भेळवाला चाचा

(या कथेतील बरेचसे स्थलकालादी दाखले हे काल्पनिक असून व्यक्तिमत्व मात्र खरे आहे. काल्पनिक गोष्टींचा उपयोग केवळ व्यक्तिमत्व खुलवण्या साठी केला आहे.)

ठाणे कॉलेज मधून डिग्री घेतली आणि तडक पुढील शिक्षणासाठी मुंबईच्या विज्ञान संस्था या महाविद्यालयात दाखल झालो. विज्ञान संस्था दादाभाई नवरोजी रोड वर रिगल थेटरच्या समोर असल्याने बरेच वेळा चालतच जायचो. दादाभाई नवरोजी रोडवरील फेरीवाले, दुकानं बघत जाण्यात एक मजा असायची. रोजच्या मिळणाऱ्या पैशांमध्ये गाडीची चैन परवडण्या सारखी नव्हती. महिन्याचे ठराविक असे पैसे मिळत नव्हते त्यामुळे रोजचा हिशोब रोज द्यावा लागे. कॉलेजला कॅंटीन असल्याने आणि आई रोज भरपूर डबा देत असल्याने बाहेरच्या ठेल्यांवर हात मारायची कधी गरजच नाही पडली. एम्.एस.सी. झाल्यावर लगेच BNHS या संस्थेत कामावर रुजू झालो. ही संस्था देखील त्याच परिसरात होती त्यामुळे रोज चालत जाण्या येण्याचा दिनक्रम तसाच होता. पगार चालू झाला असल्याने अधून मधून बाहेर खायचो. त्याच परिसरात फिरून गेट वे वर जीवाची मुंबई करायचो. 😉

एकदा ऑफिस मधून निघायला थोडा उशीर झाला त्यामुळे भूक पण लागली होती. साहेब पण थांबले होते काम करत. दोघांचे काम एकदम संपले तसे ते म्हणाले “चल तुला आज मस्त भेळ खायला घालतो.” आता साहेब घेउन जाणार म्हटल्यावर एखाद्या हॉटेल वर घेउन जाणार, त्यामुळे जरा संकोच वाटत होता. पण त्यांनीच “रस्त्यावरची चालेल ना?” असं विचारून माझ्या मनावरचं ओझं हलकं केलं. रस्त्यावरची भेळ म्हणजे माणशी ५ रुपयांचाच मामला होता. मी एका पायावर तयार. आम्ही चालत चालत बोरा बझार स्ट्रीट च्या कोपऱ्यावर आलो. रस्त्या लगतचा फुटपाथ सगळा फेरीवाल्यांनी व्यापला होता आणि त्या फेरीवाल्यांच्या एका बाजूला हा भेळवाला चाचा. साधारण पन्नाशीच्या आसपास असेल. किरकोळ शरीरयष्टी, अंगात त्याच्या वर्णाला साजेशी अशी मळकट डगलेवजा बंडी, खांद्याला लाल रंगाचा गमछा, मळकट धोती, अर्धे पांढरे झालेले भुरभुरीत केस …. अगदी टिपिकल यूपी, बिहारचा भैया … पण राईच्या तेलाचा मागमूस नसलेला. मुंबईतील फेरीवाल्यांकडे अभावाने मिळणारे चेहेर्यावरचे हास्य आणि अदबशीर बोलणं लक्षवेधक होतं.

साहेब म्हणाले “चाचा, दो मस्त भेल बनाना, मिडीयम तिखा, कांदा ज्यादा”

चाचा: “क्या साबजी, आज बहुत दिनों बाद आना हुवा?” चाचा: “क्या साबजी, आज बहुत दिनों बाद आना हुवा?”

साहेब: “हांजी …. आजकाल थोडा बिझी रेहेता हुं. ऑफिस से निकलनेको टाईम होता है”

चाचा: “आपसे पेहेले ये २ साहबको भेल देनी है. तनिक रुकना पडेगा”

त्याची अस्खलित हिंदी आणि साहेबांची बम्बैय्या हिंदी यात जुगलबंदी चालू होती. मी मात्र भुकेने बेजार झालो होतो आणि चाचा भेळ बनवत होता. टेबलावर एका मोठ्या टोपली मध्ये चुरमुरे होते. एका छोट्या मडक्यात कोळसे पेटवून ते मडके चुरमुर्यांवर ठेवले होते. दर वेळी चुरमुरे घेताना ते मडके एका लकबीने बाजूला करून त्याखाली असलेले गरम गरम कुरकुरीत चुरमुरे चाचा कागदावर घ्यायचा. ३ वेगवेगळ्या प्रकारच्या चटण्या, कांदा, कोथिंबीर, तोतापुरी आंब्याच्या छोट्या छोट्या फोडी हे सगळं नीट एकत्र करून त्यावर मस्त बारीक शेव पसरली, लिंबू पिळला आणि एक कडक पुरी टाकली की दुसऱ्या क्षणाला भेळ गिऱ्हाईकाच्या ताब्यात असायची. गप्पा मारताना देखील चाचाचे हात सराईत पण काम करत होते. जणूकाही हातांना सवयच झाली होती. चाचाचे प्रत्येक गिऱ्हाईकाशी बोलणे, नेहेमीच्या गिऱ्हाइकांची केलेली विचारपूस भेळेसारखीच चमचमीत होती, भेळवाला आणि गिऱ्हाईक या व्यावहारिक नात्यापलीकडे जाऊन आपुलकी जपणारी. कुणी कितीही मोठा असेल, घाईत असेल तरीही योग्य क्रमानेच भेळ दिली जायची. इंग्रजीचा गंध नसलेला हा चाचा “first come, first serve” या उक्तीचे इमाने इतबारे पालन करत होता. कागदाच्या त्रिकोणी शंकू मध्ये चाचाने भेळ दिली. जबरदस्त पाणी सुटले होते तोंडाला. भूक पण लागली होती त्यामुळे पहिल्या घासाला तरी चवीचा प्रश्न नव्हता. पहिल्या घासातच या चाचाने आणि त्याच्या भेळीने मला खिशात घातले होते. आधीच त्याच्या व्यक्तीमत्वावर मी फिदा झालो होतो आणि आता ही भेळ. एखादा ऋणानुबंध जुळायला इतकं पुरेसं आहे … नाही का?

नंतर २ – ३ वर्षे भेळेचा आस्वाद घेत होतो. ऑफिस सुटल्यावर चाचा कडे भेळ खाणे हा एक शिरस्ताच झाला होता. चाचाकडे भेळ आणि शेव बटाटा पुरी मिळायची. पण भेळेला जी लज्जत होती ती शेव बटाटा पुरीला नव्हती. चाचा वर्षातून ३ महिने गावी जायचा …. डिसेंबरला गेला की होळी झाली की परत. तो नसताना त्याचा भाऊ आणि पुतण्या धंदा सांभाळायचे. भेळेची चव बदलली नाही पण चाचा सारखी आपुलकी या दोघांकडे नव्हती. दोन भावांमध्ये हाच एक मोठा फरक होता. महानगरपालिकेचा त्रास इतर फेरीवाल्यांप्रमाणे चाचानेही भोगला आहे. अतिक्रमण विरोधी दलाची गाडी आली की हाती लागेल ते जप्त करून घेउन जायची. चाचा जमेल तितके समान वाचवायचा आणि जप्त केलेले समान लाच देऊन सोडवून आणायचा. ज्या दिवशी टेबल नसेल आणि चाचा खाली बसून भेळ बनवत असेल तर समजावे काल चाचाचे टेबल जप्त झाले असणार. दोन चार दिवसांनी परत चाचाचा धंदा टेबलावर विराजमान होत असे. एके दिवशी मी भेळ खात असतानाच फेरीवाल्यांची आरडाओरड सुरु झाली. मनपा ची गाडी आली होती …. समान वाचवण्यासाठी चाचाची एकच धावपळ सुरु झाली. बरंचसं समान वाचवण्यात चाचा यशस्वी झाला पण टेबल आणि चुरमुऱ्याचं टोपलं काही वाचवू शकला नाही. इतर फेरीवाल्यांची पण तीच अवस्था होती. सगळं गाडीत भरल्यावर मनपाचे कर्मचारी टोपलीतल्या चुरमुर्यांवर ताव मारत होत्ते. ते बघून चाचा कळवळला आणि एक जोरदार शिवी हासडली. चाचाच्या तोंडी मी ऐकलेला तोच पहिला आणि शेवटचा अपशब्द. हताश चाचा मला म्हणाला “हरामजादे है सब, चांगेज खान की औलाद, अकेले आते है तो मुफ्त में भेल खाते है और जाब गाडी पे सवार होके आते है तब जो मिलेगा वो लुट ले जाते है. आप चिंता मत करो … हमारे लिये ये सब आये दिनका मामला है” मी म्हटलं “सबकुछ ले जा राहे थे, मुझे लागा मेरी भेल भी लेके जायेंगे” माझे हे वाक्य प्रसंग जरा हलका करण्यासाठी पुरेसे होते. चाचा हसून म्हणाला ” अगर गिऱ्हाईक को हाथ लागायेंगे तो गंगा मैय्या की सौगंध एक एक के हाथ तोड दुंगा. गिऱ्हाईक भगवान होता है और ये सब जानवर” चाचा मधला ‘छोरा गंगा किनारे वाला’ जागा झाला होता. ज्या ठिकाणी ठेला होता त्या ठिकाणी उभे राहून मी आणि चाचा गप्पा मारत होतो. भेळ खाऊन झाली आणि चाचाला पैसे देताना म्हटलं “आज आपके २-४ भगवान ने पैसे डूबाये”. चाचा काहीच बोलला नाही. जणू गिऱ्हाईका बद्दल अपशब्द बोलायचा नाही असा त्याचा दंडकच असावा. चाचा सद्गदीत होऊन म्हणाला “आप नाही भागे? आज पैसा नाही देने केलीये अच्छा मौका था.” मी म्हटलं “चाचा, आपके पांच रुपये छीन कर मुझे क्या मिलेगा? बहुत कम लोग ऐसे मिलते है जो इतने प्यार से खिलाते है. और किसीका पैसा रखना मेरे उसूल में नाही. अगर आज आप नाही मिलते तो कल मै आपका पैसा जरूर दे देता”. चाचा गहिवरला, त्याचे डोळे पाणावले. माझ्या पाठीवर हात ठेवून म्हणाला “बेटा, आपने हमे हमारे पिताजी की याद दिला दी” या क्षणा पासून मी चाचाचा साहेब नसून बेटा झालो होतो. मी रस्ता ओलांडून व्हीटी स्टेशन कडे जायला लागलो. एकदाच मागे वळून बघितलं … अपेक्षे प्रमाणे चाचा माझ्या वाटेवरच बघत होता.

पुढे जवळ जवळ ५-६ वर्ष नवी मुंबई येथे नोकरीला असल्याने चाचा आणि त्याची भेळ सुटली. कधी कामानिमित्त त्या परिसरात गेलो तर आवर्जून चाचा ला भेटायला जायचो आणि भेळेचा आस्वाद घ्यायचो. चाचा तेच प्रसन्न हास्य चेहेऱ्यावर ठेवून म्हणायचा “बेटा, आजकाल आते नाही?” मग मी नोकरी बदलल्याचा पाढा वाचायचो. भेळ खाऊन निघालो की चाचा परत येण्याचा आग्रह करायचा.

यशाची अनेक शिखरे पादाक्रांत केली. आणि खऱ्या अर्थाने साहेब झालो होतो. जीवनशैली मध्ये अमुलाग्र बदल झाला होता. यथावकाश लग्न पण ठरले. एकदा होणाऱ्या बायकोला मुंबईला फिरायला घेउन गेलो. जुन्या रस्त्यांवरून फिरताना गप्पांच्या ओघात चाचा आणि त्याची भेळ हा विषय अपरिहार्य होता. ते चालत फिरण्याचे दिवस आणि आत्ताचे अलिशान गाडी मधून फिरण्याचे दिवस यात खुपच तफावत होती. रस्त्यावरील ठेल्यांवर उभं राहून खाणे कधीच बंद झाले होते. पण ५० – ६० रुपये देऊन घेतलेल्या तारांकित हॉटेल मधील भेळेला चाचाच्या प्रेमळ चवीची सर कधीच आली नाही. माझी तळमळ माझ्या होणाऱ्या बायकोने अचूक हेरली आणि चाचाला भेटण्याची इच्छा प्रकट केली. माझ्या अनुमतीची तमा न बाळगता ड्रायवरला गाडी भेळवाल्या कडे नेण्याचे फर्मान सोडले. गाडी बोरा बझार स्ट्रीटच्या कोपऱ्यावर थांबली. चाचाला शोधायला जास्त तसदी पडली नाही. आजूबाजूचे सगळे चित्र जसेच्या तसेच होते, तोच फेरीवाल्यांचा गदारोळ आणि कोपऱ्यावर ठेला घेऊन उभा असलेला माझा भेळवाला चाचा. चाचा आता म्हातारा झाला होता. धंद्याचा पसारा देखील वाढला होता, हाताखाली २ माणसे होती. आता चाचा फक्त पैसे घेण्याचे काम करत होता. चेहेऱ्यावर रोजच्या जीवनातील धकाधकीच्या, कष्टाच्या सगळ्या खुणा रेषांच्या रुपाने झळकत होत्या. हात थकल्यासारखे दिसत होते पण हातांची सफाई तशीच होती. चेहेर्यावरचे हास्य आणि बोलण्यातील आदब तसूभर देखील कमी झाली नव्हती. इतकी वर्षे होऊन देखील चाचाला आपल्या स्मृतीला विशेष ताण द्यावा लागला नाही. “बहुत बडे हो गये हो बेटा. आजकल बिलकुल आते नाही?” चाचा म्हणाला. मी फक्त हसलो. एखाद्या प्रश्नाला उत्तर न देता चेहेर्यावाराचे हास्य कायम ठेवण्याचे कसब या कॉर्पोरेट जगताने शिकवले होते, त्याला तो बिचारा चाचा पुरता अनभिज्ञ होता. माझ्या शेजारी उभ्या असलेल्या तरुणीला बघून चाचाने विचारलं “बहुरानी?” त्याचा असा थेट प्रश्न बघून माझी होणारी बायको जरा चपापली. ज्या आपल्या होणाऱ्या नवऱ्याला सगळे दबकून असतात तिथे हा रस्त्यावरचा चाचा आम्हाला “बेटा, बहुरानी” संबोधतो म्हणजे त्याचे आणि माझे खूप जिव्हाळ्याचे नाते असणार हे तिने ओळखले. मी म्हणालो “हा चाचा, ये आपकी बहुरानी”. चाचाने आशीर्वाद दिले “सदा खुश राहो”.

चाचाने स्वतःच्या हाताने आम्हाला भेळ बनवून दिली. माझ्या आधी ४ – ५ जण भेळेसाठी उभे होते. धंद्याचा जुना नियम चाचाने माझ्यासाठी मोडला होता. पोटभर भेळ आम्ही दोघांनी खाल्ली …. अगदी २ -२ प्लेट खाल्ली. इतके वर्षांचा उपास सुटत होता. त्या दिवशी पहिल्यांदा चाचाने भेळेचे पैसे घेतले नाहीत आणि उगाच श्रीमंतीचा बडेजाव आणून मी पण आग्रह केला नाही. चाचा जवळच उभ्या असलेल्या गाडी पर्यंत सोडायला आला. गाडीत बसल्यावर बायकोने नुकतीच घेतलेली पिशवीभर सफरचंद चाचाला दिली. चाचा नको म्हणत असताना देखील बळेच त्याच्या हातात ठेवत म्हणाली “चाचा, बहुरानी बुलाते हो तो ये मेरी भेट रखनी पडेगी”. चाचाचा नाईलाज झाला आणि पाठीवर हात ठेवून म्हणाला “बेटा जैसा तू है वैसीही बहु पाई है. इसे खुश रखना और कभी याद आये तो जरूर चले आना. मै खुद मेरे हातोंसे बनाके दुंगा”. गाडी चालू झाली. थोडं पुढे गेल्यावर एकदाच मागे वळून बघितलं … अपेक्षे प्रमाणे चाचा माझ्या वाटेवरच बघत होता. पण या वेळी त्याच्या डोळ्यात आनंदाश्रू होते आणि हवेत असलेले हात आम्हा दोघांना आशीर्वाद देत होते.