हैद्राबाद बॉम्बस्फोट आणि प्रश्न

काल संध्याकाळी घरात पाउल टाकतो न टाकतो तोच माझी चिमुरडी पोरगी धावत आली. “बाबा तुला माहितीये का??? हैद्राबाद मध्ये २ बॉम्बस्फोट झाले. बरीच लोकं देवाघरी गेली”. बॉम्बस्फोट झाल्याच्या बातमीने मी हादरलोच (खरं तर बॉम्बस्फोटाच्या मानसिक संवेदना त्याच दिवशी मेल्या जेंव्हा मुंबई मध्ये दहशतवाद्यांनी अमानुष बॉम्बस्फोट घडवून आणले.) पण जास्त धक्का बसला तो ‘ही बातमी माझ्या ७ वर्ष वयाच्या मुलीने दिली’ याचा. अश्या मुलीने, जीने अजून तरी “देवाघरी जाणे” हे प्रत्यक्षात बघितलेले नाही इतकेच काय तर साधा दिवाळीतला बॉम्ब देखील फोडला नाहीये. या बातमीने तिच्या कोवळ्या मनात नको ते कुतूहल जागं केलं. प्रत्येक घरात जिथे लहान मूल आहे तिथे हे प्रश्न पडले असणार. हा वेगळा बॉम्ब कुठला? हे दहशतवादी कोण? ते कुठे राहतात? पण मग इंडिया मध्येच का बॉम्ब फोडतात. त्यांना हाकलवून का देत नाही? पोलीस काय करतात? फाशी म्हणजे काय? तू का नाही काही करू शकत?(या वयातल्या मुलांसाठी त्यांचा बाप म्हणजे सर्वशक्तिमान व्यक्तिमत्व…पण या सगळ्या प्रश्नांपुढे ती प्रतिमा किती फोल आणि फसवी असते हे कोण सांगणार?)

या बातमीच्या अनुषंगाने आता तिच्या मनात घर करून असलेल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मला द्यावी लागणार होती. ती दिली … अगदी तिला ज्या पद्धतीने समजेल आणि मला ज्या पातळीवर जाऊन समजावता येईल त्या पद्धतीने. मग Good Boy/Bad Boy, बॉम्ब, या बॉम्ब ने माणसे का मरतात ई.ई. तिला समजेल असं सांगून झालं. तिच्या बौद्धिक स्थितीचे समाधान झाल्यावर ती तिची खेळायला लागली. एखाद्या घटनेचं गांभीर्य ज्या वयात नसावं अशी अपेक्षा असते त्याच वयाची ती माझी पोर. आई बाबांच्या आजी आजोबांच्या कवचात सुरक्षित होती. पण आजूबाजूला घडणाऱ्या घटनांमुळे आणि कोवळ्या वयात पडणाऱ्या तिच्या प्रश्नांमुळे माझं मन मात्र अस्वस्थ होत होतं. बॉम्बस्फोट झाल्याच्या बातमीने नाही पण मुलीच्या प्रश्नांनी. अस्वस्थ करणारे तिचे प्रश्न…. इतक्या कोवळ्या वयात तिला पडलेले प्रश्न….. कधीही माग न सापडणारे प्रश्न….कायम पाठ पुरवणारे प्रश्न.

असे प्रश्न माझ्या बालवयात नव्हते … कधीच नव्हते. बॉम्ब म्हणजे केवळ सुतळी बॉम्ब … दिवाळीत वाजवण्याचा… ज्याने प्राण हानी होण्याचे प्रसंग खुपच कमी. साधा दिवाळीतला बॉम्ब कसा बनवतात हे माहित नाही तर खराखुरा माणसे मारणारा घातकी बॉम्ब कसा बनवतात किंवा का बनवतात याचं उत्तर गुगल महाराजांकडे देखील नसेल.

आमच्या वेळी स्त्री वर अत्याचार या एका शब्दावर बातमी संपायची. पण आता त्याच अत्याचाराला शब्दांचे पाय फुटले. त्याचे वर्गीकरण झालय …. विनयभंग, हुंडाबळी, बलात्कार, चारित्र्यहनन, भृणहत्या ….. अजून भविष्यात देखील होईल. मग यातला फरक काय? काय सांगणार तिला??? आणि कसं सांगणार? त्यासाठी आपल्या स्वतःला त्यातले बऱ्याच शब्दांचे खरे अर्थ माहित असावे लागतात ना. जुन्या चित्रपटातील प्रणय प्रसंग बघताना हक्काचा सीन म्हणजे फुलला फूल टेकणे, मंद संगीत चालू होऊन नायक नायिकेला मिठीत घेणं इतपतच. पण सध्यातर सध्या घरगुती धारावाहीकात देखील चुंबनापासून ते पार बेडरूमच्या बेड वर प्रणयक्रीडा दाखवल्या जातात. आता जो प्रकार समोर चालला आहे तो का? कश्यासाठी? याचे उत्तर काय ते सिरीयलवाले देणार?

कालमानानुसार पडणाऱ्या प्रश्नांचे स्वरूप देखील बदललंय. बऱ्याच प्रश्नांची उत्तरे देखील माहित आहेत पण खंत याचीच वाटते की प्रश्न विचारणाऱ्याच्या पातळीवर जाऊन त्याची उत्तरे मिळत नसल्याची. भाबडेपणाने त्यांनी विश्वास ठेवावा आणि आपण त्यांचे बालपण वाचवण्यासाठी हातच राखून धादांत खोटं बोलावं. असे प्रश्न तर बरेच आहेत … अनेक अजाणत्या मनांना पडलेले. आणि त्याची उत्तरे म्हणजे रुतलेला काटा निघून गेलातरी आत सलत असलेल्या तुसासारखे, कायम वेदना देणारे.

10 thoughts on “हैद्राबाद बॉम्बस्फोट आणि प्रश्न

  1. आजकाल पालकत्व सोपे राहिलेले नाहीये आनंद… मुलांना अनेक मार्गाने नको ती माहिती मिळतेय….
    अनेक अनेक प्रश्नांचा रोजचा रतीब आहे हल्ली, आणि उत्तरं देतांना आपली तारांबळ …. 😦 😦

      • जाणीवा प्रगल्भ होण्यासाठी अश्या मार्गांची खचित अपेक्षा नाही. दहशतवाद, अराजक या बद्दल आपण काही करू शकत नाही पण टीव्ही आणि इतर मिडिया वर निश्चित अंकुश ठेवू शकतो.

    • उत्तरं देताना तारांबळ उडते ते म्हणजे त्यांच्या आणि त्यांना समजेल अश्या भाषेत देताना. आणि नको ते मार्ग म्हणशील तर खरंच आहे तुझं. पण ते बंद करण्याचे दरवाजे मात्र आपल्या हातात नाहीत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s