पेरेन्ट्स मीट (पालकांची सभा): भाग ३

पहिल्याच पालकांच्या सभेची सुरुवात तशी थोडी धक्कादायकच होती. ललीथा टीचर आल्या आणि आपल्या अंग्लो-द्रविडीयन भाषणाने आम्हां सगळ्या पालकांना सुन्न करून घाईघाईतच निघून गेल्या. त्यांच्या त्या छोटेखानी भाषणा नंतर प्रत्येक पालकाला “कसं होणार आपल्या मुलाचं?” हाच प्रश्न पडला असेल. ललीथा टीचर सोडल्या तर बाकी सगळं मराठमोळं वातावरण होतं पण अट्टाहास मात्र इंग्रजीचा होता. सहाजिकच आहे मुलांना इंग्रजीची सवय व्हावी … आणि त्यांच्या पालकांना देखील म्हणूनच असावं कदाचित. आणि समोर उभ्या असलेल्या समस्त टीचरांच इंग्रजी आपल्याच पातळीचे आहे हे बघून किती हायसं वाटलं ते फक्त माझी बायकोच जणू शकते. शेवटी मी पडलो मराठी माध्यमात शिकलेला मराठमोळा गडी. कुणी उगाच पाश्चात्यांचे अनुकरण करून त्यांच्या सारखे फाडफाड (तोंडातल्या तोंडात) इंग्रजी बोलत असेल तर उगाच पातेल्यात पॉपकॉर्न वाजतायत असं वाटत.

शेजारी वळून बघितलं तर बायको परत गप्पा मारण्यात गुंग होती. आता कोपरा मारायचा चान्स मला होता ….. पण मी मारला नाही ;). तिला हळूच म्हटलं “इथे सगळ्या टीचर बायकाच आहेत त्यामुळे तूच बोल. नाहीतर मी काहीतरी बोलायचो आणि त्यांना नीट समजायचं नाही.” माझी इंग्रजीशी असलेली आपुलकी, जिव्हाळा हिला ज्ञात असल्याने ती गालातल्या गालात हसून म्हणाली “मला माहीतच होतं … तुला इथे काही जमणार नाही …. आता मी बघ कशी बोलते ते”. आपण इथे भांडायला आलो नसून पेरेंट्स मीट साठी आलो असल्याची तिला जरा आठवण करून दिली आणि तिच्या प्रत्युत्तराची वाट न बघता मुलगी कुठे गेली हे बघण्यासाठी उगीच बगळ्या सारखी मान इकडे तिकडे करून बघू लागलो आणि बरगड्यांना हिचा कोपरा परत एकदा लागला.

अश्या रीतीने आमच्या पहिल्या वहिल्या पालकांच्या सभेला सुरुवात झाली. समोर प्रत्येक विषयासाठी एक अशा गणतीने शिक्षकवर्ग उभा होता. इथे देखील ‘म्याडम’चेच वर्चस्व दिसून येत होते. शारीरिक शिक्षण आणि चित्रकला या दोन विषयांसाठी सर लोकांची नेमणूक होती. चित्रकलेचे पाटील सर अगदीच केस कमी झालेल्या झिरो नंबरच्या कुंचल्या सारखे तर पिटीचे भुजबळ सर मात्र एखाद्या पैलवानासारखे होते. थोडक्यात काय तर विषयानुरूप आशय होता ;). बहुसंख्यांक मध्ये अल्पसंख्यांक कसे दबून असतात त्याचं प्रमाणे ते दोन सदगृहस्थ एका कोपऱ्यात निवांत उभे होते. उपस्थित पालक वर्गाला आपल्या पाल्याबाबत या विषयांबद्दल कुठलीही शंका नसणार याची खात्रीच त्या उभयतांना असावी आणि म्हणूनच ते निवांत असावेत. विद्यार्थी देखील त्यांच्याशी विशेष जवळीक नसल्याने शिवाशिवीचा खेळ खेळत नव्हते. एकदा माझी मुलगी नकळत त्या धिप्पाड भुजबळ सरांच्या समोर गेली, आपण चुकालेलो आहोत असं दाखवून परत आमच्या इथे पोचली.शाळा सुरु होऊन एकच महिना झाला होता त्यामुळे या अल्पसंख्यांक गटाशी जवळीक झाली नसावी. पण एकंदरीतच सगळा विद्यार्थीवर्ग ललीथा मय होता.

आता शिक्षकांची ओळख परेड सुरु झाली. समोरच्या घोळक्यातून एक शिक्षिका पुढे आली. “मी प्राजक्ता मराठे. मी या शाळेत मराठी शिकवते” वा ..काय योगायोग ..आडनाव मराठे आणि शिकवणार मराठी. पण मिस का मिसेस ते नाही सांगितलं ना. या मराठे बाई अतिशय शुद्ध आणि स्पष्ट शब्दात पूर्ण वर्षाची रूपरेषा देत होत्या. चला! इंग्रजी माध्यमात प्रवेश घेउन सुद्धा मुलीचे मराठी बऱ्या प्रमाणात शाबूत राहील याची खात्री पटली. नंतर आल्या मुलांना इंग्रजी शिकवणाऱ्या डेझी महाजन. त्यांनी नाव सांगताच मी आणि माझ्या पत्नीने एकमेकांकडे पहिले. मी म्हटलं “हायब्रीड प्रकरण दिसतंय”. माझ्या मताशी सहमत झाली तर ती बायको कसली? “छे तुझं आपलं काहीतरीच ठेवलं असेल आवडीने” बायकोने तिचं मत प्रदर्शन करताना म्हटलं “आता तुझ्या कॉलेज मध्ये नव्हता का ….कोण तो फिरोज इनामदार? थांब जायच्या आत त्या महाजन ची माहिती मिळवते.” घ्या आता हिला काय सांगणार इनामदार हे आडनाव मुस्लीम लोकात पण असतं म्हणून (इथे ही सोयीस्कर रित्या शफी इनामदार या गुणी कलावंताला विसरली हे अध्यारुत). आणि ही जायच्या आत त्या डेझी ची माहिती काढणार होती….खरंच गुप्तहेर व्हायला हवं होतं हिने. आत्ता पर्यंत मारलेले कोपऱ्याचे धक्के लक्षात घेऊन मी गप्प बसणंच योग्य असं ठरवून त्या डेझीचं “डेली रुटीन” ऐकू लागलो.

नुकतीच कॉलेज मधून सुटून डायरेक्ट शाळेत शिकवायला आलेल्या अल्पवयीन मुलीसारखी दिसत होती. प्रार्थनेला सगळी मुळे उभी राहिली तर शेवटच्या बेंच वरील मुलाला केवळ तिच्या बॉबकट चे भुरभुरणारे केस दिसू शकतील. ;). अश्या किरकोळ अंगकाठीच्या डेझीची इंग्रजीवर उत्तम कमांड होती. बोलण्याचा बाज हा उगीच आंग्ल पद्धतीचा अंगीकार केल्यासारखा फुटाणे उडवत होता. एक दोन वेळा तर तिला ओरडून सांगावसं वाटत होतं की बाई तोंडातली लिमलेट फेकून दे आणि प्रत्येक शब्द सावकाश उच्चार. पण कदाचित तिने आमच्या चेहेऱ्या वरचे भाव जाणून आम्हाला कळेल इतपत थोडं भारतीय पद्धतीचं इंग्रजी बोलू लागली. तितक्यात कुणीतरी शंका विचारण्यासाठी हात वर केला तर लगेच डेझी बाई म्हणाल्या,”Please note down all your queries. we would like to answer all your questions post this introductory session.” तिच्या अश्या सडेतोड उत्तराबरोबर तो हात ज्या जोमाने उठला होता तसाच परत म्यान झाला. डेझीची १० मिनिटांची लाघवी बडबड झाल्यावर समोर आल्या त्या बंगाली आहेत हे कुणी पण सांगितलं असतं. सावळा वर्ण, ठसठशीत लाल कुंकू आणि त्याच कुंकवाने भरलेला भांग, गोबरे गाल आणि त्या सगळ्या अवतारात उठून दिसणारी छानशी खळी. नाव कोमोली मुखर्जी, सायन्सच्या टीचर. बरीच वर्षे महाराष्ट्रात राहिल्याने मराठी पण चांगलं येत असावं असं त्यांच्या संभाषणातून जाणवत होतं. त्यांनी त्यांची आणि विषयाची माहिती दिली. मधूनच हुं हुं हुं हसण्याची त्यांची लडिवाळ सवय हिला मात्र खटकली आणि “काय सारखी खिदळत आहे.” असं कुजबुजली. मी म्हटलं पण छान खळी पडते हसताना. असून दे असून दे इतकंच प्रत्युत्तर ऐकू आलं.

(क्रमशः)

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s