प्राचार्य – भाग ०२

बऱ्याच दिवसांनी प्राचार्य – भाग ०२ टाकत आहे. कामाच्या व्यापात राहून गेलं. पण आज “शिक्षक दिन” आणि या निमित्ताने हा लेख अनुविना वर येत असल्यामुळे एक वेगळाच आनंद होत आहे. तसं बघायला गेलं तर सरांच्या बाबतीतले लेखन कधीच पूर्ण होणार नाही. तरी देखील सरांच्या स्मृतींना माझे विनम्र अभिवादन.

VajpeiSir01१९६२-९९ या कालावधीत डोंबिवलीच्या टिळक नगर शाळेने खर्या अर्थाने सुवर्णकाळ अनुभवला. या शाळेचं आणि प्राचार्य सुरेन्द्र बाजपेई सरांचे नातंच वेगळ. शाळा तिच्या नावाने कमी आणि बाजपेई सरांमुळे जास्त ओळखली जायची. त्यांच्या कारकिर्दी मध्ये टिळक नगर शाळा आणि पर्यायाने शिक्षण सहकार संस्था खर्या अर्थाने नावारुपाला आली. बाजपेई सरांनी शिक्षणाच्या जोडीला क्रीडा क्षेत्रात देखिल विविध उपक्रम चालु केले होते. कुठल्याही विषयाचे सखोल ज्ञान, विद्यार्थ्यांवर असलेला जिव्हाळा, सामाजिक कार्याची आवड या मुळे निवृत्ति नंतर पण त्यांच्या कामाचा आवाका एखाद्या तरुण व्यक्तीला लाजवेल असाच होता.

असामान्य व्यक्तिमत्व लाभलेला एक आसामी. हाडाचे शिक्षक आणि उत्तम प्रशासक. समोरच्या विद्यार्थ्याच्या काळजाचा ठाव घेणारी भेदक नजर आणि त्या नजरेला साजेसा भरदार आवाज. या निसर्गदत्त गुणांमुळे जरब, धाक, शिस्त या सगळ्या शब्दांची पुरेपूर ओळख आम्हाला शालेय जिवनातच झालेली होती. नेहेमी कडक इस्त्री केलेले कपडे घालणारा हा माणूस तितक्याच कडक शिस्तीचा भोक्ता होता. टिळकनगर शाळेत विद्यार्थी आला की त्याला योग्य शिस्त लावणे हाच त्यांचा एक कलमी कार्यक्रम. या सगळ्या “जरब” दस्त व्यक्तिमत्वाच्या जोडीला एक वेताची छडी किंवा पिवळ्या रंगाची जाड लाकडी पट्टी बरोबर असायचीच. त्यांच्या गणवेशाचाच एक भाग म्हणा हवं तर. त्यांचा दराराच इतका होता की इतर शिक्षक पण त्यांना बिचकुनच असायचे. म्हणुनच कदाचित त्यांच्या कारकिर्दीत आमच्या शाळेत शिक्षकांचे, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे संप, गुंड प्रवृत्तिच्या विद्यार्थ्यांची मुजोरी, गुंडगिरी, दादागिरी या सगळ्या अवांतर गोष्टींना अजिबात थारा नव्हता. शाळेच्या बाहेर देखिल त्यांचा हा दरारा कायम होता. आजही शाळेच्या परिसरात कुठेही पानाची टपरी किंवा खाद्य पदार्थ विक्रेते दिसून येत नाहित. याचे श्रेय बाजपेई सरांनाच जाते.

हा माणूस खरच विलक्षण होता. मुख्याध्यापक होते तेंव्हा सगळ्या शाळेवर त्यांची बारीक नजर असायची. ते शाळेत असले की चिडीचुप शांतता असायची. पण ती शांतता कधी भयाण वाटली नाही. शाळेतली अशी शांतता सरांचे अस्तित्व सांगून जायची. रिकाम्या वेळात कित्येक वेळा त्याना मी शाळेतिल झाडांना पाणी घालताना बघितले आहे. विद्यार्थ्यांमधिल कला गुणांना त्यानी नेहेमी प्रोत्साहन दिले. शालेय जीवनात त्यांच्या वरील आदरयुक्त भीती मुळे त्यांच्याबद्दल कधीच विशेष आपुलकी वाटली नाही. कदाचित त्यांच्या नजरेने, आवाजाने आणि त्यांच्या हातातल्या छड़ी मुळे विद्यार्थी त्यांच्या पासून ४ हात दूर असायचे. आमच्यवेळी ते शाळेचे मुख्याध्यापक असल्याने आम्हाला ते शिकवायला नव्हते हे त्यावेळी वाटलेले सुदैव अता मात्र दुर्दैव आणि कमनशिब वाटते. मुलाना शिस्त लावताना त्यांच्या जीव्हाग्रे तांडव चालु असायचे तर भाषण करताना मात्र सरस्वती नंदायाची. कधीही यांनी भाषण लिहून आणलय आणि वाचुन दाखवले आहे असे झाले नाही. ओघवती भाषा, सुस्पष्ट आवाज आणि उत्कृष्ट वक्तृत्व लाभलेले दुसरे शिक्षक माझ्या पाहण्यात नाही. म्हणून तर भारतात झालेल्या एशियाड स्पर्धेच्या वेळी हिंदी मध्ये धावते समालोचन करण्या साठी बाजपेई सराना पाचारण करण्यात आले होते. हा एक मोठा सन्मान त्यांच्या मुळे डोंबिवली सारख्या सांस्कृतिक नगरीला मिळाला.

त्याना मिळालेल्या पुरस्कारांची मोजदाद करणे खरच कठिण आहे. अगदी उत्कृष्ठ शिक्षक पुरस्कार ते जनगणनेत केलेल्या उल्लेखनीय कामामुळे राष्ट्रपति पुरस्कार असे अनेक पुरस्कार त्यांनी केलेल्या कामाची त्यांच्या अष्टपैलुत्वाची ग्वाही देतात. विविध संस्थांचे मानाचे पद भुषवताना त्यांनी केवळ संस्थेच्या विकासाचा प्रगतीचाच विचार केला. कर्मण्येवाधिकारस्ते या उक्ती प्रमाणे प्रसिद्धि पराङ्ग्मुख राहून त्यांनी त्यांचे सामाजिक कार्य अविरत पणे चालु ठेवले. १९९९ साली सर प्राचार्य या पदावरून निवृत्त झाले. पण अशी धडाडीची माणसे निवृत्त थोडीच होतात …. त्यांनी आपले वानप्रस्थ सामाजिक आणि सांस्कृतिक कामांसाठी अर्पण केले. कुशल प्रशासक, उत्तम वक्ता, उत्कृष्ठ शिक्षक याच जोडीला व्यासंगी लेखक हा पैलू देखिल सरांनी जोपासला. लोकसत्ता या दैनिकात शिक्षण विषयक लेखमाला लिहिली आणि पुढे त्याचीच परिणिती “चैतन्याचे झरे” आणि “उगवते सूर्य” यांच्या पुस्तकाने झाली.

१२ वी ला नंतर शाळेशी आणि पर्यायाने बाजपेई सरांशी विशेष संबंध आला नाही. डोंबिवलीत फिरताना कुठे लाउडस्पिकर वर त्यांचा ओळखीचा आवाज ऐकला तर चार शब्द कानावर पाडून घेण्यासाठी पाउले नकळत वळायची. मग एखाद्या व्यासपीठावर त्याच धडाडीने भाषण करताना ते दिसायचे … त्याच उत्साहाने. कधी लक्ष गेलं तर  मंद स्मित करायचे तेंव्हा बारावीच्या पहिल्या दिवसाची आठवण व्हायची. तेंव्हा वाटायचे की सरांनी खरच आपल्याला ओळखले असेल का? की असच मी हसलो म्हणून त्यांनी ओळख दाखवली असे नेहेमी वाटायचे. पण एका उपनयन समारंभात त्यांची भेट झाली आणि या शंकेचे देखिल निरसन झाले. या समारंभात बाजपेई सर आलेत असे कळले. त्यांना शोधायला विशेष कष्ट पडले नाहीत. जिथे गर्दी होती तिथेच हे असतील अशी खात्रीच होती. थोडा बिचकतच त्यांच्या समोर जाऊन उभा राहिलो. समोर कोण उभं आहे हे बघण्या करता त्यांनी वर बघितले. इतक्या वर्षांनंतर देखील त्यांच्या नजरेला नजर न मिळवता मी सरळ त्यांच्या पाया पडलो. शेजारच्या रिकाम्या खुर्चीवर बसायला सांगून “काय भातखंडे? काय चालू आहे सध्या?” अशी नावानिशी चौकशी केल्यावर मला अतिशय आनंद झालाच आणि वर आश्चर्याचा सुखद धक्का देखील बसला. त्यांच्या कारकीर्दीत शाळेतून बाहेर पडलेल्या लाखो यःकश्चित विद्यार्थ्यांपैकी मी एक आणि तरी देखील मी कोण हे त्यांच्या स्मरणात होते हे खरंच सुखावह होते.

डोंबिवली मधील कुठल्याही सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रमात बाजपेई सरांचा सक्रीय सहभाग नाही असे कधीच झाले नाही. त्यासाठी त्यांना कधी विशेष आमंत्रणाची देखील गरज भासली नाही. ६ ऑगस्ट २०१३ रोजी रात्री बाजपेई सरांना देवाज्ञा झाली आणि डोंबिवलीकर एका महान व्यक्तिमत्वाला मुकला. शैक्षणिक आणि सांस्कृतिक डोंबिवली पोरकी झाली आणि शाळेतली शांतता भयाण वाटू लागली. येणार्या दिवाळीत डोंबिवलीच्या गणपति संस्थानाच्या व्यासपीठावर त्यांचे रिक्त आसन डोंबिवलीकरांना अस्वस्थ करेल…. कारण व्यासपिठा वर गरजणारा ओळखीचा आवाज शांत झालाय….. कायमचाच ….चिरकालीन.

फोटो सौजन्य: श्री. अमित भुस्कुटे.

5 thoughts on “प्राचार्य – भाग ०२

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s