चहाट(वा)ळकी -०७: भरत भेट

मी सकाळी जागेवर येऊन बसतो न बसतो तोच आमच्या गण्याने राजकीय भूपाळीची नांदी वाजवली.”काय ओ साहेब ….झाली का भरत भेट? …. अहो नरेंद्र आणि बराकची गळाभेट हो. या वर्षी प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पावणे होते ना ते? काय बंदोबस्त होता, काय ती सुरक्षा आणि काय तो थाट  … मज्जा आहे बुवा त्या बराकची. आणि त्याच्या बरोबर तुमच्या मोदीने पण मिरवून घेतले.” “आमचा मोदी?? तू काय घरवापसी केलीस कि काय?? जरा धुरळा उडायला लागला तर लगेच आमचा मोदी झाला काय?” मी जळजळीत कटाक्ष टाकुन त्याचा सकाळी सकाळी समाचार घेतला. “नाय ओ साहेब …. मोदी साहेब आमचे पण आहेत … शेवटी आपली भगवी युती ना.” माझी नाराजी बघून गण्या सारवा-सारवी करत म्हणाला. “ते अमेरिका नरेश आणि त्यांची राणी गेले का त्यांच्या देशी परत …. अमेरिकेला? लक्ष ठेवायला हवे नाहीतर वाटेत श्रमपरिहार म्हणून पाकिस्तानात बिर्याणीच्या दावतीला उतरले असतील.” आज गण्या का सकाळी सकाळी पेटला होता ते काही कळले नाही. तुला आज काही काम नाही का असे म्हणून मी थोडे दुर्लक्ष्य करत सकाळी सकाळी आल्यावर करायची नैमित्तीक कामे उरकत होतो… टेबल सारखे करणे, पिण्याच्या पाण्याची बाटली भरून घेणे, कॉम्पुटर सुरु करणे अश्या छोट्या छोट्या कामात देखील बराच वेळ जातो.

समोरच्या व्यक्तीचे आपल्या बोलण्याकडे विशेष लक्ष्य नाही हे कळत असून देखील चिवटपणाने आणि नेटाने सुसंवाद साधण्याची भारी कला आमच्या गण्याच्या अंगात ठासून भरलेली आहे. त्याचा प्रत्यय अधून मधून येत असतो. आपला मुद्दा न सोडता परत एकदा त्याने आपला मोर्चा ओबामा मोदी आणि भरतभेटी वर आणून ठेवला. ”     नाय … नेहेमी प्रमाणे धुरळा उडालाय त्यामुळे वाटले तो परत गेला असेल. अहो साहेब, आपल्या इथे जसे घरात पाहुणे असताना लहान मुलांनी केलेल्या दंग्याचा ते गेल्या नंतर समाचार घेतात तसेच काहीसे चालू झाले असल्यामुळे ओबामा आणि मिशेश ओबामा गेले असावेत असे वाटले.” “हो गेले असतील .. पण तू का एवढ्या चांभारचौकश्या करतो आहेस? हा बाबू पण आज कुठे उलथलेला होता कुणास ठाऊक. इथे गप्पा मारण्यापेक्षा चहाचे बघ.” मी जरा ठेवणीतल्या साहेबी आवाजात गाण्याला पिटाळले.

पूर्ण ऑफिस मध्ये गण्याला आवरू शकणारा एकमेव आवाज म्हणजे बाबू. कारण त्यांच्यातले नाते मित्रत्वाचे त्यामुळे त्यांच्या संवादामध्ये मैत्रीपूर्ण वादविवाद असायचे. थोड्याच वेळात गण्या आणि बाबूची जोडी समोरून येताना दिसली. काहीतरी चर्चा चालू असल्याचे वाटत होते आणि ती ओबामा मोदी यांच्या भेटीवरच असणार हे कुणीपण पैजेवर सांगितले असते. ते जवळ आले तसे गण्याचे शब्द अर्धवट कानावर पडत होते …”अरे इतका बडेजाव करायची गरज काय म्हणतो मी ??? किती ही उधळपट्टी??” बहुतेक खालून चहा घेऊन येता येताच गण्याने बाबूला गाठले असणार. बाबू समोर जि टकळी सकाळ पासून चालू होती तीच पुढे रेटली असणार आणि बाबू त्याची शाळा घेत असणार. या दोन महान व्यक्तींना बघून एकंदरीत आज आपल्या दिनमानात श्रवणीय-आनंद योगाची पर्वणी आहे याची चाहूल लागली.

कपात चहा ओतताना बाबू म्हणाला “येडा का खुळा तू रे गण्या? फालतू वृत्त वाहिन्या बघून स्वतःचे मत बनवणे बंद कर. अरे देशाला पहिल्यांदा इतका तडफदार पंतप्रधान मिळाला आहे. गेल्या १५ वर्ष केलेला पसारा निस्तरण्याचा प्रयत्न करतोय तर तुम्ही त्याचे पाय खेचा. इतके वर्ष मुकबधीर पंतप्रधान बघितला असल्याने तुम्हाला हा चायवाला कसा पटेल. अरे शिष्टाचार वगैरे गोष्टींचे अवडंबर न करता आमचे पंतप्रधान स्वतः पाहुण्यांना आणायला गेले. आणि तिथेच त्यांची ओबामाशी भरतभेट घडून आली. हापिसात बसून उगाच फोन वर आला का रे … आला का रे करत नाही बसले. मुळात अमेरिकन राष्ट्राध्यक्षाला प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रण द्यायचे धाडस या आधी कुणाला झाले नाही. एवढा मोठा माणूस येणार … त्याची तशी बडदास्त पण ठेवायची म्हणजे काय खाऊ चे काम आहे. ते सुद्धा एकटा नाही आला तर बायकोला घेऊन आला आणि पुढच्या भेटीला मुलींना पण घेऊन येणार आहे. याचाच अर्थ आपल्या भारताची विविधता, संस्कृती निश्चितच आवडली असणार आणि त्याच बरोबर भारताच्या पंतप्रधानांशी जुळलेले मैत्रीपूर्ण ऋणानुबंध. उगाच नाही त्यांनी पत्रकार परिषदेत उघडपणे सांगितले कि प्रजासत्ताक दिनाचे आमंत्रण म्हणजे माझा सन्मान आहे म्हणून.”

“बघ ना रे बाबू … सकाळपासून हा गण्या कसले डोके खातोय उधळपट्टी केली … उगीच खर्च केला … आज भारताचा तिरंगा अमेरिकेच्या तोडीसतोड उभा राहताना बघून खरे तर अभिमान वाटला पाहिजे. पण आपल्या देशात इतकी पराकोटीची विविधता आहे ना कि काही लोकं हापूस आंब्याचा गर ठेवतील बाजूला आणि कोय चुपत बसतील. तसेच हे पण आपल्या ऑफिस मधले महानुभाव श्री. गणेश दादा. कधी कधी अश्या लोकांचा राग येतो तर कधी कधी हेच लोकं करमणुकीचे साधन ठरतात.” मी सकाळपासून गण्यावर तसा वैतागलोच होतो आणि आता बाबूने आयतीच संधी दिली.

“मग काय??? असाल पंतप्रधान म्हणून काय दुसऱ्या देशाच्या अध्यक्षांना २१ तोफांची सलामी? महाराजांच्या काळात केवळ महाराजांना आणि लढाई जिंकून आलेल्या शूर वीर सरदारांना मिळायची. इथे हीच सलामी अश्या देशाच्या अध्यक्षांना देताय ज्यांनी आपल्या शत्रू राष्ट्राला मदत केली आणि अजून करतोय.” गणू दबक्या आवाजात म्हणाला.

“अरे गण्या … अतिथी देवो भव ही आपली भारतीय संस्कृती. पाहुण्यांची पत राखून पाहुणचार केला जातो हे कधी कळणार आपल्याला? मुळात अमेरिकेचे अध्यक्ष आपल्या भारतात येणे हे खूप महत्वाचे आणि ते काम जयशंकर यांच्या सारख्या द्रष्ट्या अधिकाऱ्याने यशस्वीपणे केले. गेली कित्येक वर्षे अणुउर्जा क्षेत्रामध्ये अमेरिकेने भारतावर निर्बंध घातले होते. त्यामुळे भारताचे अनेक अणु प्रकल्प कार्यक्रम रखडले होते. ओबामांच्या या भेटी मध्ये बरेच चांगले निर्णय घेण्यात आले जेणे करून भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यावसायिक संबंधाना पुष्टी मिळेल आणि भारताच्या आर्थिक प्रगतीला चालना मिळेल. पाकिस्तानला पण यावरून काही धडा मिळेल अशी आशा आहे. चीनने फुत्कार टाकायला सुरुवात केलीच आहे. ती जरा डोकेदुखी होवू शकते. अमेरिका जास्त जवळ आली कि रशिया जो आपला जुना मित्र आहे तो जरा दूर होण्याची धूसर शक्यता आहे.” – मी

यातले अणुउर्जा, प्रगती हे साधे शब्द सोडले तर बाकीचे सगळे गण्याच्या डोक्यावरून गेल्याचे त्याच्या चेहेऱ्या वरून स्पष्ट जाणवत होते. पण तरी देखील आपले मत ठासून सांगायची सवय गण्याला काही केल्या गप्प बसू देत नव्हती. “पण मग मला एक सांगा … मोदी नेहेमी त्यांच्या पोषाखा विषयी जागरूक असतात. साधी राहणी आणि उच्च विचारसरणी असलेला माणूस आहे असे तुम्ही म्हणता. मग तो १३ – १४ लाखांचा कोट घालून मिरवायचे कशाला? वर त्यावर स्वतः चे नाव शिवून घेण्या सारखा आत्मकेंद्रीपणा करायची खरच गरज होती का? भारतात इतके दारिद्र्य, बेकारी, गरिबी आहे. मग अश्यावेळी आपल्याच देशाच्या पंतप्रधानांनी देशाच्या जनतेच्या कष्टाच्या पैश्याची उधळपट्टी करणे किती योग्य आहे? सगळीकडे मिडीया मध्ये नंतर तुमच्या स्मार्टफोन वर पण या गोष्टी चघळल्या जात आहेत. ….” – गण्या

गण्याचे वाक्य मध्येच तोडत बाबू म्हणाला “गण्या तू म्हणजे ना शेळ्या मेंढ्यांच्या कळपात वावरतोस. एक पळायला लागली कि सगळ्याच पळायला लागतात तशी तुझी गत आहे. कुणी ओरडला साप साप कि तुम्ही काठी घेऊन भुई धोपटत बसता. तरी सांगत होतो स्वतःची अक्कल लावत जा, या मिडीया वर अंधविश्वास ठेवू नकोस आणि जो काम करतोय त्यांचे पाय खेचणे बंद कर.”

“इतका मोठा माणूस आपल्या देशात आलाय ….. आपल्या मोदींची इतकी सलगी झाली आहे कि त्याने सगळ्यां समक्ष चक्क अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचा बराक असा एकेरी उल्लेख केलाय. आजमितीला चालू असलेल्या व्यावसायिक संबंधांमध्ये ६०% वाढ अपेक्षित आहे. म्हणजे भारताचे आर्थिक सक्षमीकरण करण्याच्या दिशेने टाकलेले महत्वाचे पाउल आहे. कोट्यावधीच्या व्यवसायापुढे १३ – १४ लाखांचा कोट केवळ कोत्या मनाच्या लोकांनाच दिसू शकतो. आणि मोदी भारतासारख्या प्रगतीशील राष्ट्राचे प्रतिनिधित्व करत होते त्यामुळे त्यांची वेशभूषा ही त्यांच्या व्यक्तिमत्वाला साजेशीच असायला हवी. अरे मावळे झोपडीत राहतात म्हणून राजे झोपडीत नाही राहिले … कारण गडावर वास्तव्य करणे ही राज्यकर्त्याची गरज होती. आणि राहता राहिला प्रश्न त्या कोटाचा …. उद्या त्या कोटाचा लिलाव करून हा चायवाला कोट्यावधी रुपये सरकारी तिजोरीत जमा करेल तेंव्हा बघू कोण काय काय बोलतंय ते. बाकी बाबू काहीही म्हणा, आपला चायवाला भारी हुशार आहे. मला तरी वाटते हे कोट, त्याच्या वर शिवलेले नरेंद्र दामोदरदास मोदी, त्याची किंमत, आणि त्यावरून विनाकारण उठलेले धुळीचे लोट यात काहीतरी गेम निश्चित असणार. मिडीयाला काहीतरी चटपटीत चघळायला द्यायचे आणि त्याच्या पडद्या आड काही महत्वाची कामे उरकून मोकळे व्हायचे. ही भरत भेट निश्चित सत्कारणी लागणार” – मी

बाबू हलकेच हसला आणि ग्लास उचलत म्हणाला “अच्छे दिन आणे वाले है”

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s