चहाट(वा)ळकी -११: पशुत्व ०२

आपल्या मागे पोलिसांचे, गुंडांचे नसते लचांड नको म्हणून डोळ्या देखत एखाद्या स्त्रीवर होत असलेला अन्याय होतोय हे दिसत असून सुद्धा डोळ्यावर कातडी ओढून आपण निघून जातो. पण गण्यासारखे बोटावर मोजण्या इतके असलेले खऱ्या अर्थाचे पुरुष या प्रचंड संख्येने असलेल्या वासनांध नजरेला किती पुरून उरणार? पाच पांडवांच्या पांचालीला देखील स्वतःचे शील वाचवण्या साठी कृष्णाचा धावा करावा लागला. तिथे तर एकाच दुःशासन होता इथे तर पावलागणिक सापडणारे दुःशासन पदराला हात घालायला आसुसलेले असतात.

“गण्या, अरे हे असेच चालत राहणार. जो पर्यंत स्त्री हि भोग्य वस्तू आहे आणि शारीरिक बळाच्या आधारावर तिला नामोहरम करता येते, तिचे खच्चीकरण करता येते असे मानणारे पुरुषी वर्चस्व, पुरुषी अहंकार जो पर्यंत समाजात उघडपणे वावरत आहे तो पर्यंत स्त्रियांवरील अत्याचार कमी होणार नाहीत. आणि याच अहंकाराला खतपाणी घालायचे काम करतात त्या समाजातल्या भेदरलेल्या नजरा आणि लाचार मनोवृत्ती. खूप मोठ्या प्रमाणावर समाज प्रबोधनाची गरज आहे.” – मी

“अहो साहेब, हे असे प्रबोधन वगैरे करत बसलो तर बघायला नको. दुनियेतले दुःशासन वाढतच राहतील आणि तुमच्या उपदेशांच्या डोसाचा काही एक परिणाम होणार नाही. अश्या लोकांना दिसताक्षणी ठेचून काढणे हाच उत्तम उपाय. या सगळ्याला हातभार लावते ती मिडिया” – गण्या काही आपला सैनिकी खाक्या सोडायला तयार नव्हता. त्याचे ही चूक नव्हते नुसता उपदेश करून परिस्थिती बदलणार नाही. त्याला अनुशासन आणि स्वयंसिद्धता यांची जोड अनिवार्य आहे.

“आधुनिकता, माहिती आणि मिडीया चा अव्याहतपणे होणारा भडीमार, अडगळीत लोटलेले ज्येष्ठ नागरिक (भूतकाळ), आर्थिक सुबत्तेच्या पाठीमागे धावणारी तरुण पिढी (वर्तमान), भविष्याचा गंध नसलेला विद्यार्थी वर्ग (भविष्य) आणि या सगळ्या विषम अवस्थेला पूरक अशी दुभंगलेली कुटुंब व्यवस्था (परिसंस्था)  … हे सगळे जिथे असेल तिथे थोड्याफार प्रमाणात गोंधळ असणारच. व्यक्ती स्वातंत्र्य या गोंडस नावाखाली चाललेली अमर्याद, अनिर्बंध वर्तणूक आज जरी भूषणावह वाटत असली तरी त्या स्वातंत्र्याला कुठेतरी वेसण घालणे गरजेचे आहे.” – आम्ही दोघे बोलत असताना मधेच बाबूने आपले मत देऊन त्याच्या अस्तित्वाची जाणीव करून दिली. आता या विषयावर काहीतरी वेगळेच ऐकायला मिळणार हे निश्चित.

बाबू बोलायला लागला की कधी कधी वाटते की हा चुकून या धंद्याच्या मार्गी लागला. याने खरे तर सामुपादेशक, तत्ववेत्ता … अगदी गेला बाजार कीर्तनकार बुवा वगैरे व्हायला हवे होते. छान बस्तान बसवले असते. नावलौकिक देखील झाला असता आणि कमाई पण चांगली झाली असती. मनातले विचार मेंदू पटला वर बाबूची प्रतिमा साकारत होते. डोक्यावर छान झिरमिळ्या असलेली पगडी, पांढरे शुभ्र धोतर आणि सदरा घालून ह.भ.प. राजापुरकर बुवा उभे आहेत. डाव्या बाजूला संवादिनीची साथ तर उजव्या बाजूला तबलजीचा ठेका … आणि समोर आम्ही ऑफिस मधील त्याचे नेहेमीचेच श्रोते … बुवा रंगात आलेले आहेत आणि आम्ही श्रोतेजन हातात बुवांच्याच  टपरी वरील चहाचा आस्वाद घेत रसभरीत तत्त्वज्ञानाचे अमृततुल्य रसपान चालू आहे.

गरम चहा असलेल्या ग्लासचा स्पर्श झाला आणि मी स्वप्नरंजनातून बाहेर आलो. गण्याच्या आवेशावरून तो बोलणार आहे की विचारमग्न आहे हे लक्षात येत नव्हते… “आई बापाला पाठवतात वृद्धाश्रमात, स्वतः दोघे दिवसभर बाहेर मग मुलांकडे बघायला वेळ कुणाला आहे? चांगले कपडे, खिश्यात थोडाफार पैसा खुळखुळायला लागला की याच मुलांना शिंगे फुटतात. नको त्या वयात पैसा वाईट हो … त्यात संगत जर वाईट असेल तर जन्माचे पारणेच फिटते…. मग ती मुलगी असो किंवा मुलगा. वेळी अवेळी तोकडे कपडे घालून फिरायचे, नको त्या व्यसनांच्या आहारी जायचे आणि मग पडतो एखादे वेळी दरोडा …. मग बोंबलत फिरायचे … मुलांची चंगळ आणि आईवडील अंधारात …. बिचारे उरली सुरली इभ्रत झाकत जगत असतात. एका बाजूला मुलगी वाचवा म्हणून ओरडायचे आणि दुसऱ्या बाजूला त्याच मुलींवर अत्याचार करायचे … याला काय अर्थ आहे?” – गण्या

“काय रे गण्या …. जो येतो तो नेहेमी मुलींना बोल लावतो. मुलीची जात आहे, काळजी घ्यायला हवी, चार चौघात जबाबदारीने वागायला हवे, … असंच करायला हवे, तसेच करायला हवे … तोकडे कपडे घातले तर पुरुष छेडतील, नजर खाली ठेऊन जायचे. सगळे शील जपायचे ते मुलींनीच? अरे ही कॉलेजला जाणारी मुले लो-वेस्ट च्या नावाखाली रंगबिरंगी चड्ड्या दाखवत फिरताच असतात ना? त्याना नाही कुणी उपदेश देत? शील जपायचे ते फक्त मुलींनीच? खर तर घरातल्या आईने, बहिणीने आणि जन्मदात्या बापाने मुलाला मिसरूड फुटतानाच स्त्रियांशी कसे वागावे याची समज द्यायला हवी. स्त्री ही निव्वळ भोग्य वस्तू किंवा तुमच्या शारीरिक गरजा भागवणारे मशीन नसून एक आई, बहिण, मैत्रीण, सहचारिणी अश्या असंख्य रूपात वावरणारी एक उर्जा आहे, एक शक्ती आहे. आणि तुम्ही तिची विटंबना करता? केवळ तुम्ही एक पुरुष म्हणून मर्दपणा दाखवायला जाता? पशूंमध्ये सुद्धा मादीच्या मर्जी विरुद्ध कुठलाही नर तिच्याशी रत होऊ शकत नाही. ज्यांची वैचारिक कुवत नाही असे पशु देखील आपली पातळी सोडत नाहीत आणि आपण मात्र अश्या बलात्कारी पुरुषांना पशुत्व देऊन मोकळे होतो.” – चहाचा एक घोट घेतल्यावर मिळालेल्या चालनेतून माझ्या जिभेला देखील जरा तरतरी आली.

इतका वेळ शांत बसलेल्या किटलीधारी बाबूने त्याची तत्वे मांडायला सुरुवात केली. “कुठल्याही स्त्री वर होणारा अतिप्रसंग, तो करणाऱ्या पुरुषाला पशु पेक्षाही खालच्या पातळी वर नेऊन ठेवतो. आणि त्या वर कळस करतो आपला समाज. पिडीत स्त्रीला वाळीत टाकण्या पर्यंत मजल जाते. मिडिया तर अश्या प्रकरणांना वेठीस धरून आपला टी आर् पी वाढवण्या साठी कुठल्याही थराला जाते. अगदी प्रख्यात आंतरराष्ट्रीय बीबीसी सारखी वाहिनी देखील त्याला अपवाद नाही. आधीच शारीरिक त्रासातून सावरताना मानसिक खच्चीकरण झालेल्या स्त्रीला नाही नाही ते प्रश्न विचारून आपला समाज प्रत्येक शब्दागणिक तिच्यावर बलात्कार करत असतो. मिडिया, शेजारीपाजारी, सगेसोयरे … इतकेच काय पोलीस, न्यायालायातले वकील देखील उरलीसुरली लक्तरे वेशीवर टांगायला कमी करत नाहीत. झगडून न्याय जरी मिळाला तरी झालेला त्रास, अवहेलना यांचा विचार करता होणारी शिक्षा अत्यल्प. अर्थात कायद्याचा गैरफायदा घेणारे देखील आढळतील पण प्रमाण अत्यल्पच. त्यामुळे कायदा सक्षम हवा आणि समाज प्रबोधन हे हवेच. आजच्या तरुण मुलांना त्याची नितांत गरज आहे तर तरुणींना स्वयंसिद्धतेची. पुरुषांना त्यांच्या भावनेला आवर घालण्याची तर स्त्रियांना स्वसंरक्षणाची. अगदी शालेय शिक्षण घेतानाच या दोन गोष्टींचा अंतर्भाव असायलाच हवा.”

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s