चहाट(वा)ळकी -१०: पशुत्व ०१

“फटकावले पाहिजेत एकेकाला ….. समाजाला लागलेली किड आहे हि. जिथे दिसेल तिथेच ठेचून टाकायला हवी. काही सभ्यता संस्कृती नावाचा प्रकार आहे कि नाही? भर चौकात नागवे करून बांबूचे फटके द्यायला हवेत या समाजकंटकांना.” गण्या सकाळी सकाळी कट्टर सैनिकाच्या आवेशात बडबड करत होता. एखाद्या वर्तमानपत्रातील ज्वलंत अग्रलेख वाचून उसळते रक्त नाचवत काहीतरी बरळण्याची गण्याची जुनी सवय मला माहित असल्याने मी काही फारसा प्रभावित झालो नाही. त्याच्या कडे एकवार नजर टाकून पुन्हा माझ्या कामात गर्क झालो. माझ्या टेबलापाशी गण्या येऊन उभा राहिला आणि मी थंडपणे त्याला विचारले “काय गण्या शेठ? काय झाले? सकाळी सकाळी जोरदार स्वगत चालू आहे. कुणाला फटके देऊन आलास? कुणाला ठेचायचे आहे? अरे असा कायदा हातात घेऊ नये. कायदा हातात घेतला तर चोर सोडून संन्याश्यालाच शिक्षा होण्याचे योग अधिक असतात. त्यामुळे आपल्या सारख्या सामान्य माणसाने जरा सांभाळून राहावे”. “या आपल्या अश्या बोटचेपेपणामुळे आणि शेपूट घालण्यामुळे त्यांचे चांगलेच फावते. आणि ते मग मोकाट सुटतात माजलेल्या बैला सारखे.” गण्याचे फुत्कार चालूच होते. माझ्या निर्विकार चेहेऱ्याने किंवा माझ्या सबुरीच्या शब्दांनी देखील गण्याच्या उसळ्या थांबल्या नव्हत्या. पण आता मात्र मला वाटायला लागले कि मामला खूप सिरीयस आहे.

“काय झाले गण्या? तू जे काही बोललास त्या वरून काहीही कळत नाहीये. जर तू नीट विस्तार करून सांगशील तर मला पण कळेल आणि त्यातून काही मार्ग काढायचा असेल तर काढू आपण.” – मी
“हे साले सगळे सडकछाप रोड रोमिओ …. शाळा, कॉलेज, चहाची टपरी जिथे जागा मिळेल तिथे टवके टाकत उभे असतात. चित्रविचित्र कपडे घालायचे, सिगारेटी फुंकायच्या, गाड्या उडवायच्या, वासुगिरी करत फिरायचे बायका पोरींची छेड काढायची आणि त्यातून वेळ मिळाला तर शिक्षण किंवा नोकरी सारखे दुय्यम काम करायचे. काही काही ठिकाणी तर हे सांड असा रस्ता अडवून उभे राहतात कि येणाऱ्या जाणाऱ्या स्त्रीला वाट वाकडी करून दुसऱ्या रस्त्याने जावे लागते.”- गण्या ओसंडून वाहात होता आणि मी ऐकत होतो.
“आत्ताच खाली बाबूच्या टपरी वर दोघांना सज्जड दम देऊन आलोय. उद्या परत दिसले तर सरळ आमचा सैनिकी खाक्याच दाखवणार. मग बघू पुढचे पुढे. मुळात बाबू पण गपगुमान बघत बसला होता याचा मला अधिक राग येतो. तुमच्या आया बहिणींना छेडले तर असेच बघत बसणार का आपण?” आता कुठे गण्याच्या रागाचे खरे कारण समजले.

गण्या आहेच तसा …. कुणी एखाद्या स्त्रीची छेड काढताना दिसले कि हा जाऊन भिडणार. दोन वर्षापूर्वी गण्याने ऑफिसच्या पार्टी मध्ये दारू पिऊन टाईट झालेल्या एका साहेबाने ऑफिस मधल्याच एका तरुण स्त्री कर्मचाऱ्याशी लगट करताना बघून असाच गोंधळ घातला होता. नशीब त्या मुलीने न घाबरता तक्रार केली आणि त्या साहेबाला डच्चू दिला. आणि गण्याचा सत्कार देखील केला होता.

“गण्या बस जरा शांत … घोटभर पाणी पी” मी गण्याला बसायला खुर्ची दिली आणि मग जरा वरमला.

“साहेब कधी कधी असा रागाचा कडेलोट होतो … नाही बघवत. रस्त्यावरच्या प्रत्येक स्त्री कडे एकाच वखवखलेल्या नजरेने पहाणारे बघे दिसले की पित्त खवळायला लागतं. मुळात कुणाला चार शब्द सांगून समज देण्याची सवय नाही आणि अश्या लोकांना तर नाहीच नाही. पहिले फोडून काढणार आणि मग विचारणार … साला असं आपलं नेचर … अंग पूर्ण झाकले असले तरी ते आरपार भेदून जाणारी नजर दिसली की तळपायाची आग मस्तकात जाते. कधी कधी होतो माझा बाजीप्रभू, त्या महात्म्याने मोगलांविरुद्ध खिंड लढवली तर मी या आपल्याच समाजातील छुप्या नराधमांबरोबर लढतो.” गण्या अविरत बोलत होता. त्याचे मन मोकळे करत होता.

“साहेब, वाईट इतकेच वाटते की दर वेळी मी एकटा पडतो रस्त्यावरचे लोक तमाशा बघत बसतात आणि मग दिल्ली, मुंबई सारख्या ठिकाणी दिवसा ढवळ्या एखाद्या अबलेची अब्रू लुटली जाते. लुटणारा तिचे सर्वस्व लुटून जातो, तेंव्हा एकाही हात वाचवायला येत नाही आणि मग तेच हात मेणबत्त्या घेऊन मोर्चे काढून सरकारला जाब विचारतात. सगळा मक्ता सरकारनेच घेतला आहे का? एक सुजाण नागरिक म्हणून आपली कर्तव्य आपण विसरत चाललो आहोत. आधुनिकता या नावाखाली पाश्चिमात्य देशांचे किती अनुकरण करणार आणि आपली संस्कृती कुठे गाडून ठेवणार कोण जाणे?” आज पहिल्यांदाच गण्याने माझ्या काळजाला हात घातला होता.

खरच काय चुकीचे बोलत होता तो? आपल्या मागे पोलिसांचे, गुंडांचे नसते लचांड नको म्हणून डोळ्या देखत एखाद्या स्त्रीवर होत असलेला अन्याय होतोय हे दिसत असून सुद्धा डोळ्यावर कातडी ओढून आपण निघून जातो. पण गण्यासारखे बोटावर मोजण्या इतके असलेले खऱ्या अर्थाचे पुरुष या प्रचंड संख्येने असलेल्या वासनांध नजरेला किती पुरून उरणार? पाच पांडवांच्या पांचालीला देखील स्वतःचे शील वाचवण्या साठी कृष्णाचा धावा करावा लागला. तिथे तर एकाच दुःशासन होता इथे तर पावलागणिक सापडणारे दुःशासन पदराला हात घालायला आसुसलेले असतात.

आज पुरुषांच्या खांद्याला खांदा भिडवून काम करत असलेली स्त्री देखील पदोपदी अश्या नजरेने पछाडलेली असते. तिच्या स्त्रीत्वाच्या उपभोगाची लालसा, त्यासाठी केलेली लगट अगदी नाक्यावरच्या छपरी मवाल्या पासून ते ऑफिस मधील सहकर्मचारी, साहेब यांच्यात दिसून येते. निसर्गाच्या जडणघडणी मध्ये ज्यांनी स्त्रीत्व म्हणजे काय हे अनुभवलेले देखील नाही त्या कळ्या देखील आजकाल कुसकरल्या जातात … कधी चोकलेटच्या तर कधी आईस्क्रीमच्या आमिषावर. त्या क्षणी दुःशासन असतो कुणीतरी जवळचाच काका, मामा, दादा ….. आणि बाबा सुद्धा. बलात्कार, विनयभंग असली एकही बातमी वर्तमान पत्रात नाही असा दिवस शोधून सापडणार नाही. बातमी नसली तरी असले प्रकार होताच नसतील हे म्हणणे खूप धाडसाचे आहे. कुठलीच पिडीत स्त्री आपल्या उरल्या सुरल्या शीलाचे धिंडवडे काढले जाऊ नयेत म्हणून स्वतःहून पुढे येत नाही. शारीरिक आघाता सोबत बसलेला मानसिक धक्का तिचे खच्चीकरण करतो. बलात्कार करणारा उघड्या छातीने फिरत असतो पण ती अबला मात्र सभोवताली पसरलेल्या अवहेलनेच्या गर्तेत खितपत पडलेली असते.  हे असेच चालू राहिले तर पुढे येणाऱ्या असंस्कारक्षम आणि अभिरुचीहीन पिढीचा आपण पाया रचत आहोत.

क्रमशः

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s