पेरेन्ट्स मीट (पालकांची सभा): भाग २

शाळा मस्त होती. स्वच्छ, टापटीप आणि नीटनेटकी. शिक्षणासाठी परिपूर्ण वातावरण असलेली. वेगवेगळे माहितीपूर्ण फलक त्यात प्रामुख्याने शाळेची ठळक कामगिरी, विद्यार्थ्यांनी मिळवलेली मानांकने, सुविचार, सत्यवचने, चित्रे, हस्तलिखिते झळकत होती. विशेष म्हणजे त्या दिवशी ज्या विद्यार्थ्यांचे वर्धापन दिन होते अश्यांची नावे देखील त्या फलकांवर होती. हे सगळं नंतर नीट बघायचं हे ठरवून वर्ग क्र. १२ शोधू लागलो. सगळे वर्ग क्रमानेच असल्यामुळे शोधायला विशेष तसदी पडली नाही. वर्गातील बाकड्यांवर बऱ्याच मुलांचे पालक अगदी शाळेतील विद्यार्थ्यांप्रमाणे बसले होते. बऱ्याच जणांना आपले शाळेतील दिवस आठवत असतील हे निश्चित. माझ्या प्रमाणेच काही जणांना त्या बाकड्यांवर माववून घेण्यास त्रास होत होता. बाकडी बरोबर होती पण आमचाच आकार अंमळ वाढला होता. माझे गुडघे पुढे बसलेल्या श्रीमतीला लागू नये म्हणून जरा जास्तच चोरून बसावं लागत होतं. पुरुष पालकांचे सभोवताल लक्ष होते. मध्येच कुणी ओळखीचा दिसला तर हसणं, हात दाखवणं चालू होतं. स्त्री पालक म्हणजे पालिकेतील गजबजाट कमी अश्या अविर्भावात गप्पा मारत होत्या. २० -२५ स्त्रियांचं कुजबुजणं देखील पक्षांच्या किलकिलाटा पेक्षा वरताण होतं. माझी बायको तिच्या शेजारच्या बाकड्यावर बसलेल्या बाई बरोबर गप्पा मारत होती. मी तिला विचारलं “ही कोण?” तर ती म्हणाली “मला नाही माहित. आत्ता इथेच भेट झाली”. तोंडाचा व्यायाम करायला यांना कुणीपण चालतं.

मी “सभोवतालचे” निरीक्षण करण्यात इतका गुंग होतो तितक्यात बायकोने तिच्या कोपर्याने मला ढोसले. “कुठे बघत बघताय???” बायकोने मला आदरार्थी संबोधलं की समजून जायचं की काहीतरी बिनसले असणार. “किती वेळा तुला हाक मारतेय. पण तू कुठे तरी गुंग झालास” मी अक्षम्य अपराध्याच्या भावनेने “कुठे काय बघतोय? आणि तू केंव्हा हाक मारलीस?” बायको अजून वैतागून “हाक नाही मारली रे. पण बोलवत होते तुला. ऐक ना …. ती बाई दिसते का? टोमेटो रंगाची आणि त्यावर डार्क कलरची फुलं असलेली साडी  घातलीये ना …. तो कलर माझ्याकडे नाहीये. मला तशी घ्यायची आहे.” आता हिला काय सांगू मी त्याच बाईच्या साडीवर असलेली कलाकुसर बघत होतो ते. परत ही शेजारच्या बाईबरोबर गप्पा मारण्यात गुंग झाली आणि मी इतर बैठकीच्या ठिकाणी माझा मोर्चा वळवला. परत दोन मिनिटांनी तिने माझ्या बरगड्यांमध्ये कोपर रुतवले. परत माझी साधना भंग करत म्हणाली “ती तिथे बसली आहे ना … ती आपटे. तिचा मुलगा आपल्या स्नेहाच्याच वर्गात आहे …. जाम मस्ती करतो आणि नेमका स्नेहाच्या शेजारीच बसतो. मी टीचरना सांगणार आहे ‘जागा बदला’ म्हणून” मी फक्त मान डोलवली. एखादा निर्णय झाल्यावर माझं काम इतकंच … मान डोलावून अनुमती देणं. आताशा मला घराचे “नंदीबैल” म्हणायला लागलेत याच्या पाठी कदाचित हेच कारण असावे.

आज बऱ्याच वर्षांनी फळ्यावर लिहिलेला सुविचार पाहिला. वर्गातील फळ्यावर सर्वात खाली तो सुविचार आणि मधोमध मोठ्या अक्षरात काहीतरी असंबद्ध लिहिलं होतं. नंतर कळलं मला की ते “Parents Meet” लिहिलं होतं. आणि त्याच्या खाली “सगळ्यांना बोलायची संधी द्यावी” हे पण लिहिलं होतं. बहुतेक ते शाळेत शिकवणाऱ्या “टीचर” ने लिहिलं असेल …. तरीच माझ्या मुलीचे हस्ताक्षर म्हणजे “कोंबडीचे पाय” होते. फळ्याजवळच २ माध्यम वयीन बायका सारख्या घड्याळाकडे आणि मध्येच समोर बसलेल्या पालकांकडे कटाक्ष टाकत होत्या. पालकांच्या बरोबर आलेली मुले मधूनच धावत टीचर कडे जात होती आणि त्यांना हळूच चापट मारून परत येत होती. माझी मुलगी अनुकरण करण्यात पटाईत असल्याने ति आत्ता पर्यंत दोन्ही टीचरना हात लावून आली होती. टीचर एकाच जागे वर उभ्या होत्या म्हणून ठीक आहे नाहीतर रोजच हे गुरु शिष्य पकडा पकडी खेळत असतील की काय अशी शंका यायला भरपूर वाव होता. मी इतस्ततः पळणाऱ्या माझ्या मुलीला पकडलं आणि विचारले “तुम्ही रोज अशीच पकडा पकडी खेळता का?” परत बरगड्यांमध्ये कोपर रुतलं … “काहीतरी बावळटपणे विचारू नको तिला, उद्या ती टीचरला हेच विचारेल”. त्या ३ बायकांमधली एक सुधृढ बाई सारखी माझ्याकडे बघत असल्या सारखी वाटत होती. का कुणास ठाऊक, पण ती बाई मला थोड्यावेळाने बाकावर उभं करणार किंवा अंगठे धरून उभं करणार असं सारखं वाटत होतं. मी सारखी त्या दोन्ही गुरुवार्यांची नजर टाळत होतो. पण नंतर मला कळलं की त्या “अशाच” बघतात. ज्याच्या कडे बघतात त्यांना कळत नाही आणि ज्यांचा कडे बघत नाहीत त्यांना वाटतं आपल्याकडेच बघतात …. कपाळावर हात मारून घेतला मी. मी परत मुलीला विचारलं “काय गं …. त्या टीचर नी तुला बोलावलं तर तूच जातेस का तिथल्या बेंच वर बसलेली दुसरी कुणी तरी जाते?” सहाजिकच आहे मुलीला प्रश्न कळला नाही आणि तिने माझी तक्रार “मातोश्री” कडे केली … “आई बघ ना … बाबा काही पण विचारतोय ….. त्याला माहीतच नाही की त्या टीचर नाहीत …. आमच्या मावशी आहेत” या प्रसंगा नंतर मी पूर्ण सभा होईपर्यंत मौन व्रत धारण केलेलं बरं असा निश्चय केला.

इतक्यात आमच्या पाठीमागे असलेल्या एकमेव दरवाज्यातून एक धिप्पाड, काळीकभिन्न स्त्री “सारी फार लेट” असं म्हणत आत आली. सगळी मुलं एका सुरात ओरडली “गुड मॉर्निंग ललीथा टीचर”. मी मुलीला हसून म्हटलं “ललीथा नाही गं …. ललिता … ल लि ता” तशी ती बिलंदर म्हणाली “सगळे ललीथा म्हणतात …. मी पण ललीथाच म्हणणार. माझ्या टीचर आहेत का तुमच्या??” मी गप्प. पोरीने हाताने नाही पण शब्दाने कोपरा मारला होता. बायको मात्र खुश होऊन गालातल्या गालात हसत होती. या आल्या आणि समोर फळ्याजवळ का कुणास ठवून गर्दी जाणवायला लागली. अर्धा फळा तरी त्या ललीथा टीचरने व्यापला होता. टिपिकल दाक्षिणात्य पद्धतीची साडी, गळ्यात पोवल्यांची माळ, कानात कर्णफुले. कोकिळा पण गोरी म्हणावी इतका काळा वर्ण. चेहेऱ्याच्या दक्षिण टोका कडून उत्तर टोकापर्यंत पसरलेली जिवणी आणि त्या बंद जिवणीमधून डोकावणारे पांढरेशुभ्र पटाशीचे दात. चपचपीत तेल लावून घातलेली वेणी आणि त्या वेणीत घुसवून अडकवलेला मोगऱ्याचा गजरा. अहाहा ….. काय पर्सनॅलिटी होती ….. नशीब या बाई प्राथमिक शाळेत शिकवायला होत्या …. कॉलेज मध्ये असत्या तर अर्ध्या अधिक पोरांनी कॉलेज सोडलं असतं. माझ्या मुलीला मी हळूच म्हटलं “काय बाई आहेत तुमच्या?” … “बाबा … बाई नाही टीचर …. आणि त्या खूप छान आहेत, माझ्या फेवरीट. कधीच आम्हांला ओरडत नाही.” किमान आजूबाजूच्या बाकावरील पालकांना ऐकायला जाईल इतक्या मोठ्यांनी पुटपुटली. या वरून एक मात्र जाणलं …. लहान मुलांना रंगरुपा पेक्षा त्यांच्याशी कोण कसं वागतंय यातंच स्वारस्य.

(क्रमशः)

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s