काही अनुभव हॉस्पिटलचे – ०१

काही दिवसांपूर्वी हॉस्पिटलच्या वाऱ्या करण्याचा (कु)योग आला होता. मुलुंडच्या फोर्टीस इस्पितळात चांगले ७-८ दिवस ये जा चालू होती. डोंबिवली ते फोर्टीस अशी धावपळ करताना शारीरिक पेक्षा मानसिक ताण जास्त होता. पण त्याच बरोबर सभोवतालचं निरीक्षण करण्याचा मुळचा स्वभाव काही गप्प बसू देत नव्हता. दगडा पेक्षा वीट मऊ असा विचार करून डोंबिवलीतील हॉस्पिटल पेक्षा फोर्टीस ची निवड केली. एखाद्या रुग्णासाठी तेथील सुविधांचा दर्जा डोंबिवलीतील कुठल्याही हॉस्पिटल पेक्षा निश्चितच चांगला आहे यात दुमत नाही. सगळंच प्रशस्त, वातानुकुलीत, अगदी एखाद्या हॉटेल सारखं. दांडेकर, कुलकर्णी, राव ई. कडे जाणाऱ्या माझ्यासारख्या डोंबिवलीकराला हे निश्चित सुखावह होतं. कारण वातावरण चांगले असेल तर रुग्णाला लवकर बरं वाटतं. तिथे औषधांचा, डेटोलचा वास नव्हता. सगळे कोपरे स्वच्छ होते. पांढऱ्या टाईल्स वर लाल, तपकिरी रंगाची कलाकारी नव्हती. शिस्तीचा थोडा आभाव असला तरी ते समजून घेण्यासारखं आहे. कारण रुग्ण विभाग, बाह्य रुग्ण विभाग, भेटायला येणारे अभ्यागत यांचा राबता हे सगळंच एकाच ठिकाणी होत असल्याने अश्या ठिकाणी शिस्त सापडणे कठीणच. तरी नशीब रुग्णाला भेटायचं असेल तर फक्त संध्याकाळी ४ ते ७ याच वेळात भेटण्याची मुभा होती. बाकीच्या वेळी रुग्णाच्या मदतीसाठी आणि सोबतीसाठी केवळ एकाच जवळच्या व्यक्तीला अनुमती होती. रुग्णाची खानपान व्यवस्था तिथूनच होत असल्याने काय डबा द्यायचा याची चिंता नव्हती. वेळच्या वेळी डॉक्टर, नर्स तपासून जात होत्या. सफाई वाले नियमित साफसफाई करत होते. थोडक्यात काय सगळं नीटनेटके सुरु होते.

आता इतकं सगळं व्यवस्थित असताना कुणीही विचारेल “मग कपाळावर आठ्या कशाला?”. कारण कुठलीही गोष्ट परिपूर्ण असणे या वर माझा अजिबात विश्वास नाही. ;). तसच इथे पण झालं. आता रुग्णालयाच्या परिसरात, विशेषतः वॉर्ड मध्ये शांतता राखावी असा साधा सोप्पा नियम (काही ठिकाणी लिखित तर काही ठिकाणी अलिखित) आहे. आणि याच नियमाची पायमल्ली अगदी सध्या वाहन चालका पासून ते अगदी थेट डॉक्टर पर्यंत सगळेच करत होते. रिक्षा, कार आपले कर्णकर्कश कर्णे वाजवत आवारात फिरत असलेले बघून जरा आश्चर्यच वाटलं. नियमावली नुसार येथे हॉर्न वाजवू नये ची पाटी लटकत होतीच पण वाचतय कोण. आणि तसंही या “वाहन चालक” जमाती कडून रस्त्यावरचे फलक वाचले जाण्याची अपेक्षा ठेवणेच चुकीचे आहे. ज्यांच्या मुळे किंवा ज्यांच्या साठी असे हॉर्न वाजवावे लागतात त्या निर्बुद्ध लोकांना तरी काय सांगणार? पदपथ असून सुद्धा आतील रस्त्यावरून, कानाला मोबाईल लावून अथवा मोबाईलशी चाळे करत, आपण एखाद्या बागेत फिरत असलेल्या अविर्भावात चालणाऱ्या लोकांना कोण सांगणार? असो, त्यामुळे तुर्तास मी त्यांचा आणि त्यांच्या भोंग्यांचा विषेश विचार करत नाही. कारण इथे तसा त्यांच्या आवाजाचा हॉस्पिटल मध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णावर विशेष फरक पडत नाही. पण एखाद्या साधारण हॉस्पिटल मध्ये होऊ शकतो हे विसरून चालणार नाही.

स्वागत कक्ष, बाह्य रुग्ण विभाग, अभ्यागतांसाठी असलेला विश्राम कक्ष इथे देखील आवाजासाठी असलेल्या मर्यादांचे उल्लंघन झालेले दिसून येईल. रुग्णाला भेटायला आलेले, नियमित तपासणी साठी आलेले, कामानिमित्त आलेले बरेच जण आपण एका हॉस्पिटल मध्ये आहोत हे विसरून जातात. यात रुग्णाला भेटायला आलेल्या लोकांचा कहर असतो. विशेषतः असे भेटीव लोक जर बाहेर गावातून आले असतील तर बघायलाच नको. काय झालं? कसं झालं? डॉक्टरांनी काय केलं? याची सगळी माहिती कळते ती त्यांच्या वाजवी पेक्षा वाढलेल्या आवाजातून. आता हे सगळे विभागच लोकसंपर्काच्या कक्षेत येत असल्याने त्याचे विशेष काही वाटत नाही. हॉस्पिटल मधील खरी धावपळ, बिलावरून होणारी चर्चा, कर्मचाऱ्यांशी आपापसात होणारे संवाद या मुळे स्वागत कक्षात असलेले ध्वनी प्राबल्य समजून घेण्या सारखे आहे. बिला वरून होणारे हेवेदावे. इतर कर्मचारी वर्गाबरोबर खटके उडणे हे तर रोजच्या कार्यप्रणालीचा भागच समजा ना. परत हे सगळं रुग्णाच्या खोली पासून लांब घडत असल्याने त्या कोलाहलाचा विशेष फरक पडत नाही. चार माणसे आणि त्यात चार बायका जमणार म्हणजे गोंगाट होणारच नाही का? पण जर असंच काहीसं स्वरूप रुग्णाच्या खोलीत असेल तर?

हॉटेलमध्ये असल्या प्रमाणे येथे पर्याय उपलब्ध असतात. एका खोलीत एकच रुग्ण, एका खोलीत दोन रुग्ण आणि सामान्य विभाग जिथे एका मोठ्या खोलीत १०-१२ खाटा टाकलेल्या असतात. आम्ही पर्याय निवडलेला होता तो एका खोलीत २ रुग्ण असलेला. ठरलेल्या वेळी संध्याकाळी आम्ही हॉस्पिटल मध्ये दाखल झालो. सगळ्या आवश्यक गोष्टींची पूर्तता करून जेंव्हा दिलेल्या रूम मध्ये पाऊल टाकले तेंव्हा रात्रीचे ८ वाजले होते. रूम मात्र झकास होती … एकदम प्रशस्त. इ-टीव्ही बांगला वर अगम्य गाणी मोठ्या मोठ्यांदा वाजत होती. आम्ही आत येताच बाजूच्या पेशंटनी टीव्हीचा आवाज कमी केला. त्यामुळे जरा शांतता निर्माण झाली. आश्चर्य याचे वाटले की रुमच्या बाहेर हा टीव्हीचा मोठ्ठा आवाज जात नव्हता. म्हणजे रुग्णाच्या इथे काही बोंबाबोंब झाली तरी बाहेर कुणाला कळणार नव्हतं. त्यामुळे बाहेरच्या आवाजाचा त्रास रुग्णाला आणि आतल्या आवाजाचा त्रास इतर रुग्णाना होऊ नये हाच उदात्त हेतु. गरज पडल्यास परिचारिकेला बोलावण्या साठी बेल होतीच. बेल वाजताच दुसर्या मिनिटाला परिचारिका हजर व्हायची. त्या मुळे तिला वेगळे निमंत्रण कधीच द्यावे लागले नाही. साफ सफाई करणारा कर्मचारी वर्ग कुठल्या तरी वेगळ्याच कंपनीचा असावा कारण त्याच्या गणवेशावर फोर्टिस ही अक्षरे कोरलेली नव्हती तीच गत सुरक्षा रक्षकांची. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रा प्रमाणे इथे देखिल “ऑन साईट” काम चालते हे बघून मजा वाटली. हॉस्पिटल ची साफसफाई उत्तम होत असली तरी त्या कर्मचार्यांचा त्यांच्या तोंडावर ताबा नव्हता. दर वेळी आवाजाची मर्यादा पाळा अशी विनंती करुन देखिल तक्रार करण्याची समज द्यावी लागायची. “त्या बेड वरील पेशंटचा मुलगा अगाऊ आहे जाम खीच खीच करतो” असे देखिल अधून मधून पुसटसे कानावर यायचे. त्या कर्मचार्यांकडून त्यांच्या बर्याच गप्पा ऐकल्या. विषय तेच घरगुती. कुणाच्या उखाळ्या पाखाळ्या. सासु सुन इथ पासून ते बुवाबाजी पर्यन्त … म्हणजे कुणाची सासू खाष्ट आहे आणि कुठला बाबा जाम पावरफुल आहे या बद्दल संपूर्ण संदर्भासहित माहिती मिळायची. हे च्यानल वाले याना का बरे त्यांच्या ताफ्यात घेत नाहीत कुणास ठावुक. पण यांच्या या गप्पांमुळे त्यांच्या स्वतःचा आणि बर्याचशा रुग्णांचा वेळ मात्र मस्त जायचा. यांच्यातली भांडणे मात्र तारसप्तक आणि टोकाची असायची. मग ते नकोसं वाटायचे.

राउंड या प्रकारात बरेच डॉक्टर फेरी मारून जायचे. डॉक्टर आणि त्यांच्या बरोबर 2-3 नर्स. पेशंट ला तपासून शास्त्रीय भाषेत बोलायचे आणि आदबीने नर्स ते सगळ टिपून घ्यायच्या. अगदी मस्त जिन्स टीशर्ट घालून येणारे नविन तरुण डॉक्टर आणि त्यांच्या वागण्या बोलण्यातुन दिसणारा उत्साह सुखावह होता. अनुभवाने, मानाने वरिष्ठ असलेले वृद्ध डॉक्टर पण होते. पण त्यांचे म्हणजे सगळे हात राखून. मितभाषी डोळ्यावर चष्मा विरळ केस आणि पेशंट च्या नातेवाइकाना बघून उमटणार्या अंधुक आठ्या असं अस्सल घरगुती रूप होतं. अर्थात सगळेच वृद्ध डॉक्टर असे नव्हते पण जे तसे नव्हते ते अपवादात्मकच. इथे अनुभवाने केस पांढरे झालेल्या डॉक्टरां बरोबर नर्सच्या साथीला शिकाऊ डॉक्टर पण असायचे. अश्या वयोवृद्ध मोठ्या डॉक्टरना सर म्हणतात हे इथेच कळले. तर असे बरेचसे सर भारदस्त आवाजाचे आणि व्यक्तिमत्वाचे होते. काही जण तर दरवाज्यातुनच पुकारा करीत यायचे. त्या ललकारी मध्ये रुग्ण स्त्री असेल तर आजी मावशी पासून ते ताई पर्यंत आणि पुरुष असेल तर आजोबा पासून ते भाऊ दादा पर्यन्त विविध नात्यांचे उच्चारण व्हायचे. बिल देताना ही 4-8 दिवसात जोडलेली सगळी नाती अचानक लुप्त व्हायची तो भाग वेगळा. बरेच वेळा हे सर डॉक्टर आपल्या दणदणित आवाजात रुग्णाची किंवा नातेवाईकांची कान उघडणी करायचे. अर्थात रुग्णाने काही हलगर्जीपणा केला असेल म्हणुनच. त्यात रुग्ण जर समभाषिक असेल तर गप्पा सुद्धा रंगत. त्या मानाने शिकाऊ तरुण डॉक्टर हे तसे मृदुभाषी होते. वागण्या बोलण्यात कमालीचे पॉलिश्ड होते. उगाच चढा आवाज नाही की फ़ुकटच्या गप्पा नाहित. येणार …. रुग्णाला तपासणार शंकांचे निराकरण तितक्याच आदबीने करणार…. न रागावता न कंटाळता. आपल्या माणसा विषयी चौकशी करताना जास्त जवळिक वाटायची. आधार वाटायचा. आणि त्याच आधारामुळे झालेल्या रोगावर मात करण्याचे बळ अंगी बाणवले नाही तरच नवल.

अर्थात सगळ्याना हाच अनुभव येईल असे नाही. जीवनाच्या जन्म मृत्युच्या खेळात अपघात हॉस्पिटल अश्या अनेक पायऱ्या येतात. जो ही पायरी पार करतो तो डॉक्टरला देवपद बहाल करतो आणि जो या पायरीवर अखेरचा श्वास घेतो त्याचे नातेवाईक याच डॉक्टर ला यमदूत ठरवून मोकळे होतात. काय वाटत असेल त्या पांढरा कोट लावलेल्या आणि गळ्यात स्टेथोस्कोप लावलेल्या माणसाला? केवळ वैद्यकीय शिक्षण घेतले म्हणजे कुणी माणूस मृत्युला जिंकु शकतो? हे सगळे केवळ निमित्त मात्र खरा धन्वंतरी तोच. जो जन्म देतो आणि वेळ झाली की (किंवा आली की) घेउन जातो. मागे शोक करण्यासाठी उरते फ़क्त कलेवर. पण शेवटच्या श्वासापर्यन्त जगण्यासाठी केलेली धडपड त्या शय्येवर झोपलेला रुग्ण आणि त्याला जगवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केलेले डॉक्टर आणि त्यांचे सहकारीच जाणतात. कारण कुठल्याच श्वासावर ना रुग्णाचे नियन्त्रण आहे ना त्या मानवरूपी देवदुताचे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s