नांदा सौख्य भरे

NandaSoukhyaBhare

“अरे ऐकलस का काय झालय ते” असे आईने अगदी जवळ येउन दबक्या आवाजात विचारले म्हणजे तिला निश्चित काही तरी गॉसिप सांगायचे आहे किंवा माझ्या कडून माहिती काढून घ्यायची आहे. गेल्या ४० वर्षात तिच्या अश्या बोलण्याचे या शिवाय वेगळे काही निष्पन्न झालेले नाही. सुट्टीचा वार, दुपारचे जेवण मस्त हाणुन झाल्यावर संगणकीय रवंथ करत असताना माझा स्वस्थपणा या माउलीला बरेचदा बघवत नाही. तिची ती अर्ध्या तासाची वामकुक्षी झाल्यावर सगळीकडे शुकशुकाट असताना तिचा मोर्चा हळूच माझ्याकडे वळतो. त्यात तिचा तरी काय दोष म्हणा … माझ्या वाटणीची तीच वेळ तिला सोइस्कर असते त्याला ती बिचारी तरी काय करणार. “मावशीने तुला बोलवले आहे. तिला तुझ्याशी काहीतरी बोलायचय.” काहीसा वैतागुन मी म्हणालो “काहीतरी म्हणजे काय??? आणि तुला माहीत नाही अस कस होईल? काय ते स्पष्ट बोल” आता हे तिचे स्पष्ट बोलणे किमान 35-40 मिनिटे चालणार हे निश्चित. “बर भेटतो मावशीला” असं म्हटल्यावर  तिची आणि पर्यायाने माझी सुटका झाली.

मावशीला भेटल्यावर असं जाणवले की तिच्या कडे वेगळे असे काहीच सांगायला नसून आमच्या मातोश्रींच्या कृपेने सगळी कहाणी मला अगोदरच माहिती झालेली आहे.
“बघ रे बाबा काहीही कर पण तिला समजाव. ऐकतच नाहीये अजिबात. म्हणते लग्न केलं तर त्याच्याशीच करीन. तिच्या बाबाना हे सगळे नाही चालणार…..काय सांगू तुला? आत्ताच त्या दोघांचे शिक्षण झालय … त्याची नोकरी अजुन धड नाही, ही पण आत्ताच कामाला लागली आहे … आणि मुलगा आपल्या जातीतला पण नाही.” आईने चालू केलेल्या रागदारी वर मावशी भैरवी गात होती.
आधीच माझी मावशी घराच्या परिस्थितीने गांजलेली आणि आता हा माझ्या बहिणीचा प्रेमळ प्रॉब्लेम.
अवांतर माहिती काढण्यासाठी मी तिला विचारले, “तू भेटली आहेस का त्या मुलाला? भेटून घे. बघ, दोघाना एकत्र बसवून बोल. तुमच्या घरातल्या अडचणी सांग. नाहीतरी समोरच्या बिल्डिंग मध्येच राहतो ना तो? म्हणजे ज़रा ओळख पाळख असेलच तुझी?”
“नोकरी धन्द्याचे काही विशेष नाही रे पण जातीचे काय? संस्कार रितभात किती फरक आहे? अशी कित्ती उदाहरणे बघितली आहे … अश्या ठिकाणी जरा भांड्याला भांडे लागले की 2-3 महिन्यात येतात परत घरी … आणि वर आयुष्याचे वाटोळे”
आता या वर मी काय बोलणार बापडा, “बघतो काही जमतय का…. समजावतो मी तिला” असे म्हणुन तिच्या डोक्यावरचा काही भार माझ्या खांद्यावर घेतला.
खरे तर मी हे असे कुणाला समजावण्याच्या भानगडीत अजिबात पडत नाही. कारण त्याचा अर्थ कोण कसा काढेल हे सांगू शकत नाही. उगाच सुरळीत चाललेलं काही कारण नसताना बिनसायचे. कसं आहे ना, आरश्याच्या मागचा पारा उडून गेला तर धुसर दिसणारे प्रतिबिंब पण एक वेळ चालेल पण आराश्याला तडा गेलेला नाही चालणार. पारा लावून मिळेल पण गेलेला तडा कसा सांधणार?

ठरल्या प्रमाणे तिला भेटलो. प्रेमात पडलेली माणसे ना निबर झालेली असतात निबर. तशीच ती पण मुरलेली होती. माझे सगळे निट शांतपणे ऐकून घेतले आणि परत येरे माझ्या मागल्या. हर तऱ्हेने तिला समजावून बघितले. लग्नानंतर उद्भवणार्या अडचणी, पूर्णपणे वेगळ्या असलेल्या चालीरिती, घरचे वातावरण या बद्दल चर्चा झाली. पण ती तिच्या निश्चयावरून तसूभर देखील ढळली नाही. तिच्याशी बोलताना एक मात्र पटले, एकदा का तडजोड करायचे ठरवलेच असेल तर मग जे काही समोर येईल त्याची मानसिक तयारी या प्रेमात पडलेल्या मुलींची झालेली असते. आपल्या प्रेमाबद्दल, आपल्या जोडिदारा बद्दल केलेला विचार तिच्या बोलण्यातुन जाणवत होता. “दादा अजुन आम्हाला लग्न करायला वेळ आहे. अजुन सेटल व्हायचे आहे. त्याला 2 वर्षे तरी लागतील. आईची काळजी वाटते. बाबा कधीच या लग्नाला तयार होणार नाहित…. आणि दादाचे काही सांगू शकत नाही. त्या दोघांचे मत बदलण्याचा मी प्रयत्न करीन. पण लग्न केलं तर याच्याशीच करीन … कारण तू म्हणतोस ते मुद्दे ठरवून केलेल्या लग्नात देखिल आहेतच ना. इथे निदान मुलगा आणि घरचे तरी मला निट माहीत आहेत. आणि या दोन वर्षात मी त्याच्या घरच्यां बद्दल अधिक जाणुन घेउ शकते. पाहिजे तर तू पण भेट त्याला”. ती बोलली ते काही अगदीच जगावेगळे नव्हते. तिचे शेवटचे वाक्य तिच्या निर्णयावर असलेला तिचा विश्वास अधोरेखित करत होतं. मावशीला कळवुन टाकले, मुलगी ऐकणार नाही. रितसर लग्न करून देणे हेच उत्तम. २ -३ वर्षात लग्नाची तयारी करून ठेव. उगाच पळून जाऊन लग्न करून घेण्या पेक्षा आपण लावून दिलेले केंव्हाही चांगले.

नंतरच्या  दोन वर्षात दोघांनी चांगले बस्तान बसवले. इकडे आम्ही सगळ्यांनी मिळून मावशीच्या यजमानांना राजी केले. तिने लग्न करावे मी लग्नाला येणार नाही इथून झालेली सुरुवात विधीपूर्वक कन्यादान करण्या इतपत येउन पोचली. मुलीने बाजी मारली कारण विजातीय सोडलं तर नावे ठेवायला जागाच नव्हती. पण हे त्यांना समजावून सांगायला २ वर्षे वाट बघावी लागली. ८ डिसेम्बर रोजी हा विवाह सोहळा अगदी थाटामाटात पार पडला. जोडा खूप छान दिसत होता आणि दोन्ही कडची मंडळी देखील खुश होती. मावशीची परिस्थिति बेताची जरी असली तरी छान लग्न लावून दिले. प्रतिकूल परिस्थिति वर मात करून आपले आणि आपल्या जोडिदाराचे स्वप्न पुर्ण करण्या साठी एक जिद्द लागते, नियोजन लागते …. अनेक अग्निपरीक्षा द्याव्या लागतात आणि तेंव्हा कुठे तुमच्या स्वप्नातला जोडीदार सत्यात उतरतो. विहित क्षणी दोघांच्या मध्ये आंतरपाट धरला जातो, सनई आणि मंगलाष्टकांच्या सुरांवर मंत्राक्षता डोक्यावर पडतात,  जीवनातल्या महत्वाच्या टप्प्यावर आलेले अडथळे पार करून ते दोघे हातात वरमाला घेऊन उभे असतात. “नांदा सौख्य भरे” असं म्हणत देवही आपले वाचन पूर्ण करून स्वर्गात बांधलेल्या नात्यांचा सोहळा बांधत असतो … इथे …खाली … या पृथ्वीतलावर … नाही का???

फोटो आंतरजाला वरून साभार.

5 thoughts on “नांदा सौख्य भरे

    • कमेंट्स केंव्हाही आल्या तरी त्या सुखावह असतात …. वाचकांनी दिलेली पावतीच म्हणाना … आणि तुम्ही नेहेमी माझे लेख वाचता आणि आवर्जून कमेंट देता त्याबद्दल धन्यवाद.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s