नानीची टांग

नोकरदार माणसाची सकाळची घाई म्हणजे तारेवरची कसरत असते. मुंबईच्या उपनगरातील आणि त्यातही डोंबिवलीतील माझ्यासारख्या चाकरमानी माणसाची घाई म्हणजे बघायलाच नको. ….तारे खालची कसरत….(वरच्या तारेला चिकटून लोकल धावत असते ना म्हणून तारे खालची). घर ते रेल्वे स्टेशन हा प्रवास तर कसरत, सर्कस, कबड्डी/खो खो असे मैदानी खेळ, झालच तर लांब उडी, उंच उडी या आणि अश्या अनेक मैदानी खेळांची अनुभूती देऊन जातो. त्याची सुरुवात अगदी घराखालूनच होते. सकाळी सकाळी कचऱ्याच्या डब्यांवर ताव मारत असलेल्या किंवा काहीच काम नसल्याने आळसावून पसरलेल्या कुत्र्यांना चुकवायचे असेल तर लांब उडी उंच उडी याच बरोबर १०० मी. धावणे असे प्रकार करावे लागतात. तीच गत रस्त्यावर मार्गक्रमण करणाऱ्या रिक्षा आणि इतर वाहनांबरोबर होते. तिथे तर इतर खेळांच्या प्रकारांच्या साथीला कबड्डी आणि खो खो पण खेळावे लागतात. त्यात सुध्दा जर कोणी कुणाला भोज्जा दिला तर बघायला नको.

बरं स्टेशन पर्यंत पोचताना आडव्या उभ्या लावलेल्या रिक्शा, फेरीवाले, आपल्या पेक्षा मंद गतीने चालणारे सहपांथस्त यांच्या मधून वाट काढणे लपाछपी आणि पकडा पकडी मध्ये जबरदस्त स्कील असावं लागतं…. नाहीतर इच्छित गाडी मिळणे निव्वळ अशक्य. डोंबिवली स्टेशनात अजून एक अडथळा असतो तो म्हणजे बिगारी कामगारांचा. अड्डा जमलेला असतो. गप्पा, चहा आणि सोबतीला पान तंबाखू च्या पिचकार्या. त्यांच्या तुन अगदी सावधगिरी ने मार्ग काढावा लागतो. नाहीतर ४-५ जणांशी कुस्ती खेळण्याची तयारी ठेवावी.

असाच एका रम्य सकाळी सगळ्यांचा ससेमिरा चुकवुन रेलवेच्या जीन्या जवळ पोचलो. समोर गाडी येणार असल्याची उद्घोषणा चालु होती. आज आपल्याला इच्छित गाडी मिळणार या कल्पनेनेच मन उचंबळून आलं होतं. अस्सल डोंबिवलीकराचे मन अश्याच माफक गोष्टींनी फुलून येतं. वेळेवर रिक्षा मिळणे, इच्छित गाडीच्या वेळी आपण फलाटावर असणे मग गर्दी मुळे चढायला नाही मिळाले तरी हरकत नाही. पण गर्दी मुळे जर नेहेमीची गाडी चुकली तर त्याच्या पुढची गाडी पकडायला डोंबिवलीकर सरसावून उभा असतो. तसाच मी त्या फलाटावरील जनसागरात मिसळून जाण्यास आतुर झालो होतो. आता जीना आणि मी या मध्ये फक्त रस्ता ओलांडायचा अवकाश होता. दोन्ही बाजूंनी कुठल्याही प्रकारचे वाहन येत नाहीये असे बघून रस्ता ओलांडायला सुरुवात केली आणि अर्ध्यावर पोचलो देखील. आणि इतक्यात एक दुचाकी वायू वेगाने माझ्या समोरून बरोब्बर जिन्याच्या पायरी समोर उभी राहिली. क्षणभर मी जागीच थबकलो. कारण निव्वळ काही इंचांनी माझा पाय किंवा माझ्या झोळीचा पट्टा वाचला होता.

दरवाजा ते दरवाजा घरपोच गाडी असून सुद्धा इतकी घाई कुणाला झाली आहे म्हणून जरा त्या दुचाकी कडे, तिच्या चालका कडे आणि मागे बसलेल्या वाहिके कडे कटाक्ष टाकला. ३/४ विजार घातलेला विस्कटलेल्या केसांचा तो आणि ऑफिसला जाण्यासाठी नटून थाटून तयार झालेली ती. नवपरिणीत जोडपं वाटत होतं …. त्यामुळे सकाळी उशीर, ओढाताण होणार आणि नंतर घाई होणार हे लगेच कळून आलं. पण तरी देखिल त्यांनी एखाद्या मांजरी प्रमाणे आडवे जाणे मला काही रुचले नाही. थोड्याशा त्रासीक मुद्रेने मी त्यांच्या कडे बघितले. ति अजूनही दुचाकी वर बसुन होती आणि त्याच्या कानात काहीतरी गुंजन चालू होते. गुदगुल्या होऊन तो माशी प्रमाणे मानेला झटका देत होता. उगाच कबुतरांच्या जोडीला कशाला व्यत्यय आणायचा असा विचार करून मी पुढे झालो. इतक्यात त्या वाहिकेने आपला पवित्रा बदलला …. एक पाय जमिनीवर टेकला आणि दुसरा पाय कागदावर कर्कटक फिरवावे अश्या रीतीने फिरवला. आणि तो पाय …त्या पायात अडकवलेल्या उंच टाचांच्या चपले सकट जमिनीवर टेकायच्या आधी माझ्या हातावर आदळला. आपला पाय जमिनीवर येण्याच्या वाटेत कुठेतरी अडखळला आहे …. कुणा एका मर्त्य माणसाला तिने अजाणते पणे लाथ मारली आहे हे तिच्या ध्यानातही आले नाही. ती परत गुटर्गुम करायला नवऱ्या जवळ चिकटली.

आता मात्र हद्द झाली….. मला वाट अडवून गेलेली ती स्वारी सकाळी सकाळी मला असा प्रसाद देईल असे स्वप्नात सुद्धा नव्हते. आणि वर साधं सॉरी देखील नाही. हे म्हणजे अतीच झालं ना…. इंग्रजांनी लज्जेखातर दिलेले दोन शब्द सारखे फेकत असतात मग खरंच जर चूक झाली असेल तर निदान माफी तरी मागावी. मी एक पायरी चढलेला तसाच थांबलो आणि मागे वळून पहिले तर अजून त्यांचे गुंजन चालूच होते. त्यांच्या जवळ गेलो …..तेंव्हा त्या चालकाला उपरती झाली अतिशय आदबीने तो म्हणाला “सॉरी सॉरी …. तुम्हांला पाय लागला ना?” मी ही तितक्याच आदबीने म्हणालो “नाही … तुमचा पाय लागला नाही …. पण तुमच्या मागे बसलेल्या होत्या त्यांची लाथ लागली ….. सॉरी खरं तर त्यांनी म्हणायला हवे …. नाही का?” आणि शेवटी तिने कसं बसं सॉरी म्हटले ….आणि जीव (माझा आणि त्याचा) भांड्यात पडला. काही स्त्रियांना त्यांची चुकी असताना देखील सॉरी म्हणायला खूप कष्ट पडतात हो. एखादी असती तर उतरल्या उतरल्या माफी मागितली असती. पण ही बहुतेक त्या “काही” स्त्रियांच्या वर्गवारीतील असावी.

मी तिला म्हटले “आत्ता जर माझा पाय तुम्हांला लागला असता तर अख्ख स्टेशन जमा केलं असतं तुम्ही इथे. दुचाकी वरून उतरण्याची देखील एक पद्धत असते. घोडा नाहीये तो पाय पसरून उतरायला.” त्या दोघांच्या चेहेऱ्या वरचा रंग पार उतरला होता. आवाजाची कुठल्याही मर्यादेचे उल्लंघन न करता मी इतक्या शांतपणे कसं काय बोलत होतो कोण जाणे. बहुतेक तिला त्या मुळेच तिला काही समजले नसावे असे गृहीत धरून तिला परत विचारले “गाडी वरून उतरायचे प्रात्यक्षिक देऊ का? कारण ज्या पद्धतीने तुम्ही उतरत असणार त्याच पद्धतीने बसत देखील असणार … म्हणजे दोन्ही वेळेस आजूबाजूच्यांना धोका आहेच…. थांबा मी तुम्हांला प्रात्यक्षिकच देतो. आज काल डेमो दिल्याशिवाय बरेच जणांना कळत नाही.” तरुणीच्या चेहेऱ्या वरचे भाव बघण्यासारखे झाले होते आणि तो तरुण मात्र हलकेच घेत होता. तिने घाई घाईने त्याला टाटा केलं आणि जिन्याकडे धूम ठोकली. तो तरुण सुसाट निघून गेला आणि मी देखील हात झटकत जीना चढू लागलो …. इच्छित गाडी त्या “नानीच्या टांगे”मुळे चुकलेली होती हे वेगळे सांगायची गरज नाही.

पण बरीच माणसे आपण ज्याच्या वर बसणार आहोत तो एक घोडा नसून दुचाकी आहे हे कसं विसरतात? घोड्यावर बसण्याच्या अविर्भावात दुचाकीवर का बसतात किंवा उतरतात हा प्रश्न मला नेहेमी सतावत असतो.

4 thoughts on “नानीची टांग

  1. “असाच एका रम्य सकाळी सगळ्यांचा ससेमिरा चुकवुन रेलवेच्या जीन्या जवळ पोचलो. समोर गाडी येणार असल्याची उद्घोषणा चालु होती. आज आपल्याला इच्छित गाडी मिळणार या कल्पनेनेच मन उचंबळून आलं होतं. अस्सल डोंबिवलीकराचे मन अश्याच माफक गोष्टींनी फुलून येतं.”

    आपण डोम्बिवलीकर किती साधे आहोत… आपल्या अपेक्षा पण एकदम बेसिक आहेत….

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s