ऑटोग्राफ ०१

AutoGraph

सध्याच्या चंदेरी दुनियेच्या भडिमारामुळे या लहान मुलांना सेलिब्रिटीजचे भारी आकर्षण. त्यांच्या दृष्टीने जो टिव्हीच्या पडद्यावर झळकतो तो सेलिब्रिटी – मोठ्ठा कलाकार. पण त्या साठी या रियालिटी शोज चे आभार मानायला हवेत खरे तर. निदान त्यांच्या मुळे नाच, गाणे, नकला येणार्याना जरा बरे दिवस आलेत. थोडेसे अंगविक्षेप केले आणि पदलालित्य दाखवले किंवा चार पाच गाणी त्या माईकच्या बोंडूका समोर शिरा ताणुन म्हटली, मतांचा जोगवा मागितला की झालात तुम्ही रियालिटी शो चे सेलिब्रटी. आहे काय त्यात… ;).  अर्थात त्यांची पातळी, दर्जा वगैरे हा वादाचा मुद्दा होवू शकतो पण तूर्तास त्यात न पडलेले बरे. खरा कलाकार असे प्रदर्शन कधीच भरवत नाही. कसलेल्या कलेचा आस्वाद घेण्या साठी कसलाही प्रेक्षकवर्ग चालत नाही. दाद आणि त्यावर मिळवलेल्या टाळ्या या आतुनच यावया लागतात … उगीच दिग्दर्शक सांगेल तेंव्हा टाळ्या पिटणे म्हणजे भुरभूरणारे दोन चार डास मारण्या सारखे आहे. (बरेच विषयांतर झाले. परत मुळ पदावर येतो)

माझी ज्येष्ठ कन्या आर्या हिला सेलिब्रिटीला भेटायची आणि त्यांची स्वाक्षरी घेण्याची प्रबळ इच्छा झाली होती. (नसती खुळ या लहान मुलांच्या डोक्यात जाम येतात आणि का हे विचारायची सोय नाही). शाळेत कुणीतरी मैत्रिणीने सांगितले असेल माझ्याकडे अमुक अमुक सेलिब्रिटीची सिग्नेचर आहे वगैरे. त्यामुळे आता मैत्रिणीकडे आहे म्हणजे आमच्याकडे पण असायलाच हवी कुणा सेलिब्रिटीची सही. अगदी सलमान पासून स्वप्निल जोशी पर्यन्तच्या व्यापक यादी मधून कुणाची तरी (किंवा कुणाचीही) सही मी आणून द्यावी ही माफक अपेक्षा. आणि आपला बाबा महान आहे तो कुणाचीही सही आरामात आणून देइल असा प्रचंड अभिमान. इतर अपेक्षांप्रमाणे हे ओझे देखिल खांद्यावर घेउन टाईम्स च्या ऑफिस जवळ कुणी गावतय का ते बघत होतो.

असा एक योग आमच्या ऑफिस पार्टीच्या वेळी आला. प्रतिवार्षिक विहितम् या उक्ती प्रमाणे एका आलिशान रेस्टोरंट मध्ये पार्टी ठेवली होती आणि त्या ठिकाणी नुकत्याच प्रसव वेदना सुरु झालेल्या एका चित्रपटाची हिरोइन त्याच्या कुठल्याश्या तरुणाबरोबर आगंतुक पणे अवतरली. आपला येऊ घातलेला चित्रपट कसा सर्वोत्तम आहे आणि त्यात आपण किती (सर्वांग) सुंदर अभिनय (?) केला आहे याचे यथोचित वर्णन करून झाल्यावर दोघा तिघांनी तिच्या सोबत फोटो काढून घेतले. चला कन्येवर छाप पाडण्या साठी आयती संधी चालून आलेली आहे हे लक्षात आल्यावर माझा आनंद ग्लासातिल सोड्याच्या बुडबुड्यांप्रमाणे वर येऊ लागला. हातात मिळालेला टिप कागद (Tissue paper) तिच्या समोर धरला. पेन खिशाला नव्हतेच. छ्या!!! पार्टीला कुणी पेन घेउन जातं???? “तुमच्या कडे नाही???” (ग्लासात सोडा पडल्यावर आपल्याला मराठी शिवाय कुठलीच भाषा येत नाही)…”No Ways. I dont have it” अंगावरून झुरळ जावे तशी ती थरथरत म्हणाली. आता या सगळ्या भानगडीत पेन शोधायला दहा एक मिनिटे गेली असतील. एका हातात ग्लास, दुसर्या हातात कागद आणि तिसऱ्या हातात …. नाही नाही दुसर्या हातातच पेन घेउन परत मी तिच्या समोर दत्त म्हणून उभा राहिलो. “अभी नाही, फिर कभी” म्हणत त्या टिश्यु पेपरावर पेनाने रेघोट्या मारायला त्या बयेने चक्क नकार दिला. (चायला या कलाकारांचा मूड देखील लय भारीच असतो) कदाचित पेनाच्या शोधार्थ माझी वणवण चालू असताना तिच्या सहकाऱ्याने तिला कान मंत्र दिला असणार. (अग गोदे … त्या पुसण्याच्या कागदावर कुठे स्वाक्षरी देतेस … पार्टी संपल्यावर हाच माणूस त्या कागदाला पाने पुसेल आणि फेकून देइल इथल्याच कचराकुंडी मध्ये … आता तर कुठे तुझा पहिला पिक्चर येतोय …. अस्से पुढे मागे फिरणारे पंखे तर बरेच भेटतील तुस) निमुटपणे तिच्या हातातला कागद घेउन त्याची पूरचुंडी केली आणि कचर्याच्या दिशेने टाकुन दिली आणि परत ग्लासातील बुडबुड्यांमधे ‘रम’माण झालो.

त्या कागदाच्या तुकड्या सोबत माझ्या मुलीला सेलिब्रिटीची स्वाक्षरी मिळवुन देण्याचा पहिली वहिली संधी हुकलेली होती. मुलीला सगळा किस्सा सांगितला (ग्लास, बुडबुडे यांचा तपशील वगळून) पण तीनेच माझ्या दुःखावर अलगद फुंकर घातली. “बाबा अशी काय रे ती??? इतका काय मुड गेला?? तू इतकी धावपळ करून पेन आणलस त्याचे काहीच नाही तिला?? आणि पर्स होती ना तिच्याकडे?? (कुठल्याही बाई कडे पर्स असते हे माझ्या ध्यानातही नव्हते) मग त्यात एखादे पेन ठेवायचे ना. चल मीच तुला माझी एक सही देते” असं म्हणून वहीचा कागद काढून त्यावर एक झक्कास सही करून दिली. तुम्हाला सांगतो, मन गलबलुन आले. काय ही माझी पोर ….

माझ्या मुलीने मला वेन्धळा न म्हणता त्या बयेला नावे ठेवलेली बघून ज़रा हायसे वाटले. “बाबा …. सगळ्या सेलिब्रिटी अशाच असतात का रे?” मुलीचा अपेक्षित प्रश्न. आता काय सांगावे या बिचारीला??? सत्य सांगितले तर तिच्या मनातल्या सेलिब्रिटीच्या प्रतिमेला तडा जाणार. खरं तर बरेच सेलिब्रिटी अर्ध्या हळकुण्डाने पिवळे झालेले असतात. कमी वयात कुवती पेक्षा जास्त प्रसिद्धी, त्यावर सुरु झालेला पैश्यांचा ओघ …. या सगळ्या मोहजाला पासून फारच कमी जण स्वतःचे स्वत्व टिकवू शकले आहेत. परिस्थिति अनुरूप अभिमान हा सगळ्यानाच असावा पण त्याचा अहंकार बाळगु नये हे तिला समजावण्याचा अथक प्रयत्न मला कायमच करावा लागणार होता.

“नाही रे बाळा सगळेच वाईट नसतात. बरेचसे चांगले देखिल असतात. जे खर्या अर्थाने कलेची साधना करतात ते श्रोत्यांना कधीच दूर करत नाहित. तू खुप शिकलीस, मान मरातब मिळवलेस पण इतरांशी निट बोलली नाहीस, आदर राखला नाहीस तर तुझ्या शिक्षणाचा, पदाचा काहीच उपयोग नाही.”

हे आणि या पुढे समजावून सांगताना किती वेळ गेला असेल कोण जाणे…. पण तिला ते पटत होतं. आयुष्यातल्या खाच खळग्यान्मुळे ते हळु हळु उमगेल देखिल. जशी मैफल रंगात येण्यासाठी वेळ द्यावा लागतो तसच आयुष्याचे देखिल आहे…आयुष्याचे बीज निगराणी, मशागत करून रुजवावे लागते …. मायेच्या उबेने फुलावावे लागते … आजकाल नुसते बीज शुद्ध असून चालत नाही …. आजुबाजुला फ़ोफ़ावणारे तण वेळीच काढले तरच रसाळ गोमटी फ़ळे मिळतात.

आपली मुले लोकाना स्वाक्षरी देण्या एवढी मोठी व्हावी हे तर प्रत्येक आई बापाचे हमखास स्वप्न. सेलिब्रिटी तर प्रत्येक जण असतो पण सच्चे कलाकार फारच कमी. कलेची आराधना करून उत्तुंग भरारी घेताना आपले पाय जमिनीवर घट्ट रोवून ठेवणारे कलाकार विरळाच. याच मूलभूत तफावतींचे संस्कार करायचे आहेत आमच्या मुलींवर. आमच्या साठी सेलिब्रिटी तर ती अत्ता देखिल आहे पण चांगला माणूस होण्याचे बाळकडू देण्याचे हेच योग्य वय आहे. सह्या देणारे सेलिब्रिटी अगणित मिळतिल पण सह्या घेणारे चाहते मिळाले की आयुष्य सुफ़ळ सम्पूर्ण.

(क्रमशः)

3 thoughts on “ऑटोग्राफ ०१

  1. पिंगबॅक ऑटोग्राफ ०२ | अनुविना

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s