तू आणि मी

तू आणि मी ….. अगदी एक रूप …. एक तत्व …. एकमेकांत मिसळलेले ….. पहिला श्वास पण आपण एकत्रच घेतलेला. जो तुझा रंग तोच माझा देखील पण ढंग मात्र भिन्न …. पूर्णपणे. तू चौकटीत सामावलेला तर मी चहु बाजूनी उधळलेल्या संध्याकाळच्या तांबुस भगव्या रंगा सारखा. पण तरीही आपण एकमेकांत मिसळलेलो …. नदी सागरात मिसळुन जाते तसं.
कधी मी तुझी सावली तर कधी तू माझा आधार. दोघाना एकमेकांची संगत कधी बुडताना वाचवणारा तर कधी तोल सावरून धरणारा. ही जोड़ी खरं तर त्या विधात्याने जमवली आणि टिकवेल देखिल शेवटच्या क्षणा पर्यन्त. दोन श्वासातिल घालवलेल्या अनंत क्षणांचे साक्षीदार म्हणून. आयुष्याचे जोखड मानेवर घेउन धावत रहायचे फ़क्त.
विषय आशय वेगळे भासले तरी अर्थ एकच वेगवेगळा उमगलेला. सारांशातले सार वेगवेगळे पण अंश एकच …. एकाच कुडितला …. याच एका अंशाने …. एका तलम धाग्याने बांधले गेलोय आपण कारण तो अंशच सांगतो तू माझा आहेस आणि मी तुझा.

माझ्यासाठी तुझं अस्तित्व तितकेच महत्वाचे जितके तुझ्यासाठी माझे “असण”. कधी कधी नाण्याच्या दोन बाजू होवून, पाठीला पाठ लावून उभे राहतो बंडाचे निशाण फडकवत. छापा काटा करून जिंकलास तरी तुझे बंडाचे निशाण उतरत नाही. तरी पण आपण नेहेमी धावत असतो दोन समांतर जाणार्या रेशांप्रमाणे. माझ्या हातावर जश्या रेषा अगदी तश्याच तुझ्या तळहातावर उमटलेल्या. हात जुळवले तर मिसळून जातात एकमेकांच्यात. पण त्या रेषांनी बनलेले रेखाचित्र मात्र वेगवेगळे. मी संयमित तर तू अनिर्बंध.

दोन डोळे होवून बघतो आपण जगाकडे. मेंदूच्या दृष्टी पटलावर पडणारी प्रतिमा एकच, तिचा आकार, उकार, रंग, ढंग सगळं सारखं ….. पण निष्कर्ष वेगवेगळे. कदाचित तो मेंदू देखील तुझ्या माझ्यात फारकत करत असावा. मला शांत हिरवा, निळा रंग भावतो तर तुला जहाल लाल किंवा काळा. कधी कधी तर निळसर आकाश देखील तुला लालबुंद दिसतं. सृष्टी मधील हिरवा गालिच्या वर रेंगाळणारा मी आणि तू मात्र रुक्ष वठलेल्या झाडावर झोके घेत असतोस. कृष्णाच्या मोरपिसा, बांसुरीतल्या सुरावटी मध्ये मात्र आपण दोघे रमतो कारण सगळे विश्वच तिथे एकतत्व झाले आहे. मग तिथे आपण वेगळे कसे राहणार?

पूर्वी तुझी बाजू घेणारा मेंदू आताशा अनुभवाने शहाणा झालाय …. माझे जरा ऐकायला लागलाय. तुझा शब्दातीत वाद ऐकून सुद्धा त्याला माझी निःशब्द शांतता उमगायला लागली आहे. त्याच्या याच प्रगल्भतेला तू म्हातारपण म्हणून हिणवतोस. अनुभवाने आलेले शहाणपण तुला कधीच रुचले नाही. काळ आणि वेळ यांची शिकवणी तुला कधी जमलीच नाही. ….. पण आज तरीही तू माझी साथ सोडू शकत नाहीस….सोडली नाहीस.

नाही आवडत मला तुझा हेकेखोरपणा आणि तुला माझा समजूतदारपणा. नाही आवडत मला तुझ्या स्वभावातील चंचलता. नाही आवडत एकाच गोष्टीवर तासंतास फुगून बसणे, आदळा आपट करणे. पण स्वभावाला औषध आहे का? असं तूच तर म्हणतोस. कधी कधी कळतच नाही मला तुझे अगम्य वागणे. कारण तुझ्या स्वभावाचे विश्लेषण करणे खरच कठीण आहे. तुला आवडणारे किंवा तुला जिंकता येणारेच खेळ आपण खेळायचे. तुला पाहिजे तेच करायचे आणि पाहिजे तसेच हाच तुझा दंडक. तिथे माझी आवडनिवड काय याला काहीच किंमत नाही. जगाशी वाद घालू शकणारा मी तुझ्याशी वाद घालणे मात्र टाळतो. कारण शाब्दिक वाद घालू शकतो पण तुझ्या बरोबर भावनिक वाद कधीच शक्य होत नाही. कारण भावनांशी खेळणे तुझं नित्याचेच. डोळ्यांवाटे भावना ओघळू लागल्या कि तू शांत होतोस … तेवढ्या पुरताच…. कारण तुझा “मी”पणा सुखावलेला असतो माझ्या “मी”पणाला बोचकारून. तुझ्या मना प्रमाणे मला वागवतोस ते आवडत कधी कधी… पण तेवढ्या पुरतेच…. त्यातला रस निघून गेल्यावर परत चालू होते तुझी धुमश्चक्री. मी प्रत्येक शिताची चव घेणारा आणि तुझे फक्त उदरभरण …. सपक अन्न पण चालते तुला पोटाची खळगी भरायला…. तुझ्या जगण्या पुरते. मी मात्र प्रत्येक चवीचा भोक्ता. वैविध्य जपणारा. जठराग्नि शांत करणे हे एकच तुझे उद्दिष्ट. …. मला मात्र माझ्या यज्ञ कुण्डात वेगवेगळ्या आहुत्या लागतात याची तुला जाणिवच नाही.

तुला जे आवडते तेच मी करावे हा तुझा अट्टाहास. तुझी आवड निवड पुरवावी हा तुझा आग्रह. माझ्या आवडीचे काय??? माझी निवड तुला आवडतेच असे नाही … बहुदा नाहीच …. आणि आता तर मला अशी विशेष आवडी निवडीच राहिल्या नाहित. काहीही चालते या सदरात तू माझी वर्गवारी करून गृहीत धरु लागला आहेस मला. तुझ्या सारखे फायद्या पुरते बघू शकत नाही ना मी. माझ्यासाठी वेचलेल्या श्वासाची देखिल किंमत मागशील तू कदाचित.
मी जगन्मित्र …. हे विश्वची माझे घर हिच माझी घराची संकल्पना. तुझ्या लेखी प्रत्येकाचा मापदंड एकच … तुझ्या पट्टीने मोजलेला. चांगले, वाईट अश्या वाटाघाटि करण्यात मी नाही वेळ दवडत. कारण ऋणानुबन्धाचे रज्जु ज्याचे टिकले तो आपला. तू मात्र रज्जु बांधण्या आधीच कात्री लावून बघतोस. तुझ्या दृष्टीने प्रत्येक चेहेरा फसवा, प्रत्येक जण आपमतलबी. कदाचित माझ्या बाबतीत पण तुझे हेच किंवा असेच काहीसे मत असेल….पण मला सोडून तुझं अस्तित्व नाही हा तुझा नाईलाज आणि गुण दोषांसकट तुला साथ देण्याचा माझा अट्टहास.

मला नेहेमीच आवडते स्वच्छंदी रहायला, फुलांमध्ये खेळायला, पक्षांमध्ये बागडायला. कधी वार्या बरोबर तरंगतो तर कधी पानावरल्या दवबिंदू मध्ये रमतो. नदीच्या पाण्या बरोबर वाहत जाउन शेकडो फुट उंच प्रपातावरुन झोकुन देण्यात मजा काही औरच आहे. माझं आकाश निरभ्र, निळ्याशार रंगाची रेशीम शाल पांघरलेले.

तसं तुझं नाही …. तू नेहेमीच एका कोपर्यात बसून राहतोस नुसता. म्हणे झाडांचा हिरवा रंग आवडत नाही तुला. फुलांच्या सुवासात तू गुदामरातोस. तुझं आकाश कायमच ढगाळलेले …. पण बरसण्याची आतुरता माझ्यातच …. तू केवळ ढगांशी मारामारी करत बसतोस … विजांशी तुझी गट्टी. आणि थेंब थेंब साठावण्या साठी मी हट्टी….. माझ्याच विश्वात रममाण होणारा.

माझ्या बर्याच मित्रांनी तुझे नाव “नकोसा’ ठेवलय. बरेच जण तुझी साथ सोडुन गेलेत ….. मी मात्र अजुन तग धरून आहे…..दगडाच्या फ़टित वाढणाऱ्या एखाद्या रोपट्या सारखा. एकाच आशेवर की आज ना उद्या त्या दगडाना पाझर फुटेल आणि अडकलेल्या पाण्याचा मार्ग मोकळा होईल … मग घेऊ दोघे भरारी त्या निळ्याशार अवकाशात. वाट बघतोय त्या क्षणाची, त्या समांतर धावणार्या रेशा क्षितिजा वरच्या बिंदुवरतरी एकत्र जुळण्यचि.
पण आता मी थकलोय …. पाठीला पाठ लावून उभे केलेले बंडाचे निशाण मी आता कधीच म्यान केले आहे….. शेवटी ते देखिल माझ्या रागाप्रमाणेच लटके निघाले…. क्षणभंगुर… का मी कंटाळलोय तुझ्या औषध नसलेल्या स्वभावाला?? का मी थकलोय तुझ्या समवेत होत असलेल्या फ़रफ़टिला? का मी वैतागलोय तुझ्या अस्तित्वालाच… तुझ्या असण्यालाच?

कसं शक्य आहे ते? कारण आपण वेगळे आहोत का हा मुळ प्रश्नच मेंदू सोडवू शकलेला नाही. देवानेच हे कधीही न उलगडणारे कोडे घालून ठेवले आहे आपल्या आयुष्यात. या प्रश्नाचा चक्रव्यूह उभा आहे आणि मेंदूचा अभिमन्यु झालाय. तो शेवट पर्यंत चक्रव्युहातच राहणार. तुझा नी माझा चक्रव्यूह अभेद्य आहे …. अगदी कृष्णाला देखिल कारण त्याची निर्मिती आपणच केली. त्यामुळे आता आपली देखिल सुटका नाही ….ज्या शरीरात आपण आहोत त्याच्या अंतापर्यन्त एकत्रच राहणार आपण…. अगदी काहीही झाले तरी …. आपणच बनवलेल्या चक्रव्युहातले अभिमन्यु.

19 thoughts on “तू आणि मी

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s