ऑटोग्राफ ०२

AutoGraph

ऑटोग्राफ भाग ०१

नागावला माझ्या काकांच्या वयाची साठी पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आम्ही सर्व भावंडानी उग्ररथ शांतीचे (साठी शांत) आयोजन केलेले होते. तर या सोहळ्या निमित्त काकांची खास इच्छा होती की येणार्या पाहुण्यां च्या मनोरंजना साठी रात्री नाट्यसंगीताची मैफल ठेवावी. रागदारी पेक्षा त्याना नाट्यसंगित अधिक प्रिय. ते स्वतः देखील उत्तम गातात. झोपाळ्यावर बसून म्हटलेले गाणे किंवा उत्स्फूर्तपणे घेतलेली एखादी तान कानावर आली की दाद दिल्याशिवाय राहवत नाही. आता उत्सव मुर्तींचीच इच्छा म्हटल्यावर काय? करुया कार्यक्रम. घरा शेजारीच असलेल्या बल्लाळ सिद्धीविनायक मंदिराच्या प्रशस्त मंडपात व्यासपीठ, खुर्च्या, माईक आदींची जैय्यत तयारी झाली होती. रात्रौ ९ वाजता कार्यक्रम सुरु होणार होता पण आलेल्या पाहुण्यांचा आणि कलाकारांचा भोजनादी कार्यक्रम व्हायचा असल्याने भा. प्र. वे. नुसार 10 वाजता पहिली घंटा झाली. पोलिसांची फेरी किंवा शेजार पाजार्यांचा उपद्रव नसल्याने कार्यक्रम कितीही उशिरा पर्यन्त चालला असता तरी व्यत्यय कुणाचाच येणार नव्हता. त्यामुळे कलाकार पण एकदम निवांत होते.

अनौपचारिक ओळख झाल्यावर सगळ्यानि इच्छाभोजन उरकून घेतले … जेवता जेवता गप्पा रंगल्या. ओघा ओघात समजले की गायिका मुळचि अलिबागाची आणि आता लग्न करून डोम्बिवली येथे स्थाईक. बाकीचे इतर साथीदार कलाकार पण डोंबिवलीचेच. मग काय गप्पा अजुनच रंगल्या. आमच्या हीने जवळ येउन हळूच कोपर मारले आणि म्हणाली की तरीच या सगळ्यांचे चेहेरे मला जरा ओळखीचे वाटतात. त्यातल्या एकाला तर मी डायरेक्ट विचारले “बहुतेक कस्तुरिच्या नाक्यावर पाहिले आहे तुम्हाला…. असता का तिथे”. डोंबिवली मध्ये प्रेक्षणीय स्थळे दोनच फडके रोड आणि कस्तूरी. वाट चुकलेले आणि न चुकलेले फकीर इथेच सापडणार. तो त्याच्या आई वडिलाना पण घेउन आला आहे हे माझ्या अगतिकते मध्ये लक्षातच आले नाही. बिचार्याचा चेहेरा शाई उडालेल्या तबल्या सारखा झाला होता. बरं त्याच्या बाकीच्या सहकाऱ्यांनी या वेळी मला साथ दिली त्यामुळे नाईलाजाने का होइना पण त्याने काबुली जबाब दिला. जेवण करून गायचे झाले तर मध्येच झोप लागण्याची किंवा आवाज न लागण्याची शक्यता असल्याने बाईंनी कार्यक्रम झाल्यावर भोजन करण्याचे ठरवले. (बरे झाले नाहीतर इतक्या रात्रि उगीच त्या गज्या ताशेवाल्याला ताशा गरम करून हिला उठवण्या साठी अवताण धाडावे लागले असते)

तितक्यात माझी मोठी कन्या धावत धावत माझ्या कडे आली …. कानात हळूच म्हणाली “त्या सेलिब्रिटी आहेत???” मी म्हटले “हो तर त्या मोठ्या गायिका आहेत. स्टेज वर जाउन आता मस्त गाण्यांचा कार्यक्रम करतील” पुढचा तिचा प्रश्न अपेक्षितच होता. “मग मी त्यांची सही घेऊ?” तिची पृच्छा. माझी अनुमती मिळताच माझ्या पुढ्यात कागद पेन धरले “तू घे”. हे म्हणताना बाल्यसुलभ लज्जा तिच्या डोळ्यात दिसत होती. हो… ना…. करता करता ती तयार झाली. कागद पेन घेउन ही स्वारी बाईंच्या पुढ्यात उभी. लाजत लाजतच सही द्याल का म्हणून विचारले. त्या वेळी बाईंना वाटलेले आश्चर्य त्यांच्या डोळ्यावर दिसत होते. एक चिमुरडी आपली सही मागत आहे म्हणून त्या खुश झाल्या. असे प्रसंग एखाद्या शास्त्रीय संगीत गायिकेला त्या मानाने फारच कमी येत असतील बहुदा. “अगं माझी कशाला सही??” त्यानी हसत तिला विचारले. “मग का नको? बाबा म्हणाला तुम्ही सेलिब्रिटी आहात ना?” माझ्या लेकिचे प्रत्युत्तर. “बर! दे कागद आणि पेन” असं म्हणत त्यानी एक छान वाक्य आणि खाली त्यांची स्वाक्षरी दिली. नाव होते अनुराधा दातार.

सगळे कलाकार रंगमंचा वर स्थानापन्न झाले. उगाच कसली भाषणे नाहित आणि कसला बडेजाव नाही. मंडप पुर्ण भरलेला होता. माईक, स्पीकर वगैरे सगळ्या तांत्रिक गोष्टींची पडताळणी झाली होती. त्यामुळे हैल्लो माइक टेस्टिंग वन टू थ्री किंवा हैल्लो चेक चेक असे धीर गंभीर खर्जातले आवाज, खर खर, मध्येच आपोआप शिट्टी वाजवण्याचे प्रयोग आधीच झालेले होते. मोजकाच कलाकार वर्ग असल्याने वाद्यांची भाऊ गर्दी नव्हती. त्यामुळे रंगमंच जरी छोटा असला तरी कुणालाही अंग चोरून बसावे लागले नाही.  सर्वश्री सौ. अनुराधा दातार मुख्य स्थानी होत्या. त्यांच्या डाव्या बाजुला संवादिनी वर साथीला त्यांचेच यजमान श्री. ओमकार दातार. दुसर्या बाजुला तबल्याच्या साथीला श्री. अतुल गोडसे. रंगमंचावरची ही त्रिसूत्री सांभाळण्याचे अवघड काम करणारे निवेदक श्री. साने. या सूत्रधाराने दोन गाण्या दरम्यान जे काही अप्रतिम निवेदन केले त्यामुळे ती वेळ कधीच कमर्शियल ब्रेक सारखी भासली नाही. दोन गाण्यांमधील सूत्र टिकवून ठेवणे हेच तर त्याचे कौशल्य. पुर्ण कार्यक्रमाला बांधून ठेवणारा हा दुवा पहाटे पहाटे पडलेल्या हळुवार दवा सारखा भासला. लयबद्ध सुरावटीवर जणू शब्दांची रांगोळी काढावी आणि त्यात रंग भरले जावे इतक्या सहजपणे कार्यक्रम रंगत होता.

गायनाचे शिक्षण घेणे, आवड असणे या वेगळ्या गोष्टी आहेत पण सुंदर आवाज लाभणे आणि त्यावर महेनत घेउन त्याची कसदार सुरेल मैफल सजवणे याला पूर्व पुण्याईची दैवी देणगीच असावी लागते. आणि असे कलाकार जेंव्हा श्रोत्यांना सप्तसुरांची पर्वणी पेश करतात तेंव्हा तिथे निर्माण होणारा प्रत्येक नाद, प्रत्येक लय दैवी अंशाने भारलेली असते …..मंत्रमुग्ध करून टाकणारी. सुमधुर आवाज आणि त्याला लाभलेली तितक्याच तोडीची ताल आणि सुरांची सांगत, एक सेवा म्हणुन या पेक्षा वेगळे काय अपेक्षित असेल नटेश्वराला? त्या मंचावर उपस्थित प्रत्येक कलाकाराने पेश केलेल्या गंधर्विय आदाकारीने श्रोतृ वर्ग तल्लीन झाला होता … मुग्ध झाला होता. इतका की शेवटचे गाणे झाले आणि प्रतिक्रया आली “हे काय? झाला कार्यक्रम?” ही अशी विचारणा होणे यातच कलाकारांचे यश आहे आणि त्यांच्या अर्चनेला मिळालेली पोचपावती….

कार्यक्रम संपला … वाद्यांची आवारा आवर झाली. सगळे कलाकार मुळचे अलीबाग परिसरातिलच असल्याने रातोरात डोंबिवलीला परतण्याची घाई पण नव्हती. नविन पिढीचे कलाकार आणि त्यात जुन्या पिढीची शाळूसोबत ओळख निघाल्या मुळे गप्पांचा ओघ मनात घर करून राहिलेल्या आठवणींना उजाळा देत होता. रात्रीचे 2 वाजले होते आणि अनुराधा बाईंचे जेवण देखिल व्हायचे होते. मस्त गरम गरम वाफ़ाळलेल्या मुगडाळिची खिचड़ी बघून दातार बाई खुश दिसत होत्या. गाडीत सगळे सामान भरुन झाले आहे आणि प्रस्थानाला तयार आहे असा निरोप आला आणि लगबग सुरु झाली. काकुने रिवाजा प्रमाणे हळद कुंकू लावले आणि अनुराधा दातार यानी काका काकुला वाकून नमस्कार केला.

पटकन काही तरी आठवून अनुराधा बाई परत खुर्चीत बसल्या. पर्स मधून वही आणि पेन काढले. वहीचा मागचा कागद फाडून त्यावर काहीतरी लिहिले आणि विचारले, “आर्या कुणाची मुलगी आहे? तिला हा कागद द्या. खुप गोड मुलगी आहे” मी म्हटले “माझीच मुलगी”. त्यांनी दिलेला कागद घेतला. कागदाची घडी उघडून बघितले तर एक छान सन्देश आणि त्या खाली स्वाक्षरी.
मी म्हटले “अहो कार्यक्रमाच्या आधी पण तिने तुमची सही घेतली होती ना??? हरवली असेल आणि तुमच्या कडे परत मागितली असेल”.
“नाही नाही …. मध्यंतर झाल्यावर ती आणि अथर्व म्हणून एक तिच्याच वयाचा मुलगा माझ्या कड़े आले. तेंव्हा आर्या मला म्हणाली की मी मगाशी जी सही तिला दिली होती ती तिने अथर्व ला दिली त्यामुले तिला परत एकदा सही हवी …. पण त्यावेळी कागद पेन नव्हते म्हणून मी तिला सांगितले की कार्यक्रम झाल्यावर देते. दोघे जण बराच वेळ शांतपणे गाणी ऐकत होते…. दंगामस्ती न करता…. लहान मुले समोर बसली आहेत आणि काही मस्ती करत नाहीयेत असे खुप कमी वेळा होते.” इति अनुराधा दातार
आता त्या बिचारीला काय माहित जेंव्हा मी या दोघाना पहिल्या रांगेत बसताना बघितले तेंव्हाच मस्ती न करण्यासाठी चांगलाच दम भरला होता ते.
त्यांनी दिलेला कागद पाकिटात ठेवत मी म्हणालो “हो ती कार्यक्रम संपायच्या आत निघून गेली झोपायला… सकाळ पासून धवपळ मस्ती चालु होती त्यामुळे दमली …. इतका वेळ गाणे ऐकायला दोघे बसली याचेच नवल वाटते. मी देतो तिला आपली सही”.

एखाद्या लहान मुलीची सही देण्या बद्दलची विनंती लक्षात ठेवून ती पूर्ण करणारा कलाकार वेगळाच असतो. माहीत असतं की लहान मुले तो कागद कुठेही हरवू शकतात पण तरी सुद्धा त्यांचे मन राखणार्या कलाकाराना त्यांच्या प्रेक्षकान्बद्दल खरी आपुलकी असते, आत्मीयता असते. हा वसा जपणारे असेच कलाकार, केवल कलाकार म्हणुनच नाही तर माणुस म्हणून देखिल महान असतात …. माझ्या साठी आणि माझ्या मुलीसाठी असलेले खरेखुरे सेलिब्रिटी.

4 thoughts on “ऑटोग्राफ ०२

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s