गुलाबांचे प्रदर्शन

RoseExhibition

डोंबिवलीला प्रदर्शने आणि निदर्शने काही कमी नाहीत. दोघानांही सपाटून गर्दी होते. डोंबिवली मध्ये काही काही ठिकाणी तर कायमच प्रदर्शन भरलेले असते. डोंबिवलीतील बालभवन येथे आमदार रविंद्र चव्हाण यांनी २५ ते २७ जानेवारी या कालावधीत “डोंबिवली रोझ फेस्टिवल” आयोजित केला होता. डोंबिवली मध्ये गुलाब प्रेमींची “डोंबिवली रोझ सोसायटी” आहे. मागच्या वेळचे प्रदर्शन काही कारणास्तव बघायचे राहून गेले होते. डोंबिवलीत अश्या प्रकारचे फुलांचे प्रदर्शन क्वचितच भरते. प्रदर्शनात भाग घेणाऱ्यांचा सहभाग हाच कदाचित महत्वाचा प्रश्न असावा कारण जाणकार आणि रसिक प्रेक्षकांची वानवा नाही.

शनिवारी सकाळी प्रदर्शन बघायला जायचं ठरवलं. बोरिवलीहून भाचा आलाच होता. मी, तो आणि माझी मुलगी असे तिघे जण बालभवनला पोहोचलो. गेट मधून आत शिरल्या शिरल्या परिसरात वेगवेगळया जातीची, प्रकारांची, रंगांची गुलाबाची रोपटी विकावयास ठेवली होती. आत शिरल्या शिरल्याच आर्याने जाताना एकतरी गुलाबाचे झाड घेऊन जायचे असे वदवून घेतले. वातावरण निर्मिती तर झकास झाली होती. प्रदर्शन दुसऱ्या मजल्यावर होते. जाताना जिन्यामध्ये गुलाबाची माहिती देणारे फलक लावले होते. दर महिन्यात गुलाबाच्या रोपट्याची कशी निगा राखावी, त्याला कुठली फवारणी करावी, कुठले खत घालावे याची सविस्तर माहिती त्या फलकांवर दिलेली होती. प्रत्येक पायरी गणिक कुतूहल वाढत होतं. विशेष म्हणजे इतर प्रदर्शनात माहितीचा भडीमार करणारे जाहिरातीचे फलक कुठेही दिसले नाहीत.

प्रदर्शनाच्या दालनात शिरताच क्षणी डोळ्यासमोर जे बघितलं त्यावर विश्वास बसत नव्हता. इतके विविध प्रकारचे गुलाब मी कधीच एका ठिकाणी बघितले नव्हते. पूर्ण दालन गुलाबमय झालं होतं. विविध आकाराचे विविध रंगाचे शेकडो गुलाब प्रदर्शनात ठेवले होते. त्या हॉल मध्ये नुसती एक फेरी मारली तर १ मिनिट पण नाही लागणार पण तिथे या फुलांच्या राजाला बघता बघता दीड तास कसा निघून गेला ते कळलंच नाही.

आमदार रविंद्र चव्हाण यांनी चालू केलेल्या अनेक अभिनव उपक्रमांपैकी गुलाबांचे प्रदर्शन ही डोंबिवलीकरांना एक आगळी वेगळी पर्वणीच आहे. या रोझ शो साठी पुणे, मुंबई, शहापूर, वांगणी, नागपूर ई. अनेक ठिकाणच्या रोपवाटिका, हौशी मंडळींनी सहभाग घेतला होता. १४ प्रकारचे गंध असलेली,  ४०० जातींची जवळ जवळ २५०० गुलाबांची विविध रंगी फुले प्रदर्शनात मांडण्यात आली होती. तीन दिवसांच्या या प्रदर्शनाला अंदाजे १०-१५ हजार नागरिकांनी भेट दिली. वांगणीच्या श्री. आशिष मोरे यांच्या गुलाबाला “गुलाबांचा राजा” तर श्री. विकास म्हसकर यांच्या गुलाबाला “गुलाबांची राणी” पुरस्कार मिळाले. डबल डिलाईट, रोझ ऑफ मिलेनियम (दोन कळ्यांचे एक फूल) या प्रदर्शनाचे विशेष आकर्षण होते. डोंबिवली रोझ सोसायटीच्या वतीने दरवर्षी हा उपक्रम दरवर्षी केला जाईल असा मानस आमदार रविंद्र चव्हाणांनी व्यक्त केला.

डोंबिवलीकरांना इतक्या छान छान गुलाबांच्या राज्यात फेरफटका मारायची संधी आ. रविंद्र चव्हाण यांनी त्या बद्दल त्यांचे आणि डोंबिवली रोझ सोसायटीचे शतशः धन्यवाद. डोंबिवलीत अशी अजून अनेक प्रदर्शने व्हावीत जेणे करून डोंबिवलीकरांना निसर्गाची माहिती मिळेल आणि निसर्गाबद्दल आस्था निर्माण होईल.

(माहिती स्त्रोत: मुंबई मिरर)

इयरफोन

Anuvina-Musicसध्या जलद लोकल मध्ये चढायचा अतिव कंटाळा येत असल्याने १५ मिनीटे आधी निघून धिमी लोकलने जाणे मी जास्त पसंत करतो. त्या मानाने कमी गर्दी, कमी रेटारेटी आणि बसायला मिळण्याचे अधिक चान्सेस याच काय जमेच्या बाजू.  सकाळी सकाळी मी जेंव्हा गाडीत पकडून आसन ग्रहण न करता स्थानापन्न होतो तेंव्हा  बसायला मिळालेले अर्धेअधिक जण झोपलेले असतात, काहीजणांचे वाचन चालू असते. काही रसिक तर कानात इयरफोन घालून संगीताचा आस्वाद घेत असतात. हे असे सकाळचे चित्र गेले बरेच दिवस मी बघतोय आणि आता त्याची सवय झालीये.
आज नेहेमी प्रमाणे गाडी पकडली. बरेच जण अपूर्ण राहीलेली झोप पूर्ण करत होते. इतक्या सकाळी झंकार बीट्स असलेली गाणी कोण ऐकतय याचा कानोसा घेत होतो. कर्णेंद्रीयांनी मेंदूला दिलेल्या सुचने प्रमाणे माझे लक्ष थंडीमुळे बंद असलेल्या खिडकी जवळ बसलेल्या एका कॉलेज कुमाराकडे गेले.
डोकं मागच्या बोर्डला टेकलेलं, डोळ्यावर बारीक ताड्यांचा चष्मा, अर्धोन्मिलीत डोळे, उर्ध्वगामी नजर, त्याने केलेल्या “आ” मधुन हवेचे आवाजासह चालू असलेले आवागमन, आणि तो ऐकत असलेल्या संगिताला त्याचे स्वतः दिलेले पार्श्वसंगित. याने वातावरण एकदम तयार झाले होते. आजुबाजुचे काही प्रवासी त्याच्या या मैफिलीला आपापल्या परीने डोलून, माना हलवुन दाद देत होते. कारण वाजणार्या गाण्यांचा आवाज त्याच्या पुरता मर्यादित नव्हता. निदान गाण्याचे बोल इतरांना कळतील इतपत तो मोठा होता. इतका मोठा ठणाणा कानात चालू असताना सुद्धा तो मुलगा निवांत झोपलेला होता याचंच आश्चर्य वाटत होतं. हैप्पी सिंग, मिका यांच्या गाण्यांच्या कोलाहलात माणूस झोपू शकतो या वर कुणी सांगून देखील माझा विश्वास बसला नसता.
मला नेहमी प्रश्न पडतो कानाला त्या पुंगळ्या लावून इतक्या मोठ्या आवाजात गाणी कशी ऐकता येतात. आणि कानाजवळ कोलाहल चालू असताना झोप कशी लागते. किंवा इतक्या मोठ्या आवाजात ऐकायचे असेल तर कानात इयरफोन घालायची गरज आहे का? मानवाची सर्वात जागृत इंद्रिये कान आणि डोळे. जे कानाने ऐकायला येतं त्याचा वेध डोळे घेतात. तेच जर कृत्रिमरीत्या बंद केले तर सभोवतालचे जाणिव कशी राहणार? उलट बाहेर गलका असेल तर कान बंद करून घेतो. इथे तर कानाच्या पडद्याजवळच हे सगळे ठणठणाट चालू असतात. हे कानासाठी धोकादायक नाही का? आपण ऐकतो की वाहतूक पोलीस कायम वाहनांच्या संपर्कात असतात. त्यांच्या आवाजामुळे पुढे उतारवयात त्यांना श्रवण दोष होऊ शकतो. तीच गत मोठ्या मोठ्या यंत्रांवर काम करणाऱ्या कामगारांची.
संगीत ऐकणे केंव्हाही चांगले. आपल्या मोबाईलवर वाजत असलेल्या गाण्यांचा इतरांना त्रास होऊ नये म्हणून इयरफोन वापरणे हे केंव्हाही सोयीस्कर असले तरी त्याचा आवाज मर्यादित असावा. नाहीतर एक दिवस असा येईल की गाणी तर ऐकायला येणार नाहीतच आणि इयरफोनच्या जागी श्रवणयंत्र लावावे लागेल.

———————————————————————————————————————————————

याच विषयावर अवांतर वाचायला मिळाले ते आपणासाठी देत आहे.

१. Loud music on headphones causes deafness by having a similar effect on nerves as MS
२. Bad Effects of Using Earphones
३. Earphones Potentially as Dangerous as Noise from Jet Engines, Researchers Find

(फोटो आंतरजालावरून साभार)

पाच कलमी बापू

आपल्या देशात कुठलीही दुर्घटना घडली की देशाचे स्वयंघोषीत रक्षणकर्ते आपल्या वळवळणार्या जीभा सैल सोडतात. ज्यांच्याकडे मिडीया नामक राक्षसाचे क्वचितच लक्ष जाते अश्यांना तर विषेश चेव येतो. मग कसलं तरी वाह्यात विधान करून ब्रेकिंग न्यूज बनवून हे लोक आपला कंडू शमवून घेतात. आज काल अश्या लोकांच्या कंपू मध्ये स्वयं घोषित संतांची भर पडली आहे. संत म्हणजे स्वतःची सद्सद्विवेक बुद्धि जागृत ठेवून समाजाला देवाधर्माला लावणारा माणूस. अशी एक ढोबळ समज. संत परंपरेचा सशक्त इतिहास लाभलेल्या भारतभूमीला सध्या तथाकथित बुवा, बापू, महाराज, स्वामींची बुवाबाजीची थेरं बघावी लागत आहेत हे दुर्दैव आहे. सगळ्यात आश्चर्य म्हणजे समाजातील सगळ्या थरातील माणसे त्यांच्या (अ) विचारांचे अंधानुकरण करतात. इतके आहारी जातात की खांद्यावर मेंदू नसून मातीचं मडकं आहे की काय असं वाटतं. ४ मडकी जमतात आणि बुवाच्या तालावर नाचू लागतात. बुवा आपलं नाणं अश्या मडक्यांवर यथेच्छ वाजवुन घेतात.

दिल्लीत घडलेल्या एका दुर्घटनेच्या पार्श्वभुमीवर देशातील दोन बापूंनी अकलेचे तारे तोडले. मागच्या लेखात वयाने ज्येष्ठ असलेल्या भरघोस दाढी असलेल्या बापूंनी आपल्या भक्तांसाठी एक कलमी उपाय जाहिर केला. कुणी पुरूष बलात्कार करावयास आला की लगेच त्याला भाऊराया अशी आर्त हाक मारायची. अश्याने त्याच्या वासनेच्या आगीवर थंडगार पाणी पडेल आणि तो तुम्हाला त्वरित सोडून देईल. सगळे भक्त गहिवरलेना त्याचे. असा नामी उपाय सांगितल्याने त्यांना या बापूला कुठे ठेवू आणि कुठे नको असं झालं असणार.

याला काय अर्थ आहे? या कलम प्रमाणे ती मुलगी वाचेल हो पण त्या नराधमाचे काय? तो मोकाट सुटलेलाच आहे. त्याच्या तावडीत अशी एखादी अबला सापडली जिला हा कलम वापरताच आला नाही तिचं काय? तिथे बलात्कार नक्की. छे छे हे काहीतरी भलतेच. नराधमाला शिक्षा ही झालीच पाहीजे. असा अत्युच्च विचार फावल्या वेळात आपल्या झुपकेदार मीशांना पीळ देता देता अजून एका बापूंच्या मेंदूत चमकला. या अश्या अराजकतेला आळा बसण्यासाठी ज्येष्ठ बापूंनी सांगितलेल्या एक कलमी उपायाने काही फरक पडणार नाही म्हणून या कनिष्ठ बापूंनी ५ कलमी “उतारा” तयार केला. नुसता तयार करून गप्प नाय बसले काय…. लगेच आपल्या भक्तांना प्रवचनाद्वारे उपदेश पण केला. सगळे भक्तगण एकदम निर्धास्त, निश्चिंत, निर्भीड (अजून काही निकारांत, अकारांत शब्द लावायचेत ते लावा.) झाले. बरं हे उपाय फक्त आपल्या भक्तांसाठीच मर्यादित न ठेवता त्यानी विवीध माध्यमातून आंतरजाळात पसरवले. अर्थात प्रसार माध्यमांनी या उपायांची विषेश दखल घेतली नाही याची खंत कनिष्ठ बापूंना निश्चित वाटत असेल. कारण अजूनही ज्येष्ठ बापूंचा कलमच जास्त चर्चेत आहे. (काळजी नसावी प्रचिती आल्यावर लगेच चर्चा होईलच) जगतातील वखवखलेल्या नराधमांना गर्भीत इशारा देण्यासाठी आणि समस्त महिला वर्गाला स्वसंरक्षणाची माहिती मिळावी या उदात्त हेतुने या ५ कलमांचा पंच इथे देत आहे. (वाचकांनो वाचाल तर “वाचाल” ही उक्ती लक्षात असू द्यावी)

कलम ०१ : बलात्कारित स्त्री अथवा पुरूषाने (?) दररोज १०८ वेळा अनिरुद्ध चालीसाचे पठण केल्यास ज्या व्यक्तीने बलात्कार केला असेल ती व्यक्ती लगेच नपुंसक होईल. आणि त्याची नपुंसकता जगजाहिर होईल. त्याची सगळी कडे छीथू होईल. हे बापूंचे वरदान आहे.

कलम ०२ : जी असहाय्य स्त्री किंवा पुरूष गुरुक्षेत्रम् मंत्राचे कमीतकमी ५ वेळा पठण करील त्या व्यक्तीवर कुणीही बलात्कार करू शकणार नाही. अगदी १०० जण जरी सामुहिक बलात्कार करावयास आले तरी त्यांना ते शक्य होणार नाही असे मी वचन देतो. अश्या वेळी मी स्वतः त्यांना सामोरा जाईन. गुरुक्षेत्रम् मंत्र कसा पण म्हटला तरी मी तो दुरुस्त (?) करून घेईन आणि त्याचा फायदा त्याच व्यक्तिला होईल.

कलम ०३ : मातृवात्सल्यविन्दानम् पारायण करण्याची एक पद्धत आहे. त्याचे नित्य पठण देखिल करता येते. मातृवात्सल्य उपनिषद् पठणाला कसलेच बंधन नाही. कुठलाही अध्याय कुठल्याही क्रमाने कितीही वेळा वाचू शकता. कुणालाही दुसऱ्या व्यक्तिची भिती वाटत असेल तर त्या व्यक्तीने मातृवात्सल्य उपनिषद् मधील माता शिवगंगागौरीचे जे दोन अध्याय आहेत त्यांचे दिवसातून एकदा वाचन केले आणि माता शिवगंगागौरीची प्रार्थना केली तर त्यांचे भय नष्ट होईल.

कलम ०४ : जे अशिक्षित आहेत, तोतरे आहेत, मुके आहेत त्यांनी मनातल्या मनात केवळ ‘अनिरुद्ध अनिरुद्ध’ असं म्हटलं तरी बास. मी त्यांच्या साठी वरील सांगितलेले पठण स्वतः करीन आणि त्याचे फळ त्यांना मिळेल. हे माझे प्रॉमिस आहे.

कलम ०५ : आम्ही स्थापना केलेल्या अहिल्या संघ, बल ग्रुप आणि चंडिका आर्मी मधिल स्त्रीयांना अहिल्या संघामध्ये अशी क्लुप्ती शिकवणार आहे की ज्या मुळे तुम्ही हात लावलेली व्यक्ति कायमची नपुंसक होईल. त्या वेळी तुमची शारिरिक स्थिति कशीही असली तरी तुम्ही हे करू शकाल. अशी मी गॅरेंटी देतो.

आहाहा… किती ही तळमळ, कितीही आपुलकी, समस्त जनतेची किती काळजी करतात हे बापू. बघा बघा परत परत हे कलम वाचुन त्याची फ्रेम करून ठेवाविशी वाटते. समाजातील सगळ्या थरातील लोकांचा विचार इतका कुणीही केला नसेल. त्या मुळे त्यांच्या भक्तांमध्ये एक प्रकारचा हुरुप, एक प्रकारचे चैतन्य (बलात्कार विरोधी) संचारले आहे. प्रत्येक वीर सिंहाच्या आवेशात तर सिंह वीराच्या आवेशात वावरतो आहे. अर्थात भविष्यात किती जणींवर होणारे बलात्कार वाचले, किती जण तात्पुरते किंवा कायमचे नपुंसक झाले, किती ठिकाणी हे बापू स्वतः अवतिर्ण झाले आणि भक्तावरिल आपत्ति स्वतःवर ओढवुन घेतली)याचे दाखले वाचणे हास्यास्पद ठरू शकेल. कारण त्या साठी दृढ विश्वास हवा, बापूंवर आणि त्यांच्या या कलमांवर. बघु किती मेंदूंची मडकी होतात आणि किती मडकी फुटून परत मेंदू जागृत होतो. सद्य परिस्थिति बघता पहिली शक्यता अधिक. तरी अश्या मडके होवू घातलेल्यां साठी एक सुचना. या बुवा बापूंच्या कलमांमध्ये एक छोटा पुसट अक्षरात तारा चमकत असतो (जसा कित्येक जाहीरातींच्या तळटिपेवर असतो) तो ज्यांना दिसेल तो तरला….. बाकीच्यांचे मडके परिवर्तन निश्चित.

अवांतर : माझ्या खांद्यावर अजून मडकं फिट्ट न बसल्या मुळे काही शंका उपस्थित झाल्या आहेत.
१. कलमांचे दुरूपयोग होणार नाहीत याची खात्री काय?
२. चुकून कलमांचा वापर(?) झाल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार?
३. चुकून(?) नपुंसक झालेल्या व्यक्तीचे स्वत्व परत मिळेल का? आणि जर मिळणार नसेल तर त्याने कायद्याची मदत घेतली तर दोष कुणाचा?
४. स्त्री कडून बलात्कार (Ragging) होत असेल तर आपल्या मंत्राने ती स्त्री “नपुंसक” कशी काय होणार कारण पुं हे अक्षर पुरुष वाचक संदर्भात येतं.
५. अतिशय लहान मुली ज्यांच्यावर बलात्कार होतात ज्यांना ध्यान, जप, बापू वगैरे काहीही माहीत नाही त्या अभागी मुलीचे काय?
६. शेरास सव्वाशेर असतोच असं जर मानलं तर समोरची बलात्कार करणारी व्यक्ती देखील दुसरा कुठला तरी किंवा वरील कलमांपैकी मंत्र म्हणत असेल तर.

थोडक्यात काय तर रेल्वेच्या डब्यात अगदी कस्पटासमान स्टीकर चिकटवले असतात वेगवेगळया बाबांचे (राजा बाबा बंगाली, बाबा मयूर खान ई.ई.) जे आपल्या कर्माची अशीच हमी आणि वाचने देतात त्यांच्याच लायनीत या बापूचे स्थान आहे. त्यामुळे ज्यांच्या खांद्यावर अजूनही मेंदू शाबूत आहे त्यांनी दुर्लक्ष करणेच उचित. ज्यांनी मनापासून ठरवलंय की मडकच व्हायचं अश्यांसाठी दुसरा बापू येण्याची वाट बघा. 😉

माहिती स्त्रोत