इयरफोन

Anuvina-Musicसध्या जलद लोकल मध्ये चढायचा अतिव कंटाळा येत असल्याने १५ मिनीटे आधी निघून धिमी लोकलने जाणे मी जास्त पसंत करतो. त्या मानाने कमी गर्दी, कमी रेटारेटी आणि बसायला मिळण्याचे अधिक चान्सेस याच काय जमेच्या बाजू.  सकाळी सकाळी मी जेंव्हा गाडीत पकडून आसन ग्रहण न करता स्थानापन्न होतो तेंव्हा  बसायला मिळालेले अर्धेअधिक जण झोपलेले असतात, काहीजणांचे वाचन चालू असते. काही रसिक तर कानात इयरफोन घालून संगीताचा आस्वाद घेत असतात. हे असे सकाळचे चित्र गेले बरेच दिवस मी बघतोय आणि आता त्याची सवय झालीये.
आज नेहेमी प्रमाणे गाडी पकडली. बरेच जण अपूर्ण राहीलेली झोप पूर्ण करत होते. इतक्या सकाळी झंकार बीट्स असलेली गाणी कोण ऐकतय याचा कानोसा घेत होतो. कर्णेंद्रीयांनी मेंदूला दिलेल्या सुचने प्रमाणे माझे लक्ष थंडीमुळे बंद असलेल्या खिडकी जवळ बसलेल्या एका कॉलेज कुमाराकडे गेले.
डोकं मागच्या बोर्डला टेकलेलं, डोळ्यावर बारीक ताड्यांचा चष्मा, अर्धोन्मिलीत डोळे, उर्ध्वगामी नजर, त्याने केलेल्या “आ” मधुन हवेचे आवाजासह चालू असलेले आवागमन, आणि तो ऐकत असलेल्या संगिताला त्याचे स्वतः दिलेले पार्श्वसंगित. याने वातावरण एकदम तयार झाले होते. आजुबाजुचे काही प्रवासी त्याच्या या मैफिलीला आपापल्या परीने डोलून, माना हलवुन दाद देत होते. कारण वाजणार्या गाण्यांचा आवाज त्याच्या पुरता मर्यादित नव्हता. निदान गाण्याचे बोल इतरांना कळतील इतपत तो मोठा होता. इतका मोठा ठणाणा कानात चालू असताना सुद्धा तो मुलगा निवांत झोपलेला होता याचंच आश्चर्य वाटत होतं. हैप्पी सिंग, मिका यांच्या गाण्यांच्या कोलाहलात माणूस झोपू शकतो या वर कुणी सांगून देखील माझा विश्वास बसला नसता.
मला नेहमी प्रश्न पडतो कानाला त्या पुंगळ्या लावून इतक्या मोठ्या आवाजात गाणी कशी ऐकता येतात. आणि कानाजवळ कोलाहल चालू असताना झोप कशी लागते. किंवा इतक्या मोठ्या आवाजात ऐकायचे असेल तर कानात इयरफोन घालायची गरज आहे का? मानवाची सर्वात जागृत इंद्रिये कान आणि डोळे. जे कानाने ऐकायला येतं त्याचा वेध डोळे घेतात. तेच जर कृत्रिमरीत्या बंद केले तर सभोवतालचे जाणिव कशी राहणार? उलट बाहेर गलका असेल तर कान बंद करून घेतो. इथे तर कानाच्या पडद्याजवळच हे सगळे ठणठणाट चालू असतात. हे कानासाठी धोकादायक नाही का? आपण ऐकतो की वाहतूक पोलीस कायम वाहनांच्या संपर्कात असतात. त्यांच्या आवाजामुळे पुढे उतारवयात त्यांना श्रवण दोष होऊ शकतो. तीच गत मोठ्या मोठ्या यंत्रांवर काम करणाऱ्या कामगारांची.
संगीत ऐकणे केंव्हाही चांगले. आपल्या मोबाईलवर वाजत असलेल्या गाण्यांचा इतरांना त्रास होऊ नये म्हणून इयरफोन वापरणे हे केंव्हाही सोयीस्कर असले तरी त्याचा आवाज मर्यादित असावा. नाहीतर एक दिवस असा येईल की गाणी तर ऐकायला येणार नाहीतच आणि इयरफोनच्या जागी श्रवणयंत्र लावावे लागेल.

———————————————————————————————————————————————

याच विषयावर अवांतर वाचायला मिळाले ते आपणासाठी देत आहे.

१. Loud music on headphones causes deafness by having a similar effect on nerves as MS
२. Bad Effects of Using Earphones
३. Earphones Potentially as Dangerous as Noise from Jet Engines, Researchers Find

(फोटो आंतरजालावरून साभार)

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s