इंपॉर्टन्स फॅक्टर – भाग ०२

इंपॉर्टन्स फॅक्टर – भाग ०१

————————————————————————————————

माझ्या कठीण प्रसंगी मला मदत करणारे खास मित्र आहेत किंबहुना ज्यांच्या कडे मी हक्काने मदत मागू शकतो असे. काही जुने बालपणापासून तर काही नुकतीच ओळख झालेले. खरं तर ऋणानुबंधाला कालमर्यादा नसते, तो तर तुमच्या पूर्व पुण्याईच्या योगांचे फलित असतं. लग्नाच्या गाठी जर स्वर्गात बांधल्या जात असतील तर त्या गाठीवर अक्षता टाकायला हेच साथीदार हजर असले पाहिजेत असं माझं ठाम मत आहे. अश्याच काहींचा नामोल्लेख न करता हा लेख पूर्ण होवूच शकत नाही. खरं तर प्रत्येक व्यक्तीमत्वावर एक स्वतंत्र लेख होऊ शकतो.  अनन्य साधारण महत्व त्यांना माझ्या जीवनात. माझा इंपॉर्टन्स फॅक्टर हा बहुतांशी त्यांच्या इंपॉर्टन्स फॅक्टरवरच अवलंबून आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही.

तुमचा संसार गाडा व्यवस्थित चालवायचा असेल तर या गाड्याची चाकं मजबूत आणि सारथ्य कसदार लागतं. इथे मी प्रचंड भाग्यवान. गाड्याची चाकं एकदम मजबूत आणि सारथी देखील जबरदस्त. संसाराची वेल तिनेच वाढवली जोपासली आणि आता त्याची रसाळ गोमटी फळे घेऊन झाड डवरलेलं बघितलं की हा जन्म सार्थकी लागल्या सारखं वाटतं. जन्मोजन्मी हीच बायको मिळावी म्हणून नवरोजींसाठी कुठले व्रत वगैरे आहे का याचा शोध सध्या चालू आहे. बाकी प्रेम, आपुलकी, जिव्हाळा यांच्या बरोबरच शाब्दिक चकमकी, राग, वाद-विवाद असे नात्यांचे रंगीबेरंगी पदरांची वीण मस्त जमून आलीये. निंदकाचे घर असावे शेजारी असं म्हणायची कधी गरजच भासली नाही. काय बरोबर पेक्षा काय चुकलंय याचा शाब्दिक आहेर घरातूनच मिळतो. त्यामुळे अश्या कामांसाठी आपल्याला कुणी मित्र नाही याची तिळमात्र खंत वाटत नाही कारण हे काम माझी मैत्रीण कम प्रेयसी कम बायको अगदी आत्मीयतेने करत असते. 😉

नातेवाईकांमध्ये फार कुणी जवळचे नाहीत. (हे वाक्य “कुणासाठी मी विशेष जवळचा नसावा” किंवा “कुणाला माझ्या इंपॉर्टन्स फॅक्टरशी काही घेणं देणं नसावे” असं वाचावं) कुणाचा कोण, अमुकचा तमुक, ह्याचा तो, त्याची ही वगैरे वगैरे ही सगळी नाती तुमच्या जन्मताच शेपटासारखी चिकटलेली असतात. बरेचदा तुम्ही मोठेपणी कोण झालात यावर देखील चिकटणे जास्तच दृढ होतं. भावंडे, बहिणी, आत्या, मामा, मावश्या, काका, काकू ही सगळी नाती आपल्या जन्माला यायच्या आधीच विधात्याने पेरून ठेवलेली असतात. पेराल तसे उगवते म्हणतात ते याच करिता. देवाने पेरून ठेवलेली नाती इथे जमिनीवर आपल्या आजूबाजूला उगवलेली असतात. माझ्या काहीश्या फटकळ(?), विक्षिप्त(?) आणि कुठल्याही गोष्टीला “का?” विचारण्याची सवय असल्याने माझ्या आधीच्या पिढीतील नातेवाईक जरा लांबच राहतात. तरी जसं प्रत्येक गोष्टीला अपवाद असतात तसच या नात्यांमध्ये पण अगदी बोटावर मोजण्या इतपत का होईना आहेतच. घरातल्या कुठल्याही छोट्या मोठ्या कार्यक्रमाला आवर्जून मदतीला असणारा माझा अनिल दादा (श्री. अनिल दिवाकर बर्वे) हा सर्वात जवळचा. हा सोबतीला असला की कुठलीही चिंता नसते. छोटा हृषीकेश पण असाच. कुठलाही आडपडदा न ठेवता स्पष्ट बोलणारा. २० वर्षे अंतर असलेले सख्खे चुलत भाऊ आम्ही, पण हे अंतर कधीच जाणवत नाही. रत्नागिरीचा विनय हा जरी नावाप्रमाणे नसला तरी आमचं चांगलं जमतं. या तिघांबरोबर कुठल्याच प्रकारचा “फॅक्टर” आड येत नाही … नातं असून सुद्धा.

मित्र परिवार संख्येने जरी मोठा असला तरी हितगुज मात्र फार थोडेच जण जाणतात. अर्थात या प्रत्येक व्यक्तीवर एक स्वतंत्र लेख होऊ शकतो इतके ते सगळे खास आहेत. अगदी बालवर्गापासून सोबत असलेला अमित भुस्कुटे, त्यानंतर पाचवीत भेटलेला अमोल दाबके माझे जिवाभावाचे सोबती. अजून एक होता, दीपक कोकजे, बहुतेक त्याच्या इंपॉर्टन्स फॅक्टरची गरज देवाला जास्त होती म्हणून तो काही वर्षांपूर्वीच देव दरबारी रुजू झालाय. अमोल किंवा अमित माझ्याबरोबर आहेत किंवा मी त्यांच्या बरोबर आहे असं म्हटल्यावर घरी काळजी नसायची. कॉलेज, कट्टा, नाक्यावरचे मित्र बहुधा लग्न (त्यांचे किंवा आपले) झाले की दूर होतात पण त्यात सुद्धा जे टिकून राहतात ते खरे मित्र … अडचणीच्या काळात मदतीला येणारे. ;). नागांव मध्ये असाच एक वल्ली भेटला. कामाच्या निमित्ताने एकत्र कधी आलो आणि चांगले मित्र कधी झालो ते कळलेच नाही. हेमंत रिसबूड ही व्यक्ती म्हणजे पु.लं.चा नारायणच. “नाही” हा शब्दच नाही त्याच्या कोशात. पर्णिल चितळे हा अजून एक मनाजोगा मित्र. तोच बिचारा नेहेमी काही ना काही अडचणीत असतो. पण तरीही …..

एका प्रकल्पाच्या कामात भिवंडीच्या मंदार लेलेची भेट झाली. आधीच भिवंडीचा आणि त्यात वर लेले (एकाक्षरी एकारांती चित्तपावन कोकणस्थ) … आधी जरा दबकूनच होतो त्याच्या बरोबर. पण नंतर मात्र भट्टी छान जमली. काही सल्ला हवा असेल तर त्याला फोन करावा आणि त्याचा शब्द प्रमाण मानावा इतकी संगत जमली त्याच्या बरोबर. त्याची ओळख होऊन फार फार तर २ वर्षे झाली असतील पण असं वाटतं कित्येक वर्षांची सोबत आहे.

माझी ऑफिस मध्ये कधीच कुणाशी मैत्री अशी झाली नाही. एका ठराविक पातळीवर सगळ्यांशीच व्यावहारिक संबंध टिकवून होतो आणि आहे. कामासाठी यावं, काम करावं आणि निघून जावं हाच शिरस्ता असल्याने कुणाच्या मैत्रीत वगैरे अडकलो नाही. कारण तिथले सगळेच मित्र बाटली पुरते मर्यादित. या टाईम्स ऑफ मनी मध्ये मात्र एक अवलिया भेटला. दादर हिंदू कॉलनीत राहणारा जयदीप सावंत उर्फ जेडी. खूप धम्माल केली आम्ही दोघांनी. त्याच्या कामात एकदम नीटनेटका आणि जाणता असलेला जेडी कधी कधी बाळबोध प्रश्न विचारून मला बुचकळ्यात टाकायचा.

आधी म्हटलं त्या प्रमाणे मला मैत्रिणी जवळ जवळ नाहीतच. ज्या एक दोन आहेत त्यांनी मात्र आमची मैत्री अजून जपली आहे. इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स मधून वनस्पतीशास्त्रात M.Sc. करत असताना तिची भेट झाली. अर्चना अष्टेकर गोवा विद्यापीठातील प्रथम क्रमांकाची विद्यार्थिनी. खूप मदत करायची मला … ३-४ जणांचा छान ग्रुप जमला होता आमचा. कालमानपरत्वे सगळे आपापल्या क्षेत्रात निघून गेले पण डॉ. अर्चना अजून संपर्कात आहे. तृप्तीची ओळख फेसबुक वर झाली….अचानक. तशीच अचानक बातमी कळली की ती म्हणजे माझ्या परम मित्राची, अमितची होणारी सहचारिणी. त्यामुळे ही मैत्री नुसतीच मैत्री राहिली नाही. (आता या मुळे अमित जरा लांब गेला … पण ते ठीक आहे.) 😉

हे सगळे कोण होते, कुठून आले, कश्यासाठी आले हे सगळं माझ्या दृष्टीने गौण आहे. मला महत्वाचा आहे तो ऋणानुबंध …आमच्या मैत्रीचा. यांच्या बरोबरची मैत्री ही एका अश्या पातळीवर पोचली आहे की जिथे “इंपॉर्टन्स फॅक्टर” कुठेही आडवा येत नाही. किंबहुना असा कुठलाही फॅक्टर या सहजीवनात नाहीच. आपल्या आयुष्यात चांगली माणसे भेटणं आपण आपले पूर्वसुकृत समजतो. आणि माझ्या कडे असलेली यादी बघता माझं पूर्वसुकृत निश्चितच उत्तम आहे. बाकी इंपॉर्टन्स फॅक्टर म्हणजे कुणाचे तरी राहिलेलं देणं समजावं आणि कर्म करत राहावं म्हणजे पुढील जन्माच्या पुर्वसुकृताची चिंता मिटते. 😉

समाप्त.

4 thoughts on “इंपॉर्टन्स फॅक्टर – भाग ०२

    • असेच अजून काही मित्र खूप दूर गेल्यासारखे भासतात. कारण काही नाही …. प्रश्न नेहेमी आधी संपर्क कुणी करायचा याचाच असतो. मला पण सगळ्यांना फोन करायचेत …. बहुतेक त्या उर्मितूनच या लेखाचा उगम झालाय. असो योग येतील तेंव्हा येतील.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s