माझे गुरु आणि मी

image

आज गुरु पौर्णिमा म्हणजे गुरु पूजनाचा दिवस. गुरु स्मरण तर रोजच होत असतं कारण त्यांचे आपल्यावर असलेले अनंत उपकार. खर तर नुसत्या पुजनाने किंवा स्मरणाने या उपकारांची परतफेड होणे कदापि शक्य नाही. पण तरी देखिल दिनमानाचे औचित्य साधुन समस्त गुरुवार्याँना वाहिलेली ही आदरांजली.

गुरु पूजनाचा अग्रक्रम हा नेहेमीच आई वडीलाना जातो. आई जन्माचा अर्थ शिकवते तर वडिल जगायचे कसे हे शिकवतात. त्यामुळे हा पैलू निट पडला की साधा दगड देखिल चमकतो. मी भाग्यवान, या गुरु-पालकांची सेवा करण्याची संधी मिळाली आणि पुढे अखंड मिळुन दे अशी ईश चरणी प्रार्थना. पण त्यांना गुरुपदी विराजमान करण्या पेक्षा त्यांच्या प्रेमाचा मायेचा उतराई होऊ इच्छितो. कारण योग्य गुरु मिळवणे आपल्या हातात असू शकते पण उत्तम आई वडील मिळण्यासाठी दैवी हस्तक्षेप असावाच लागतो.

एक गुरु आणि गुरुकुल ही पुराण काळापासुन चालु असलेली पद्धत कधीच कालबाह्य होऊ लागली आहे आणि त्यांची जागा शाळा महाविद्यालये आणि त्या मध्ये शिकवणार्या शिक्षकांनी घेतली. तिथे शिकवणर्या व्यक्ति तितक्या प्रकृति असल्याने सगळी सरमिसळच होती. काही जणानी नाईलाजाने तर काही जणानी ज्ञान देण्याच्या लालासेने हा पेशा पत्करला होता. तरी माझ्या नशिबी आलेले बरेच शिक्षक हे दुसर्या प्रकारचे होते. त्या वेळी हे उमगलं नाही पण आज असं वाटतय की आम्हीच कमी पडलो. नाहीतर बर्वे, केळकर, कुलकर्णी, टांकसाळे, पळधे, जोग, पाटणकर  यांसारख्या अनेक शिक्षिका आणि रानडे, महाजन, कुलकर्णी, भंडारी, शिंपी, राठोड यांसारखे अनेक मन लाऊन शिकवणारे शिक्षक लाभले हे आमचे भाग्यच म्हणायचे. त्याच वेळी शाळेतर शिक्षकांनी आमच्यावर कसून मेहेनत घेतली त्यात रघुपती सर विशेष आदरणीय.

महाविद्यालयीन जीवनात तर विशेषतः B.Sc. आणि M.Sc. ला असताना ज्यांनी आमच्यावर संस्कार केले त्यांच्या बद्दल काही बोलायचे म्हणजे शब्द, भावना खरंच अपुऱ्या आहेत. ठाण्याच्या बांदोडकर कॉलेज मधील डॉ. अंबिके, डॉ. टेकाळे, डॉ. मोझेस, डॉ. गीता नायर, डॉ. सहा यांनी नुसतीच डिगरी मिळवून देणे हा हिशोब न ठेवता विषयाची सर्वांगीण व्याप्ती सहजसाध्य करून दाखवली. इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स मधे वनस्पती शास्त्रात M.Sc. करत असताना डॉ. अपर्णा होडावडेकर, डॉ. हिप्पळगांवकर, डॉ.त्रेहान, डॉ. कुलकर्णी या सर्व उच्च विद्या विभूषित गुरु जनांनी आमच्या पातळी वर येऊन कठीण विषय सोपे करून सांगितले. किंबहुना क्लिष्ट विषय सोपे कसें करावे याचा नमुनाच दाखवून दिला. डॉ. लट्टू यांचे तर आमच्यावर अनंत उपकार आहेत. झाडा पानांशी गट्टी यांच्या मुळेच शक्य झाली. निसर्गाचा आस्वाद घेणे यांनीच शिकवले. पुढे डॉ. संजय देशमुख आणि डॉ. उमेश मुंडल्ये यांनी संशोधन कसें करावे हे शिकवले.

कधी कधी या गुरुजनांची आठवण आली तर एक मात्र नेहेमीच वाटतं, शालेय किंवा महाविद्यालयीन जीवनात जे जे शिक्षक आले त्यांनी त्यांच्या त्यांच्या परीने उत्तमोत्तम ज्ञान देण्याचा नेहेमीच प्रयत्न केला पण ग्रहण करण्यात आम्ही कमी पडलो, आमची तहान भूक कुठेतरी कमी पडली. अश्या या गुरुजनांचे ऋण कायम शिरोधार्य राहील. आजही या शिक्षकांपैकी कुणीही महानुभाव समोर आले तर नकळत हात जुळतात आणि अजूनही आम्ही विद्यार्थी दशेत असल्याची जाणीव करून देतात.

सर्वात महत्वाचा गुरु म्हणजे “काळ”. तो प्रत्येक वेळी तुम्हांला काही ना काही शिकवत असतो धडे देत असतो. या “काळा”ला वंदन केल्या शिवाय गुरु पौर्णिमा सफल होणार नाही. वाईट दिवस … चांगले दिवस त्यानेच दाखवले… भरभराट, हतबलता त्यानेच दाखवली. जगण्याची जिद्द धडाडी, समयसूचकता त्यानेच शिकवली आणि यातून चांगल्या वाईटाचे संस्कार झाले. आजूबाजूच्या मित्र परिवाराकडून “काय करावे” याच बरोबर “काय करू नये” याचे ज्ञान मिळणे हा देखील काळाचाच महिमा. बाकीच्या शिक्षकांचा उत्तरोत्तर संपर्क राहणे कठीण होत असले तरी “काळ” या शिक्षकाचे आपण आजन्म विद्यार्थी असतो. ज्ञाना पेक्षा हा शिक्षक अनुभवाची पोतडी मात्र भरभरून देतो. ती मात्र तहहयात साठवून ठेवावी. त्यातूनच पुढील पिढीसाठी असलेला “ठेवा” निर्माण होतो.

(अध्यात्मिक गुरु हा विषय तूर्तास बाजूला ठेवला आहे. कारण माझा प्रॉब्लेम हा आहे की मला सगळ्यांचीच संत वचने भावतात. आणि मग मनात अध्यात्मिक कोंडी चालू होते. कुठल्याही बाबा, बापू, पंत, महाराज वगैरेंचे दोरे बांधून स्वतःलाच गंडा घालून घेण्या पेक्षा नामस्मरण उत्तम.)
टिप: चित्र आंतरजाला वरून साभार.

6 thoughts on “माझे गुरु आणि मी

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s