फुटपाथ वरचा रमेश

begger01

प्रत्येक पावला गणिक हात पसरून गयावया करून दोन चार रुपये मागणार्या भिकारी नामक मनुष्य गटावर मी पैसे देऊन कधीच अनुकंपा दाखवत नाही. त्यापेक्षा त्याला वस्तू/अन्न रूपी दान देणे पसंत करतो. हे माझ्या अनुभवा वरुन शिकलोय …. म्हणजे भिक मागण्याच्या नाही तर दान देण्याच्या अनुभवावरून ;).

कॉलेज मध्ये असतानाची गोष्ट. ऑफ पिरेड होता आणि सिगरेट चा झुरका मारावयास खाली आलो होतो. डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी चौकात जहांगीर आर्ट गैलरी समोरच्या बस स्टॉप जवळ एक पानाची टपरी, एक उसाचा रस विक्रेता आणि एक वडापावची गाडी. तिथे एका छोटया मुलाला भिक मागताना बघितले. लोकं त्याच्या दानात दोन चार आणे टाकत होते आणि त्या बिचार्याला वडापाव ची अपेक्षा होती. पण जो तो त्याला पैसे देऊन बाजुच्या गल्लीतून वडापाव खाण्याचा सल्ला देत होते ….त्याला भूक लागली होती पण मिळणार्या पैशातुन तो त्याचे उदरभरण का करत नव्हता हे मात्र काही कळत नव्हते.  त्या दुपारच्या उन्हात बस स्टॉप वर उभ्या असलेल्या लोकांकडे हे गरीब बिचारे पोर याचना करत फिरत होते. पैसे मागणारे भिकारी नेहेमीच बघितले असल्याने या खायला काही तरी मागणार्या जीवाने माझे कुतूहल जागृत केले. कमरेला फाटकी चड्डी, असंख्य ठिकाणी फाटलेला बनियान. दोन्ही वस्त्रांचा रंग रस्त्यावरच्या मातीशी साधर्म्य सांगणारा. सगळ्यांच्या पायाशी आर्जव करत करत हा माझ्या पर्यंत पोचला. त्याच्या डोळ्यातील भाव बघून जिव गलबलुन आला. डोक्यात शंकेचा किडा वळवळत होताच. “काय खाणार?” मी विचारले आणि त्याच्या डोळ्यात चमक दिसली. “ज्यो बी किलायेगा साब” त्याचे उत्तर. भाषेवरुन तरी तो दक्षिणे कडचा वाटत होता. “वडापाव खिलाउंगा लेकिन मेरे साथ बातें करनी पडेगी. है मंजूर ?” त्याला कळले की नाही ते माहीत नाही पण त्याने मान डोलावली. एक वडापाव घेतला आणि त्याच्या हातात दिला. तिथेच बेस्टच्या बाकड्यावर बसून मी त्याच्याशी संवाद साधायला लागलो. काही महिनेच झाले असतील त्याला मुंबई मध्ये येउन पण त्याची भाषा किती बदलली… भाषाच काय त्याचे तर सगळे जगच बदलले होते.

रमेश नाव त्याचे. आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्राच्या सिमेवरच्या गावातला. ८-९ वर्षे वय असेल पण कुपोषित असल्याने लहान वाटत होता. रमेशचे आई वडिल रमेश आणि त्याच्या २ बहिणींना घेऊन मुंबईमध्ये बांधकाम मजूर म्हणून आले. काम काही मिळाले नाही आणि सगळे कुटुंब शब्दशः भिकेला लागले. मुलांनी भिक मागुन आणलेले पैसे वडिल काढुन घ्यायचे….. आई वडिल दोघांना दारूचे व्यसन त्यामुळे या भावनडाञ्चि आबाळ व्हायची. आणि हे रोजचेच …. मारहाणी च्या भीतीने ही तिन्ही भावंडे वेग्वेगळ्या चौकात दिवसभर भिक मागायची. मी प्रश्न विचारत होतो आणि तो माहिती देत होता त्याच्या तोडक्या मोडक्या हिंदी मधून. शेवटी मी माझ्या मेंदूला सतावणारा प्रश्न विचारलाच. “लेकिन तुम पैसे के बजाय वडापाव क्यों माँग रहे थे? पैसे मिलाने के बाद तुम खुद भी खरीद सकते हो ना?” लगेच तो शांत झाला … कुठल्या तरी गुढ किंवा गोपनीय प्रश्नाला मी हात घातला होता. चेहेर्यावरची निराशा त्याला लपवता आली नाही याचा अर्थ त्याला प्रश्न कळला होता. न राहवून शेवटी मीच म्हटले “रहेने दो अगर नहीं बताना चाहते हो तो…”. माझ्या या नाराजीच्या निर्णायक सुरांनी त्याला बोलते केले. “मई अगर ये पैसा देके वडापाव खाना तो वो जग्गू म्येरे बाप को बोलता… और फिर बाप म्येरेकू इदरीच मारता” मी हादरलोच …. आपल्या मुलांच्या पोटा पेक्षा त्याच्या पैश्यावारून मिळणार्या दारु वर या बापाची अधिक नजर. अरे मग पोरं काय भिक मागुन पैसे मिळवण्या करता काढायची? मनात विषण्णता आणि क्रोध दोन्ही एकाच वेळी उफ़ाळुन आले होते…. पण हतबल होतो…. त्याला जमेल तेंव्हा वडापाव देण्या व्यतिरिक्त काहीच करू शकत नव्हतो.

हे विचार चक्र चालू असताना त्याने दोन चार वाक्ये अजुन सांगितली पण लक्षात आले नाही. एव्हाना त्याचा वडापाव खाऊन झाला होता. तो त्याचे काम करायला सुरु करणार इतक्यात मी परत त्याला विचारले “तो अब नहीं मारेगा तेरा बाप?” गोड हसून पोरगं म्हणाले “अब आपने किलाया तो जग्गू कुच नई बोलेगा, वैसे जानकी मौसी अच्ची है. कभी कभी कुच पैसा नई मिला तो देती है वडा … बदले में झाडू मारना …. जग्गू नई रयेगा तो …. या फिर रोज कोई ना कोई मिलता … आदा काया वडापाव देता … आज पेली दफा पूरा वडापाव काया किसीने दिया हुवा”. त्याचे प्रत्येक शब्द काळजात रुतत होते…. उद्विग्नता वाढवत होते. लेक्चर चालु होणार होते म्हणून त्याला बाय करून निघून गेलो पण त्या दिवशी शिकण्यात कुठेच मन लागत नव्हते.

पुढे दोन चार वेळा मी त्याला वडापाव खायला दिले. ज्या दिवशी माझ्या आधी कुणी हे पुण्य कर्म केलेले असेल तर हसून म्हणायचा “साब कल दे दो … आज काया”. कधी कधी माझ्या डब्यातली पोळिभाजी देखिल मी द्यायचो. आणि तो आनंदाने खायचा. जग्गुला पण माहीत असायचे की मी रमेशला वडापाव द्यायचो पण ज्या अर्थी त्याला मारहाण झाली नाही त्या अर्थी जग्गू काही बोलला नसावा.

मे महिन्याच्या सुट्टी नंतर परत कॉलेज सुरु झाले. सगळ्या गोष्टी तिथल्या तिथे होत्या … तो बस स्टॉप, डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी चौक, जहांगीरचा परिसर, जग्गुची गाडी, पान टपरी, पण रमेश कुठे दिसत नव्हता. बरेच दिवस पाळत ठेवल्या गणिक मी रमेश ला शोधत होतो. शेवटी न राहवून जग्गू ला विचारले. उकळत्या तेलात वडे सोडत जग्गू म्हणाला “त्याचा काका येउन घेउन गेला त्याला आणि त्याच्या बहिणींना. में महिन्यात त्याचा बाप दारु पिवुन कुठल्यातरी गाडी खाली आला व्ही.टी च्या चौकात. पोलीस आले होते चौकशीला. ८-१० दिवसांनी गावावरुन काही माणसे आली आणि रमेशला, त्याच्या आईला आणि त्याच्या बहिणींना घेउन गेली.” बरे वाटले ऐकून.

बापाच्या असण्या मुळे मुलांचे आयुष्य घडते पण बापाच्या नसण्या मुळे घडलेल्या आयुष्याचे माझ्यासाठी रमेश हे एकमेव उदाहरण. सिगरेटच्या धुरा सोबत डोक्यात विचार शिलगत होते आणि विरत होते. “साहेब तुम्ही त्याला जमेल तेंव्हा काहीतरी खायला द्यायचात. खुश असायचा तुमच्यावर.” हे वाक्य ऐकल्यावर जग्गू वर एक जळजळीत कटाक्ष टाकला आणि जग्गुने नजर चोरली. “हे काम तू पण करू शकत होतास … तुझ्या मुलाच्या वयाचा होता तो. सकाळी पहिला वडापाव जो बाहेर ठेवातोस तोच जर दिला असतास तर जास्त पुण्य मिळाले असते.” माझ्या अश्या उत्तराने जग्गू जरा चपापला. नंतर पुढे १५-२० मिनिटे माझा दांडपट्टा अव्याहत चालु होता. आणि जग्गू निमुटपणे ऐकत होता.

माझे सगळे बोलणे झाल्यावर जग्गू नाराजीने म्हणाला “साहेब तुम्ही शिकले सवरलेले, रस्त्यावरच्या धंद्या मधील प्रॉब्लेम तुम्हाला सांगुन देखिल समजणार नाहित. तुम्ही जेंव्हा यायचा तेंव्हा रमेश एकटाच असायचा. दिवसभरात रमेश सारखे शेकड्यावरी भिकारी येउन जातात. प्रत्येकाला जर खायला घालायला लागलो तर मी कमवू काय आणि माझ्या पोराना खायला घालू काय? सकाळी ठेवलेल्या वडापाव वर कावळे तुटुन पडतात … अवघ्या ५ मिनिटात वडापाव चा फडश्या पडतो. सकाळी इकडच्या गर्दुल्ल्यानी वडापाव सकट रमेशचा पण फडश्या पाडला असता. तसाही पोलिसांचा नेहेमीच त्रास असतो त्यात या भिकार्यांच्या मारामारीचा मलाच नस्ता ताप झाला असता. त्यामुळे मीच त्याच्या बापाला एकदा सांगितले हा माझ्या कडून वडापाव विकत घेऊन खातो म्हणून …. आता मला काय माहीत त्याचा बाप त्याला फोडुन काढेल म्हणुन. माझ्या बायकोला मी नसताना त्याला वडापाव द्यायला मीच सांगितले. पण फुकट नाही … काहीतरी काम करून घ्यायचे आणि मग वडापाव द्यायचा. साहेब मी पण अश्याच परिस्थितीतून वर आलोय …. हातगाड्यांवर काम करून … उपाशी राह्यालोय पण भिक नाही मागितली कधी. मी पण मुम्बैच्या फुटपाथ वर लहानाचा मोठा झालोय साहेब …. आमचे प्रॉब्लम तुम्हा ब्लॉक मध्ये राहणार्याना नाही कळणार. पण बरे झाले आज तुम्ही बोललात रमेश विषयी तुम्हाला पण काळजी वाटते …. मुम्बैत अशी माणसे खुप कमी राहिली आहेत.”

मी तिथून निघालो. दुसरी बाजू माहित नसताना जग्गुला उगाच फैलावर घेतला याचे वाईट वाटत होते आणि रमेश देखील परत भेटणार नाही याची रुखरुख लागून राहिली. ज्यांनी त्याला नेले ते त्याचे नातेवाईक कसे असतील? कोण असतील? त्याचे शिक्षण परत सुरु झाले असेल का? की परत गाव बदलले तरी नशीब बदलत नाही या उक्ती प्रमाणे आंध्रा मधील एखाद्या शहरात चौकात भीक मागत उभा असेल? पण आता या प्रश्नांना काहीच अर्थ नव्हता कारण त्याची उत्तरे मला कधीच मिळणार नव्हती.

लेखामधील चित्र आंतरजालावरून साभार.

4 thoughts on “फुटपाथ वरचा रमेश

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s