८ वाजताची कर्जत – मुंबई सी एस टी जलद लोकल

एखादी सकाळ विशेषतः ऑफिस मधे जाताना काही वेगळीच भासते. आणि बरेच वेळा त्या वरून आपला दिवस कसा जाईल याची कल्पना आपण मनातल्या मनात करत असतो. आज गुरु नानक जयंती त्यामुळे सरकारी सुट्टी. स्टेशनवर पोचलो तेंव्हा ७:५५ झाले होते. अश्या सुट्टीच्या दिवशी मुंबईतील लोकलना गर्दी जरा कमीच असते. तशीच आज पण असेल अशी आशा करून ५ नंबरच्या फलाटावर जलद गाडी पकडण्यासाठी आलो. समोर इंडिकेटरवर  ८ वाजताची कर्जत वरून येणारी मुंबई सीएसटी जलद गाडी लावली होती. हीच गाडी पकडण्यासाठी मी प्रचंड आटापिटा करायचो. पण ऑफिसची वेळ बदलली आणि तो आटापिटा संपला. संपला म्हणजे संपवावा लागला. गर्दी मुळे बरेचदा त्या गाडीत चढायलाच मिळायचं नाही. किंवा ठाण्यापर्यंत दरवाज्यात लटकत जावं लागायचं. त्यामुळे ग्रुप बरोबर गप्पा मारत जाण्याचा मोह सोडला. आदमी सलामत तो ग्रुप पचास :).  या सगळ्या प्रकारामुळे जुन्या ग्रुपशी भेटच होत नव्हती. दसरा गेला दिवाळी गेली, अहो इतकंच काय २-३ वाढदिवस देखील गेले. कारण आधी अश्याच काही सणवाराला केलेली धम्माल आठवायची. (त्याचे सविस्तर वर्णन इथे वाचायला मिळेल) दर वेळी बोलावणं यायचं “निदान शुक्रवारी तरी ये जमल्यास.” दर शुक्रवारी खास बेत असतो. बेत म्हणजे भरपेट नाश्ता …. गाडीतच. कधी इडली, बटाटेवडे कधी सामोसे. पण कुठलाही शुक्रवार गाठता आला नाही.

आज शुक्रवार नव्हता पण परत गाडीतील मित्रमंडळीना भेटण्याचा योग आला. निमित्त गुरुनानक जयंती आणि त्यामुळे तुरळक असलेली गर्दी. गाडीत चढायला मिळालं पण ग्रुप पर्यंत पोचायला ठाणे पर्यंत वाट बघावी लागली. जे उभे होते त्यांनी गलका केला “आनंद आया आनंद आया”. एकाने तर चक्क मला मिस्टर इंडिया करून टाकलं कारण काय तर त्याला माझा आवाज ऐकू येत होता पण मी दिसत नव्हतो. शेवटी मजल दर मजल करत माझ्या जुन्या घोळक्यात सामील झालो. हालहवाल, चौकश्या होई पर्यंत भांडूप केंव्हा गेलं तेच कळलं नाही. घाटकोपरच्या आधी या बरच दिवसांनी अवतरलेल्या मला एका मित्राने जागा पण बहाल केली. आणि माझ्यावर खाद्य पदार्थांचा मारा चालू झाला. कुणी बुंदीचे लाडू पुढे केले. नंतर मस्त खुसखुशीत भाजक्या पोह्यांचा चिवडा समोर आला. मग बिस्किटांचा पुडा उघडला गेला. या सगळ्यांचा आस्वाद घेऊन झाल्यावर या ग्रुप मधील सर्वात ज्येष्ठ असलेल्या काकांनी पाण्याची बाटली समोर केली. हे मित्रांचे प्रेम अनुभवताना वेळ कसा गेला तेच कळलं नाही आणि गाडीतला स्पीकर बोंबलला. “पुढील स्टेशन दादर. अगला स्टेशन दादर. Next station dadar”. मग काय उतरायची तयारी.

उतरल्यावर सगळे मित्र आवर्जून म्हणाले “कभी तो आ जाया करो यार. मजा आता है”. “फ्रायडे को तो कोशिश करो”. सगळ्यांच्या भावना मनाला भिडत होत्या. त्यांची आत्मीयता कळत होती. खरं तर आज बरेच दिवसांनी मी ती गाडी पकडू शकलो होतो तरी पण माझ्या मित्रांचे प्रेम तसूभर देखील कमी झाले नव्हते आणि आजच्या प्रसंगाने तर ते कधीच कमी होणार नाही याची खात्रीच पटली. खरंच रोज ती गाडी पकडता आली असती तर? त्यांचा सहवास मिळू शकेल ….. पण कसं शक्य आहे? रोज तर नाहीच …त्या ६० मिनिटांसाठी १५ मिनिटे दरवाज्यात जीव मुठीत धरून लटकू शकत नाही मित्रांनो. त्या पेक्षा असंच एखाद्या दिवशी अचानक भेटूच. तीच गाडी, तोच डबा आणि तोच सगळा मित्र परिवार.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s