पाच कलमी बापू

आपल्या देशात कुठलीही दुर्घटना घडली की देशाचे स्वयंघोषीत रक्षणकर्ते आपल्या वळवळणार्या जीभा सैल सोडतात. ज्यांच्याकडे मिडीया नामक राक्षसाचे क्वचितच लक्ष जाते अश्यांना तर विषेश चेव येतो. मग कसलं तरी वाह्यात विधान करून ब्रेकिंग न्यूज बनवून हे लोक आपला कंडू शमवून घेतात. आज काल अश्या लोकांच्या कंपू मध्ये स्वयं घोषित संतांची भर पडली आहे. संत म्हणजे स्वतःची सद्सद्विवेक बुद्धि जागृत ठेवून समाजाला देवाधर्माला लावणारा माणूस. अशी एक ढोबळ समज. संत परंपरेचा सशक्त इतिहास लाभलेल्या भारतभूमीला सध्या तथाकथित बुवा, बापू, महाराज, स्वामींची बुवाबाजीची थेरं बघावी लागत आहेत हे दुर्दैव आहे. सगळ्यात आश्चर्य म्हणजे समाजातील सगळ्या थरातील माणसे त्यांच्या (अ) विचारांचे अंधानुकरण करतात. इतके आहारी जातात की खांद्यावर मेंदू नसून मातीचं मडकं आहे की काय असं वाटतं. ४ मडकी जमतात आणि बुवाच्या तालावर नाचू लागतात. बुवा आपलं नाणं अश्या मडक्यांवर यथेच्छ वाजवुन घेतात.

दिल्लीत घडलेल्या एका दुर्घटनेच्या पार्श्वभुमीवर देशातील दोन बापूंनी अकलेचे तारे तोडले. मागच्या लेखात वयाने ज्येष्ठ असलेल्या भरघोस दाढी असलेल्या बापूंनी आपल्या भक्तांसाठी एक कलमी उपाय जाहिर केला. कुणी पुरूष बलात्कार करावयास आला की लगेच त्याला भाऊराया अशी आर्त हाक मारायची. अश्याने त्याच्या वासनेच्या आगीवर थंडगार पाणी पडेल आणि तो तुम्हाला त्वरित सोडून देईल. सगळे भक्त गहिवरलेना त्याचे. असा नामी उपाय सांगितल्याने त्यांना या बापूला कुठे ठेवू आणि कुठे नको असं झालं असणार.

याला काय अर्थ आहे? या कलम प्रमाणे ती मुलगी वाचेल हो पण त्या नराधमाचे काय? तो मोकाट सुटलेलाच आहे. त्याच्या तावडीत अशी एखादी अबला सापडली जिला हा कलम वापरताच आला नाही तिचं काय? तिथे बलात्कार नक्की. छे छे हे काहीतरी भलतेच. नराधमाला शिक्षा ही झालीच पाहीजे. असा अत्युच्च विचार फावल्या वेळात आपल्या झुपकेदार मीशांना पीळ देता देता अजून एका बापूंच्या मेंदूत चमकला. या अश्या अराजकतेला आळा बसण्यासाठी ज्येष्ठ बापूंनी सांगितलेल्या एक कलमी उपायाने काही फरक पडणार नाही म्हणून या कनिष्ठ बापूंनी ५ कलमी “उतारा” तयार केला. नुसता तयार करून गप्प नाय बसले काय…. लगेच आपल्या भक्तांना प्रवचनाद्वारे उपदेश पण केला. सगळे भक्तगण एकदम निर्धास्त, निश्चिंत, निर्भीड (अजून काही निकारांत, अकारांत शब्द लावायचेत ते लावा.) झाले. बरं हे उपाय फक्त आपल्या भक्तांसाठीच मर्यादित न ठेवता त्यानी विवीध माध्यमातून आंतरजाळात पसरवले. अर्थात प्रसार माध्यमांनी या उपायांची विषेश दखल घेतली नाही याची खंत कनिष्ठ बापूंना निश्चित वाटत असेल. कारण अजूनही ज्येष्ठ बापूंचा कलमच जास्त चर्चेत आहे. (काळजी नसावी प्रचिती आल्यावर लगेच चर्चा होईलच) जगतातील वखवखलेल्या नराधमांना गर्भीत इशारा देण्यासाठी आणि समस्त महिला वर्गाला स्वसंरक्षणाची माहिती मिळावी या उदात्त हेतुने या ५ कलमांचा पंच इथे देत आहे. (वाचकांनो वाचाल तर “वाचाल” ही उक्ती लक्षात असू द्यावी)

कलम ०१ : बलात्कारित स्त्री अथवा पुरूषाने (?) दररोज १०८ वेळा अनिरुद्ध चालीसाचे पठण केल्यास ज्या व्यक्तीने बलात्कार केला असेल ती व्यक्ती लगेच नपुंसक होईल. आणि त्याची नपुंसकता जगजाहिर होईल. त्याची सगळी कडे छीथू होईल. हे बापूंचे वरदान आहे.

कलम ०२ : जी असहाय्य स्त्री किंवा पुरूष गुरुक्षेत्रम् मंत्राचे कमीतकमी ५ वेळा पठण करील त्या व्यक्तीवर कुणीही बलात्कार करू शकणार नाही. अगदी १०० जण जरी सामुहिक बलात्कार करावयास आले तरी त्यांना ते शक्य होणार नाही असे मी वचन देतो. अश्या वेळी मी स्वतः त्यांना सामोरा जाईन. गुरुक्षेत्रम् मंत्र कसा पण म्हटला तरी मी तो दुरुस्त (?) करून घेईन आणि त्याचा फायदा त्याच व्यक्तिला होईल.

कलम ०३ : मातृवात्सल्यविन्दानम् पारायण करण्याची एक पद्धत आहे. त्याचे नित्य पठण देखिल करता येते. मातृवात्सल्य उपनिषद् पठणाला कसलेच बंधन नाही. कुठलाही अध्याय कुठल्याही क्रमाने कितीही वेळा वाचू शकता. कुणालाही दुसऱ्या व्यक्तिची भिती वाटत असेल तर त्या व्यक्तीने मातृवात्सल्य उपनिषद् मधील माता शिवगंगागौरीचे जे दोन अध्याय आहेत त्यांचे दिवसातून एकदा वाचन केले आणि माता शिवगंगागौरीची प्रार्थना केली तर त्यांचे भय नष्ट होईल.

कलम ०४ : जे अशिक्षित आहेत, तोतरे आहेत, मुके आहेत त्यांनी मनातल्या मनात केवळ ‘अनिरुद्ध अनिरुद्ध’ असं म्हटलं तरी बास. मी त्यांच्या साठी वरील सांगितलेले पठण स्वतः करीन आणि त्याचे फळ त्यांना मिळेल. हे माझे प्रॉमिस आहे.

कलम ०५ : आम्ही स्थापना केलेल्या अहिल्या संघ, बल ग्रुप आणि चंडिका आर्मी मधिल स्त्रीयांना अहिल्या संघामध्ये अशी क्लुप्ती शिकवणार आहे की ज्या मुळे तुम्ही हात लावलेली व्यक्ति कायमची नपुंसक होईल. त्या वेळी तुमची शारिरिक स्थिति कशीही असली तरी तुम्ही हे करू शकाल. अशी मी गॅरेंटी देतो.

आहाहा… किती ही तळमळ, कितीही आपुलकी, समस्त जनतेची किती काळजी करतात हे बापू. बघा बघा परत परत हे कलम वाचुन त्याची फ्रेम करून ठेवाविशी वाटते. समाजातील सगळ्या थरातील लोकांचा विचार इतका कुणीही केला नसेल. त्या मुळे त्यांच्या भक्तांमध्ये एक प्रकारचा हुरुप, एक प्रकारचे चैतन्य (बलात्कार विरोधी) संचारले आहे. प्रत्येक वीर सिंहाच्या आवेशात तर सिंह वीराच्या आवेशात वावरतो आहे. अर्थात भविष्यात किती जणींवर होणारे बलात्कार वाचले, किती जण तात्पुरते किंवा कायमचे नपुंसक झाले, किती ठिकाणी हे बापू स्वतः अवतिर्ण झाले आणि भक्तावरिल आपत्ति स्वतःवर ओढवुन घेतली)याचे दाखले वाचणे हास्यास्पद ठरू शकेल. कारण त्या साठी दृढ विश्वास हवा, बापूंवर आणि त्यांच्या या कलमांवर. बघु किती मेंदूंची मडकी होतात आणि किती मडकी फुटून परत मेंदू जागृत होतो. सद्य परिस्थिति बघता पहिली शक्यता अधिक. तरी अश्या मडके होवू घातलेल्यां साठी एक सुचना. या बुवा बापूंच्या कलमांमध्ये एक छोटा पुसट अक्षरात तारा चमकत असतो (जसा कित्येक जाहीरातींच्या तळटिपेवर असतो) तो ज्यांना दिसेल तो तरला….. बाकीच्यांचे मडके परिवर्तन निश्चित.

अवांतर : माझ्या खांद्यावर अजून मडकं फिट्ट न बसल्या मुळे काही शंका उपस्थित झाल्या आहेत.
१. कलमांचे दुरूपयोग होणार नाहीत याची खात्री काय?
२. चुकून कलमांचा वापर(?) झाल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार?
३. चुकून(?) नपुंसक झालेल्या व्यक्तीचे स्वत्व परत मिळेल का? आणि जर मिळणार नसेल तर त्याने कायद्याची मदत घेतली तर दोष कुणाचा?
४. स्त्री कडून बलात्कार (Ragging) होत असेल तर आपल्या मंत्राने ती स्त्री “नपुंसक” कशी काय होणार कारण पुं हे अक्षर पुरुष वाचक संदर्भात येतं.
५. अतिशय लहान मुली ज्यांच्यावर बलात्कार होतात ज्यांना ध्यान, जप, बापू वगैरे काहीही माहीत नाही त्या अभागी मुलीचे काय?
६. शेरास सव्वाशेर असतोच असं जर मानलं तर समोरची बलात्कार करणारी व्यक्ती देखील दुसरा कुठला तरी किंवा वरील कलमांपैकी मंत्र म्हणत असेल तर.

थोडक्यात काय तर रेल्वेच्या डब्यात अगदी कस्पटासमान स्टीकर चिकटवले असतात वेगवेगळया बाबांचे (राजा बाबा बंगाली, बाबा मयूर खान ई.ई.) जे आपल्या कर्माची अशीच हमी आणि वाचने देतात त्यांच्याच लायनीत या बापूचे स्थान आहे. त्यामुळे ज्यांच्या खांद्यावर अजूनही मेंदू शाबूत आहे त्यांनी दुर्लक्ष करणेच उचित. ज्यांनी मनापासून ठरवलंय की मडकच व्हायचं अश्यांसाठी दुसरा बापू येण्याची वाट बघा. 😉

माहिती स्त्रोत

6 thoughts on “पाच कलमी बापू

  • धन्यवाद मिनू,
   इथे अश्या बाबा/बुवा/बापूंची कमतरता नाहीये. आणि ही लोकं देवाधर्माच्या , संस्कृतीच्या नावाखाली काही पण स्तोम माजवतात. असो. … हे चालतच राहणार. अशीच भेट देत रहा.
   आनंद

 1. आनंदा,
  ह्या बाबांची, बापूंची संख्या बघितल्यावर ‘फास्टफूड’चा जमाना असल्याची खात्री पटते. कसलेही कष्ट न करता सर्व दु:खांपासून मुक्ती मिळवण्याचा शॉर्टकट सगळ्यांनाच हवा आहे असे दिसते. मग असल्या बाबा, बापूंचे पेव फुटल्यास नवल ते काय?
  तेही शेवटी मर्त्य मानवच आहेत, त्यांचेही कुल्ले मातीचेच आहेत. ते फक्त त्याची जाणीव करून देत नाहीयेत तर सिद्ध करत आहेत त्यांच्या बाष्कळ दर्पोक्तीने. हे बरेंच नाही का?

  सोड हा त्रागा, उद्या माझ्या ब्लॉगवर एक कॉकटेल टाकतो आहे ते एंजॉय कर आणि जस्ट चील 🙂

  • ब्रिजेश …. राग किंवा त्रागा त्या संधीसाधू बापू/बुवा यांच्यावर नाही तर त्यांच्या समोर डोके गहाण ठेऊन त्यांचे अंधानुकरण करणाऱ्यांवर आहे.

 2. बरोबर आहे… दोष बापूंपेक्षा मडके-शिष्यांचा अधिक आहे.
  ज्यांनी बुवाबाजीविरूद्ध आयुष्यभर लढाई केली त्यांना देखिल संतपद देऊन, त्यांची जन्म जात शोधून काढून कम्युनिट्या बनवतात हे लोक.
  मग बापूलोक यांच्या आंधळेपणाचा फायदा घेतील नाही तर काय?!

  अवांतर शंका वाजवी आहेत!! उद्या मंत्र रूपातच बलात्कार अन प्रतिकार होऊ लागेल! तयार राहिले पाहिजे!!

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s