जिव्हाळ्याची शहाळी

Nagaon-Oct2010-112

माझी सासुरवाडी मुळची नागांवची. त्यामुळे काही नातेवाईक म्हणजे माझ्या पत्नीची चुलत आत्या, तिचे काका अशी मोजकी दोन चार घरे अजुन आहेत. त्यामुळे नागांवला गेलो की अधून मधून ख्याली खुशाली निमित्त जाणे होते. तिच्या या सगळ्या नातेवाईकांना आधी पासूनच ओळखत होतो पण सोयरीक झाल्यावर येणे जाणे वाढले…..कधी सहजच म्हणुन तर कधी निरोप्या म्हणुन.

नागांव ला आमच्या घराचे काम चालू होते त्यामुळे शनिवार रविवार किंवा इतर सुट्टीच्या दिवशी पण मी तिकडेच जायचो. जवळ जवळ वर्ष सहा महिने हा शिरस्ताच चालू होता. उन्हाळ्याचे दिवस असले तरी आजुबाजुच्या नारळ पोफळीच्या बागांमुळे थंडावा असायचा. त्यात बागेला शिपणे केले असेल तर दूर वरून येणारा गरम हवेचा झोत देखिल शीतल होउन जायचा. अगदी एखाद्या कूलर प्रमाणे. नैसर्गिक वातानुकूलन म्हणा हवे तर. मग अश्या वेळी पडवी वर हतरी टाकुन काय मस्त झोप लागते …. आहाहा …. पण आता तश्या पडव्या नाहित आणि ओसर्या देखील नाहित त्यामुळे दोन नारळाच्या झाडाना hammock बांधून त्यावर झोके घ्यावे. (असो विषयांतर होतय … पण काय करणार, ही वाटच इतकी जिव्हाळ्याची आहे की एखाद्या आडवाटे वर डोकावल्या बिगर चैन नाही पडत).

अश्याच एका नागांव फेरीच्या वेळी सौं.च्या मालु आत्याकडे कसला तरी निरोप द्यायला जायचे होते. हिची आत्या बंदर भागातील आठवल्यां कडे दिलेली. नागांवात आठवले/कुंटे/लोंढे/भातखंडे/पटवर्धन/फडके अशी ब्राह्मण घरे मुबलक …. त्यामुळे कुणाचा कोण हा तपशील या आडनावा बरोबर नेहेमी द्यायला लागतो. नागांवातील सगळ्या आठवल्यां प्रमाणे हे देखिल सुखवस्तू, जमिन जुमला, गुरं ढोरं बाळगुन होते. पण तितकेच कष्टाळु ….. दिवसाची कामे ठरलेली … कधीही खंड नाही. मालु आत्या आणि तिचे यजमान दोघेच घरात. मुलगा सून कामानिमित्त मुंबईत, त्यामुळे नातवंडे देखिल मुंबईत. अर्थात मुंबई मधील मुलगा सुन येउन जाउन असायचे पण तेही सुट्टी पुरतेच.

नागांवातल्या घरात दिवसभर गडी माणसांचा कायम राबता असे. वाडीची देखभाल, शिपणे, शेताची कामे सगळी कामे गडी माणसे करत. मालु आत्या आणि अण्णांची चांगली बडदास्त त्यांच्या मुलाने करून ठेवली होती. त्यामुळे घरातील इकडची काडी तिकडे करायची वेळ उभयतांवर कधी आली नाही. आयुष्य भर कामांचा गाडा उपसलेल्या त्या दोन जीवांना चैन थोडीच पडणार? पण या वयात देखिल त्यांची कामाची उरक बघता यांनी त्यांच्या उमेदीच्या काळात केलेल्या मेहेनतीची जाणीव झाल्याशिवाय रहात नाही. पण आता वयोमानापरत्वे अण्णा फक्त देखरेखीचे काम करत. पण जरा कुठे गडी आला नसेल तर कामाला तयार. मग मालु आत्या त्यांना दामटवायच्या. शिडशिडीत बांध्याचे अण्णा कमरेत काहीसे वाकलेले होते. त्या मानाने मालु आत्या वजन राखुन होत्या. (माहेरच्या पटवर्धन ना). दोघांचा वर्ण मात्र एकदम हात सडीच्या तांदळा सारखा … तांबुस गोरा. मालु आत्या हसल्या की प्रसन्न वाटायचे. अगदी कृष्ण-धवल जमान्यातील सुलोचना बाईंची आठवण व्हायची. छानसे कौलारू घर, अगदी ओटी, पडवी, ओसरी, माजघर असे जुन्या धाटणीचे असले तरी निटनेटके आणि टापटीप असायचे. घरा समोर अंगण, अंगणात तुळशी वृंदावन, पाठीमागे नारळी पोफळीची विस्तीर्ण वाडी, घराला लागुनच शेत … जणू हिरवाईच्या कोंदणात असलेले टुमदार घर …. मस्त आणि प्रशस्त. नागांवातील प्रातिनिधिक घरच म्हणा हवे तर.

दुपारी जेवण झाल्या झाल्या जाऊन त्यांच्या वामकुक्षी मध्ये अडसर नको म्हणून चार च्या सुमारास त्यांच्याकडे जायला अमित आणि मी निघालो. तसं त्यांचे घर आमच्या घरा पासून दिड एक किलोमीटर असेल पण चालत जायचा आळस आणि तसेच पुढे सुरुच्या बनात पण भटकंतीला (नेमाप्रमाणे) जाता येईल म्हणून गाडीच काढली. मुळ रस्त्याला लागुनच त्यांच्या घराची वेस आणि ती वेस सांधणारे मोठे लाकडी फाटक…. जुन्या पठडीचे. गाडी बाहेरच लावलेली बघुन दरावाज्यातुनच अण्णा म्हणाले “अरे आत आण …. इतकी मोकळी जागा आहे” “अगं जयंताचा जावई आलाय गं … वासु भटजींचा नातु” हे वाक्य मालु आत्याला. गाडी अंगणात लावून पडवी वरच्या झोपाळ्या वर मस्त झोके खात बसलो. पडवी तिन्ही बाजुंनी मोकळी असल्यामुळे इतक्या उकाड्यात देखिल पंख्याची गरज भासली नाही. खरं सांगू का? एक झोपाळा आणि एक काथ्यांच्या दोराने विणलेली बाज असेल तर तुम्हाला सोफा, खुर्च्या यांची गरजच नाही.

अण्णा जुजबी चौकशी करून त्यांच्या कामाला निघुन गेले. तयार झालेले नारळ पाडण्या साठी बहुतेक पाडेकरी आला होता. मालु आत्या माजघरात एकट्याच बसलेल्या होत्या त्यांनी बोलावून घेतले. ख्याली खुशाली विचारुन झाली. निरोप सांगुन झाले आणि मग अश्याच गप्पा झाल्या. निघायची वेळ झाली आणि आम्ही दोघांनी आत्यांना वाकून नमस्कार केला. मागील दारी गेलेले अण्णा लगबगीने आत आले. त्यांच्याही पाया पडलो. आशीर्वाद देतानाच अण्णा मालू आत्याला म्हणाले “अगो जावयाला काही चहा पाणी विचारलेस की नाही??? ज़रा चहा टाकायला सांगा. ३-४ कप जरा जास्त सांगा …. आज गडी पण आहेत.” म्हातारा म्हातारीला काहीच तोशिश नव्हती. अगदी स्वयंपाक घरात काम करायला सुद्धा बाई ठेवलेली होती. अण्णाचा आवाज ऐकताच तिने लगबगीने अधण ठेवले आणि चहाची तयारी केली.

इतक्यात खांद्या वर शहाळ्यांनी भरलेली पोगी घेउन गडी माजघरात थडकला. एका पोगीलाच जवळ जवळ २०-२५ हिरवीगार शहाळी लगडलेली होती. आमच्या कडे बघून अण्णा म्हणाले “चहा घेणार की शहाळ्याचे पाणी?” उन्हाळ्याच्या दिवसात झाडावरुन काढल्या काढल्या शहाळ्याचे पाणी मिळायला जबरदस्त योग लागतो आणि तो आमच्या नशिबी आयताच आल्याने आम्ही अव्हेरण्याचा करंटेपणा थोडीच करणार? आमच्या होकार नकाराची वाट न बघता त्यांनी गड्याला कोयता आणि पाणी काढण्या साठी एक तांब्या दिला. “पाहुण्यांना हवी तेवढी फोडून दे”….. आयला हे म्हणजे छप्पर फाड के…. चातकांच्या घशात थेंबांच्या जागी पावसाची संततधार. दोन शहाळ्यातच तो आकाराने भक्कम असलेला तांब्या भरला. समोर दोन पेले ठेवले होते. त्यात पाणी ओतून घेताना मी म्हणालो “अण्णा, आत्या तुम्ही पण घ्या”. मालू आत्या चक्क नाही म्हणाली तर अण्णा म्हणाले ” तुम्ही घ्या पोटभर, मी घेतो नंतर.”

पेला ओठांना लावला … काहीच थेंब जिव्हे वरून ओघळत आत गेले असतील …. सगळ्या रसग्रंथी जागृत झाल्या …. इतके सुमधुर अविट गोडीचे शहाळ्याचे पाणी आजतागायत मी कधी प्यायले नव्हते. रंग हिरवट असता तर उसाचा रसच वाटला असता. एकाच घोटात ती अमृत मधुरा प्राशन केली. दोघांनी पेले परत भरुन घेतले. तांब्यात काही उरले नाही ना याची खात्री करून घेतली आणि आता मात्र आरामात घुटके घेत बसलो. त्या चवीची, देवाच्या करणी ची इतकी मोहिनी पडली होती की थोडे पाणी मालकांकरता ठेवायचेच विसरून गेलो. या सगळ्या प्रकारामुळे अजुन दोन शहाळी फोडायला सांगायचा बेत रद्द केला. त्यांच्यासाठी पाणी उरले नाही या बद्दल दिलगीरी व्यक्त केली तसे अण्णा हसून म्हणाले “तुम्ही प्या भरपूर. असं कुणी आले की बरे वाटते रे. मी काय घेईन नंतर फोडून. आता शरीर थकले रे नाहीतर नारळाच्या शेण्ड्यावर बसून शहाळी खाण्यात जी मजा आहे ती या स्टील च्या पेल्यात नाही.” असं म्हणताना कुठलाही पक्का नागावकर रंगात आला नाही तरच नवल. मग त्यांनी त्यांच्या ऐन तारुण्यातले मजेदार किस्से सांगितले. शिमगा, होळी, पोपटी, कबड्डीचे सामने, बैलांच्या शर्यती यांच्या निगडीत असलेल्या आठवणी जुन्या नागावकराला तजेला आणतो. अश्या वेळी त्या म्हातारबुवाच्या नजरेतली चमक आणि आवेश बघता थक्क व्हायला होत.मनसोक्त गप्पा मारुन झाल्यावर अण्णा आणि मालु आत्याचा निरोप घेतला. “परत आलात की येत जा. फोन करून आलास तर शहाळी काढून ठेवीन.” गाडी पर्यन्त सोबत आलेले अण्णा म्हणाले. शहाळ्याच्या पाण्या इतकेच त्यांचे नितळ भाव आणि आपुलकीचा गोडवा बघून गहिवरून आले. तेथून समुद्राच्या किनार्यावर फेरफटका मारला. जिभेवरची प्रेमाची, जिव्हाळ्याची चव जपण्या साठी पहिल्यांदाच भेळ पूरी वर काट मारली होती.

त्या नंतर कधीच तिथे जायचा योग आला नाही. आता मालु आत्या नाही आणि अण्णा देखिल नाहित. आजही त्या रस्त्याने जाताना त्यांची आठवण झाल्याशिवाय रहात नाही. अगदी गाडी चालवत असलो तरी नजर घराकडे वळतेच. जुनी कच्ची वेस जाउन आता तिथे सिमेंटचे कंपाउंड झालय … जुने गेट पण बदलले. त्यांच्या उंची मुळे बाहेरून दिसतात ती फक्त घराची कौलं, त्या मागे डोलणारी माडांची वाडी आणि त्याला लगडलेली सुमधुर चवीची शहाळी.

2 thoughts on “जिव्हाळ्याची शहाळी

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s