडीत गडबड होते. तिथे २ ऐवजी ३ गुणसूत्रे असतात आणि त्या  बालकात शारीरिक, बौद्धिक विकलांगता येते. हा कुठलाही साध्य किंवा असाध्य असा शिक्का असलेला रोग नाही तर ही एक स्थिती आहे, कधीही न बदलणारी. याला डाउन्स सिंड्रोम म्हणतात. अश्या मुलांचा बुद्ध्यांक सामान्य मुलांपेक्षा निम्मा असतो. कुणाचेही मुल विकलांग असावे असा कधी विचारही आपल्या मनाला शिवत नाही. पण जे अश्या मुलांचे पालक असतात त्यांचे काय? सगळ्या बाजूंनी झालेला हा आघात पचवून त्यांना या मुलांच्या भवितव्या साठी कंबर कसून उभं राहावं लागतं. त्यांना सांभाळता सांभाळता त्यांचं भविष्य घडवावं लागतं…. अगदी नाजूकपणे आणि विचारपूर्वक.

अश्या मुलांच्या भवितव्याची काळजी जपणाऱ्या बऱ्याच समाजसेवी संस्था सध्या कार्यरत आहेत. या संस्था अश्या मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वार्थाने प्रयत्न करत आहेत. त्यांना उत्तम शिक्षण मिळण्यासाठी तसेच भविष्याच्या दृष्टीने त्यांना स्वावलंबी बनवण्याचे अवघड कार्य चोखपणे बजावताना या मुलांच्या पालकांना देखील मानसिक आधार देण्याचे काम या संस्था करतात. बरेच वेळा या संस्थांच्या पाठीमागे समाजातील मान्यवर व्यक्ती, सरकार यांचे आर्थिक पाठबळ असते. काही पालक मात्र निव्वळ या संस्थांवर अवलंबून न राहता स्वतः मुलांना स्वतःच्या पायावर उभे राहण्याचे बळ देतात. पण बहुतेक वेळा हे सगळे उपक्रम स्वतःच्या मुलां पुरतेच मर्यादित असतात.

आज अश्याच एका ग्रुपशी ओळख झाली. “लीला सेल्फ हेल्प ग्रुप”, ५ मातांनी आपल्या ५ मुलांसाठी चालू केलेला हा उपक्रम. दिवाळी साठी बनवलेल्या रंगीबेरंगी पणत्या, सुगंधित उटणे, विविध आकाराच्या मेणबत्त्या अश्या सगळ्या विविध उत्पादने आमच्या ऑफिस मध्ये विक्रीसाठी आणली होती. विशेष म्हणजे ज्यांनी ह्या वस्तू बनवल्या होत्या ती मुले देखील त्यांच्या आयांना मदत करत होती. कुठलीही जाहिरातबाजी नाही की कुठलाही बडेजाव नाही. त्यांची कलाकुसरच इतकी सुंदर होती की ते बघितल्यावर त्यांना वेगळी जाहिरात करण्याची गरजच भासली नाही. गेली ३ वर्षे या पंचमाता आपल्या मुलांसाठी हा उपक्रम राबवत आहेत. त्यांचे प्रयत्न, त्यांचे श्रम, त्यांची चिकाटी बघून नतमस्तक व्हायला होतं.

मी सकाळी सकाळीच गेलो होतो त्यामुळे तयारी नुकतीच झाली होती. आपल्या सगळ्या कलाकृती अश्या छान रीतीने मांडून ही बच्चे कंपनी तय्यार होती. गर्दी नसल्यामुळे या सगळ्यांशी संवाद साधणे सोप्पं झालं.

सर्वात एक गोष्ट आवडली ती म्हणजे घेतलेल्या सगळ्या वस्तू कागदाच्या पिशवीत बांधून दिल्या जात होत्या. या पिशव्या देखील या मुलांनीच बनवल्या होत्या. त्याही कुठलाही प्रकारचा गम किंवा तत्सम चिकटवण्याचा पदार्थ किंवा पिना न वापरता.

Happy Diwali म्हणत या छान छान कलाकारांनी मला टाटा केलं. या मुलांसाठी आणि त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहिलेल्या या मातांना विनम्र अभिवादन.

संपर्क:
लीला सेल्फ हेल्प ग्रुप
सीमा कासम,
२०१, सीता कुटीर, कोस्टा कॉफीच्या मागे, जुहू स्कीम, अंधेरी (प.)

7 thoughts on “लीला सेल्फ हेल्प ग्रुप

 1. या मुलांसाठी आणि त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहिलेल्या या मातांना विनम्र अभिवादन. + 1
  असं काही पाहिलं, ऐकलं की जगण्याला अजून बळ येतं … आपलं दु:ख कुरवाळत बसू नये हे नव्याने जाणवतं !!
  आनंद या पोस्टसाठी मनापासून आभार!!

  • आपलं मुल हे इतरांप्रमाणे सर्वसामान्य नाही हाच एक मोठा धक्का असतो. अश्या पालकांना परिस्थितीशी जुळवून घेण्याशिवाय देवाने दुसरा कुठला पर्यायच ठेवला नाही हीच सर्वात दुर्दैवाची गोष्ट आहे. काही महिन्यांपूर्वी डोंबिवली स्टेशन वर अश्याच एका मुलीचा पिता आपल्या मुलीला खेळवत होता. मुलीचे वय असेल साधारण १-२ वर्ष. डोळ्यात पाणी यायचं बाकी होतं. पण नेहेमीच प्रश्न पडतो की अश्या मुलांचे पालकांच्या पश्चात काय होत असेल? सध्या तरी कल्पना करवत नाही.
   प्रतिक्रिये बद्दल धन्यु. 🙂

  • धन्यवाद कुलकर्णी साहेब,
   आपल्या मुलांना त्यांच्या पायावर उभं करण्यासाठी त्या सगळ्याजणी खरंच खूप मेहेनत घेतात. निदान या पोस्ट मार्फत त्यांचे उपक्रम मी काही वाचकांना सांगू शकलो यातंच समाधान आहे. अजून काही करता आलं तर बघू.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s