शेजारधर्म : चाळीचा गणेशोत्सव ०७

पुजेच्या दिवशी सकाळी नाष्त्याला नचुकता सगळी चाळ हजर होती. मधुने बेत मस्तच जमवला होता. बटाटे पोहे आणि कॉफी. नाष्टा झाल्यावर यातिल बरीच टाळकी गायब होतील आणि एकदम आरतिला किंवा महाप्रसादाला प्रकट होतील हे ओघाओघाने आलेच. असे असले तरी हे ५ जण आणि त्यांची यंग ब्रिगेड तिथेच ठाण मांडुन बसणार होती.

मागील भाग:
शेजारधर्म : चाळीचा गणेशोत्सव ०१
शेजारधर्म : चाळीचा गणेशोत्सव ०२
शेजारधर्म : चाळीचा गणेशोत्सव ०३
शेजारधर्म : चाळीचा गणेशोत्सव ०४
शेजारधर्म : चाळीचा गणेशोत्सव ०५
शेजारधर्म : चाळीचा गणेशोत्सव ०६

————————————————————————————————————————-

नेहेमी प्रमाणे बंडोपंतांनी अतिशय सुंदर रित्या सत्यनारायणाची पुजा सांगितली. केसरभाईचा भक्तिरस तर ओसंडून वहात होता. कथा चालू असताना अधुन मधून तो वर छताकडे बघत काहीतरी पुटपुटत होता. एका हाताने नमस्कार करत होता. उजवा हात सॅलूट केल्यासारखा कपाळावर ठेवायचा मग तो छातीला लावायचा आणि मग तर्जनी ओठांवर ठेउन पुचुक अपसा आवाज काढायचा. असं २-४ वेळा झालं आणि हे बघुन खुर्चीत बसलेल्या अप्पाला राहवेना. कथा ऐकता ऐकता ब्रह्मानंदी टाळी लागून डोलत असलेल्या मधुला उचकवत म्हणाला “अरे हा केसरभाई नमस्कार बघ कसा करतोय एका हातान. आणि सर्वात शेवटी पुचुक आवाज काढून चक्क देवाला फ्लाईंग पप्पी?” अप्प्यामुळे मधुची चिंतन साधना भंग झाली होती. काहीश्या त्रासीक वाणीने म्हणाला “आज काल अशीच फॅशन आहे. कपाळाला हात लावून बुद्धि देवतेला नमन, मग छातीला हात लावून प्राण देवतेला नमन आणि सर्वात शेवटी अप्सरांना फ्लाईंग किस.”मध्या तुझे चिंतन झकास चालू आहे. चिंतनातुन अप्सरांना साद घालणे छान चालू आहे. तरीच असे भलतेच अर्थ काढतोय” मधु परत डोलू लागला. जेंव्हा मधुच्या पार्श्वसंगिताची लय नाद टिपेला जायचा तेंव्हा अप्पा त्याची साधना भंग करायचा. तिथे मात्र सत्यनारायणाची नैमिषारण्यातिल कथा साधूवाणी, कलावती, त्यांचा जावई यांच्या साक्षी ने सुफळ संपुर्ण झाली. परत एकदा साग्रसंगीत आरत्या झाल्या. नैमित्तिक ५-५० आरत्यांमध्ये सत्यनारायणाची काय ती वाढली. बाकी ताल, सूरांची चढाओढ तशीच. पाठीमागे दरवळत असलेल्या पूरी, जिलबी, पुलाव अश्या सुग्रास अन्नाच्या सुवासामुळे मंत्रपुष्पांजली आटोपती घेतली असावी. आज घरातील मूदपाकखान्याला सुट्टी असल्याने महिला वर्ग अगदी नटून थटून आला होता. आज केसरभाई चाळ जेवण घालणार असल्याने सगळेच सहकुटुंब सहपरिवार उपस्थित राहून उत्सवाची शोभा वाढवत होते. सगळ्यांचे दर्शन घेऊन झाले. तिर्थप्रसाद वाटून झाला. बिल्डर पण त्याच्या चमच्या काट्यांसह हजर होता. केसरभाई ने माईकचा ताबा घेतला आणि सगळ्या चाळकरींचे आभार मानताना नाना, बाळू, अप्पा, बंडु आणि मधुचे विशेष कौतुक केले. सगळ्या उपस्थित भक्तगणांनी महाप्रसाद घेऊनच जायचे असे सांगून त्याने मोडक्या तोडक्या बंबैय्या मराठी कम हिंदीतले भाषण संपवले.

बूफे पद्धतिची मांडणी असल्यामुळे आणि जागेच्या आभावामुळे बसण्याची वेगळी व्यवस्था करणे शक्य नव्हते. असे उभ्याने जेवणाची सवय नसल्याचे बंडोपंतांनी सांगताच नाना मिश्कील हसत म्हणाला “बऱ्याच गोष्टी अजुनही उभ्याने जमतात, पण जेवण काही जमत नाही.” भुकेने आधीच त्रस्त झालेल्या अप्पाने पण मतप्रदर्शन केले “मग काय … अरे! एका हातावर हनुमंताच्या द्रोणागिरी स्टाईल मध्ये जेवणाचे ताट धरायचे आणि दुसऱ्या हाताने घास घ्यायचा. खाताना काही सांडू नये म्हणून घास घेताना प्लेट वर उचलली की हनुवटीने भातात लोळण घेतलेच समजा.” “अरे अप्पा फुकटचे ते पौष्टीक…. बुफे तर बुफे …उदरभरण झाले म्हणजे झाले …बसून काय आणि उभे राहून काय. सगळ्याची सवय असावी.” इति बंडोपंत. “वा …पंत एकदम तयारीत आलेले दिसतात. आज रात्रीची सोय पण इथूनच की काय? रिकामे डब्बे का २ वेळा जेवण?” नानाने चिमटा काढला. “नान्या, तू काही वेगळा नाहीस बरं. काल रात्री लंघन केलेंस म्हणे आज जास्तीच ढकलता यावे म्हणून. आणि वर सकाळ पासून दोन वेळा पोट रिकामे करून आल्याचे लक्षात आलंय सगळ्यांच्या.” पंतांनी नानाला सुनावले. “अरे कशाला वाद घालताय? आपण एक काम करू” आता मधु आपल्या अकलेचे तारे तोडणार इतक्यात केसरभाई आला आणि म्हणाला “बरा झाला तुमी सगडे लोग इथेच भेटला. आपण सगड्यांसाठी टेबल खुर्ची मांडली हाय. तुमच्या साठी खास.” मधुने साफ नकार दिला. “सगळे आमचे चाळकरी मित्र इकडे तिकडे उभ्याने जेवणार आणि आम्ही मात्र बसून आरामात जेवायचं. आज पर्यंत आम्ही अशी फारकत कधीच केली नाही. तुम्हाला जमणार नसेल तर तुम्ही बसा टेबल लाऊन. आम्हाला चालेल उभ्याने. केसरभाईचा नाईलाज झाला. आधी टेबल लावून बसलेला केसरभाई थोड्या वेळाने हातात ताट घेवून या पाच जणांच्या कंपू मध्ये घुसला. तसं बघीतलं तर बरेच जण ताटात मध्ये हवं ते आणि हवं तितकं घेवून आपापल्या घरी पसार झाले होते. जे उरले होते त्यांनी व्हरांड्यात बस्तान मांडले. काही जणांनी २ खुर्च्या घेवून, एका खुर्चीत ताट तर समोर खुर्चीत स्वतः स्थानापन्न झाले होते. जेवताना केसरभाई दिलखुलास गप्पा मारत होता. चाळीच्या आठवणी, भाडेकरू, त्यांचे आलेले बरे वाईट अनुभव, केसर हाईट्सचे स्वप्न, आणि आता त्या स्वप्नाची होत असलेली पूर्ती. केसरभाईला विषय पुरत नव्हते. पण जितका तो केसर हाईट्स साठी उत्साही होता तितकाच केसरभाई चाळ कायमची जाणार या कल्पनेने अस्वस्थ पण होत होता. जवळ जवळ तासभर गप्पा आणि जेवण चालू होतं.

जेवण झाल्यावर केसरभाई मधुला म्हणाला ” मधु शेठ जरा एखादी सिगरेट पाजते का सिगरेट? ” तेंव्हा तर सगळे उडालेच. सगळ्यांच्या चेहर्यावर प्रश्न चिन्ह बघुन केसरभाईने खुलासा केला ” कधी तरी मूड आला की पीते. पण माझ्या बायडी ला सांगू नको. तिला कळला तर घरात नाय घेनार. रात्री इथेच झोपायला.” असं म्हणुन हात पुढे करून बाळू कडे टाळी मागितली आणि सगळे दिलखुलास हसले. मधुने लगेच सिगरेट पाकीट काढून एक सिगरेट केसरभाईला दिली आणि एक स्वतः साठी घेतली. काडेपेटी काढून सिगरेट शिलगवणार इतक्यात बाळू ओरडला “मध्या गाढवा तुला हजारदा सांगितले गणपतिच्या मांडवात सिगरेट, विडी, तंबाकू, गुटखा, दारू, पत्ते काहीही चालणार नाही. तुम्हाला जे काही झुरके मारायचे असतिल ते घरी जावुन मार किंवा बाहेर जावुन मार.” केसरभाई आणि मधु दोघे वर निघून गेले. हे दोघे जाताच बाकीचे पण पांगले. इतके सुग्रास जेवण झाल्यावर सगळ्यांचे डोळे मिटायला लागले. हिच ती वेळ हाच तो क्षण, घेवुया एक छोटीशी वामकुक्षी अश्या अविर्भावात सगळे घरी पळाले.

केसरभाई चाळीचा गणेशोत्सव ५ दिवसांचा, तसा छोटेखानी. पार्थिव गणेशाची प्रतिष्ठापना, सत्यनारायणाची पुजा, विविध सांस्कृतिक कार्यक्रम आणि शेवटच्या दिवशी विसर्जन या सगळ्या जल्लोषात ५ दिवस कसे निघून जातात तेच कळत नाही. चौथ्या दिवशी मनोरंजनात्मक कार्यक्रम झाले. मुलांसाठी विविध स्पर्धा आणि बायकांसाठी संगीतखुर्चीचे आयोजन केले होते. मोठ्या संख्येने उपस्थित राहून स्पर्धकांना प्रोत्साहन देण्याची जबाबदारी पुरूषांवर टाकली होती. मुळात स्पर्धकच कमी असल्याने फार काही नियोजन करावे लागले नाही. संगीतखुर्ची मध्ये मात्र बऱ्याच जणींनी भाग घेतला होता. सगळ्यांमधे लक्षवेधी होत्या त्या म्हणजे मालकिण भाई आणि त्यांची मॉड कन्या. पण त्या दोघींचा निभाव लागणे जरा कठीणच. मालकिण बाई….. सौ. सरला केसरभाई पटेल बऱ्या प्रमाणात स्थूल होत्या तर त्यांची कन्या कु. काजल केसरभाई पटेल यांचा पेहराव असा होता की धड पळणे शक्य नव्हते की धड बसणे. कन्या पहिल्या फेरीतच बाद झाली. तर मालकिण बाईंची दौड दुसऱ्या फेरीत संपुष्टात आली. या सगळ्या मनोरंजनात्मक स्पर्धे मध्ये प्रोत्साहन द्यायला उपस्थित असलेल्या चाळकऱ्यांची मात्र जबरदस्त करमणूक होत होती. शिडशिडीत बांध्याच्या सरखोत बाई बाकीच्या तरुणींच्या नाकावर टिच्चून संगीतखुर्चीच्या दावेदार ठरल्या. पण या मागे त्यांच्या चपळ पायांपेक्षा म्युझिक कंट्रोलर अप्पाचा हात असावा अशी नानाची दाट शंका होती. केसरभाई चाळीचा पुनर्विकास करणाऱ्या बिल्डरच्या हस्ते बक्षिसांचे वितरण झाले. त्या नंतर त्यांनी जे काही भाषण केले ते बघता भाषणा पेक्षा याला मुकादमगिरी उत्तम जमू शकेल अशी खात्री पटली. प्रत्येक वाक्याचा संदर्भ जमीन, माती, रेती, विटा, सिमेंट, ….झालच तर कार्पेट, बिल्टअप या सगळ्यांच्या ठाई येऊन थांबायचा. शेवटी असे ३-४ संदर्भासहित स्पष्टीकरण झाल्यावर टाळ्यांचा गजर काही कमी होत नाही हे बघून बिल्डर साहेबांनी त्यांचे भाषण “जय हिंद, जय महाराष्ट्र” या वाक्याने आवरते घेतले. आता याच दरम्यान काही जास्तच टाळ्या वाजवणारी काही डांबिस तरुण मंडळी होती त्यांनी “जय केसरभाय” ही आरोळी पण खपवली. 😉

सगळ्यांच्या मते या वर्षीचा केसरभाई चाळीचा गणेशोत्सव एकदम सॉलिड झाला होता. अर्थात केसरभाई रूपी कुबेराने या वर्षी गणपतीच्या उत्सवावर थोडी कृपा दृष्टी दाखवून त्याचा खजिना थोडा हलका केला होता. पैश्याची ददात नव्हती आणि खर्चाची चिंता नव्हती. केसरभाई स्वतः जातीने हजर असायचा. सगळ्यांची चौकशी करायचा. नानाला खर्चाबद्दल तर बाकीच्यांना इतर कामाबद्दल विचारायचा. मालक आणि भाडेकरू यांच्यातील दारी कमी होत होती आणि त्याचा अनुभव सगळ्या चाळकरींना येत होता. तसं केसरभाईने कधीच चाळीतील भाडेकरूंना वेठीस धरले नव्हते. आडल्या नाडल्या भाडेकरूंना तो मदत जरूर करायचा पण योग्य अंतर राखून. कारण सगळ्यांची परिस्थिती तो जाणून होता. लहानपण त्याच चाळीत गेले असल्याने वर्षोनुवर्षे राहणारे भाडेकरू आणि त्यांचा मालक केसरभाई यांच्यात एक अस्पष्ट अंधुक रेषा होती ती या गणेशोत्सवाच्या निमित्ताने पुसली गेली.

सगळे खेळ, स्पर्धा झाल्यावर टाळ्या वाजवून आणि उभ्या उभ्या जागेवर उड्या मारून दमलेला केसरभाई आपल्या मोकळ्या कपाळावरील घाम पुसत पुसत जिथे हे पाच जण उभे होते तिथे आला. “काय बाळूशेठ….मज्जा आला ना?…बरेच दिवस झाला असा धम्माल नाय केला. मी काय सांगत होते … हा… ती उद्याची विसर्जनाची सगळी तयारी झाली आहे. जसा येताना गणपती बाप्पाला आणला तसाच जाताना घेऊन जायचा विसर्जनासाठी. टेम्पो, डीजे सांगितला हाय. तुम्ही फक्त बरोबर या. बाकी सगळा माझी माणस बघून घेल. मी येते उद्या संध्याकाडी ४ वाजाला. विसर्जन झाला की मग सगळा हिशोब पण बघून टाकू.”

केसरभाई आणि सगळी मंडळी गणपती पुढे उभी राहिली. सगळ्यांनी वाकून नमस्कार केला. काही दिवसातच चाळ खाली करावी लागणार होती. हा गणेशोत्सव या चाळीतला शेवटचा उत्सव होता. केसरभाई डोळे भरून सगळी कडे पहात होता. जणू या वास्तुतल्या सगळ्या आठवणी केसरभाईंच्या डोळ्यासमोर फेर धरून नाचत होत्या. डोळ्यात दाटलेले पाणी घालवलेल्या प्रत्येक क्षणाची साक्ष देत होते. मालकीण बाईंनी केसरभाईंचा हात धरला आणि निघायची विनंती केली. ओल्या झालेल्या डोळ्यांच्या कडा पुसत केसरभाई बाहेर पडला. त्याच्या मनातील घालमेल त्याच्या डोळ्यात उतरली होती आणि सगळ्यांनी ती पाहिली होती. हे पाचही जण त्या दोघांच्या पाठमोऱ्या आकृती कडे नजरेआड होई पर्यंत बघत होते. शेवटी एखादी गोष्ट पैश्यांनी कितीही तोलली तरी त्यात गुंतलेल्या भावनांना मोल नसते हेच खरे.

——————————————————————————————————

(समाप्त)

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s