व्हॅलेंटाईनस् डे – उत्तरार्ध

valentines_Diguव्हॅलेंटाईनस् डे – पूर्वार्ध

संत व्हॅलेंटाईनस् च्या कृपेने चिंतातूर झालेला दिगू दुकानातून बाहेर पडला. पण आज घरी बायकोसाठी काहीतरी घेऊन जायचेच हा विचार काही केल्या मनातून जात नव्हता. ड्रेस? छे …चिक्कार झालेत …. कपाट उघडलं की कोसळतील इतके. साडी?? काय समजतं त्यातलं…उगाच काहीबाही घेऊन जायचं घरी आणि दुसऱ्या दिवशी बदली करून घायची. परफ्युम??? नको … महिन्या भरात संपेल. अर्धी बाटली झंपीच वापरेल. ज्वेलरी??? शुद्ध सोन्याची परवडणार नाही 😉 आणि खोटी … (अर्र्र्र्र्र्र्र्र खोटी कसली आर्टिफिशियल म्हण आर्टिफिशियल) ते पण शक्य नाही … कारण त्या साठी स्वतः “ती” असल्याशिवाय जमत नाही. कित्ती पर्यायांचा विचार करून झाला पण दिगुच्या मनातून प्रत्येकाला नकार घंटाच वाजत होती. अंतर्मन सांगत होतं “जा घेऊन काही पण …. बायको खुश होईलच … आजचा दिवसच असा आहे” …. पण नाही असं काहीही घेऊन जाऊन चालणार नाही ….तसं असतं तर ती उशी नसती का घेतली? मला क्यूट म्हणणारी ती ललना देखील खुश झाली असती ना.

नुसत्या विचारांनी थकलेला दिगू घरच्या वाटेला लागला. काहीच मिळालं नाहीतर वाटेत एखादे भेटकार्ड घेऊ … सुवाच्य अक्षरात “प्रिये … केवळ तुझ्यासाठी” वगैरे मजकूर लिहू आणि देऊ तिला. ती घेईल समजून आपल्याला. इतके वर्ष काहीही मिळण्याच्या अपेक्षा न ठेवता जीवापाड प्रेम केलं तिने आपल्यावर. आपल्या वेंधळेपणावर, विसरभोळेपणावर कितीही बोल लावले तरी कुठलीही अवास्तव मागणी केली नाही किंवा त्यासाठी हट्ट पण केला नाही. प्रत्येक नाजूक क्षणी सावली सारखी उभी राहिली माझ्या मागे … वेळ प्रसंगी बायकोची मैत्रीण झाली, कधी आई लहान मुलाला समजावते तशी “माय” झाली. माझी सहचारिणी म्हणून दिलेल्या शब्दाप्रमाणे प्रत्येक भूमिकेला योग्य न्याय दिलेली माझी बायको … तिला माझं प्रेम न बोलताच कळेल … माझी खात्री आहे … खरं तर गिफ्ट देणं वगैरे नंतरचं …. प्रेम तर कसंही व्यक्त करता येतं …. अगदी अव्यक्त रूपात सुद्धा. विचारांचा गुंता वाढत चालला होता पावले जड झाली होती.

Gajara“साहब … मोगरा लोगे. आज व्हॅलेंटाईनस् डे है. गजरा लेलो. आप के लिये १५ रुपया फुट देती हुं.” या एका चिमुरडीच्या बोलण्याने दिगू विचारातून बाहेर आला. त्याने त्या गजरे विकणाऱ्या मुलीकडे बघितलं. गजरे असलेली परडी जवळ जवळ रिकामी झाली होती. जे काही थोडे उरले होते ते विकून घरी जायचं होतं. दिगू काही न बोलताच तिच्याकडे बघत राहिला …. डोक्यात विचारांचे चक्र फिरतच होते. युरेका स्टाईल त्याच्या मनाने “गजरा” म्हटलं आणि डोळ्यात एक चमक आली. किती आवडतो तिला गजरा त्यात सुद्धा मोगऱ्याचा. तिने केसात माळलेल्या गजर्याचा सुगंध बराच काळ रुंजी घालत राहायचा. सकाळी सकाळी ती आरश्या समोर उभी राहून गजरा माळत असायची. तिच्या नकळत पाठीमागून तिला मिठीत घेऊन त्या मोगऱ्याचा गंध त्याच्या रोमारोमात दरवळला होता. हातात गजरा घेऊन त्याचीच अनुभूती दिगू घेत होता….अगदी समाधी लागली होती. साहेब हातात गजरा घेऊन, डोळे मिटून नुसताच उभा आहे … धंद्याची खोटी करत आहे हे बघून त्या मुलीने परत नाराजीनेच त्याला विचारले “साहब लेना है क्या? माल खतम करना है. लेना है तो बोलो.” या वाक्यांनी दिगुला भानावर आणले. “दे … दोन फुट. ताजे आहेत ना? उद्या सकाळ पर्यंत टिकले पाहिजेत” दिगू पाकिटातून पैसे काढत म्हणाला. “होय साहेब…. एकदम ताजे आहेत. टिकतील उद्या सकाळ पर्यंत.” पानाच्या पुडीत गजरा बांधत ती मुलगी म्हणाली. पुडी ब्यागेत टाकण्याच्या आधी मोगऱ्याचा सुवास मनात भरून घेण्याच्या इच्छेने दिगुने ती पुडी नाकाजवळ नेली. मोगऱ्याचा वास त्याच्या शरीरात रुळायला लागला. नकळत त्याचे ओठ त्या पुडीला टेकले. “हेच ते … जे आपण इतका वेळ शोधत होतो. काहीतरी वेगळं.” मनातील सगळं किल्मिष दूर झालं. करड्या रंगाच्या धुक्याची जागा परत गुलाबी रंगाने घेतली आणि आता त्याच्या जोडीला मोगऱ्याचा सुवास देखील होता.

कित्येक वर्षात ही अमुल्य भेट आपण आपल्या बायकोला दिलीच नाही. लग्नाच्या आधी आणि लग्नानंतर कित्ती वेळा आपण तिच्या साठी गजरा घेऊन गेलो होतो. याच मोगऱ्याच्या साक्षीने वसंत फुलवले होते. मी गजरा आणत नाही म्हणून तिनेही घालणे बंद केले. कसं इतकं साधं आपल्या नजरेतून निसटून गेलं. पण गजरा हा नवऱ्यानेच आणून देण्यात वेगळीच मजा आहे. इतके वेंधळे की आपण हे पण विसरलो. असो. या एका पुडीने जुने दिवस जुन्या रात्री निश्चित जाग्या होतील. पण नुसता गजरा नाही घेऊन जायचं. त्या बरोबर कुछ मिठा तो होना ही चाहिये. एका दुकानासमोर थांबून तिला प्रिय असलेली “पर्क” घेतली. पूर्वी हीच पर्क तिने कधी लबाडीने तर कधी दांडगाईने सगळी गट्टम केली होती. आणि मग माझा राग जावा म्हणून दुसरी पर्क एकत्र खाल्ली होती (ओठांना ओठ लावून). या सगळ्या आठवणींवर स्वार होऊन दिगू घरी पोचला.

घरात शिरल्या शिरल्या झंपी येऊन दिगुला चिकटली. आज नेहेमी पेक्षा उशीर होऊन देखील बायकोने जाब विचारला नाही याचे दिगुला आश्चर्य वाटले. महत् प्रयासाने त्याने गजरा आणि पर्क आपल्या मुली पासून लपवून ठेवले. “उशीर झालाय … हात पाय धुवून जेवायला बस” असे बायकोचे मंजुळ शब्द कानावर पडले. कानावर विश्वास ठेवत दिगू सगळं आवरून जेवायला आला. ताटात प्रचंड आवडीचे गुलाबजाम बघून स्वारी एकदम खुश झाली. “तुला आवडतात म्हणून आज मुद्दाम घेऊन आले. बरेच दिवसात गुलाबजाम झाले नव्हते” काहीशी लाजत बायको म्हणाली. ऑफिस मधल्या गप्पांच्या जोडीने आजचे जेवण रंगात आले होते.

दमून भागून झंपी झोपी गेली. ज्या क्षणाची दिगू वाट बघत होता तो आला. बायको स्वयंपाकघरातील आवराआवर करून बेडरूम मध्ये आली. दिगुने हैप्पी व्हॅलेंटाईनस् डे म्हणत तिच्या ओंजळीत गजरा ठेवला. आज नको उद्या सकाळी घालते असं म्हणत असताना केवळ दिगुच्या आग्रहा खातर ती आरश्या समोर उभी राहिली. केसात मोगरा रुळायला लागला. दिगुने तिला पाठीमागून मिठीत घेतले … मोगऱ्याचा वास रोमारोमात भिनला. स्त्रीसुलभ लज्जेने तिने मान खाली करून त्याच्या छातीवर डोकं ठेऊन हळूच म्हणाली “आय लव्ह यु”. दोघांनी मिळून पर्क खाल्ली ….ओठांना ओठांचा स्पर्श करून …. सगळी बेडरूम मोगऱ्याच्या सुवासाने भारून गेली.  मोगऱ्याच्या साक्षीने पुन्हा जुन्या आठवणी जाग्या झाल्या. मोगऱ्याचा सुवास, ओठांवरील पर्कचा गोडवा आणि दरवळणाऱ्या आठवणी हाच काय तो व्हॅलेंटाईनस् डे चा उत्तरार्ध ….. बाजारातील लाल बदामाच्या आकाराच्या उशी पेक्षा मुलायम …. नाजूक….चिरकाल आठवणीत राहणारा.

10 thoughts on “व्हॅलेंटाईनस् डे – उत्तरार्ध

  1. सुंदर लेख. अश्याच बर्याच जुन्या आठवणी ताज्या झाल्या. अजून थोडे वर्णन लिहिले असते तर अजून मजा आली असती. पण एक वाईट पण वाटलं, आपल्या नंतरच्या पिढीला हि मजा / अनुभव कधी घेता नाही का येणार? आणि ह्या सर्वांना ते नसून आपणच जबाबदार नाही का?

    • अनुदिनीवर स्वागत. प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद. मुद्दाम जुन्या आठवणीत शिरत नाही nostalgic व्हायला होतं. आणि या अश्या आठवणी तर स्पेशल …. त्यामुळे नकोच. ;). जुन्या आठवणी माणसाला अधिर किंवा बधिर करतात … मी बधिर जास्त होतो. 😉
      बाकी पिढीचं म्हणाल तर ते पूर्वापार चालत आलेले आहे. आपल्या आधीच्या पिढीला जे वाटतं तेच आता आपल्याला पुढच्या पिढीसाठी वाटत आहे. जबाबदार धरण्यात काही अर्थ नाही सामाजिक चक्र आहे हे. चालायचेच.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s