भावे काकूंचा डब्बा

ई-साहित्य प्रतिष्ठानच्या “इत्यर्थ दिवाळी २०१२” या दिवाळी अंकात “भावे काकुंचा डब्बा” ही माझी कथा प्रकाशित झाली. ती आपणांस वाचायला सुपूर्द करत आहे.

————————————————————————————————————————————-

आयुष्यात काही आठवणी सिमेंट काँक्रीटच्या घराप्रमाणे पक्क्या राहतात. त्या आठवणींशी निगडीत असलेल्या प्रसंगामुळे, स्थळ काळामुळे किंवा व्यक्तींमुळे त्यांचा तजेला, टवटवीतपणा वर्षानुवर्षे तसाच टिकून असतो. काळाच्या ओघात जपून ठेवलेल्या अश्या आठवणींना माळेतील मोत्यांची सर असते. माळ जरी निखळली तरी ते मोती जपून ठेवले जातात …. अनंत काळासाठी.

माझ्या लहानपणी आम्ही एका चाळवजा इमारती मध्ये पहिल्या मजल्यावर रहात होतो. एका सामाईक बाल्कनीत सगळ्या भाडेकरूंचे प्रवेशद्वार उघडायचे. शेजार-पाजार्यांचे दरवाजे कारणाशिवाय बंद नसल्यामुळे आम्हां पोराटोरांचा मुक्त संचार असायचा. तळ मजल्यावर एका छोट्या खोलीत भावे काकू राहायच्या. घरात त्यांच्या बरोबर, कॉलेजमध्ये शिकणारा माधव आणि दहावीत शिकणारी मीरा, असे तिकोणी कुटुंब होते. पतीचे अकाली निधन झाल्यामुळे संसाराची सगळी जबाबदारी भावे काकुंवर पडली. त्यांच्याकडे काही वैयक्तिक कारणामुळे विशेष नातेवाईक पण यायचे नाहीत. त्यामुळे सगळी चाळ हेच त्यांचे नातेवाईक होते. स्वयंपाक, शिवणकाम आदी छोटे छोटे उद्योग करून काकू घर चालवत होत्या. माधव सकाळी वर्तमानपत्र टाकायचा आणि संध्याकाळी एका वाचनालयात काम करून घरखर्चाला हातभार लावायचा. मीरा पण त्यांना घरकामात मदत करायची. एखाद्या कृष्णधवल मराठी चित्रपटात शोभेल असे ते कुटुंब होतं.

काकू प्रेमळ आणि मनमिळावू होत्या. त्यांचे कधी कुणाशी वादविवाद झाल्याचे स्मरत नाही. उलट त्याच इतरांच्या घरातील भांडणे सोडवायच्या, कधी सासूच्या हक्काने, कधी आईच्या मायेने, तर कधी बहिणीच्या समजुतीने. शाळेत जाताना त्यांच्या मंजुळ आवाजातील भजनं, भूपाळ्या ऐकताना आमच्या दिवसाची सुरुवात पवित्र आणि मंगलमय व्हायची. देवतार्चन आणि अध्यात्मिक पुस्तकांचे वाचन हा त्यांचा फावल्यावेळात चालणारा नित्यक्रम होता. काकूंचं कृष्णावर विशेष प्रेम. दुपारच्या वेळी त्या आम्हाला सगळ्यांना जमवून देवाधर्माच्या, पुराणातील गोष्टी सांगायच्या. गोष्ट सांगून झाली की त्या सगळ्यांना गोल चकतीच्या आकाराच्या पांढऱ्या पेपरमिंटच्या गोळ्या द्यायच्या. त्या गोळ्यांकरीता का होईना आम्ही कधी कधी त्या अगम्य वाटणाऱ्या गोष्टी ऐकण्यासाठी बसायचो. कृष्णजन्म, कालियामर्दन तर इतकं खुलवून सांगायच्या की आम्ही सगळे बालगोपाळ आहोत आणि चाळ हेच आमचे गोकुळ अश्या अविर्भावात वावरायचो. चाळीत शांतता असेल तर समजावे, भावे काकूंचा बालसत्संग चालू आहे. आपलं कार्टे भावे काकूंकडे आहे हे कळल्यावर प्रत्येक आई निश्चिंत असायची. त्यांच्या घरात कधी भांडणे नाहीत वादविवाद नाहीत. घरात कर्ता पुरुष नसताना असेल त्या बेताच्या परिस्थितीत सुद्धा सुखात नांदणारे ते कुटुंब माझ्यासाठी आदर्श होते.

काकूंच्या स्वभावामुळे आणि त्यांच्या परिस्थितीमुळे सगळे चाळकरी सदैव मदतीला तयार असायचे. कधीकधी काही कामासाठी काकू बाहेरगावी गेल्या तर कुठल्या ना कुठल्या घरातून मीरा आणि माधव करता डबा यायचा. आमच्या घरीतर काही गोडधोड केलं तरी ते एका डब्यात घालून तो भावे काकूना देण्यासाठी आई मला पिटाळायची. आईने इतरांना देण्यासाठी काही खास प्लास्टीकचे डब्बे ठेवले आहेत. उद्देश एकच “परत नाही आला तरी पंचाईत नाही”. असंच एकदा बाजूला कुणाला तरी काही द्यायचे होते आणि आई “ठेवणीतील” डब्बे शोधत होती. पण बरेच डब्बे गायब होते. शोधता शोधता ती स्वतःशीच बडबडत होती ‘आजकाल या भावे काकू लवकर डब्बे आणूनच देत नाहीत. पुढच्या वेळेस त्यांना सांगेन डब्ब्यातलं काढून घ्या आणि लगेच डब्बा परत द्या.’ पण ते तसं कधीच होत नाही हा मुद्दा वेगळा. मला माहित होतं की आई आता मला भावे काकूंकडे डब्बे आणायला पाठवणार त्यामुळे मी तिच्या आज्ञेची वाटच बघत होतो …. आणि तितक्यात आज्ञा आली … “नुसताच बसला असशील तर जरा भावे काकूंकडून आपले २ डब्बे तरी घेऊन ये. काय करतात स्वतःकडे ठेवून घेऊन कोण जाणे”. मी धावत पळत काकूंकडे गेलो आणि दरवाज्यातूनच आरोळी ठोकली “काकू ssssssssss डब्बे.” काहीतरी कामात असलेल्या काकू पदराला हात पुसत बाहेर आल्या आणि म्हणाल्या “अरे हो, सविताचे ५-६ डब्बे माझ्याकडे आहेत. रोज देईन म्हणते पण जमत नाही. डब्ब्यात द्यायला काही नाही ना. आत्ता काहीतरी तुझ्या आवडीचं करत आहे ते घालून संध्याकाळी देते” आतून मस्त चिवड्याचा वास येत होता. त्या वासाच्या अंमलाखाली मूळ निरोप विसरण्या आधी तो सांगितलेला बरा. “काकू किमान २ डब्बे तरी घेऊन येच अशी आज्ञा आहे मातोश्रींची”. “बरं २ आत्ता देते आणि बाकीचे मग संध्याकाळी आणून देईन” असं म्हणून काकू डब्बे आणण्याकरिता आत गेल्या. दोन डब्ब्यात थोडी साखर घालून माझी बोळवण केली. चिवड्याच्या वासापुढे माझा पाय हलत नव्हता. तितक्यात पहिल्या मजल्या वरून रणांगणात वापरल्या जाणाऱ्या शंखादी वाद्यांचा कडकडाट झाला आणि मी पुढील संकटाची चाहूल लागल्यामुळे वर जायला धूम ठोकली. आईच्या हातात डब्बे दिले. “हे काय दोनच? बाकीचे तीन?” मातोश्री वदल्या. मी म्हटलं “तुला दोनच हवे होते ना? काकू बाकीचे तीन संध्याकाळी आणून देतील” दोन्ही डब्ब्यात दिलेली साखर बघून आई म्हणाली “कधीच रिकामे डब्बे देत नाहीत. काही ना काही तरी देतातच” चिवड्याचा वास अजूनही मेंदू मध्ये भिनला असल्याने मी म्हणालो ” थांब, संध्याकाळी घरी डब्ब्यांतून चिवडा मिळणार आहे.” आई:”तुला कसं माहीत”. मी म्हटलं “काकू चिवडा करत होत्या. छान वास सुटला होता” “तरीच तुला एवढा वेळ लागला. हावरटासारखा मागितला नाहीस ना त्यांच्याकडे?” आईची त्रासिक मुद्रा. मी पण तितक्याच त्रासिक चेहेर्याने, “त्या देणार म्हटल्यावर मी कशाला मागू?”

संध्याकाळी काकू डब्बे घेऊन घरी आल्या. मी चिवडा मिळणार म्हणून त्यांच्या अवतीभवती घुटमळत होतो. माझी ती चलबिचल बघून त्या म्हणाल्या “आणलाय बरं का चिवडा माझ्या कान्हा साठी” आम्ही सगळीच पोरं त्यांच्यासाठी कृष्णरूप होतो. त्यामुळे कधी त्या आम्हाला कान्हा म्हणत तर कधी मुकुंदा म्हणत. खऱ्या नावाने कधीच काकूंनी हाक मारली नाही. आईने डब्बे आत नेऊन ठेवले तितक्यात काकू आईला म्हणाल्या “त्याला चिवडा दे गं, सकाळ पासून कळ धरून आहे बिचारा”. सकाळच्या आईच्या वाक्याचे मला खूप कुतूहल होते. आम्ही दिलेल्या डब्यात काकू काही ना काही तरी घालून देतातच ते का? कसलीही भीड न ठेवता मी काकूंना त्याच्या बद्दल विचारलं. काकूंच्या चेहेऱ्यावर मंद हास्य होतं. त्या म्हणाल्या “सहजच रे. असं खास कारण काही नाही. कुणाला रिक्त हाताने पाठवू नये अशी आपली शिकवण सांगते. म्हणून मी कधीच रिकामा डब्बा देत नाही. कृष्णाला तू काही जरी दिलेस तरी तो डब्बा भरभरून तुला देईल, विसरलास ती कृष्ण सुदाम्याची गोष्ट” आईने मला चिवडा आणून दिला तरीपण काकूंचं संतवचन माझी पाठ सोडायला तयार नव्हतं.

इतक्या सध्या गोष्टीची देव आणि भक्ताचे नाते यात घातलेली सांगड मला त्या वयात अगम्य वाटली. कसला डब्बा?? त्यात मला कृष्ण काय देणार?? पण पुढे पुढे त्याचा उलगडा होत गेला. अगदी जीवनाचं रहस्य समजल्या सारखा. भगवंताकडून काही इच्छा असेल किंवा त्याने आपल्या करता काही करावे अशी अपेक्षा असेल तर त्याला “भक्ती”रूपी डब्बा द्यावाच लागतो तरच तुम्हाला त्या डब्ब्यातून देव सुखसमृद्धीची उधळण करतो. काकुंच्या बोलण्याचे हेच सार मी कायम डोक्यात ठेवले. कालांतराने आम्ही त्या चाळी पासून थोड्याच अंतरावर नवीन घरी राहायला गेलो आणि चाळ संस्कृतीशी असलेली नाळ कायमची तुटली. काकू अधून मधून दिसायच्या, गोविंदा अशी हाक मारून विचारपूस करायच्या. घरी येत जा असा आग्रह पण करायच्या. पण वेळ काय आपल्या हातात असते?

असाच काळ लोटला. माझं शिक्षण पूर्ण झालं. चांगली नोकरी पण मिळाली. कंपनीने सगळं काही दिलं. सुख पायाशी लोळण घेत होती. कंपनीने राहायला मोठी जागा दिली, फिरायला गाडी दिली. माझ्या प्रगतीवर आई बाबा खुश होते. आणि आता तर लग्न ठरले होते. मनासारखी बायको पण मिळणार होती. बाबांनी विचारले की “तुझे कुणी स्पेशल गेस्ट येणार आहेत का?” मी म्हटलं “हो, मला एकच पत्रिका द्या. बाकी तुम्ही बघून घ्या कुणाला बोलवायचे ते” माझ्या हस्ताक्षराने त्या पत्रिकेवर लिहिलं “भावे काकू आणि परिवार”. माधव दादा अजूनही संपर्कात होता. त्याला फोन करून त्याच्या घरी गेलो. आता त्याच चाळीच्या जागी अलिशान इमारत उभी आहे आणि तिथेच माधव दादाने स्वकर्तुत्वावर ४ खोल्यांचा ब्लॉक घेतला. माधव दादा आपल्या पत्नी सोबत काकूंची खूप चांगली काळजी घेत होता. मीरा ताईचे पण लग्न झाले होते. आपल्या नातवंडाना आता कृष्णाच्या गोष्टी सांगून काकू आपली हौस पूर्ण करून घ्यायच्या. कृष्णा ने त्यांच्या डब्यात भरभरून सगळं दिलं अगदी कधीही रितं न होण्या सारखं.

दरवाजा उघडताच काकूंनी विचारलं “कोण आलाय गं?”. मी म्हटलं “यशोदामाई तुझा कान्हा आलाय गं”. भावे काकूंच्या पाया पडलो आणि त्यांच्या शेजारी बसलो. काकूंनी मायेने पाठीवरून हात फिरवला. “इतका मोठा झालास तरी काकूला नाही विसरलास. बरं वाटलं आलास ते. मी आजकाल कुठे बाहेर नाही पडत. माधव कधी कधी गाडीतून फिरायला घेऊन जातो इतकंच” जुन्या आठवणीना उजाळा देऊन झालं, सगळ्यांची ख्याली खुशाली घेऊन झाली. काकूंना म्हटलं “काकू, पुढच्या महिन्यात तुमचा कान्हा लग्न करतोय. त्याला त्याची रुक्मिणी मिळालीये. तुम्हाला बोलावणे करायला आलोय. गाडी पाठवून देईन. तुम्ही सगळे आवर्जून या आणि मीरा ताईला पण सांगा.” काकू सुनेला म्हणाल्या “माझ्या गोविंदाला चिवडा आण गं. आणि मग चिमुटभर साखर पण आण” काकूंच्या हातात निमंत्रण पत्रिका दिली. त्यांच्या पायावर डोके टेकवून तिथेच पायाशी बसलो. काकू मंदपणे हसत होत्या. तेच हास्य जे कैक वर्षांपूर्वी माझा प्रश्न ऐकून उमटलेलं. काकूंनी त्यांचा कापरा हात माझ्या डोक्यावर ठेवला आणि म्हणाल्या “कृष्णाने डब्बा भरून दिला ना?” आणि दोघांच्या डोळ्यात आनंदाश्रू उभे राहिले.

(वरील कथानक हे पूर्णपणे काल्पनिक असून यातील नावे, स्थळ, काळ यांचे साधर्म्य हा निव्वळ योगायोग आहे असे समजावे)

6 thoughts on “भावे काकूंचा डब्बा

  1. I don’t know hoe to react, what to write. Mojkya shabdat ghanghor aashay asleli hi katha. Aaj suarvanchys hatat daba ahe. kadachit bharlelahi asel pan to bkasurachy gadya sarkha. aaj manus bakasur zala ahe. sudamyachya chimutbhar pohyane trupta honari bhuk nahi. tyala. Krushnache prem klayla krishanavar vishwas asayla hava.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s