इंपॉर्टन्स फॅक्टर – भाग ०१

सकाळी सकाळी एका मित्राचा फोन आला. तसा जवळचा पण संपर्क क्षेत्राच्या पलीकडचा. माझे सगळेच मित्र तसे जवळचेच…कारण माझं कुठलाच नातं “लांब वरचं” नसतं. एकदा नातं/मित्र म्हटला की जवळचा लांबचा अशी फारकत मला जमतच नाही. त्यामुळे बरेच धड आणि चिंध्या देखिल भराभर असा प्रकार. आता बरेच दिवसांनी या महाभागाने फोन केला म्हणजे काही कामासाठीच केला असणार हे गृहीतच आहे, नाही का? अन्यथा सकाळच्या धावपळीत कोण कोणाला फोन करत बसणार? माझे ठोकताळे काही अजिबात चुकले नव्हते. आधी अवांतर गप्पा मारून झाल्यावर त्यांनी त्याची “निकड” मला सांगितली आणि हे काम तूच करू शकतोस याची खात्री आहे असं छातीठोक पणे सांगितलं. झालं …. त्याची निकड माझ्या खांद्यावर. मग ते काम पुर्ण होतं की नाही हा मुद्दा निराळा. पण माझं अंतर्मन सुखावतं. त्याने बऱ्याच दिवसांनी केलेल्या फोन मुळे म्हणा किंवा त्यांनी दिलेल्या इंपॉर्टन्स मुळे म्हणा. कामाच्या वेळी, अडचणीच्या वेळी त्याच्या शेकडो मित्रांमधे माझी आठवण येते हाच माझा इंपॉर्टन्स फॅक्टर.

असे माझे बरेच मित्र, नातेवाईक आहेत ज्यांना याच इंपॉर्टन्स फॅक्टर मुळे बरेच वेळा माझी आठवण होते. अर्थात मला त्याचे काहीच वाटत नाही कारण आमच्या तिर्थरूपांनी सांगितले आहे, आनंदाच्या क्षणी पार्ट्या मागणारे आणि झोडणारे सगळेच मिळतील पण खांदे देणारे कमी तस्मात आनंदाच्या क्षणी नाही जायला जमले तरी हरकत नाही दुःखाच्या वेळी मात्र मदतीला पुढे हो. माणसाची किंमत सोहळ्यात उठलेल्या पंक्तींपेक्षा अष्म्यावर अंगठ्यावरुन पाणी सोडण्यासाठी झालेल्या गर्दी वरुन करावी. अर्थात हे सगळे त्या इंपॉर्टन्स फॅक्टर वर अवलंबून असते.

प्रत्येक माणसात एक “इंपॉर्टन्स फॅक्टर” असतोच असतो. आणि त्याच्या आजुबाजुला हा इंपॉर्टन्स फॅक्टर जाणणारे, त्याचा फायदा करुन घेणारे बरेच जण असतात. अर्थात ते सगळे देखिल कुणाचा तरी इंपॉर्टन्स फॅक्टर असतातच ना. हि सगळी यंत्रणा प्रत्येक मेंदू मध्ये देवानेच कार्यान्वीत केलेली असते. मेंदूच्या कुठल्यातरी कोपर्यात मित्र/व्यक्ति आणि त्यांचा इंपॉर्टन्स फॅक्टर अश्या रकान्यात माहिती साठवली जाते आणि वेळ प्रसंगी हिच माहिती वापरुन कार्यभाग साधला जातो. माहितीचा योग्य वापर करून घेण्याचे कसब मात्र सगळ्यांकडे असतेच असे नाही बरं का. अडचणीच्या वेळी एकाच प्रकारचा इंपॉर्टन्स फॅक्टर असणारे बरेच असतिल तर मात्र वर्गवारी चालू होते. खरेदी संकेतस्थळावर नाही का आपण एखादी वस्तु निवडतो आणि पैसे देण्या आधी सवलती, निःशुल्क पोच, इतर ग्राहकांनी दिलेले मानांकन अश्या अनेक बाबींचा विचार करुन आपली खरेदी पार पडते.

या इंपॉर्टन्स फॅक्टर चे दुष्परिणाम पण आहेतच. मित्रांना मदत केल्यावर आपला इंपॉर्टन्स फॅक्टर सुखावत जरी असला तरी बरेच वेळा आपला कामा पुरता मामा मात्र होतो. बरेच वेळा असं पण होतं की नेमके आपल्या निकडीच्या वेळी मात्र मदतीला कुणाचाच इंपॉर्टन्स फॅक्टर उपलब्ध नसतो. आणि मग “तु सगळ्यांच्या मदतीला जा धावत… अगदी आपली कामं टाकुन…. पण जेंव्हा आपल्याला गरज असताना कुणी विचारतं तरी का?” किंवा “जरा कुणी मदत मागितली, स्तुति केली की लगेच हरभर्या वर चढायला तयारच असतोस.” अश्या ठेवणीतील घरच्या आहेराने सुरूवात होते. या वर जर तुम्ही अजून काही स्पष्टीकरण करणार असाल तर थांबा…. हि चुक कधीच करु नका. बायको कडे संदर्भा सहीत स्पष्टीकरणाचा सगळा तपशील तव जिव्हेवर नांदत असतो. मग दोन तिन दिवस आपलाच इंपॉर्टन्स फॅक्टर घेऊन हाताची घडी तोंडावर बोट या संसार योग साधनेत घालवावे लागतात.

मला बरेच मित्र आहेत ज्यांनी माझे, माझ्या मैत्रीची वर्गवारी ‘जिवलग’ ‘जवळचा’ ‘सखा’ ते अगदी ‘कामापुरता’ इतक्या विविध रकान्यात केली असेलही. पण मैत्रिणींना मात्र मी जरा दूरच ठेवतो. ;). कारण अश्या कामांमुळे कधी कधी बिकट प्रसंग उभा राहण्याची शक्यता जास्त. “सख्याहरी” म्हणून लटकतील आणि आपली बासरी वाजेल. कारण मैत्रिणींच्या पाठोपाठ मग त्यांच्या खास मैत्रिणी पण असतात कुणी लटकवून घ्यायला आहे का या शोधात. मला माहित आहे या वाक्याने मी माझ्या बऱ्याच मैत्रिणींचा रोष ओढवून घेतोय असं तुम्हांला वाटेल. पण तसं काही नाही …. कारण मुळात मैत्रीणीच अत्यल्प असल्यामुळे काही वोशेष फरक पडत नाही. काळजी नसावी. त्यामुळे काहींच्या दृष्टीने मी खडुस, हेकेखोर, फटकळ, गर्विष्ठ असु शकतो (नाही नाही … आहेच)… कारण त्यांना माझ्या इंपॉर्टन्स फॅक्टरचा उपयोग झाला नसावा. बाकी गुणसूत्रांमुळे काही स्वभाव वैशिष्ट्ये आली आहेतच. वाढत्या वयामुळे म्हणा किंवा अजून कश्यामुळे पण सध्या शक्ती पेक्षा युक्तीची मागणी वाढली आहे.

क्रमशः

5 thoughts on “इंपॉर्टन्स फॅक्टर – भाग ०१

  1. एक सुंदर संकल्पना जी आजूबाजूला अस्तित्वात आहे, तिला योग्य रुपात शब्दात पकडल्याबद्दल अभिनंदन!

    फक्त एक निरीक्षण – ‘मित्रांना मदत केल्यावर आपला इंपॉर्टन्स फॅक्टर सुखावत जरी असला’ ह्या वाक्यातील इंपॉर्टन्स फॅक्टर चा वापर काहीसा बरोबर वाटला नाही.

    • धन्यवाद आदित्य पाटील. अनुदिनीवर स्वागत. संकल्पना या पेक्षा ही वृत्ती आहे. आणि ही वृत्ती आहे म्हणूनच आपण एकमेकांना मदत करतो. संतांनी नाही का म्हटले आहे “एकमेका साह्य करू अवघे धरू सुपंथ”.
      तुमचे निरीक्षण आवडले. “इंपॉर्टन्स फॅक्टर” हे शब्द केवळ या लेखाचे शीर्षक असल्यामुळे वापरले आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s